फ्रान्सिस्को- जोसे- द- गोया - युगांतर दिवाळी 2015

फ्रान्सिस्को- जोसे- द- गोया - युगांतर दिवाळी 2015

फ्रान्सिस्को जोसे द गोया हा स्पेनमधला एक महान प्रतिभावान चित्रकार म्हणून ओळखला जातो.  गोयाच्या चित्रांमधून स्पेनचा व्यक्तित्ववाद आणि त्या देशाचं हट्टी स्वच्छंद मन ठळकपणे दिसतं. गोयाच्या कुठल्याही चित्रात त्रयस्थ वृत्ती दिसत नाही. गोयाच्या प्रत्येक चित्रात गोयाही आपल्याला कळतनकळत दिसायला लागतो. स्पेनच्या राजदरबारात तो राजचित्रकार म्हणून मानाचं स्थान भूषवत असताना त्यानं राजघराण्यातल्या व्यक्तींची आणि चर्चची अनेक चित्रं रेखाटली होती. गोया हा स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. वृत्तीनं तो निडर असल्यामुळे त्याला बेछूट आणि बेभान होऊनल जगायला आवडे. तलवारीचं द्वंद्वयुद्ध असो वा बैलाची झुंज त्यात भाग घेण्याचा त्याचा साहसी स्वभाव होता. मारामार्‍या करण्यातही तो एकदम पुढे असायचा. बेफिकिरीनं तो नेहमीच म्हणे, ‘माझ्या जवळ तलवार असेल तर मी कोणालाच भीत नाही.’ त्याला प्रवास करण्याची आवड असल्यामुळे त्यानं अनेक शहरं पालथी घातली होती. 

फ्रान्सिस्को गोयाचा जन्म फुएन्डोटोडास या गावी ३० मार्च १७४६ या दिवशी एका गरीब कुटुंबात झाला.  गोयाचं गावं नापीक प्रदेशात होतं. आपलं इवलंसं गाव, आपली घरातली माणसं आणि गावात असणारा चर्च एवढंच त्याचं जग होतं. गावाच्या आसपासचा डोंगराळ प्रदेश, कमी पडणारा पाऊस, नदी नव्हतीच आणि लोकांचे भकास झालेले चेहरे अशा वातावरणात गोयाचं लहानपण गेलं. या काळात स्पेनमधले अनेक भाग एकमेकांबाबत हेवेदावे करणं आणि आकस बाळगणं यातच बुडालेले होते. हळव्या मनाच्या गोयावर या मानसिकतेचा बराच परिणाम झाला. त्यामुळेच त्याच्या अनेक चित्रांत तो भेसूरपणा आपल्याला सतत जाणवतो. 

वयाच्या बाराव्या वर्षी सरगोसा या गावी फादर जोकिन यांच्या शाळेत शालेय शिक्षण संपल्यावर गोयानं पुढल्या शिक्षणासाठी जेजुइट कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. गोयाचा चित्रकलेकडे असलेला ओढा फादरच्या लक्षात आला आणि त्यांनी हौसे लुझॅन या प्रसिद्ध चित्रकाराकडे आपल्या मुलाला शिकायला पाठवावं असं गोयाच्या वडिलांना सांगितलं.  तिथे चार वर्ष गोयानं चित्रकलेचा आणि शिल्पकलेचा अभ्यास केला.  वयाच्या १७ व्या वर्षी तो माद्रीद शहरात गेला. माद्रीदला त्यानं रॉयल अकादमीकडे चित्रकलेच्या शिष्यवृत्तीसाठी अर्ज केला पण त्यात त्याला अपयश आलं. त्यामुळे त्यानंतरची दोन वर्ष त्याची परिस्थिती प्रचंड हलाखीची राहिली. या काळात त्याला गरिबी किती भीषण असते हे कळून चुकलं. 

१७७६ मध्ये रॉयल अकादमीनं सुवर्णपदकासाठी एक स्पर्धा ठेवली होती. त्यात गोयानं चक्क भाग घेतला.  अकादमीचं सुवर्णपदक गोयाला मिळालं नाही. पण ते का मिळालं नाही या कारणांचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला. ज्या रोमान बयेश्यू नावाच्या चित्रकाराला हे सुवर्णपदक मिळालं होतं, त्यानं रंगवलेली चित्रं ही नव-अभिजात शैलीतली होती. तर गोयाची चित्रं रोकोको पद्धतीची होती.  राजदरबारातही या नव-अभिजात शैलीचाच वरचष्मा हेाता.  रोमानचा भाऊ फ्रान्सिस्को याचं शिष्यत्व गोयानं पत्करलं आणि त्याच्या स्टुडिओत तीन वर्ष अभ्यास केला.  पुढे फ्रान्सिस्को बयेश्यु च्या बहिणीशीही गोयाची ओळख आणि मैत्री झाली. 

गोयानं रोमला जायचं ठरवलं. कारण कलेचं माहेरघर असलेल्या रोममध्ये मायकेल अँजेलो आणि राफाएल या जगत्मान्य चित्रकाराच्या कलाकृती बघायचं स्वप्न घेऊन त्यानं इटलीत दोन वर्ष त्यानं काढली. या वास्तव्यात श्रेष्ठ चित्रकारांच्या कलाकृती बघायला मिळाल्यामुळे  त्याचा कलाविषयक दृष्टिकोन जास्त विकसित झाला. 

इटलीहून माद्रीदला परतल्यावर माद्रीदमधलं स्पर्धात्मक वातावरण गोयाला दिसलं. चित्रकलेत स्वतःचा ठसा उमटावी अशी खास शैली त्याच्याजवळ नसल्यामुळे माद्रीदमध्ये आपला टिकाव लागेल की नाही अशा विचारानं त्यानं १७७१ मध्ये सरळ सरगोसाचा रस्ता धरला. तिथं त्याला काही सरदारांकडून राजवाडयाच्या परिसरातल्या चर्चमधली काही चित्रं रंगवण्याचं काम मिळालं. विशेष म्हणजे ही चित्रं त्या सरदारांना खूपच आवडली आणि त्यांनी त्याला घसघशीत मानधन दिलं. आता सरगोसामधला नम्बर एकचा चित्रकार म्हणून गोयाचं नावं झालं. ‘दी अ‍ॅडोरेशन ऑफ दी नेम ऑफ गॉड’ या नावाचं त्याचं हे चित्र बरोक शैलीतलं आहे. ‘बरोक’ या शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे म्हणजे ओबडधोबड आणि परिपूर्ण नसलेला मोती. बरोक कलेमध्ये छायाप्रकाशाला आणि भावनिक तपशीलांना खूप महत्त्व दिलं गेलं. बरोक कलेतली चित्रं किंवा शिल्पं ही ऊर्जेनं पूर्णपणे ओतप्रोत भरलेली असायची. या तंत्रामुळे चित्र किंवा शिल्प यांच्यामध्ये एकप्रकारची गतिमानताही बघायला मिळायची. त्यामुळेच गोयाची चित्रं त्या प्रसंगाचं जिवंतपणे चित्रण केलेली आणि ऊर्जेनं पुरेपूर भरलेली वाटतात. रेनेसान्सनंतरच्या या मधल्या काळाला ‘बरोक’ असं म्हणत एक प्रकारे हेटाळणी केली गेली. 

१६०० ते १८०० या दोनशे वर्षाच्या कालखंडात युरोपमध्ये वैचारिक क्रांतीचं वातावरण होतं. तसंच धर्मसुधारणांच्या चळवळींनी जोर धरला होता. या चळवळींमुळेच कॅथॉलिक आणि प्रोटेस्टंट अशा दोन गटात युरोप विभागला गेला होता. या विभाजनाचा परिणाम त्या काळातल्या कलेवरही मोठ्या प्रमाणात झाला. कॅथॉलिक गटामध्ये कलेचा उपयोग धर्मासाठी होत असे आणि त्यामुळे चर्च कलावंताना आश्रय देत असे. पण इंग्लंड, हॉलंड आणि जर्मनी इथे प्रोटेस्टंटवादी जास्त लोक होते. या विचारांच्या चित्रकारांना फक्त धार्मिक विषयांवर चित्रं काढण्यात फारसा रस नव्हता. धार्मिक विषयापेक्षा निसर्गदृश्य स्वतंत्रपणे रंगवण्याची (लँडस्केप पेटिंग) कला तिथे भरभराटीला आली. रेनेसान्सचा काळ (इ.स. १४००-१६००) आणि फ्रेंच राज्यक्रांती (इ.स. १७८९) यातल्या जवळपास दोन शतकात निर्माण झालेल्या कलेला ‘बरोक कला’ असं म्हणतात. यातही पुन्हा आणखी खोलवर जाऊन काही इतिहासकारांनी सतराव्या शतकात ‘बरोक कला’ आणि अठराव्या शतकात ‘रोकोको कला’ असे दोन भाग केले.  गोयानं बरोक आणि रोकोको दोन्ही चित्रशैलीत चित्रं काढली.

माद्रीद येथे गोयानं स्टेट स्ट्रेपेट्री कंपनीत काम करायला सुरुवात केली. स्ट्रेपेटीसाठी त्यानं ३० चित्रं काढली. त्या काळी चित्रांचे विषय ऐतिहासिक आणि पौराणिक जास्त करून असत. पण गोयाला यापेक्षा वेगळे विषय करावे वाटत. त्याच त्याच प्रकारचे विषय त्याला रटाळपणे काढणं आवडत नसे. त्यामुळे त्याने चित्रं काढताना लोकांचं जगणं पाहून तसेच विषय त्यानं आपल्या चित्रांसाठी निवडले. त्याच्या चित्रांमध्ये मेंढपाळ आणि शेतकरी यांचं चित्रण दिसे. त्याला निसर्गदृश्यंही रेखाटायला आवडायचं. या कंपनीत गोयानं १६ वर्षं काम केलं. त्यानं काढलेली चित्रं लोकांना आवडली आणि त्यामुळेच राजदरबारात गोयाची पुढे राजचित्रकार म्हणून नेमणूक झाली. त्यानं एकूण ३०० चित्रं काढली. राजघराण्यातल्या माणसांची चित्रं काढताना उगाचच बढाचढाके त्यांचं व्यक्तित्व खुलवण्याचं काम त्यानं केलं नाही. ती माणसं जशी आहेत तशाच स्वरूपात चितारायचं काम त्यानं केलं. त्यानं काढलेल्या चित्रांमधून त्या व्यक्तीचं सौंदर्य आणि वैगुण्य दोन्हीही दिसतं. तसंच बैल सोडला तर प्राण्यांपैकी कोणाचंही चित्र नीट रंगवणं गोयाला जमतच नसे. 

दुर्दम्य महत्वाकांक्षा आणि जन्मतःच चित्रकलेची देणगी या दोन गोष्टींच्या बळावर गोयानं चित्रकलेच्या जगतात आपलं बस्तान बसवलं.  राजदरबारात त्यानं प्रथम दर्जाचं स्थान मिळवलं. आर्थिक स्थैर्य आणि सुबत्ता यांचा ते भोक्ता हेाता पण वृत्तीनं मात्र बंडखोर होता.  गोयाच्या चित्रांतून त्याची तटस्थता अभावानंच आढळते. त्याच्या प्रत्येक चित्रातून तोही त्या चित्रात आपल्याला पदोपदी जाणवत राहातो. आर्थिक परिस्थिती सुधारताच गोयानं माद्रीदला येऊन जोसेफा या फ्रान्सिस्को बयेश्यूच्या बहिणीला लग्नाची मागणी घातली. १७७३ मध्ये गोया आणि जोसेफा यांचं फ्रान्सिस्कोच्या संमतीनं लग्न झालं. जोसेफानं गोयाला ३९ वर्ष झकास साथ दिली ते तिच्या मृत्यूपर्यंत. गोयानं काढलेलं जोसेफाचं हे एकमेव व्यक्तिचित्र आहे. ज्यात तिच्या चेहर्‍यावर काळजी आणि चिंता यांचं सावट दिसतं. 

संपूर्ण आयुष्यभर अनेक राजदरबारातील मानमरातब गोयाला मिळाले.  त्या काळात व्यक्तिचित्रांना फारच मागणी होती. त्यामुळं गोयानं व्यक्तिचित्रं रंगविण्याचं तंत्र आत्मसात करण्यासाठी खूपच परिश्रम घेतले.  इंग्लडमधल्या सर जोशुआ, जॉर्ज रोम्नी, थॉमस गेन्सबरो या चित्रकारांच्या कलाकृतींचा त्यानं बारकाईनं अभ्यास केला. व्यक्तीचं फक्त बाह्यरुप न रंगवता तिच्या अंतर्मनाचा शोध घेऊन ते व्यक्तिचित्रात आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं गोया म्हणायचा.

१७७४ ते १७७८या चार वर्षांच्या काळातली गोयाची चित्रं खूपच रसरशीत आणि ताजीतवानी आहेत. त्यानं या काळात शिलेदार आणि त्यांना आकर्षित करणार्‍या तरूणी अशी काही चित्रं रंगवली आणि ही चित्रं लोकांनाही खूपच आवडली. १७७८ साली गोया आजारी पडला. आजारपणामुळे राजानंही त्याच्या प्रकृतीचा विचार करून त्याच्यावर साधी कामं सोपवण्यात आली. त्या वेळी व्हेलास्केझ हा स्पॅनिश चित्रकार खूपच प्रसिद्ध होता. त्याच्या काही श्रेष्ठ कलाकृती राजवाड्यात लावलेल्या होत्या. या कलाकृतींच्या नकला करण्याचं काम गोयावर सोपवण्यात आलं होतं. गोयानं अशी नकला केलेली १६ चित्रं केली. खरं तर त्याची चित्रं हुबेहूब साधली गेली नाही. पण व्हेलास्केल या चित्रकाराची शैली, त्याच्या चित्रांची बारकाईनं निरीक्षणं गोयाला या कामाच्या वेळी करता आली. व्हेलास्केझही चित्रं काढताना त्या विषयाच्या किंवा त्या व्यक्तीच्या अंतरंगात जाण्याचा प्रयत्न करे. त्यामुळे त्याची चित्रं जास्त जिवंत आणि बोलकी वाटत. हेच सगळं गोयातही होतं. म्हणूनच गोयाला व्हेलास्केझ हा चित्रकार खूपच जवळचा वाटायला लागला. 

त्यानंतरच्या बारा वर्षांमध्ये १७८० ते १७९२ या काळात गोयानं अनेक नमुनाचित्रं रंगवली. तसंच इतरही अनेक चित्रं त्यानं काढली. बड्या बड्या श्रीमंत व्यक्तींची मागणी असल्यामुळे त्यांची व्यक्तीचित्रं पूर्ण करण्यासाठीही गोयाला वेळ पुरे पडेनासा झाला. म्हणून मग शेवटी १७९२ साली त्यानं नमुनाचित्रं काढणं बंदच केलं. त्यानं एकूण ६३ नमुनाचित्रं रंगवली. ‘दी डमी’ हे त्याचं गाजलेलं अखेरचं नमुनाचित्रं!

१७८३ साली गोयानं स्पेनच्या पंतप्रधानांचं चित्र काढलं. खरं तर या चित्रानं त्याला आर्थिक लाभ झाला नाही. पण पंतप्रधानांचा लहान भाऊ इन्फंट डॉन लुई याच्याशी ओळख झाली आणि त्यानं गोयाला आपल्या राजवाड्यावर राहायला येण्याचं निमंत्रण दिलं. मग चक्क महिनाभर गोया तिथे जाऊन राहिला. या महिनाभरात गोयानं डॉन लुईच्या कुटुंबीयांची अनेक व्यक्तिचित्रं रंगवली आणि मुख्य म्हणजे ती चित्रं लुईच्या कुटुंबीयांना खूपच आवडली. लॉन लुईला शिकारीची आवड असल्यानं तो गोयालाही कंपनी म्हणून बरोबर घेऊन जात असे. थोडक्यात, गोयाची राजघराण्यातल्या माणसांबरेाबर उठबस व्हायला लागली. याच दरम्यान १७८४ साली गोयाच्या बायकोनं जोसेफानं मुलाला जन्म दिला. त्याचं नाव फ्रान्सिस्को झेवियर पेद्रो असं होतं. १७८५ साली गोयाची अकादमीच्या पेंटिंग विभागात उपसंचालकाची नोकरी मिळाली. या पदावर पैसा मिळणार नसला तरी ते पद खूपच मान आणि प्रतिष्ठा देणारं होतं. 

याच काळात ओसुना या कुटुंबाशी गोयाची मैत्री झाली. ओसुनाचा ड्यूक आणि डचेस हे दोघंही कलावंतांचा आदर करणारी मंडळी होती. गोयाला त्यांच्याबरेाबर राहायला आवडत असे. त्यानं त्यांची आणि त्यांच्या चार मुलांची समूह-व्यक्तिचित्रं रंगवली. या चित्राची मागची बाजू त्यानं अगदी साधी ठेवली. त्यात त्यानं निळा, हिरवा आणि करड्या रंगावा वापर केला. ड्यूक आणि डचेस यांच्यासाठी गोयानं या काळात अनेक चित्रं रंगवली. व्यक्तीच्या उणिवा चित्रात आणायला गोया जराही मागंपुढं बघत नसे.

याच काळात गोयानं तसंच आपले मित्र, डॉक्टर, कवी आणि मंत्री अशा अनेक प्रतिष्ठित मंडळींचीही चित्रं गोयानं रंगवली. तसंच त्यानं भूतं आणि वेताळ यांची देखील चित्रं रंगवली. भुताखेतांच्या त्याच्या चित्रांनी लोकांमध्ये एकच खळबळ माजली. लोकांना या चित्रांविषयी गोयानं उत्सुकता निर्माण केली. अशी चित्रं रंगवण्यात त्याचा चांगलाच हातखंडा होता. खरं तर रोगट आणि नकारात्मक विचारसरणीच्या माणसांची व्यक्तिरेखा रंगवणं गोयाला मनापासून आवडत असे.

१७८८ साली स्पेनमधल्या तिसरा चार्ल्सचं निधन झाल्यामुळे त्याचाच मुलगा चवथा चार्ल्स राजा झाला. नव्या राजाच्या चित्रांना एवढी मागणी होती की दरबारातल्या सगळ्याच चित्रकारांना रात्रंदिवस पुरेल इतकं काम समोर होतं. ओसुनाच्या डचेसलाही गोयानं काढलेलंच राजाचं चित्रं हवं होतं. आता गोयाची चित्रं काढताना चांगलीच तारांबळ उडायला लागली होती. रात्रंदिवस काम केलं तरी कामाचा ढीग तसाच अशी अवस्था गोयाची व्हायला लागली. कामाचा वेग वाढवूनही काम संपता संपेना. मग शेवटी नाइलाजानं गोया मिळणारी कामं नाकारायला लागला. गोयाची आिर्थिक स्थिती आणि प्रसिद्धी चांगलीच होत होती. त्यामुळे गोया सुखासमाधानात जगत होता. तसंच राजघराण्यातल्या मंडळींची मर्जी कशी सांभाळायची हे माहीत असल्यानं गोयावर नवा राजाही एकदम लट्टू झाला आणि त्यानं गोयाची चक्क ‘पेंटर टू दी चेम्बर’ या पदावर नेमणूकच करून टाकली. या पदावर येण्याचा मान स्पेनमधल्या खूप कमी चित्रकारांना मिळाला होता. त्यामुळे गोयाची प्रतिष्ठा आणखीनच वाढली होती. तसंच पैसा, मानमरातब आणि राजाबरोबर घनिष्ठ संबंध हे ओघानं सगळं आलंच होतं. 

१७९० मध्ये गोयावर कामाचा इतका ताण आला की त्याला डॉक्टरांचे उपचार घ्यावे लागले. डॉक्टरांनी त्याला हवापालटाचा सल्ला दिला. थोडक्यात, गोयाला काही दिवसांकरता का होईना पण माद्रीद सोडणं भाग होतं. गोयानं सरळ जोसेफाला घेऊन सरगोसा गाठलं. सरगोसाला त्याचा मित्र मार्टिन झपाटर याचीही भेट झाली. गोयानं मार्टिन झपाटरचंही व्यक्तिचित्रं रंगवलं. काही दिवस गोयानं सरगोसात विश्रांती घेतली आणि ताजातवाना होऊन तो माद्रीदला परतला. गोयानं आपण आता दुप्पट जोमानं माद्रीदला येऊन कामाला लागायचं असं ठरवलं. अर्थात माद्रीदला आल्यावर कामांची पुन्हा एकच गर्दी त्याच्यासमोर उभी राहिली. नमुनाचित्रं, दरबारातल्या अमीर-उमरांवाची चित्रं, व्यक्तिचित्रं आणि वर राजाची खास कामं ही सगळी तारेवरची कसरत करता करता गोया पुन्हा थकून गेला. त्यानं १९९२ साली कार्डीज या गावी सॅबस्टियन मार्टनिझ याच्याकडे आराम करायला रवाना झाला. कार्डीज इथे मित्रांबरोबर खूपच छान वेळ गोयाचा गेला. गोयाला हवी तेवढी विश्रांतीही या ठिकाणी मिळाली. या काळात त्यानं आपल्या मित्राचं माटर्निझचं चित्रंही काढलं. पण प्रवासातच गोयाला चक्कर आली आणि पॅरॅलिसीसचा अ‍ॅटॅक आला. त्यामुळे प्रवासातून कार्डीजला परतावं लागलं. डॉक्टरांनी गोयावर उपचार सुरू केले पण नक्की काही त्यांना सांगता येत नव्हतं. काही दिवसांनी थोडीशी प्रकृती सुधारली आहे असं वाटल्यामुळे गोया माद्रीदला परतला. परतल्यावर त्यानं पुन्हा आपलं सगळं लक्ष चित्रकलेवर केंद्रित केलं. तब्येतीनं गोया दणकट असल्यानं तो लवकरच पुन्हा पहिल्यासारखं काम करायला लागला. या सगळ्या भानगडीत मात्र गोया कायमचा बहिरा झाला. त्याला अजिबात ऐकू येईनासं झालं.

अकादमीमध्येही गोयाला संचालक म्हणून नेमण्यात आलं होतं, पण ऐकायलाच येत नसल्यानं त्याला काम करणं कठीण जायला लागलं. शेवटी दोन वर्ष कसंबसं काम रेटून त्यानं त्या पदाचा राजीनामा देऊन टाकला. याच दरम्यान गोयाला अल्बाच्या ड्यूकचं व्यक्तिचित्र काढण्यासाठी माद्रीदच्या राजवाड्यात बोलावण्यात आलं. त्यानं ड्यूकचं काढलेलं चित्र त्याला इतकं आवडलं की त्याला अल्बाच्या डचेसनंही बोलावून घेतलं. ड्यूक हा अतिशय संवेदनशील आणि अबोल होता, तर त्याची डचेस ही नखरेल आणि स्वतःच्या सौंदर्यांची पुरेपूर जाणीव असलेली होती. इतरांना नादी लावण्याची कला तिच्यात चांगलीच होती. त्यामुळे गोयानं तिची व्यक्तिचित्रं करता करता तिनं गोयावर कधी प्रेमाचं जाळं फेकलं आणि कधी तो त्यात अडकला हे त्याचं त्यालाही कळलं नाही. 

१७७५ साली गोयानं डचेसचं अतिशय आकर्षक असं व्यक्तिचित्रं गोयानं साकारलं. या काळात ड्यूकचा मृत्यू झाला होता, पण डचेसच्या चेहर्‍यावर त्या दुःखाचा लवलेशही बघायला मिळत नाही हे विशेष! तिच्या बोटात दोन अंगठ्या असून एकावर अल्बा आणि दुसर्‍यावर गोया अशी अक्षरं कोरलेली होती. पायाच्या जवळ वाळूत ‘फक्त गोया’ अशी अक्षरं कोरलेली दिसतात. एवढंच नाही तर त्या अक्षरांकडे डचेस बोटाने इशाराही करत आहे. गोयानं डचेस आणि त्याच्यातल्या कोमल संबंधांमुळे हे चित्र कधीही कुठल्याही प्रदर्शनात ठेवलं नाही. त्यानं हे चित्र आयुष्याच्या शेवटपर्यंत स्वतःजवळच बाळगलं.

१७९९ साली राजदरबारातला मुख्य चित्रकार म्हणून गोयाची नेमणूक झाली. त्याला राजघराण्यातील व्यक्तींची चित्रं काढायची जबाबदारी आली. राणी जशी होती तसंच चित्र काढणं म्हणजे थोडं अवघडच काम होतं. राणीला दोन चित्रं काढून हवी होती. त्यातलं एक चित्र नेहमीचं दागदागिने घालून, तर दुसरं घोड्यावर बसलेली राणी असं चितारायचं होतं. राणी खूपच लठ्ठमुठ्ठ आणि दिसायलाही तथाकथित सुंदरतेच्या व्याख्येत बसत नव्हती. म्हणजे जाडजुड, बसकं नाक..वगैरे..पण गोयानं चित्रात जराही तडजोड न करता ही चित्रं काढली. ही चित्रं काढणं म्हणजे किती कठीण परीक्षा होती हे सहज लक्षात येईल. अर्थात त्यावेळी राणीला स्वतःचं असं काही मत नव्हतं. तिच्या दरबारातील खुशमस्कर्‍यांवर तिचं मत अवलंबून असल्यामुळे त्यांनी या चित्राला वहाव्वा दिली आणि राणी गोयाच्या चित्रावर खुश इतकी झाली की तिनं आपल्या कुटुंबातील सगळयांचीच चित्रं गोयाला काढण्यासाठी पुढचं काम सोपवलं. ‘दी फॅमिली ऑफ चार्ल्स फोर’ हे चित्र काढायला गोयाला एक वर्ष लागलं. याही चित्रात त्यानं राजा आणि राणी बेढब आणि बोजड रुपातच रंगवल्या आहेतं.  नो कॉम्प्रमाईझ अ‍ॅट ऑल. मात्र मुलांना रंगविण्याबाबत त्यानं सौम्य भूमिका घेतली आहे. इंग्लंडमधल्या सर जोशुआ रेनॉल्ड्स, जॉर्ज रोम्नी, थॉमस गेन्सबरो या चित्रकारांच्या चित्रांचा याच काळात त्यानं बारकाईनं अभ्यास केला. 

गोयानं तिसर्‍या चार्ल्सचं चित्र देखील वास्तव स्वरुपातच काढलं. त्यात त्यानं म्हातार्‍या राजाचं वाकलेपण, त्याला आलेलं कुबड, चेहर्‍यावरचा वयामुळे थकलेपणा, दात पडल्यामुळे तोंडाचं झालेलं बोळकं जसंच्या तसं रंगवलं. तिसर्‍या चार्ल्सचा मुलगा चौथा चार्ल्स याच्या कुटुंबाचंही चित्र त्याने वास्तवचित्रचक काढलं. त्यानं या चौथ्या चार्ल्सचं वाढलेलं पोटही दाखवायला कमी केलं नाही. त्या पोटावरून तो खाण्यापिण्याचा शौकिन असावा असं दिसतं. त्या चित्रात त्यानं राणीचा नखरा आणि कारस्थानी वृत्तीही अतिशय बारकाईनं चित्रित केली होती. 

स्पेनच्या लोकांमध्ये राजसत्तेविरुद्ध प्रचंड असंतोष होता. राजघराण्याचं अन्यायी वर्चस्व त्यांना झुगारून द्यायचं होतं. राज्यावर आलेला नवीन राजा चौथा चार्ल्स हा राज्य करण्यासाठी सक्षम नव्हता. पण त्याची राणी मारिया ही दुसरी आनंदीबाईच होती. ती कारस्थान करण्यात आणि ध चा मा करण्यात पटाईत होती. राजा चौथा चार्ल्स तिच्या हातातलं बाहुलं बनला होता. गोदोय नावाच्या शिपाई असलेल्या रखलवादाराला तिनं चक्क प्रधानपद दिलं होतं. इतकंच काय पण ती त्याच्या पूर्ण कह्यात गेली होती. त्यामुळे गोदोय स्वतःलाच राजा समजून वाट्टेल ते जुलूम प्रजेवर करत होता. एकूणच स्पेनमध्ये राजा आणि चर्च यांचंच वर्चस्व होतं. सर्वसामान्य माणसाला काय हवंय याच्याशी दोन्हीनाही काहीच देणंघेणं नव्हतं. लोक मोकळेपणानं आपलं मत मांडू शकत नव्हते, ना संवाद साधू शकत होते. त्यांच्यावर अनेक प्रकारची बंधनं लादण्यात आली होती. कलेच्या बाबतीत तर आनंदीआनंदच होता. कलावंतांच्या कलानिर्मितीवर देखील बंदी घालण्यात आली होती. याच काळात स्पेन आणि इंग्लंड यांच्यात य्ाुद्ध सुरू होतं. गोदोय त्याच्या लग्नाची तयारी करत होता. लग्नप्रसंगी शोभतील अशी चित्रं त्याला राजवाड्यात लावायची होती. त्यामुळे त्यानं गोयाला बोलावून घेतलं. गोयानंही व्यापार, उद्योग, शेती, काव्य आणि स्पेनचा इतिहास अशी चित्रं केली.

या सगळ्या काळात माद्रीदमधली परिस्थिती खूपच विदारक बनली होती. गरिबीनं लोक पिचले होते. रक्षणकर्ताच भक्षणकर्ता बनल्यामुळे दाद कोणाकडे मागायची हा प्रश्न लोकांपुढे होता. या सगळ्या कारणांमुळेच स्पेनच्या राजसत्तेविरुद्ध क्रांती झाली. लोकांनी निदर्शनं करायला सुरुवात केली. आपली ओळख लपवून लोक क्रांतीचा जयघोष करत होते. माद्रीदचा चौक गजबजून गेला होता. लोक नाचत होते गात होते. या बंडाचं नेतृत्व राजघराण्यातली डचेस ऑफ ऑस्पा ही स्त्री करत होती. खरं तर ती राजघराण्यातली असूनही सर्वसामान्यांमध्ये मिसळून त्यांच्यासारखेच सामान्य, भडक आणि उत्तान असे कपडे घालून नाचत होती. राजघराण्यातली अवास्तव बंधनं तिला आवडत नसतं. त्यामुळे ती सर्वसामान्यांचं नेतृत्व करत या बंडात सामील झाली होती. तिनं गोयालाही चौकातल्या व्यासपीठावर बोलावलं. गोया हा स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा पुरस्कर्ता होता. त्याला गरीबांविषयी प्रेम होतं. सर्वसामान्यांविषयी जवळीक होती. जुलूमशाहीचा तो कट्टर विरोधक होता. त्यामुळेच जेव्हा डचेस त्याला आग्रह करत राहिली, तेव्हा गोया स्वतःला रोखू शकला नाही. खरं तर ते स्पेनचा त्या वेळचा पंतप्रधान गोदोय याच्याविरुद्धचं ते बंड होतं आणि त्या बंडात लोकांच्या बाजूनं गोयानं व्हावं म्हणून ती गळ घालत होती. डचेसच्या आग्रहाला बळी पडून गोया स्टेजवर चढला आणि सगळ्यांप्रमाणे तोही धूंद होऊन नाचत सुटला, घोषणा देऊ लागला. डचेसचा हात हातात घेऊन नाचत सुटला. लोक बेंधूंद होऊन टाळ्या पिटत होते आणि घोषणा देत होते. पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही. काहीच वेळात स्पेनच्या सैनिकांनी चौकात प्रवेश केला आणि गोळ्यांच्या फैरी झाडायला सुरुवात केली. बंडखोर या अनपेक्षित हल्ल्यानं घाबरले आणि तसेही ते निःशा होते. ते सैरावैरा पळायला लागले. गोयालाही काय करावं सुचेना. त्यानं डचेसला हात धरून तिला आपल्या स्टुडिओत सुरक्षितपणे आणलं. डचेसला या बंडात गोयासारखा चित्रकार कलावंत हवा होताच. डचेसला सर्वसामान्य जनतेची साथ मिळाल्यामुळे क्रांतिकारकांच्या बंडाला आणखीनच जोर मिळत चालला होता. 

हे सारं लक्षात येताच गोदायनं डचेसला माद्रीदमधून हाकलून लावलं. डचेसबरोबर गोया देखील माद्रीद सोडून निघून गेला. या काळात गोयानं डचेसची दोन चित्रं काढली. एका चित्रामध्ये त्यानं एकसारखीच दोन चित्रं रंगवली. एका चित्रात चांगला पोशाख परिधान केलेली डचेस, तर दुसर्‍या चित्रामध्ये तिनं वा परिधान केलेली नाहीत. मोनालिसाच्या चित्रानं जशी प्रसिद्धी मिळवली, तशीच या दोन्ही चित्रांनी मिळवली. गोयाच्या कुंचल्यानं डचेस अल्वा हिला जगभर लोकप्रिय केलं.

इकडे गोदोयनं पुन्हा नवीनच कट रचला. नेपोलियन बोनापार्ट याची मदत घेऊन प्रत्यक्ष राजालाच (चौथा चार्ल्स) याला राज्यातून हाकलून लावायचं आणि राजपुत्राच्या हाती राज्यकारभार देऊन तो आपणच आपल्याला हवा तसा बघायचा असा त्याने बेत केला. पण डचेसला मात्र असं काही झालं तर स्पेनचं स्वातंत्र्य आपण गमावून बसू हे लक्षात आलं होतं. स्पेनवरचं गोयाचं प्रेम पाहून डचेसला गोयाविषयीचं प्रेम आणखीनच वाढलं. त्या दोघांमध्ये सारख्या विचारांनी जवळीक जास्तच वाढत गेली.

गोदोय खूपच चाणाक्ष होता. त्याला हातातली सत्ता सोडायची नव्हती. तसंच तोही मारियाप्रमाणेच महाकारस्थानी आणि पाताळयंत्री होता. त्याने डचेसवर विषप्रयोग केला. त्या विषप्रयोगामुळे डचेस अल्वाचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला कारणीभूत ठरवून गोयाला देहदंडाची शिक्षा ठोठावण्यात येणार होती. पण राजदरबारातला चित्रकार म्हणून त्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकली नाही. मरण्यापूर्वी डचेस गोयाला म्हणाली, ‘‘काहीही झालं तरी तू तुझी चित्रकला कधीही थांबवू नकोस. तुझी कला हीच स्पेनची सेवा ठरेल. त्यात तू कधीही खंड पडू देऊ नकोस.’’ असं बोलून डचेसनं प्राण सोडला. तिच्या जाण्यानं गोया खूप सैरभैर झाला. त्याला अश्रू आवरणं कठीण झालं. 

इकडे नेपोलियननं गोदोयच्या मदतीनं स्पेनमध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्याच भावाला गादीवर आणून बसवलं. चिडलेल्या लोकांनी आपलं बंड आणखीनच तीव्र केलं. स्वातंत्र्यासाठी लोकांनी आपले प्राण पणाला लावण्याची शर्थ केली. माद्रीदमध्ये फ्रेंच सैनिक वाट्टेल तसा धुमाकूळ घालायला लागले. दिसेल त्याला गोळ्या मारणं त्यांनी सुरू केलं. इतकंच नाही तर घराघरात जाऊन स्पेनविषयी निष्ठा ठेवणार्‍या माणसांना त्यांनी वेचून वेचून ठार केलं. सगळीकडे प्रेतांचा नुसता खच पडलेला दिसे. 

पण याच समाजामध्ये असलेल्या वाईट रूढी, भोंदूपणा, भोळेपणा आणि फसवणूक, भ्रष्टाचार या सगळ्या गोष्टी गोयानं त्याच्या ‘कॅप्रिस’ या चित्रांमधून व्यक्त केल्या. कॅप्रिस याचा अर्थ कल्पनालहरी असा होतो. ही चित्रमालिका खूपच गाजली. ही मालिका केवळ स्पेनलाच नाही तर एकूणच मानवजातीला संदेश देणारी ठरली. या चित्रामध्ये कलावंत झोपलेला असून वेड आणि अज्ञान यांची प्रतीक दाखवण्यासाठी गोयानं वटवाघुळ आणि इतर विचित्र प्राणी दाखवून त्या कलावंतावर त्यांनी आक्रमण केलेलं दाखवलं आहे. या वेळी गोयाची मनःस्थिती काही वेगळी नव्हती. आजूबाजूला हेवेदावे करणारी माणसंच माणसं दिसत होती. राजकीय आणि सामाजिक परिस्थिती यांच्याविषयी उपहासात्मक चित्रं काढायची त्यानं ठरवलं. त्याची ही चित्रमालिका समाजातला उथळपणा, वातावरणातली निराशा आणि अराजक या सगळ्यांविषयी भाष्य करतात.

यानंतरची आठ वर्षं गोयानं फार चित्रं केली नाहीत. १८०० ते १८०८ या आठ वर्षांत त्याच्यामधला उत्साह कदाचित वयाच्या साठीकडे आल्यामुळे कमी झाला. हवा तेवढा पैसा आणि प्रतिष्ठा गोया बाळगून होता. एक बहिरेपणा त्रासदायक होता, पण आता गोयानं त्यालाही स्वीकारलं होतं. आयुष्याचा उर्वरित काळ आता आनंदात आणि सुखासमाधानात घालवायचं गोयानं ठरवलं, पण नियतीच्या मनात काही वेगळंच असावं. याचं कारण फ्रेंचांनी स्पेनवर आक्रमण केलं. त्यानंतर १८०८ ते १८१५ या काळात स्पेनवर नेपोलियनची सत्ता राहिली.

१८०८ साली झालेल्या या भीषण हत्याकांडाचं गोयानं चित्र रेखाटलं. या काळात नेपोलियनची स्पेनवर सत्ता होती. पण स्पेनमधले लोक गनिमी काव्यानं फ्रेंच सत्तेला विरोध करत लढत होतेच. तीन मे या दिवशी फे्रंच सैनिकांनी असाहाय स्पेन जनतेवर गोळीबार केला तेव्हा गोया खूपच अस्वस्थ झाला आणि त्यानं आपल्या भावना चित्रातून व्यक्त करण्यासाठी ३ मे १८०८ हे चित्र रंगवलं. गोयानं युद्धाची भीषणता दाखवणारं भयानक चित्रण या चित्रातून त्यानं व्यक्त केलं. युद्धात होणारं अमानुष क्रौर्य या चित्रात दिसतं. जगत असताना समाजामध्ये अनेक रुढी परंपरा पाळत माणूस जगत असतो. ‘३ मे १८०८’ हे त्याचं एक गाजलेलं चित्रं. शिपायांनी रोखलेल्या बंदुका स्वातंत्र्यसैनिकांच्या इतक्या जवळ आहेत की त्या बघणार्‍याचा थरकाप होतो. हे चित्र पाब्लो पिकासोच्या ‘गेर्निका’ या चित्राचंच विवेचन असल्याचा भास होतो. या चित्रामध्ये उजव्या बाजूनं असहाय लोकांची गर्दी दिसते. जिथे काही लोक मारले गेलेले आहेत आणि काही तर कुठल्याही क्षणी मरणार आहेत. काही लोक मरणाच्या भीतीनं गर्भगळीत झालेले आहेत. डाव्या बाजूनं शिस्तीत उभ्या असलेल्या सैनिकांच्या आकृत्या बंदुका ताणलेल्या अवस्थेत बघायला मिळतात. पार्श्वभूमीवर राजमहालाची फिकट आकृतीही बघायला मिळते. हे चित्र गोयाचं सगळ्यात उल्लेखनीय चित्र म्हणून ओळखलं जातं. या चित्रात सैनिकांचे चेहरे दाखवले नाहीत, तर त्यांचं शोषण, संहार आणि अत्याचार करणार्‍या शक्तीकडे त्यानं संकेत केला आहे. या चित्रात पांढरे कपडे घातलेला क्रांतिकारक सैनिकांच्या बंदुकांना आणि मृत्यूला भीत नसल्याचं दाखवला आहे. चित्राची मुख्य बाजू काळसर रंगात असून पांढरा शर्ट घातलेला देशभक्त चित्राचा मुख्य बिंदू आहे. देशभक्तीपुढे त्याला प्राणाचीही पर्वा नाही हे या चित्रातून दिसतं. जमिनीवर ठेवलेली मशाल किंवा दिवा गोयानं इतक्या सहजपणे चितारला आहे की त्या प्रकाशातून चित्राला वेगळीच झळाळी आणि महत्त्व आलं आहे. 

अर्थात ‘३ मे १८०८’ हे चित्र गोयानं १८१४ साली रंगवलं. याचं कारण नेपोलियनची सत्ता असेपर्यंत जनतेच्या बाजूनं उभं राहून अशा कलाकृती जाहीरपणे मांडणं त्याला शक्य नव्हतं. ती धमक त्याच्यात नसावी किंवा राजसत्तेच्या नेहमीच आश्रयाला असल्यामुळे विरोधात जाणं त्याला परवडणारं नसावं. आपल्याकडली संपत्ती गमावून देशोधडीला लागण्याची भीतीही त्याला वाटत असावी. कारण कुठलं का असेना, पण गोयानं त्या वेळी त्या सत्तेपुढे मान तुकवली हे मात्र खरं. नव्या राजाच्या दरबारातही गोयानं प्रथम क्रमांकाचा चित्रकार म्हणून राहणं पसंत केलं. एवढंच काय पण १८१० साली गोयानं माद्रीद शहराच्या मुख्य इमारतीत चित्र रंगवण्याचं सरकारी कामही केलं. त्याच्या चित्रकलेतल्या कामगिरीसाठी त्याला जोसेफ बोनापार्ट कडून सुवर्णपदकही मिळालं होतं. फ्रेंच अधिकार्‍यांची व्यक्तिचित्रंही त्यानं अनेक वेळा रंगवली. त्यांच्याकडून त्याला भरपूर मोबदला मिळत असे. थोडक्यात, गोयाच्या संपत्तीत भरच पडत असे. मनातून त्याला क्रांती हवी होती, जे चाललंय ते आवडत नव्हतं, पण भूमिका घेण्याची त्याची तयारी नव्हती आणि त्याचं वागणं कायम सत्ताधार्‍यांना खुश करण्याकडेच राहिलं.

१८११ साली गोयानं काढलेलं ‘दी क्लासेस‘  हे चित्रं अत्यंत परिणामकारक आहे. या चित्रात त्या काळी होणारे गनिमी य्ाुद्धाचे पडसाद या चित्रात दिसतात. फ्रेंच सत्तेविरुद्ध स्पेनमधली जनता मिळेल त्या मार्गानं आपला विरोध व्यक्त करत होती. आपल्या जीवाची पर्वा न करता ही सर्वसामान्य माणसं प्रतिकार करत होती. हाती काहीच येत नव्हतं, फक्त वेळ मात्र जात होता. फेंच सैनिकांकडून सर्वसामान्य प्रजेवर अनन्वित अत्याचार होत होते. हे सगळं पाहून गोयावर या परिस्थितीचा खूपच परिणाम झाला. त्यानं अस्वस्थ आणि बेचैन होऊन हाती ब्रश घेतला आणि सैरावैरा धावणारे  भयग्रस्त लोक आणि आकाशाला भिडणारा एक उघडा वागडा राक्षस आपल्या कॅनव्हासवर चितारला. हा राक्षस म्हणजे माणसांच्या मनातल्या भीतीचं चित्रं होतं. या चित्रातली भेसूरता आणि गोयाचं तंत्रकौशल्य यांचा अजब मेळ दिसतो.

१८१० साली गोयानं ‘डिझास्टर ऑफ वॉर’ या नावाची एक चित्रमालिका रंगवली. मनात साठलेल्या अस्वस्थ भावनांचा निचरा व्हावा या उद्देशानं एकापाठोपाठ एक असे अनेक विषय त्याच्या कॅनव्हासवर उतरत गेले. बलात्कार, मारामारी, खून, हत्या असे अनेक विषय या चित्रमालिकेत येऊन दाखल झाले. हे सगळेच विषय गोयानं खूपच कौशल्यानं चितारले. या चित्रमालिकेचं काम युद्ध संपल्यावरही बरेच दिवस चाललं. त्याच्या कचखाऊ स्वभावामुळे गोया जिवंत असेपर्यंत त्याची हिम्मत ही चित्रमालिका प्रसिद्ध करण्याची झाली नाही. पण गोयाच्या मृत्य्ाूनंतर ३५ वर्षांनी सॅन फर्नांदो अ‍ॅकॅदमीनं ती प्रकाशित केली. मन उद्विग्न करणारी ही चित्रं असून यात गोयाचं कौशल्यही नजरेत भरतं.

मनःशांती देणारी काही चित्रं गोयानं त्याच्या कारकिर्दीत रंगवली ती म्हणजे आपल्याच कुटुंबातली व्यक्तिचित्रं, उदा. मुलगा, नातू- ही चित्रं हळुवारपणे रंगवल्याचे आपल्याला दिसते. साधं जीवन जगणारी माणसं, उदा. पखाल वाहून नेणारा, सुर्‍या-चाकूंना धार लावणारा, लोहारकाम करणार्‍या अनेक सामान्य माणसांची व्यक्तिचित्रं त्यानं काढली. रांगडे तरुण आणि त्यांना भुरळ पाडणार्‍या नखरेल तरुणी अशीही चित्रं त्यानं साकारली.  

त्या काळी स्पेनवर नेपोलियनची सत्ता होती. आणि गोया हा राजदरबारातला चित्रकार असल्यामुळे आणि अर्थातच मानाची पद त्याच्याकडे असल्यामुळे त्यानं अमाप संपत्ती साठवली होती. इतकी की काही न करता तो आरामात जगू शकेल. वजदरबारात असल्यामुळे त्याकाळी राजसत्तेला विरोध असणार्‍या जनतेची बाजू उघडपणे घेण्यास तो असमर्थ होता. त्यामुळे राजसत्तेपुढे मान तुकवणे यातच आपलं हित आहे हे गोयाला चांगलंच माहीत हेातं आणि त्यानं तेच केलं. 

१८१४ साली अखेर युद्ध संपलं आणि सातवा फर्डिनंड यानं राज्याची सूत्रं हाती घेतली. खरं तर स्पेनची आर्थिक स्थिती खूपच ढासळली होती. युद्धानं आख्खा देश कमकुवत करून टाकला होता. गोयाचं वय झालंच होतं, पण युद्धाचे परिणाम त्याच्या मनावर खोलवर झाले होते. ते पुसले जात नव्हते. तसंच आता काम करण्याची ताकदही त्याच्यात राहिली नव्हती आणि काम करता येत नाही याचं शल्यही त्याला सारखं बोचत असे. तसंच १८१५ नंतर दरबारातलं काम संपल्यावर त्याला तसा एकटेपणा आला होता. काही मित्रं जग सोडून गेले होते तर काहींनी देशातल्या परिस्थितीला कंटाळून फ्रान्समध्ये स्थायिक होण्याचं ठरवलं होतं. 

आयुष्याच्या अखेरीस गोयाला राजदरबारातल्या गुप्त कारवाया, नातेवाईक, आश्रयदाते या सगळ्यांचाच कंटाळा आला.  त्यानं शेवटच्या काळात शिलारेखन करण्याचाही प्रयत्न केला. बुलफायटिंगची त्याची चित्रं शिलारेखन पद्धतीनं काढलेली आहेत. ही पद्धत गोयाला फारच आवडली होती. लहानपणापासून बुल फायटिंग हा त्याचा आवडता खेळ होता.  एकाकीपणावर तोडगा म्हणून त्यानं या काळात बुल फायटिंगची चित्रं काढली. एकूण ४४ प्रकारची ही चित्रं त्यानं रंगवली. ही चित्रं काढताना तो सगळं काही विसरून चित्रांमध्ये पूर्ण रमला. ही चित्रं काढताना कोणी समोर आलाच तर तो आपण तरूण असताना बैलाशी कसं लढलो होतो अशा गोष्टीही रंगवून सांगत असे. या चित्रांनी त्याला समाधान नक्कीच दिलं. तरूण असताना तो इटलीला गेला होताच आणि त्या काळात त्यानं बुलफायटिंग बघितली होती. त्यामुळे या झुंजीचं एक चित्र त्याच्या मनात ठसलं होतंच. गोयाची ही रेखाटनं अतिशय सुरेख झाली आहेत.

गोयानं आपल्या मुलाचं फ्रान्सिस्को झेवियरचं व्यक्तिचित्र काढलं होतं.  हातात छडी, श्रीमंती पोशाख, खुशालचेंडू व्यक्तिमत्व हुबेहुबपण या चित्रातून दिसतं आणि अर्थातच गोयाचे सुपुत्र तसेच होते. त्यानं पोटापाण्यासाठी काही करण्याची गरजही नव्हती, गोयानं भरपूर कमवून ठेवलं होतं आणि गोयाचं आपल्या या अपत्यावर जीवापाड प्रेम होतं. झेवियर लाडावलेला मुलगा असल्याकारणानं गोयानं त्याला एक नोकरी मिळवून दिली, पण त्यानं वर्षभर देखील ती नीट केली नाही. वडिलांनी भरपूर कमावलंय, मग कशाला कष्ट करा अशीच त्याची मनोवृत्ती होती. गोयानं पुढे त्याचं लग्नही करून दिलं आणि आपला आलिशान, ऐसपैस बंगलाही मुलाला देऊन टाकला. गोयाचा मुलगा गोयाच्या जीवावर आणि संपत्तीवर वयाची एकोणसत्तर वर्षं ऐषारामात जगला. गोयाचं त्याच्या मुलाशीही फारसं सख्य राहिलं नव्हतं.

मुलाला सगळं काही देऊन बसल्यावर गोयानं स्वतःसाठी माद्र्रीद शहराबाहेर एक दुमजली वाडा विकत घेतला. ज्याला लोक बहिर्‍या माणसाचं घर म्हणून ओळखत. या घरात ७३ वर्षांचा गोया त्याचं घर सांभाळणारी डोना लिओ कँडिया नावाची बाई आणि तिची पाच वर्षांची मुलगी रोझारिटो हिच्याबरोबर राहत होता. वृद्धावस्थेमुळे तो वारंवार आजारीही पडत असे. डोना त्याची शुश्रूषा करे आणि युजेनिओ गार्शिया एरिएटा या डॉक्टरांचेही उपचार चालू असत. लोकांपासून तर गोयानं केव्हाच संपर्क तोडला होता. डॉक्टरांचे परिश्रम बघून गोयानं त्यांच्याविषयीच्या भावना व्यक्त करण्यासाठी त्यांचंही एक चित्र जरा आराम वाटताच केलं. या चित्रात त्यानं स्वतःचंही चित्र चितारलं आहे आणि एरिएटा डॉक्टर त्याला तपासताहेत असं दाखवलं. या काळात त्यानं ब्लॅक पेंटिग्ज, फ्लाईट विथ क्लब्स, ज्यूडिथ, विचेस सॅबाथ, सॅटर्न डिव्हव्हरिंग हिज सन सारखी भित्तिचित्रं त्यानं रंगवली. 

 डॉक्टरांच्या उपचारानंतर गोयाला बरं वाटायला लागलं आणि त्यानं चित्रं रंगवण्याचं काम पुन्हा नव्या उमेदीनं हाती घेतलं. त्यानं ‘डेस्परेट फॉलीज’ म्हणजे अविचारी कृत्यं अशा शीर्षकाची ही चित्रमालिका रंगवायला सुरुवात केली. ही चित्रंही सॅन फर्निंदो अकादमीनं गोयाच्या मृत्यूनंतर ३६ वर्षांनी प्रसिद्ध केली.

गोयानं ‘डेस्परेट फॉलीज’ ही चित्रमालिका संपताच ब्लॅक पेटिंग्ज या नावानं ओळखली जाणारी चौदा चित्रं काढली. या चित्रांमधून गोयाची मनःस्थितीही कळते. ही चित्रं काळपट आणि गडद रंगातली असून सगळ्याच चित्रांचे विषय  उद्विग्नतेकडे नेणारे आहेत. या चित्रात दोन तरूण एकमेकांवर वार करण्याच्या तयारीत असून दोघंही गुडघ्यापर्यंत चिखलात फसलेले आहेत. खरं तर दोघांचीही यातून सुटका नाही. ज्यूडिथ नावाच्या चित्रात त्यानं ज्यूडिथ ही स्त्री लोकांची संकटातून सुटका करण्यासाठी तिच्या पायाजवळ दारू पिऊन नशेत असलेल्या दोघा सेनापतींना ठार मारते. 

त्यानंतर ‘विचेस सॅबाथ’ या चित्रात तर गोयानं कमालच केली आहे. हे चित्र बघताना अंगावर भीतीनं काटे उभे राहतात. रात्रीच्या वेळी एकत्र सगळी भुतं या चित्रात जमलेली दाखवली आहेत. या भुतांचा प्रमुख हा बकर्‍यासारखा दिसणारा मोठमोठी शिंगं असलेला आहे. ही सगळी भुतं दारू पिउन हैदोस घालत आहेत. तिथल्या एका जुन्या एका कथेवर आधारित हे चित्र गोयानं चितारलं आहे. 

या चित्रासारखंच आणखी एका कथेवर आधारित ‘सॅटर्न डिव्हव्हरिंग हिज सन’ हे चित्र गोयानं रंगवलं आहे. आपल्या मुलामुळेच आपला मृत्यू होणार ही गोष्ट शनीला कळते आणि तो आपल्या मुलांना एका पाठोपाठ एक असं करत मारून टाकतो. या मुलांपैकी ज्यूपिटर याला त्याची आई लपवून ठेवते आणि वाचवते अशी ही गोष्ट आहे.  पीटर पॉल रुबेन्स या प्रसिद्ध चित्रकारानंही हे चित्र रंगवलं, पण तुलना केली असता गोयाच्या चित्रातला भेसूरपणा जास्त ठळकपणे जाणवतो आणि चित्रातलं क्रौर्यही अंगावर शहारा आणतं. ब्लॅक पेंटिंग्जमधली सगळीच चित्रं भित्तीचित्र असून ही चित्रं बघताना रसिक स्तब्ध व्हावेत आणि जागीच खिळून राहावेत असाच उद्देश गोयाचा चित्र रंगवताना असावा असं वाटतं. ही सगळी चित्रं मनोविश्लेषकात्मक आहेत.

गोयानं आपले अखेरचे दिवस फ्रान्समध्ये घालवले. याचं कारण म्हणजे १८२३ साली सातवा फनिंनंड राजाने लोकशाही प्रस्थापित करणारी घटना रद्द केली आणि राज्यपद्धतीचा पुरस्कार केला. गोयाला हे सगळं अजिबात पटलं नाही. पण त्याच्या स्वभावानुसार राजाला दुखावणं त्याला शक्य नसल्यामुळे आपण शांतपणे स्पेन सोडावं असंच गोयाला वाटायला लागलं.  आपल्या ढासळत्या प्रकृतीचं कारण पुढे करून हवाबदलासाठी फ्रान्सला जायचंय असं खोटंच सांगून गोयानं राजाची परवानगी घेतली आणि फ्रान्समधल्या बोर्डो शहरात प्रस्थान केलं. तिथेही गोया जवळ जवळ चार वर्षं चित्रं काढतच राहिला. आता या काळात कोणाला कशी चित्रं हवीत हा विचार करण्याची गरज त्याला मुळीच नव्हती. त्याच्या मनाला हवी तशी आणि मनाला क्लेश देणारे विषय सोडून त्यानं समाधान देणारी चित्रं काढली. गोयानं या काळात शिलारेखन पद्धतीनं चित्रं काढली. ही चित्रं कमी वेळात पूर्ण होतात असं त्याच्या लक्षात आलं. गोयाला ही पद्धत खूपच आवडली. त्याची बुलफायटिंगची चित्रं याच पद्धतीनं रेखाटलेली आहेत.

मृत्यूपुर्वी गोयाची कानाबरोबरच वाचाही गेली होती. उजवी बाजू लुळी पडली होती. मात्र मरेपर्यंत चित्रकलेनं त्याला सोबत केली. मृत्यूनं गाठण्याआधी गोयानं आपला मुलगा झेवियरला भेटायला ये असा निरोपही पाठवला होता. पण त्यानंतर त्याची वाचा गेल्यामुळे त्याला बोलता येणं शक्यच नव्हतं. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर त्याला बोलता यायला लागलं, पण शरीरानं असहकार पुकारला होता. थकलेल्या गोयानं १६ एप्रिल १८२८ रोजी मृत्यूला स्वतः स्वाधीन केलं. साठ वर्षानंतर गोयाच्या अस्थी त्याच्या प्रिय स्पेन देशात सन्मानपूर्वक आणून पुरण्यात आल्या आणि त्याच्या देशभक्तीला जणू काही मानाचा मुजरा करण्यात आला. आज जगभरात आपल्या चित्रकारितेनं नाव कमावलेला गोया स्पेनमध्ये चिरशांती घेतो आहे. 

गोयाच्या स्मरणार्थ १९८७ पासून स्पेनमध्ये त्याच्या नावानं चांगल्या उत्कृष्ट फिल्मसाठी गोयाच्या नावानं अ‍ॅवार्ड दिलं जातं. हे अ‍ॅवार्ड अमेरिकन अ‍ॅकडमी अ‍ॅवार्डइतकंच आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचं आहे. गोयाची प्रतिकृती असलेल्या शिल्पाच्या स्मृतिचिन्हाच्या स्वरूपात हे पारितोषिक आहे. गोयाची चित्रं काढण्याची एक ठाम, निर्भीड आणि स्वतंत्र शैली होती. गोयाच्या कामाचा प्रभाव पुढे स्वच्छंदवाद (रोमँन्टिसिझम), दृकप्रत्ययवाद (इम्प्रेशनिझम) आणि अविष्कारवाद (एक्स्प्रेशनिझम) अशा अनेक शैलींवर ठळकपणे पडला. स्पेननं जगाला जे महान चित्रकार दिले, त्यात फ्रान्सिस्को गोया याचं नाव ओलांडून पुढे जाताच येत नाही हे मात्र निश्चित!

(आगामी कॅनव्हास-२ या पुस्तकातून)
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.