गौरीची गोष्ट!

गौरीची गोष्ट!

गौरीची गोष्ट! हो, मी 'क्राईम पेट्रोल' बघते. माझ्या मैत्रिणी मला हसतात, म्हणतात, 'अग काहीही काय करतेस? किंवा मी त्या गुन्हेगारीच्या विदारक, अंगावर शहारा आणणार्‍या गोष्टी बघूच कशा शकते? असं त्यांना वाटतं. मी क्राईम पेट्रोल बघू नये म्हणून त्या सल्ला देण्याच्या भानगडीत मात्र पडत नाहीत कारण मी त्यांचं ऐकणार नाही हे त्यांना चांगलंच ठाऊक आहे. अनेकदा त्यांना माझ्याकडून 'क्राईम पेट्रोल'च्या स्टोर्‍या ऐकाव्याही लागतात! त्याही मग मैत्रीचे दुष्परिणाम भोगतात निमूटपणे! लहानपणी मला ‘दक्षता’ मासिकही असंच खूप आवडायचं. त्यात लपलेला गुन्हेगार कोण हे शोधताना खूप मजा यायची. पुढल्या अंकात गुन्हेगार कोण याचं अचूक उत्तरही दिलेलं असायचं. आपण गुन्हेगार बरोबर शोधला याचा खूप आनंद त्या वेळी व्हायचा.

आता मात्र कामानं खूप थकवा आला, मेंदू बधिर झाला किंवा काम करायला नकार द्यायला लागला, की मी 'क्राईम पेट्रोल'ला शरण जाते. माझा आवडता अनुप सोनी स्वागताला उभाच असतो. त्याचं नेमकं निवेदन मला आवडतं. 'क्राईम पेट्रोल' हे समाजाचं, परिस्थितीचं, लोकांच्या जगण्याचं खरंखुरं दर्शन घडवतं असं मला वाटतं. त्या चाळी, किंवा त्या झोपडपट्या, त्यातलं बकालपण, तिथे राहणारी माणसं, चोर्‍यामार्‍या करणारी मंडळी, पोलिसांची खबरी मंडळी, पोलीस अधिकारी इतकं सगळं मला आकर्षित करतं, की आता क्राईम पेट्रोलचे सगळेच (प्रेमळ) अधिकारी आणि सगळेच खबरे माझ्या जवळचे झाले आहेत. तर आज दोन भागातली गौरीची गोष्ट बघितली.

जिल्हा न्यायालयाच्या तुरंगात असलेली १८ वर्षांची गौरी नावाची मुलगी तिनं न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतेय. एक पत्रकार तुरुंगात येतो आणि त्याची भेट गौरीशी होते, तिची गोष्ट ऐकून त्याच्यातला संवेदनशील माणूस जागा होतो, तो तिच्यावर ‘इस रात की सुबह नही’ नावाची एक कव्हर स्टोरी लिहितो. ती कव्हर स्टोरी वाचून उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधलं एक सुखवस्तू वृद्ध जोडपं गौरीच्या गोष्टीनं हळवं होतं. त्यांना दोन मुलं असतात. मुलं मोठी होऊन स्वतःच्या पायावर उभी असतात. या जोडप्याला एखादी मुलगी असावी असं नेहमीच वाटत असतं. गौरीची गोष्ट वाचून त्यांना आपण या गौरीला दत्तक घ्यावं असं वाटायला लागतं. हे जोडपं चांगल्या कामाला नेहमीच निरपेक्षपणे मदत करणारं असं असतं. ते तुरुंगाधिकार्‍याला भेटतात आणि गौरीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. पण गौरी त्या अनोळखी जोडप्याला भेटायला नकार देते.

हे जोडपं मग हताश न होता त्या कव्हर स्टोरी लिहिणार्‍या पत्रकाराला जाऊन भेटतं. तो पत्रकार त्यांना अनेक प्रश्न विचारतो. इतकंच नाही तर ट्रेनिंगला असणार्‍या एका ज्यूनियर पत्रकाराला त्यांची माहिती काढायलाही सांगतो. त्याला हे जोडपं खरोखरं चांगलं असल्याचं कळताच तो त्यांना मदत करायचं ठरवतो. तुरुंगाधिकार्‍याची भेट घेऊन तो पुन्हा एकदा गौरीला भेटतो. गौरीला आता कोणाच्या उपकाराच्या ओझ्याखाली राहायचं नसतं. तो पत्रकार तिला तिच्या आयुष्यातला अंधार आता दूर होऊन बाहेर प्रकाश प्रतीक्षा करतोय असं सांगतो. तो तिला त्या जोडप्याला एकदा तरी भेट आणि मग हवा तो निर्णय घे असं सांगतो. गौरी चार-पाच वर्षांची असताना तिचे आई-वडील आणि तिचा छोटा भाऊ हे गरिबीत पण आनंदात जगत असतात.

मात्र काम न मिळाल्यानं गौरीचे वडील अखेर पंजाबमध्ये एका शेतात काम करायला मिळणार म्हणून कुटुंबासह पंजाबमध्ये पोहोचतात. आता डोक्यावर छप्पर येतं, गौरी आणि तिचा लहान भाऊ शाळेतही जायला लागतात. मात्र हे दिवस फार टिकत नाहीत. एके दिवशी रस्ता ओलांडताना गौरीच्या वडिलांना एक वाहन उडवतं आणि त्यांचा मृत्यू होतो. गौरीची आई, गौरी आणि तिच्या लहान भावाला घेऊन पंजाबमधून पुन्हा गौरखपूरच्या रेल्वेस्टेशनवर उतरते. कुठे जायचं ठाऊक नसतं. काय पुढे वाढून ठेवलंय हेही माहीत नसतं. मात्र गौरीच्या आईचा काहीतरी निर्णय झालेला असतो. स्टेशनच्या बाहेर ती गौरीला बसवते आणि 'मी काम शोधून येताना खायला घेऊन येते' असं सांगून तिथून निघून जाते. जाताना ती आपल्या लहान मुलाला बरोबर घेऊन जाते. गौरीला त्या वेळी कळतच नाही की आपण आता आपल्या आईवर ओझं झालो आहोत आणि आता ती आपल्याला कायमचं सोडून चालली आहे.

गौरी आईची वाट पाहत राहते आणि अखेर रात्र होते. पोटातली भूक आणि जवळ आई नाही या दुःखानं गौरी रडायला लागते. तिचं रडणं ऐकून एक रिक्षावाला तिच्याजवळ येतो, तिची विचारपूस करतो आणि तिला खाऊ देखील घालतो. तिला घेऊन तो त्याच्या एका नातेवाईक स्त्रीकडे येतो आणि गौरीला ठेवून घे असं सांगतो. ती स्त्री गौरीची जबाबदारी घ्यायला तयार होत नाही, पण तो तिला 'गौरी तुझ्या घरातली सगळी कामं करेल, बदल्यात फक्त दोन वेळा तिला जेवू घालावं लागेल', असं सांगतो. गौरीला रस्त्यावर सोडलं तर तिचं बाहेरच्या जगात काही बरंवाईट होऊ शकतं या विचारानं तो त्या स्त्रीला पुन्हा पुन्हा आग्रह करत राहतो. कामाला आयती मुलगी मिळाली या हेतून ती स्त्री गौरीला घरात ठेवून घेते. लहानग्या गौरीला हसण्याखेळण्याच्या वयात त्या घरातली सगळीच कामं करावी लागतात. आपल्या मुलांनी आणि नवर्‍यानं गौरीशी केलेली जवळीक त्या स्त्रीला चालत नाही. ती त्यांना गौरीपासून दूर ठेवते. बाहेर जाताना ती गौरीला आत कोंडून कुलूप लावून जात असते.

तुला राहायला छत दिलं नसतं तर तुझी अवस्था काय झाली असती हे सतत तिला ऐकवलंही जात असतं. गौरी वयात येते आणि ती स्त्री आता हिची झंझट नको या विचारानं स्वतःचे दागिने गौरीच्या सामानात लपवते आणि पोलिसांजवळ गौरीनं दागिने चोरले असा कांगावा करते. आपण निरपराधी आहोत असं सांगूनही गौरीचं कोणीही ऐकत नाही. गौरीचं वय अवघं तेरा वर्षांचं असल्यानं तिला बालसुधारगृहात पाठवलं जातं. आपण ओझं झालो आणि त्यातच मुलगी असल्यानं सख्ख्या आईनं आपल्याला वार्‍यावर सोडलं, जिथे राहायला छप्पर मिळालं तिथेही बालपण पूर्णपणे कोमेजलं. घाण्याच्या बैलासारखं काम आणि काम...ना शाळा ना शिक्षण, ना मित्र ना मैत्रिणी......दोन वेळच्या खाण्याच्या बदल्यात सतत उपेक्षा, तुच्छता आणि तिरस्कार! म्हणूनच गौरीला न्यायालयाच्या लांबलेल्या निकालानंतर आता स्वतःची वाट स्वतःच शोधायची असते.

म्हणून ती या वृद्ध जोडप्याला भेटायला आणि त्यांचे उपकार स्वीकारायला तयार होत नाही. मात्र पत्रकाराच्या सांगण्यानुसार ती त्या जोडप्याला भेटते. ते तिचा विश्वास मिळवतात, त्यांच्या स्पर्शातून गौरीला हरवलेलं वात्सल्य मिळतं. तिच्या आणि त्या जोडप्याच्या डोळ्यांत अश्रू दाटून येतात. गौरीला घेऊन ते जोडपलं घरी येतं. ज्या गोरखपूरमधून गौरीची आयुष्याची फरफट सुरू झाली त्याच गोरखपूरनं तिला पुन्हा एक ऊबदार घर मिळवून दिलं. क्राईम पेट्रोलच्या रिसर्च टीमला गौरीची ही गोष्ट कळल्यावर त्यांनी सगळी शहानिशा केली. गौरीला खुश बघून, पुन्हा शिक्षण घेताना पाहून आणि नव्या आई-वडिलांचं मिळणार प्रेम बघून ही टीम सदगदित झाली. गौरीची गोष्ट सुखद शेवट घेऊन संपली, किंवा गौरीची गोष्ट आता सुरू झाली. म्हणूनच हो, मी 'क्राईम पेट्रोल' बघते.....माझ्या आसपासही मला या वृद्ध जोडप्यासारखी अनेक माणसं दिसतात. सगळं काही भरभरून असतानाही केवळ एका माणुसकीच्या नात्यानं त्यांनी उचललेलं पाऊल माझ्या मनाला उभारी देतं.

माझ्या आसपासची मग माणसं मला खुणावू लागतात. पारध्यांच्या मुलांवरचा चोर हा ठसा मिटवून त्यांना घर देणारा अनंता असो, वा संतोष असो; भिकार्‍यांचा डॉक्टरच नव्हे तर त्यांना मुलाचं प्रेम देणारा अभिजीत असो, अपंगांसाठी तळमळीनं काम करणारा अभिजीत राऊत असो, कामगारांसाठी झटणारा सिद्धार्थ असो, आपल्या गावाला विज्ञानगाव करणारा जयदीप पाटील असो वा नाशिकचा सचिन असो, मतिमंदांची सेवा करणारा अतिष असो वा काश्मीरमधल्या मुलांना शिकवणारा सारंग असो; एकही रुपया मानधन न घेता अंधांच्या आयुष्यात आनंद पेरणारा स्वागत असो, या सगळ्यांच्या अस्तित्वानं मनावर दाटलेलं मळभ स्वच्छ होतं....चांगुलपणावरचा विश्वास पुन्हा बसतो. डोळ्यातले आनंदाश्रू मुक्तपणे वाहत राहतात!

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.