वेध – व्यापक ऊर्जेचं व्यासपीठ

वेध – व्यापक ऊर्जेचं व्यासपीठ

वेध – व्यापक ऊर्जेचं व्यासपीठ

मला स्वतःला अदभुतरम्य गोष्टी खूप आवडतात. त्या काल्पनिक असतात, दंतकथा असतात हे मनाला नीट माहीत असतं. पण तरीही त्या आवडतात कारण त्या स्वप्नं बघायला शिकवतात, अशक्य ते शक्य करण्याची प्रेरणा देतात आणि धाडसी बनवतात असं मला वाटतं. अशा दंतकथा किंवा चमत्कारी वाटाव्यात अशा व्यक्ती जर प्रत्यक्ष आयुष्यात भेटत असतील तर त्याला काय म्हणावं? हो, अशा व्यक्ती मला भेटतात याचा मला खूप आनंद वाटतो. त्यातली एक व्यक्ती म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी – अफाट उत्साहाचा प्रवाही धबधबा! हा माणूस कधी तोंड लटकावून बसलेला मला दिसत नाही किंवा मी थकलोय म्हणून आराम करतानाही दिसत नाही. इतका कल्पक की डॉक्टरी करून गप्प बसावं की! पण नाही. हा मनुष्य त्या व्यवसायाला जोडून इतके उपक्रम राबवतो की एकटा माणूस हे कसं करू शकतो म्हणून इतरांनी आपल्या तोंडात आश्‍चर्यानं बोटं घालावीत.

डॉ. आनंद नाडकर्णी एक प्रथितयश मानसोपचारतज्ज्ञ, जाणता लेखक, प्रभावी समुपदेशक, संवेदनशील कवी, सामाजिक कार्यकर्ता, द्रष्टा नाटककार, कुशल संगीतकार आणि गायक, व्यवस्थापक, ओजस्वी वक्ता आणि प्रशिक्षक आणि आणखी काय काय…..यादी न संपणारी…..आयपीएच (इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ) या संस्थेच्या छत्रीखाली समाजाभिमुख अनेक उपक्रम चालवले जातात. त्यातला वेध हा उपक्रम ११ जिल्ह्यात संपन्न होतो. वेध उपक्रम गेली २३ वर्ष सुरू असून हा उपक्रम शालेय आणि महाविद्यालयीन तरुणांना पुढली दिशा ठरवण्यासाठी व्यवसाय मार्गदर्शक म्हणून त्याचं सुरुवातीचं स्वरूप होतं. मी प्रत्येक वर्षी या कार्यक्रमात सहभागी होऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटते.  मला वाटतं हा उपक्रम किशोरवयीन मुलांनाच नव्हे, महाविद्यालयीन तरुणांनाही नव्हे तर प्रत्येक वयोगटातल्या स्त्री-पुरुषांसाठी आहे. आजच्या या चंगळवादी, व्यक्तिकेंद्रित आणि धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण मानसिक आणि शारीरिक पातळीवर थकून जातोय. त्याला नवऊर्जा देण्याचं काम ‘वेध’सारखे उपक्रम करताहेत.

पुणे वेधचं सातवं वर्ष ९ आणि १० सप्टेंबर २०१७ या दिवशी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात संपन्न झालं. दीड दिवसामध्ये आपल्या कर्तृत्वानं प्रतिकुल गोष्टींशी सामना करत अनुकूल मार्ग बनवणारे १४ लोक सामील झाले होते. या सगळ्यांच्या सहवासात राहून त्यांना अनुभवणं अतिशय विलक्षण आणि थरारून टाकणारा अनुभव होता. पुणे वेधचे संयोजक दीपक पळशीकर आणि त्यांची टीम प्रत्येक वर्षी अतिशय परिश्रमपूर्वक हा उपक्रम यशस्वी करत असते. प्रत्येक वर्षी ‘वेध’ची थीम (संकल्पना) वेगळी असते. या वर्षी ‘प्रतिकूल ते अनुकूल’ अशी थीम होती आणि या थीमचं गीत अर्थातच डॉ. आनंद नाडकर्णी यांनी रचलं आणि संगीतबद्ध केलं होतं.

अपनी धुन मे मगन रहो तो

सुखदुखसे क्या लेना देना

घनी  रात या नया सवेरा

आसमॉनको बस है छुना….

धडकेगा ये कभी कभी दिल

राह बनेगी मुश्किल मुश्किल

खुदासे ज्यादा खुदपे भरोसा

हर कठनाई आना जाना….

कदम कदम है नन्ही मंझील

भूल गये हम रोना धोना……

ढले न पलभर लक्ष्यसे नजर

मायूसीसे रहे बेखबर

हसते हसते मान लिया अब

आँधी और तुफॉंका होना…..

सुचेता कडेठाणकर ही जगातलं पाचवं सगळ्यात मोठं गोबीचं वाळवंट ५५ दिवसांत २०११ साली पायी पार करणारी पहिली भारतीय महिला आहे. सुचेता ही वेधच्या व्यासपीठावर फॅकल्टी म्हणून आली आणि ती आज वेधची कार्यकर्ती बनली आहे. ‘गोबी वाळवंटानं मला जिंकायची भावना खूप क्षणभंगूर असल्याची जाणीव दिली. स्पर्धा, जिंकणं हे अतिशय निरर्थक आहे. सगळ्यांनी एकत्र प्रवास करताहेत म्हणून तो प्रवास तो एकट्याचाही आहे आणि सगळ्यांचाही झाला. या प्रवासानं मला संयम शिकवला. मला गोबीच्या वाळवंटात गवसलेली हिरवळ म्हणजे मीच’ असं सुचेतानं सांगितलं.

लीलावतीज डॉटर म्हणून ओळखली जाणारी शास्त्रज्ञ प्रियदर्शिनी कर्वे! जैवतंत्रज्ञानापासून इंधननिर्मिती असं काम! प्रियदर्शिनी प्रवाहात असलेली संशोधक आहे. उद्योजिका आहे. पदार्थविज्ञानात शिक्षण घेतलेल्या प्रियदर्शिनीनं धूरविरहित चुलीवर काम केलं.

डॉक्टर आणि आयआयटीतून इंजिनियर झालेला उद्योजक अभिषेक सेन! टेक्नॉलॉजीचा आरोग्याशी संबंध लावून आरोग्याच्या सुविधा ग्रामीण पातळीपर्यंत नेणं हे त्याचं ध्येय आहे. आरोग्याशी संबंधित उपकरणं बनवणं आणि ते किफायतशीर दरात गावापर्यंत पोहोचवणं अभिषेक करतो आहे.

वयाच्या २५ व्या वर्षीपासून बीडजवळच्या गेवराई इथे सहारा अनाथालाय स्थापून ८५ मुलांना पालकत्व देणारा संतोष गर्जे! उजाड माळरानावर त्यानं मायेचं घर फुलवलंय. ऊसतोड कामगाराचा मुलगा असलेल्या संतोषवर बहिणीचा मृत्यू आणि वडलांचं घरातून परागंदा होणं या आघातांनी खूप मोठा परिणाम झाला. बहिणीचं मूल वाढवताना त्याच्या मनात अशा अनाथ झालेल्या अनेक मुलांचा विचार मनात आला आणि त्यातूनच त्यानं अशा मुलांना घर देण्याचा निश्‍चय केला.

बॉर्डरलेस फाऊंडेशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी उभा राहिलेला मूळचा पुण्याचा असलेला शेतकरी कुटुंबातला असा अधिक कदम! काश्मीरमध्ये कूपवाडा जिल्ह्यात अतिरेकी कारवाया चालतात. तिथे अतिरेक्यांशी संवाद करून आपलं काम करणारा अधिक! अशा मुलींना शिकवून त्यांना घर देऊन त्यांची लग्नं करून देणारा अधिक हा तरुण एवढ्या लहान वयात खूप मोठं काम करतोय. तिथल्या लोकांच्या वेदनांमधून तो शिकत गेला. आपला जन्मच मुळी देण्यासाठी आहे असं तो मानतो. या मुलींनी शांतीदूत (पीस मेसेंजर) बनायला हवं असं त्याला वाटतं आणि त्या दृष्टीने तो प्रयत्नशील आहे.

खेड्यापाड्यातल्या मुलांमध्ये ग्यान की लायब्ररीच्या माध्यमातून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी जगातल्या सर्वात मोठ्या प्रकल्पाचे जनक प्रदीप लोखंडे! प्रदीप आणि वेध चळवळीचा जुना संबंध आहे. पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया असं प्रदीपला म्हणावं लागेल कारण गांधीजीनंतर पोस्टकार्डचा उपयोग इतक्या कल्पकतेनं प्रदीपनं केलाय.

‘वेचक वेधक’ या वेधच्या प्रकाशित होणार्‍या पुस्तकाच्या शब्दांकन करणार्‍या वंदना अत्रे! नाशिकमधल्या पहिल्या ज्येष्ठ महिला पत्रकार आहेत. लेखिका आहेत. गावकरीच्या सहसंपादक. दुर्धर रोगाशी मैत्री करत त्या आज कार्यरत आहेत. त्यांच्या कार्यात त्यांची ऊर्जा साठलेली आहे. तीन वेळा कॅन्सरनं हल्ला केल्यावरही त्यांनी त्याला परतवून लावलं आहे. रेडिएशन्स किमोथेरपी या सगळ्या उपचारांमुळे वंदनाताईंचे केस गेले. आता त्यांनी केस गेलेलं डोकं रुमालानं झाकणं बंद केलं. त्यांनी आरशात पाहून स्वतःला विचारलं, मी जर मलाच आवडत नसेल तर काय उपयोग? लोकांना अशा रुपात मी आवडो न आवडो मला मात्र मी अशीही आवडतेच आहे. आणि त्या व्यासपीठावर ज्या आत्मविश्‍वासाने प्रसन्नपणे उत्तरं देत होत्या, त्यातच त्यांचं सौंदर्य सगळ्यांना दिसत होतं.

विवेक सावंत

एमकेसीएल द्वारे संगणक साक्षरता केवळ भारतातच नव्हे तर जगातल्या अनेक देशांत पसरवणारे एमकेसीएलचे व्यवस्थापकीय संचालक म्हणजे विवेक सावंत! परम संगणक बनवण्याच्या प्रक्रियेतली महत्त्वाची व्यक्ती म्हणजे विवेक सावंत!  सेल्फ लर्निंग ही आमच्या कामाची पद्धत आहे असं ते म्हणाले. इन्फॉर्म, पफॉर्म आणि ट्रान्स्फॉर्म अशा स्टेप्सनी आम्ही काम करतो. काम करताना येणारे काही गमतशीर अनुभव त्यांनी शेअर केले आणि वातावरण खुसखुशीत केलं. ते म्हणाले, ‘आम्ही घानात गेलो, तिथं मोठ्या प्रमाणात काम करायचं होतं. घानामधले प्रमुख मंत्री होते त्यांची भेट झाली. तुम्ही कसं शिकवता यावर बोलताना लग्नाची निमंत्रण पत्रिका मुलं कशी बनवून खरी कमाई करतात हे आम्ही त्यांना सांगितलं. त्यातून ते एमएससीआयटीची फी भरू शकतात असंही आम्ही सांगितलं. माझं बोलणं झाल्यावरही ते गंभीर होते. मी त्यांना काय प्रॉब्लेम आहे असं विचारलं, तेव्हा ते म्हणाले आमच्याकडे  लग्नाच्या निमंत्रण पत्रिका वगैरे नसतात, लग्नं होतात आणि तुटतात. मी विचारलं मग तुम्ही निमंत्रण पत्रिका कशाच्या करता, तर ते म्हणाले, आमच्याकडे अंत्यविधी साजरा करतो, तेव्हा त्या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिका आम्ही करतो. आणि हे अंत्यविधीचे कार्यक्रम आम्ही वर्षभर करतो. तर तुम्ही फ्यूनरल इन्व्हिटेशन कार्डस करायला आमच्या लोकांना शिकवा.’ प्रत्येक ठिकाणची संस्कृती कशी वेगळी असते आणि त्यामुळे काय गडबडी होतात त्याबद्दल विवेक सावंत बोलले. ते म्हणाले, ‘सौदी अरेबियात वेगळाच अनुभव आला. एक कंपनी तिथे गेली. त्यांची जाहिरात होती, मळलेले कपडे साबण लावलं की कसे स्वच्छ होतात. त्यांनी आपल्या जाहिरातीतून ते दाखवलं. पण त्यांना ठाऊकच नव्हतं की तिथले कम्प्युटर हे उलट बाजूनं चालवले जातात. त्यामुळे हीच जाहिरात त्यांच्याकडे दिसताना स्वच्छ कपडा साबण लावताच कसा मळका होतो असं दिसलं आणि परिणाम जो व्हायचा तोच झाला.’ विवेक सावंत म्हणाले, आता भाषांमधले अडसर तंत्रज्ञान दूर करतं आहे. वसुधैव कुटुंबकमकडे जाण्याची पहाट होते आहे असं मी म्हणेन. सध्या तंत्रज्ञानानं वसुधैव मार्केटम केलंय.

हे महासत्र खूपच रंगतदार झालं. वेधमध्ये सामील झालेल्या काही निवडक प्रेरक तरुणांच्या मुलाखती ‘वेचकवेधक’ या पुस्तकात समाविष्ट केल्या असून या पुस्तकाचं शब्दांकन आणि संपादन वंदना अत्रे यांनी केलं आणि या पुस्तकाचं प्रकाशन झालं.

डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले, ‘प्रतिकूलता आणि अनुकूलता’ म्हणजे काय तर समोरच्या आव्हानांकडे आपण कसं बघणार याच्या दष्टिकोनावरच अवंलबून आहे. ज्ञानेश्‍वर म्हणतात, वारा हा झाडाला भेटतो आणि पुढे निघून जातो पण फांद्यात तो राहतो. म्हणजे त्याच्या फांद्या या डोलत राहतात. तसं आजचं हे महासत्र जरी संपलं तरी आपल्या मनातल्या फांद्यामधून तो संवाद डोलत राहणार आहे’

………..                                                                       जितेंद्र जोशी

दुसर्‍या सत्रात प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि कवी जितेंद्र जोशी उपस्थित श्रोत्यांच्या समोर आला. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी त्याला बोलतं केलं. जितेंद्रला अभिनेता म्हणून पडद्यावर बघणं आणि प्रत्यक्षात माणूस म्हणून त्याला अनुभवणं हे वेगळेच अनुभव होते. जितेंद्रमधला अभिनेता जेवढा भावतो, त्यापेक्षा कितीतरी अधिक पट त्याच्यातला माणूस आणि त्यामुळे त्याच्यात आजही जिवंत असलेला कवी सगळ्यांनाच खूप खूप भावला. आत्मकेंद्री वृत्तीवर कडाडून टीका जितेंद्रनं केली. लोकप्रियता, मान्यता हे आपल्या जगण्याचे बायप्रॉडक्ट म्हणून आले तर काहीच हरकत नाही, पण जगण्यासाठी ते मुख्य नसावेत. जितेंद्रनं आपल्यातला कवी त्याच्या जीवनसंघर्षात जपून ठेवला. एका दुभंगलेल्या कुटुंबात जन्मलेल्या जितेंद्रनं स्वतःला घडवलं.

अनुभव खूप आला की अजिबात न शिकणारी माणसं आपल्या आजूबाजूला खूप असतात. त्यासाठी अनुभवाच्या वर्गात बसलं पाहिजे. अनुभव घेण्यासाठी भावनिक सच्छिद्रता असणं आवश्यक आहे, असं तो म्हणाला.

जितेंद्रचा जन्म पुण्यातला. जितेंद्रनं आपलं काम १९९८ पासून सुरू केलं. इंटरनेटवर मी इंजिनिअर असल्याची चुकीची माहिती असून मी फक्त एफवाय बीकॉम असल्याचं त्यानं प्रांजलपणे कबूल केलं. जितेंद्रच्या आईनं खूप चढउतार झेलले. ती अतिशय स्वाभिमानी स्त्री! लहानपणी ‘राजा भिकारी माझी टोपी घेतली’ अशा प्रसिध्द गोष्टीवर आधारित नाटकात जितेंद्रनं काम केलं. त्यात धोब्याचं काम करत असताना राजा गप्प आणि धेाबी मोठमोठ्यानं बोलताना बघून शिक्षिकेनं जितेंद्रची धोब्याची भूमिका रद्द करून राजाचीच भूमिका त्याला दिली. अशा रीतीनं नाटक सुरू झालं.

शाळेत असताना वडलांमुळे जितेंद्रला खूप त्रास झाला. त्याला खूप छळलं गेलं. वडलाचं दारू पिणं, गुन्हे करणं या गोष्टींमुळे ते बदनाम होते. शाळेत या गोष्टींची कुजबूज कानावर पडाची आणि शाळेत जाणंच मग त्याला नकोसं वाटायचं. सातवीत असताना जितेंद्रनं ती  शाळा सोडली आणि दुसर्‍या शाळेत तो गेला. तिथे दशरथसिंग गुलाबसिंग परदेशी हे शिक्षक त्याला भेटले आणि आईनंतर जितेंद्र फक्त त्यांनाच मानू लागला. कारण त्यांनी जितेंद्रमध्ये खूप चांगले बदल घडवले. त्यांच्यामुळेच नाटकाकडे तो वळला. सतीश आळेकर, चंद्रकांत काळे, विक्रम गोखले, संजय मोने आणि परेश मोकाशी यांना जितेंद्र मानतो. जितेंद्र निसर्ग आणि संगीत, तसंच कला यांमध्ये परमेश्‍वराला बघतो.

जितेंद्र सध्या सत्यजीत भटकलसोबत पाणी पंचायतचं काम करतोय. जो महाराष्ट्र माहीत नव्हता तो थोडासा कळतोय, असं तो म्हणाला. सध्या भाषावाद, प्रांतवाद आणि एकूणच चाललेल्या जातीय गोष्टींविषयीची त्याची अस्वस्थता तो लपवू शकला नाही. गौरी लंकेशला गोळी झाडली गेली आणि दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी प्रमाणेच आणखी एक विचार संपवण्याचा प्रयत्न झाला. जितेंद्र म्हणाला, ‘मला बोललंच पाहिजे कारण बोलल्यानं जर हत्या होत असतील आणि न बोलण्यानं मुर्दाड जगणं जगायचं असेल तर मी बोलणं पसंत करेन.’ त्यानं गौरी लंकेशच्या मृत्यूनंतर अस्वस्थतेतून लिहिलेली कविता याप्रसंगी सादर केली.

इतनी आवाजे अनगिनत इच्छाये

पल पल का बैर

घडी घडी का बखेडा

कितीनी घडिया है जिसने

मुझसे मुझि को छेडा

कोख काली है या उजली है

पैदाईश मगर मेरी धुंधली है

मै बदन मे रेंगते कीडे की कोशीश

मै शौकिन नजर अंदाज अधुरी ख्वाहिश

हुआ जब मै पैदा तब, भीडसे एक आवाज आयी

बधाई हो बधाई

आपके घर जनाजा हुआ है

आपने मरी हुयी इच्छाओको पैदा किया है

सुनने वालोने फिरभी मिठाई बॉटी

क्युंकी लाईव्ह एफबी चल रहा था

कुछ लोगोने प्यार जताया

क्युंकी मिडीया का सीना मचल रहा था

धर्मोके कुछ रखवाले आये

जनेऊ खतने का सामान लाये

मेरी मरी आयडेंटिटीपर

सरनेम लग गया

मरा हुआ मै फिरसे रिच्युअल्स मे मर गया

फिर पढता रहा जो उन्होने पढाया

जहर उगलता रहा जो उन्होने उगलवाया

एक दिन बिच बजार

अखंड भारत के नक्शे पर

एक पत्थर मेरी बच्ची को लगा

दुसरी बच्ची के हाथ से निकला

उस बच्ची का बाप

मेरीही बच्ची के बचपनसे निकला

बाप के हाथो गीता और कुरान थी

धर्म आखरी सॉस ले रहा था

फिर भी उस इंसान मे जान थी

जान जरूरी है जैसे मरने के लिए

मै, मेरी बच्च और वो बाप उसकी बच्ची भी जिंदा है

दुनिया से डरने के लिए

वो बाप मेरे सामने आया

मैने ना शिकायत की

ना ही उसे कुछ समझा पाया

उसकी नीली ऑखोमे नाखुनोमे

खून सुख गया था जम गया था

मैने उससे भूख जताई

तो उसे अपने पुरे खानदान की याद आयी

मैने पूछा खाओगे या मरवाओगे

वो बोला

आप जरूर पॉलिटिक्समे जाओगे

मैने मेरी बच्ची के माथेसे खून साफ किया

उस बाप बच्ची के साथ

हम दोनो को भी खाना दिया

वो बोला

माफी तो न मॉंगूगा

मगर कभी कश्मिर आना

मुझे तुमको भी है मेरे पुश्तोका रोना रुलाना

मैने कहा हिन्दुस्थान और मेरा परिवार आबाद है

वो बोला, आजा मिलने वही

फिर समझ लेना, तू भी कहॉं आझाद है

वो चला गया तबसे उसको खबरोमे ढुढता हँ

और उसके किस्से सुनाता हू

मरा हुआ मै हर साल

जोरो शोरोंसे अपना बर्थडे मनाता हुं

संपूर्ण सत्र जितेंद्रमय झालं होतं. तो कसाही वाहत होता. त्याच्या प्रवाहाला बांध घालणं कोणासाठीही केवळ अशक्य होतं. मात्र डॉ. आनंद नाडकर्णीमधल्या कुशल मुलाखतकारानं त्याला हवं तसं वळवत, बांध घालत लोकांपर्यंत पोहोचवलं. जितेंद्र हा अतिशय सच्चा, प्रामाणिक आणि पारदर्शी कलाकार आणि माणूस असल्याचं जाणवत गेलं. त्यानं वयाच्या २३ व्या वर्षी लिहिलेली एक कविता त्यानं सादर केली आणि हे सत्र संपलं.

शून्य

एक शून्य चाहिये

ठहरा ठहरा रुका रुका

विचारोंका मोसम

तापमान भी न्यून चाहिये

एक शून्य चाहिये

शून्य सफल है शून्य से ही

शून्य असफल है शून्य से ही

शून्योका अभी अर्थ ना पूछो

मुझे जैसे अर्थशून्य से ही

शून्योका कब कहा ठिकाना

शून्योका कैसे मिल पाना

जिस संख्या से करो कम

गुनो, मिलाओ

फिर भी शून्य है

शून्य सरल हे दुनिया का स्तर

शून्य से डरता मनुष्य और ईश्‍वर

शून्य भँवर है फस जायेगा

शून्य है बंधन डस जायेगा

शून्य विविधता न दिखलाये

शून्य आशा भी सिखाये

शून्य है अलग एक सा दिखता

गर्भ शून्य था मा जब जन्मी

मै भा शून्य गर्भ जब जन्मा

शून्य सफर से शून्य सफर तक

शून्य से उपर शून्य बसर तक

मै एक शून्य अब बनना चाहूँ

हूं एक शून्य गर मिल ना पाऊँ

……….

दुसरा दिवस

१० सप्टेंबरला सकाळी साडेनऊ वाजता सत्रं सुरू झाली.

‘टेंपल मॅन ऑफ इंडिया’ – के. के. महम्मद

‘टेंपल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे के. के. महम्मद यांचं सत्र ऐकणं हा अतिशय रोमांचित करणारा अनुभव होता. हिंदूस्थानवर १७ स्वार्‍या करणारा गझनीचा महंमद आपल्याला माहीत आहे, पण २०० हिंदू देवालयाचं पुनरुज्जिवन करणारा महंमद म्हणजे के. के. महम्मद! केरळमधल्या कालिकात इथल्या कुटुंबातले के. के. महमंद हे भारतीय पुरातत्व विभागात रिजनल डायरेक्टर म्हणून निवृत्त झाले. अनेक संस्थांचे ते सल्लागार आहेत. वेगवेगळ्या राज्यातल्या एैतिहासिक स्थळांचं पुनरुज्जीवन त्यांनी केलं. चंबळच्या खोर्‍यातल्या २०० देवालयांचं पुनरुज्जीवन केलं. त्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं.

एका मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या के. के. महमंद यांनी सत्राची सुरुवात करतानाच संस्कृत श्‍लोकानं गणेश वंदना म्हटली. कोणत्याही चांगल्या गोष्टीची सुरुवात गणेश वंदनेनं करावी असं ते म्हणाले आणि सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. अतिशय स्पष्ट शब्दोच्चार आणि संस्कृतवर असलेलं त्यांचं प्रभुत्व उपस्थितांच्या लक्षात आलं. अतिशय नम्रतेनं त्यांनी उपस्थितांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. माणसातलं माणूसपण जिवंत असेल तर तो जातीधर्माच्या भिंती ओलांडून प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य शोधतो हे सत्राच्या सुरुवातीनं लक्षात आणून दिलं. आयुष्यात प्रतिकुलतेचं असणं अत्यंत गरजेचं आहे असं त्यांना वाटतं.

शाळेत असतानाच ऐतिहासिक गोष्टींनी आपल्याला कसं आकर्षित केलं आणि तोच आपल्या जगण्याचा ध्यास बनला असं के. के. महमंद म्हणाले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देत शिक्षण पूर्ण झाल्यावर पुरातत्व विभागात नोकरीला लागलेल्या महंमद यांनी आपल्या नोकरीकडे नोकरी म्हणून न बघता आपल्या जगण्याचा एक हिस्सा मानलं. ते झपाटल्यासारखे जंगलातून, दर्‍याखोर्‍यातून फिरत होते. त्यांना अनेक पडझड झालेले तर काही जमीनदोस्त झालेले ऐसिहासिक, पौराणिक अवशेष या वाटेवर दिसत होते. विखुरलेले, खंडहर झालेले भग्नावशेष पाहताना त्यांच्या डोळ्यासमोर मात्र त्याचं मूळ रूप मूळ सौंदर्य उभं राहत होतं. त्यांनी प्रत्येक पडझड झालेल्या दगडधोंड्यांना एकत्र करून पुन्हा त्या वास्तू उभारल्या. एक एक वास्तू उभारली गेल्यावर तिला बघणं हा नवनिर्मितीचा आणि त्या वास्तूच्या पुर्नजन्माचा क्षण होता. बिहारमध्ये काम करताना, जेव्हा २०० हिंदू देवालयांचे अवशेष के.के.ना दिसले तेव्हा तिथे असलेले डाकू आणि हिंस्त्र श्‍वापदं यांची भीती होती. पण त्या कशाचीही पर्वा न करता के. के. कामाला लागले. डाकूंशी संवाद साधून त्यांना आपलंसं केलं. आज ही २०० हिंदू देवालयं ज्या दिमाखात उभी आहेत, त्यांना पाहून हा माणूस हे कसं करू शकला असेल यावर विश्‍वासच बसत नाही. प्रत्येक खांब, त्याचे इतर अनेक भाग शोधणं, एक एक वास्तू पूर्वी होती तशीच आणि त्याच जागेवर उभी करणं यासाठी जी नजर हवी ती जादुई नजर के.के.मध्ये आहे.

के. के. यांचा धर्म कोणता असं डॉ. आनंद नाडकर्णी यांनी विचारल्यावर आर्कियॉलॉजी हाच आपला धर्म असं म्हणणार्‍या के.के. कडे पाहून आपलं काम हाच आपला परमेश्‍वर हेच ते सांगत असावेत असं वाटलं. के. के. सारखी हिर्‍यासारखी माणसं बघायला, ऐकायला आणि अनुभवायला मिळणं हे खरोखरंच भाग्यच म्हणायला हवं.

………………………..

एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपची संस्थापक यशोदा वाकणकर

डायबेटिसची समुपदेशक आणि एज्युकेटर विद्या संजय गोखले

स्किझोफ्रेनिया सपोर्ट ग्रुपमध्ये आयपीचच्या माध्यमातून काम करणारी अस्मिता अजित मोकाशी

यांच्या सहभागानं दुसर्‍या सत्राला सुरुवात झाली. डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी तिघींचं स्वागत केलं.

‘जगण्याच्या सार्थकाची लागलीया आस….’ आपण सगळेच जगत असतो पण या जगण्याची आस काय यासाठी या सत्रातल्या सहभागी तिघींचा प्रतिकूलतेतून केलेला प्रवास बघायला मिळाला. स्वपासून सामाजिकतेकडे या तिघींचा प्रवास सुरू आहे.

यशोदा वाकणकर

कमर्शिअल आर्टिस्ट असलेली यशोदा आज एपिलेप्सी ग्रुपची संस्थापक आहे. त्यात तिनं प्रचंड मोठं काम उभं केलं असून तिनं त्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळवले आहेत.

वयाच्या सातव्या वर्षीपासून यशोला फीट यायला सुरुवात झाली. समाजात या विकाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. यशोच्या आई-वडलांनी ही परिस्थिती खूप चांगल्या पद्धतीनं हाताळली. आपण अनिल-सुनंदा अवचट यांची मुलगी आहोत याचा तिला खूप अभिमान वाटतो. आपल्याला होणारा त्रास हा त्याचा त्यांनी खूप बाऊ केला नाही. फिट हा शब्दही त्यांनी कधी उच्चारला नाही. ते त्या वेळी छोटा त्रास, मोठा त्रास असं म्हणत. तिला घ्याव्या लागणार्‍या गोळया घेण्यासाठी तिनं स्वावलंबी व्हावं यासाठी तिनं सकाळच्या गोळ्यांना सूर्याचं चित्र तर सायंकाळच्या गोळ्यांना चंद्राचं चित्र काढून त्या स्वतः घ्यायला सुरुवात केली. चित्रं काढणं, गाणं शिकणं या गोष्टींनी एपिलेप्सीवर मात करता आली.

यशोच्या आईवडलांनी तिला खूप सहजपणे वाढवलं, पण बाहेरच्या लोकांना या विकाराविषयी नीट माहीत नसल्यानं ते सहानुभूती दाखवत. हिला वेड लागलंय, चप्पल आणा, कांदा आणा. हे कानावर पडल्यावर तिला राग यायचा, पण लोक काहीही म्हणाली तरी ते मनावर घ्यायचं नाही हे आईवडलांनी तिच्या मनावर  बिंबवलं. या आजाराला बरोबर घेऊन यशोनं तिचं शिक्षण पूर्ण केलं. या आजारावर एक मेंदूची शस्त्रक्रिया आहे हे कळल्यावर ती करण्याचा निर्णय तिनं घेतला. पराग हा यशोचा जोडीदार तिला एपिलेप्सी आहे हे माहीत असूनही त्यानं लग्न केलं. तिला अतिशय सुरेख साथ दिली आणि देतोय.

एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप काढू या असं यशोच्या मनात आल्यावर तिनं सल्ला घेण्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णीकडे ठाण्यात धाव घेतली. आपल्याला असं असं करावं वाटतं असं सांगताच डॉ. आनंद नाडकर्णींनी तिला खिशातून हजार रुपये काढून दिले आणि ही तुझ्या सपोर्ट ग्रुपसाठीची पहिली मदत असं सांगितलं. त्यानंतर या ग्रुपचं काम सुरू झालं. सुरुवातीला लोक येतील का नाही अशी भीती यशोला वाटली. पण तिच्या बाबानं तिला सांगितलं, नाहीच आले तर तू आणि मी असणारच आहोत की! पहिल्याच मिटिंगला ४० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते. या सपोर्ट ग्रुपमुळे अशा रुग्णांना दिलासा मिळाला. अनेक गैरसमज दूर झाले. यशोनं त्यानंतर एपिलेप्सी विवाह मेळावा आयोजित केला. यासाठीही खूप चांगला प्रतिसाद मिळाला. आज यशोला देशात आणि देशाबाहेर परिषदांसाठी बोलावणी येतात आणि तिच्या कामाची प्रशंसा केली जाते.

 विद्या संजय गोखले

विद्या गोखलेला डायबेटिसनं ग्रासलं आणि तीच विद्या आज केईएम हॉस्पिटलमध्ये डायेबेटिस कौन्सिलर म्हणून काम बघते.

विद्याला एकोणिसाव्या वर्षी डायबेटिस झाला. आईवडलांनी खूप सकारात्मतेनं घेतलं. त्याचा बाऊ केला नाही. विद्याला रोज इन्शुलिनचं इंजेक्शन आयव्हीतून दिवसांतून चार वेळा घ्यावं लागतं. तिनं वस्तूस्थिती सकारात्मकतेनं स्वीकारली. कॉलेज असतानाच विद्याला जोडीदार मिळाला. तिला डायबेटिस आहे हे कळल्यावरही त्याच्या निर्णयात कुठलाच बदल झाला नाही. लग्न झाल्यावर हा विकार झाला असता तर काय केलं असतं असं म्हणत त्यानं आणि त्याच्या घरच्यांनी विद्याला सहजपणे आणि आनंदानं स्वीकारलं.

अस्मिता अजित मोकाशी

अस्मिता हिच्या पतीला स्किझोफ्रेनियानं आक्रमण केलं आणि तिनं त्याला त्या परिस्थितीत कशी साथ दिली आणि त्याचबरोबर इतरांसाठीही ती काय करते हे या सत्रात समोर आलं.

नैराश्य हा जसा भावनेचा आजार आहे, तसा स्किझोफ्रेनिया हा विचारांचा आजार आहे असं अस्मिताला वाटतं. अशी व्यक्ती काल्पनिक वास्तव तयार करते. अशा माणसाच्या बुद्धिमत्तेवर परिणाम होत नाही, पण कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्किझोफ्रेनिया दोन प्रकारच्या वृत्ती दिसतात. एक डिप्रेसिव्ह टेन्डसिज दिसतात. यात आत्महत्येकडे जाणारा कल दिसतो. दुसरे ऍग्रेसिव्ह होऊन दुसर्‍यावर हल्ला करू शकतो. या विकाराबद्दलही अनेक गैरसमज आहेत. अस्मिताचं लग्न १९८५ साली अजितशी झालं. लग्नानंतर ही लक्षणं दिसायला लागली आणि त्याला स्किझोफ्रेनिया असल्याचं समजलं. अस्मिताच्या आईवडलांनी तिला हा आजार कळल्यावर तिला तू आपल्या घरी परत येण्याचा निर्णय घेऊ शकतेस असं सांगितलं. हा निर्णय तिनं स्वच्छेनं घेतला आणि अस्मितानं ठरवलं की आपण अजितला साथ द्यायची. या आजाराशी सामना करायचाय. उपकार म्हणून तू करू नकोस असं तिच्या वडलांनी सांगितलं आणि अस्मितानं डोळसपणे अजितला साथ देण्याचा निर्णय घेतला आणि दोघांचा हा प्रवास ३२ वर्षं सुरू आहे आणि तो अस्मिता आनंदानं करते आहे. या प्रवासात अनेक कसोटीचे क्षण आले. अजितला ऍटॅक येई, त्यात त्याला अनेक आवाज ऐकू येत आणि हे आवाज निगेटिव्ह गोष्टी सांगत. एकदा तू मर असे आवाज ऐकायला आल्यानं त्यानं चालत्या ट्रेनमधून उडी मारली आणि सगळं संपलं असतं. पण तो वाचला. अस्मिताला मुलगी झाल्यावर तिला लहानपणापासून आपले वडील मध्येच वेगळं का वागतात हे कळायचं नाही, तेव्हा तिला तिच्या वयानुसार समजून सांगणं हे खूप कठीण कामही अस्मितानं केलं. नातं जसं जुनं होत गेलं तसंतसं ते जास्त परिपक्व होत गेलं. आपल्यासाठी अस्मितानं जे केलं त्याची जाणीव अजितला आजही आहे आणि अस्मितालाही आपला नवरा मनानं खूप चांगला असल्याचा अभिमान आहे.

अजितच्या उपचारांमुळे अस्मिता आयपीएच संस्थेत डॉ. आनंद नाडकर्णी यांच्याकडे जात होती. घरात या विकाराशी झुंज देत असताना तिला इतरांनाही मदत करावी असं वाटायला लागलं आणि ती आयपीएचमध्ये जाऊन स्किझोफ्रेनियाच्या सपोर्ट ग्रुपमध्ये सामील झाली.

यशो, विद्या आणि अस्मिता या तिघींच्या प्रवासाचं वैशिष्ट्य म्हणजे या तिघींच्या पालकांनी त्यांना झालेल्या विकाराचा बाऊ न करता तो सहजपणे स्वीकारला आणि आपल्या मुलीला मानसिक भरभक्कम आधार दिला. त्या आधाराच्या बळामुळे आणि मनातल्या सकारात्मक विचारांमुळे तिघींनी आपला स्व-पासून सुरू झालेला प्रवास तिथेच न थांबता इतरांपर्यंत नेला आणि आज त्या अनेक कुटुंबांच्या आधारस्थान बनल्या आहेत.

या सत्राचा शेवट यशोनं प्रार्थना सादर करून केला ः

वैष्णवजन तो तेने कहिये जे, पीड पराई जाणे रे

पर दुःखे उपकार करे तोये, मन अभिमान न आणे रे

……..                                                                           कर्नल दत्ता

कर्नल दत्तांच्या वडलांना आपल्या मुलानं मेडिकलला जाऊन डॉक्टर व्हावं असं वाटत होतं. पण कर्नल दत्ता यांचं मन मात्र आर्मीकडेच ओढ घेत होतं. आर्मी त्यांच्या जगण्याचा श्‍वास आहे. आपल्या पाय गमवण्याच्या दुःखापेक्षा त्यांना एखाद्या अंधांचं दुःख जास्त मोठं वाटतं. त्याला हे जग बघायलाच न मिळणं त्यांना खूप अस्वस्थ करतं. आयुष्यात अनेक चढउतार येतील जातील, त्याच्याशिवाय कोणाचंच जीवन असू शकत नाही. पण या संकटांसमोर हार मानू नये. आम्ही पाण्यापासून काही शिकायला हवं. साचलेलं पाणी खराब होतं आणि प्रवाही पाणी नेहमीच ताजं राहतं. त्यामुळे प्रत्येकानं पाण्यासारखं प्रवाही राहावं, आपली विचारांची धारा सतत प्रवाही ठेवावी असं सकारात्मक दृष्टीनं जगणारे कर्नल दत्ता म्हणाले.

मुलांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगू द्यावं, आपल्या इच्छा त्यांच्यावर लादू नये असं कर्नल दत्तांनी उपस्थित पालकांना सांगितलं. प्रत्येक पालकानं, मुलानं सगळ्यांनीच अब्दुल कलाम यांचं अग्नीपंख हे पुस्तक वाचावं असं त्यांनी सांगितलं. आपण हे पुस्तक भेटवस्तू म्हणून देतो आणि त्या वेळी आपल्याला खूप आनंद होतो असंही कर्नल दत्ता म्हणाले. मला पुन्हा जन्म मिळाला तर मी पुन्हा हेच जगणं पसंत करेन असं म्हणणार्‍या कर्नल दत्ताच्या खिळाडूवृत्तीकडे पाहून आणि त्यांनी दुःखाला ज्या सहजतेनं घेतलं त्याकडे पाहून नतमस्तक व्हावं असं वाटलं. त्यांचं आवडतं गाणंच त्यांच्या जगण्याबद्दल बोलतं ः

रूक जाना नही तू कही हारके

कॉटोसे चलके मिलेंगे साये बहारके

ओ राही ओ राही………………

नैन आँसू जो लिये है, ये राहो के दिये है

लोगोंको उनका सबकुछ देके

तू तो चला था सपनेही लेके

कोई नही तो तेरे अपने है सपने ये प्यार के….

सूरज देख रूक गया है, तेरे आगे झुक गया है

जब कभी ऐसे कोई मस्ताना

निकले है अपनी धुन मे दिवाना

शाम सुहानी बन जाते है दिन इंतजार के…..

साथी ना कारवॉं है, ये तेरा इम्तिहान है

युंही चला चल दिल के सहारे

करती है मन्झिल तुझको इशारे

देख कही कोई रोक नही ले तुझको पुकार के….

…………..

‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ – स्वागत थोरात

‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ म्हणून ओळखले जाणारे स्वागत थोरात यांची ‘अपूर्व मेघदूत’ या नाटकावर आधारित संक्षिप्त फिल्म दाखवण्यात आली. सध्या सर्वत्र चर्चेत असलेलं ‘अपूर्व मेघदूत’ हे नाटक १९ अंधाना घेऊन स्वागतनं दिग्दर्शित केलंय. केवळ स्पर्शाच्या साहाय्यानं त्यानं प्रत्येक पात्राला अभिनय आणि हालचालींचे धडे दिले. डोळसांनी चकित व्हावं असं हे नाटक! यातला अभिनय, शब्दफेक, प्रकाशयोजना, संगीत, दिग्दर्शन, लेखन सगळं सगळं फक्त आणि फक्त अप्रतिम! अपूर्व मेघदूत हे नाटक स्वागत जगलाय आणि त्यानं त्यातल्या प्रत्येक पात्राला, नाटकाशी संबंधित प्रत्येकालाच ते जगायला लावलंय.

आयुष्यातल्या चढउतारांना सामोरं जात असताना अचानक अंध व्यक्तींवर बनवण्यासाठी आलेला माहितीपटाचा प्रस्ताव आणि त्यातून स्वागतचं बदललेलं आयुष्य….या प्रवासाची त्याची गोष्ट! अंधाच्या मनातली प्रत्येक गोष्ट, त्याच्या भावना, त्याचं सुख, त्याचे विचार, त्याची स्वप्नं जाणून घेण्यासाठी स्वागतनं स्वतःच्या डोळ्याला पट्टी लावली आणि दिवसाचा काही भाग त्यांना जाणून घ्यायला सुरुवात केली. त्यांच्याबरोबर, त्यांच्यासाठी स्वागतचा प्रवास सुरू झाला. त्यांच्यासाठी नाटकाचं अभिवाचन कर, नाटक, एकांकिका बसव, त्या वेळी आलेले अनेक अडथळे आणि समस्या यांची सोडवणूक कर असं सगळं स्वागत करत असतानाच त्यानं स्वबळावर पैसे जमवले आणि अंधांसाठी ब्रेल लिपीतलं स्पर्शज्ञान नावाचं मराठी भाषेतून पाक्षिक सुरू केलं. पुढे रिलायन्स दृष्टी यांच्या साहाय्यानं त्यानं हिंदीतूनही ते सुरू केलं आणि आज जगभरातल्या अंधांना ते मोफत पोहोचवलं जात आहे. याशिवाय स्वागत जिथे जाईल तिथे अंध व्यक्ती आहेत कळलं रे कळलं की जाऊन पोहोचतो आणि त्यांनी स्वतः आत्मविश्‍वासपूर्वक समाजात वावरावं, स्वावलंबी व्हावं यासाठी त्यांना अनेक गोष्टी शिकवतो. ब्रेल लायब्ररी ठिकठिकाणी उभारण्याची मोहीमही त्यानं हाती घेतली आहे. अंधांसाठी नाट्यसंस्थेची उभारणी करणं आणि भारतातलं पहिलं ब्रेल दैनिक सुरू करणं ही स्वप्नं स्वागतला प्रत्यक्षात उतरवायची आहेत. स्वागतच्या दृष्टीनं डोळस असणं म्हणजे सजग संवेदनशील असणं आहे. अंध व्यक्तींनी मला दृष्टिकोन दिला. मी डोळ्यांवर पहिल्यांदा पट्टी बांधली, तेव्हा माझे डोळे उघडले. अशा मानवतावादी विचारांचा स्वागत म्हणत होता ः

कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे

जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे

कोणीतरी कोणासाठी नीत्य गीत गावे

त्या गीताच्या बोलांनी आयुष्य हे फुलावे

कोणीतरी कोणासाठी मुक्त हास्य व्हावे

त्या हास्याच्या मोहराने आसमंत भारावे

कोणीतरी कोणासाठी……………….

….

भुपेंद्र त्रिपाठी

एक सॉफ्टवेअर इंजिनियर पॅरेलेसिस, कॅन्सर आणि अंधत्व यांच्याशी एकाच वेळी सामना करून आज अहमदाबादमध्ये रिझर्व बँकेच्या मॅनेजरपदी विराजमान झालेला भुपेंद्र त्रिपाठी हा तरुण व्यासपीठावर डॉ. आनंद नाडकर्णीसमवेत बसला होता. भुपेंद्रच्या चेहर्‍यावर प्रसन्न हास्य आणि शांतपणा होता. डॉक्टरांनी त्याला बोलतं केलं. त्याची कहाणी त्याच्याच तोंडून ऐकताना मन अचंबित होऊन गेलं. भूपेंद्रला त्याची कंपनी परदेशात कामासाठी पाठवणार असल्यानं जाण्याची तो तयारी करण्यात मग्न होता आणि एके दिवशी रात्री टॉयलेटमधून बाहेर पडतानाच तो तिथेच कोसळला. पॅरेलेसिस आणि तपासणीनंतर कॅन्सर या रोगांनी त्याच्यावर आक्रमण केल्याचं लक्षात आलं. आता तो केवळ दीडच महिने जगेल असं डॉक्टरांना वाटत होतं. अचानक कोसळलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी भूपेंद्र आणि त्याची आई सज्ज झाले. या उपचारांना सामोरं जाताना भूपेंद्रची पूर्ण दृष्टी गेली. वयाची ३२ वर्षं सगळं जग बघितलेल्या भूपेंद्रला अंधारात जगणं अतिशय कठीण होतं. त्या सगळ्या कठीण प्रसंगात त्याचे आई-वडील त्याच्याबरोबर होतेच, पण त्याचे डॉक्टर्स देखील त्याला साथ देत होते. या काळात भूपेंद्र ब्रेल लिपी शिकला, गाणं शिकला, बँकिंग आणि अर्थशास्त्र यांचा अभ्यास त्यानं केला. त्याचे प्रयत्न बघून अशा अवस्थेत माणूस इतका सकारात्मक कसा राहू शकतो याचं आश्‍चर्य वाटतं. अर्थशास्त्रावरची पुस्तकं आपल्या मित्रांकडून वाचून घेणं आणि ती रेकॉर्ड करणं, नंतर ती तासनतास ऐकणं….अर्थशास्त्रातले अनेक डायग्रॅम्स मित्रांना आपल्या हातावर काढायला सांगणं आणि त्याचं चित्र डोळ्यासमोर उभं करून त्याचे अर्थ लावणं अशा अनेक गोष्टी भूपेंद्र करत होता. मृत्यू कधी विकट हास्य करत येईल हे ठाऊक नव्हतं. पण त्याच्याशी दोन हात करायला भूपेंद्र तयार होता. भूपेंद्रचे हे कठीण परिश्रम पाहून त्या मृत्युलाही लाज वाटली असावी तो आला तसा परत गेला. कारण तपासणीत भूपेंद्रचा कॅन्सर पूर्णपणे बरा झाला होता. फिजिओथेरॅपी आणि इतर उपचारांनी भूपेंद्र चालायला फिरायला लागला होता. अशा परिस्थितीत भूपेंद्रनं स्पर्धा परीक्षा दिल्या आणि त्यात तो यशस्वी होऊन आज रिझर्व्ह बँकेच्या मॅनेजरपदी विराजमान झालाय. त्याचं हे पद त्याच्या अचाट कष्टांची कहाणी सांगतं. जगाविषयी, आपल्याच बाबतीत असं का झालं, अशा कुठल्याच गोष्टींविषयी त्याच्या मनात कटुता नाही उलट आपल्याला दोन जन्म मिळालेत आणि एक जन्म ३२ वर्षांपर्यंतचा एका सॉफ्टवेअर इंजिनिअरचा होता आणि आता हा दुसरा जन्म रिझर्व्ह बँकेच्या मॅनेजरचा आहे. या दुसर्‍या जन्मानं त्याला अनेक गोष्टी शिकवल्या. आज भूपेंद्र इतरांसाठी प्रेरणास्थान बनला आहे. अनेक ठिकाणी त्याची व्याख्यानं होतात. नैराश्याच्या खाईत गेलेल्या अनेकांना भूपेंद्रकडे बघून दिलासा मिळतो. लोकांच्या मनातल्या अंधाराला, भीतीला मला माझ्यातल्या सकारात्मक विचारांनी पळवून लावायचंय असं भूपेंद्र म्हणतो. भूपेंद्रनं आपलं मनोगत संपवताना त्याच्या गुरूंनी शिकवलेली एक प्रार्थना सादर केली,

तेरे फुलोंसे भी प्यार, तेरे कॉटोंसे भी प्यार

जो भी देना चाहे, दे दे कर्तार,

दुनियाके पालनहार

टाळ्यांच्या कडकडात भूपेंद्रविषयीचा स्नेहभाव व्यक्त करण्यासाठी आख्खं सभागृह उभं राहिलं होतं. दृष्टी कशाला म्हणायचं हा प्रश्‍न डॉ. आनंद नाडकर्णींनी विचारला, बाह्यदृष्टी महत्वाची नाही हे उत्तर संपूर्ण सभागृहाला ठाऊक झालं होतं. आपले अंतःचक्षू जागे होतील तोच आपला खरा विकासाचा क्षण! अंतरदृष्टी जर सिमीत आणि संकुचित असेल तर आपणच आपल्यासाठी भिंती बांधत जाऊ. आणि ती जर व्यापक असेल तर धर्माच्या, संस्कृतीच्या, परिस्थितीच्या, विषमतेच्या सगळ्या भिंती कोसळून पडतील. भूपेंद्रसाठी प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले होते. भूपेंद्रच्या आईला लोक कडकडून भेटत होते. ‘वेध’चा हा ह्रद्य कार्यक्रम संपला तरी पावलं बाहेर पडण्यासाठी जड झाली होती.

या दीड दिवसांच्या वेधच्या सत्रामध्ये सुचेता कडेठाणकर, प्रियदर्शिनी कर्वे, अभिषेक सेन, संतोष गर्जे, अधिक कदम, प्रदीप लोखंडे, वंदना अत्रे, विवेक सावंत, भूपेंद्र त्रिपाठी, स्वागत थोरात, वंदना अत्रे, कर्नल के.के. सिंग, कर्नल गौरव दत्ता, यशोदा वाकणकर, विद्या गोखले, अस्मिता मोकाशी या सगळ्यांच्या संघर्षाची कहाणी उपस्थित असलेल्या प्रत्येकालाच दहा हत्तीचं बळ देऊन गेली आणि सकारात्मक विचारांची झुळूक कायमची मनात पेरून गेली. या सगळ्यांसाठी प्रयत्नशील असलेले डॉ. आनंद नाडकणी, दीपक पळशीकर आणि टीम आणि इतर १० जिल्ह्यांची वेधची टीम या सगळ्यांचे खूप खूप आणि खूप आभार! डॉ. आनंद नाडकर्णी यांनी प्रतिकूल कडून अनुकूलतेचा प्रवास केलेल्या निमंत्रितांना खुलवलं, वेधचं वातावरण फुलवलं आणि आपल्या उत्साहाच्या आनंदाच्या प्रवाही झर्‍यात चिंब भिजवलंत. तुम्ही सगळ्यांनी जे मला – आम्हाला दिलंय, देत आहात त्याच्यासाठी खरोखरंच शब्द नाहीत! सलाम तुम्हाला!

दीपा देशमुख, पुणे.

९ आणि १० सप्टेंबर २०१७

…………..

Submit a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *