कॉ. मुक्ता मनोहर-कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कार

कॉ. मुक्ता मनोहर-कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कार

तारीख

३ जून २०१५ या दिवशी पुणे महानगरपालिका युनियनचं काम करणार्‍या कॉ. मुक्ता मनोहर यांना कॉ. गोविंदराव पानसरे पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं.
अच्युत गोडबोले यांनी काही वर्षांपूर्वी ‘लोकायत’च्या एका कार्यक्रमात मुक्ता मनोहर हिच्याशी माझी ओळख करून दिली. उत्साहानं सळसळणारी, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाची, पारदर्शी स्वभावाची आणि विश्‍वासाचं नातं निर्माण करणारी खंबीर असलेली मुक्ता पहिल्याच भेटीत मला भावली. त्यानंतर अनेक वेळा ती मला भेटत राहिली. कधी बलात्काराच्या बातमीनं अस्वस्थ झालेली, तर कधी कामगारांच्या प्रश्‍नांनं बैचेन असलेली...तिची ती तगमग न पाहवणारी असायची....
एखाद्याच्या दुःखानं डोळ्यातल्या अश्रुंना वाट करून देणारी मुक्ताही मी पाहिली, पण त्याचबरोबर अन्यायाविरोधातल्या मोर्चाचं नेतृत्व करतानाची कणखर मुक्ताही मी अनुभवली. सभांमधलं कामगारांना प्रेरित करणारं, त्यांच्या हक्कांसाठी लढण्याचं बळ देणारं तिचं तीन तीन हजार जनसमुदायासमोरचं व्याख्यानही मी ऐकलं....प्रत्येक वेळी तिची छबी निराळीच होती. 
कधी ‘श्रमिक’ इथल्या युनियनच्या ऑफीसमध्ये कामगारांच्या व्यक्तिविकासासाठी कार्यशाळा घेणारी, तर कधी त्यांच्या मुलांसाठी गणित आणि विज्ञान यांचे उपक्रम राबवणारी, कधी ‘कचराकोंडी’तून कामगारांचं दुःसह्य जगणं दाखवणारी, तर कधी डॉ. विनायक सेन यांच्या पाठीशी ऊभी राहणारी, कधी विंदांच्या कवितांचा कार्यक्रम आयोजित करून सगळ्यांना त्या आनंदात सामील करून घेणारी, तर कधी बंतांसिंग या कार्यकर्त्याच्या कार्यावर प्रकाशझोत टाकणारी....तसंच कधी ‘सत्यशोधक’ नाटकात कामगारांनाच सहभागी करून त्यांच्यात म. फुले यांचा संदेश रुजवणारी मुक्ताही मला इथेच भेटत होती.
तिचं वैयक्तिक जगणं असं काही राहिलेलंच नाही. कामगारांचं जगणं आणि तिचं जगणं एकमेकांत पार मिसळून गेलेलं मला बघायला मिळालं. भौतिक सुखांचा कुठल्याही हव्यास तिच्या ठायी नाही. त्यामुळेच पुरस्कार स्वीकारताना चंगळवादी वातावरणानं आलेली अस्वस्थता तिच्या शब्दाशब्दांतून जाणवत होती. आपण मार्क्सवादी आहोत याचा तिला अभिमान वाटतो. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंदराव पानसरे यांच्या हत्त्येची भळभळती जखम अजूनही तिच्या मनात तितकीच ताजी आहे. खूनी प्रवृत्तींना ती सतत जाब विचारते आहे. प्रबोधनाची ही चळवळ कधीही थांबणार नाही असा सज्जड इशाराही ती समाजविघातक प्रवृत्तींना ठणठणीत आवाजात देते आहे.
विंदांच्या कवितेची आठवण करून देणारी आणि तिच्यातल्या संवेदनशीलतेची साक्ष देणारी तिची एक कविता 
लिहिणार्‍याने लिहीत जावे, वाचणार्‍याने वाचत राहावे
लिहिता लिहिता लिहिणार्‍याने, वाचणार्‍याचे पंचेद्रिय व्हावे
कळले किती, गळले किती याचे थोडे भान घ्यावे
लिहिणार्‍याने लिहीत जावे, वाचणार्‍याने वाचत राहावे
वाचता वाचता वाचणार्‍याने, लिहिणार्‍याचे मन व्हावे
अशा मनांच्या मशागतीतून, कृतींचे थोडे सृजन व्हावे
लिहिणार्‍याने लिहीत जावे, वाचणार्‍याने वाचत राहावे
लिहिणारे, वाचणारेही कधीतरी एक व्हावेत
दोघे मिळून कधीतरी आंधळ्याचे डोळे व्हावेत
अशा कॉ. मुक्ता मनोहर हिचं या पुरस्कारानिमित्त मनापासून अभिनंदन!!!
एस एम जोशीच्या  खच्चून भरलेल्या हॉलमध्ये संपन्न झालेल्या या कार्यक्रमात रावसाहेब कसबे, भाई वैद्य, उत्तम कांबळे, दत्ता देसाई, अच्युत गोडबोले, प्रकाश चव्हाण, उद्धव कांबळे, शांता रानडे, नागनाथ कोतापल्ले, डॉ अनंत फडके, संध्या फडके, अनंत दीक्षित, उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, मनपाचे अनेक अधिकारी आणि सफाई कामगार उपस्थित होते.

दीपा देशमुख 
 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.