सम्राट अशोक आणि साजरा झालेला वाढदिवस!

सम्राट अशोक आणि साजरा झालेला वाढदिवस!

तारीख

२८ ऑक्टोबरला असलेला वाढदिवस २७ पासूनच सुरू झाला आणि तो सिलसिला आत्तापर्यंत सुरूच होता. हा काळ मी कोणी जगप्रसिद्ध व्यक्ती असल्याच्या थाटात मिरवत राहिले. लहानपणी मला सम्राट अशोक खूप आवडायचा. आणि त्याचं अशोका हे नाव देखील खूप आवडायचं. तर तो सम्राट अशोका मीच असल्याचा अविर्भाव माझ्या हालचालीतून दिसतोय की काय असा मला भास व्हायला लागला. 
सोशल मीडियामुळे अनेक माणसं जोडली गेली, जवळची झाली. याचे फायदे-तोटे अनेक असले तरी मला मात्र फायदेच जास्त करून जाणवले. भले यातल्या अनेकांनी केवळ हॅपी बर्थ डे म्हणून पोस्ट टाकल्या असतील, काहींनी फक्त लाईकच केलं असेल, काहींनी मेसेंजर आणि काहींनी व्हॉटसअपवर आपल्या भावना व्यक्त केल्या, तर काहींनी थेट फोन करून बोलणंच पसंद केलं. माझ्या दृष्टीनं हे सगळेच माझ्यावर भरभरून प्रेम करणारे आहेत. 

सध्या फोनच्या नेटवर्कचे प्रॉब्लेम्स सुरू असल्यानं सुवर्णसंध्याला माझा फोन लागतच नव्हता. पण तिनं तेवढ्या मध्यरात्री शुभेच्छा पाठवल्या. मी माझ्या तब्येतीची काळजी घेत नसल्याबद्दल रागही व्यक्त केला. पण त्याचबरोबर तिच्या जगण्यातला मीही एक महत्त्वाचा हिस्सा कशी आहे तेही सांगितलं. माझ्यासाठी एक सुरेखशी कविता तिनं केली आणि मला पाठवली. हे सगळं जेव्हा सकाळी बघितलं तेव्हा काय बोलावं, कसं व्यक्त व्हावं तेच मला कळेना.

सखी...
तू बहरत जा
बहाव्यासारखी
पिवळीधम्म
अन् झुपकेदार....
तू फुलून जा
मोरासारखी
पिसारा फुलवत
सुंदर डौलदार...
तू विहरत रहा
पक्ष्यांसारखी
स्वतःच्याच धुंदीत
सार्‍या आकाशभर...
-सुवर्णसंध्या.

ना कुठल्या अपेक्षा, ना कुठला व्यवहार, बस्स, आतून असणारी एक ओढ! खरंच एक जिवलग मैत्रीण असणं काय असतं ते मी रोज अनुभवते. जळगाव हून मेधा या मैत्रिणीचा मी आज काय काय केलं पाहिजे याबद्दल आदेशवजा फोन आला.

माझी बॉस्टनला असलेली इंजिनिअर सून अश्विनी हिनं तर आपलं स्टेटस म्हणून तिचा-माझा फोटो ठेवला होता. वाढदिवसाच्या दिवशी मी काय काय करावं याच्या सूचनाही दिल्या होत्या. अजिंक्य आणि अश्विनी, दोघंही माझी मुलं, त्यांचे आभार कसे मानावेत? त्यानंतर सकाळी सकाळी गीता आणि सुबोध भावसार मल्हारसह शुभेच्छा द्यायला घरी आले. तिला मला औक्षण करून ओवाळायचं होतं. पण माझ्यासारख्या नास्तिक आणि कर्मकांड न मानणार्‍या व्यक्तीच्या घरात तिला हवं ते सामान सापडेना. मग हळद, तांदूळ आणि मेनबत्ती इतकं शोधून तिनं अखेर मला ओवाळलंच. दिवाळीची सकाळ छान प्रसन्न वातावरणात झाली. 

मग शास्त्रीचा दमबाजी करत शुभेच्छा देणारा आणि पार्टी मागणारा फोन आला. त्याच्या सगळ्या मागण्या मी मान्य करून टाकल्या. रात्री अमृताचा फोन आला. अमृता आठवणीनं फोन करते. मला आवडतेही खूप. जाईच्या फुलासारखी नाजूक अशी ही आर्टिस्ट मुलगी आहे. कशाला आर्किटेक्ट झालीस आणि सामाजिक काम करत हिंडते आहेस. त्यापेक्षा आपण दोघी यापुढे आकाशकंदील करत फिरू असा प्रस्ताव तिच्यासमोर मी ठेवला. मग सजलचाही फोन आला. तसा तो माझ्यावर कधी रागावत, रुसत नाही. पण या सहा आठ महिन्यांत मी त्याचे फोन अनेकदा घेऊ शकले नाही आणि उलट फोनही करू शकले नाही. 

त्यानंतर कल्याण तावरे या मित्राचा दिलखुलास आवाजात शुभेच्छा देणारा फोन आला. बारीकसारीक गोष्टीं मनाला न लावता मैत्री जपणारा मित्र! त्याच्याशी बोलणं होताच, प्रवासात असलेल्या डॉ. प्रशांत पाटील यांचा शुभेच्छा देणारा फोन आला. प्रशांत माझे फेसबुकवरचे मित्र! हा मित्रही मला खूप आवडतो. कारण प्रवास, साहित्य, संगीत सगळ्या गोष्टीत या माणसाला अपार रस आहे. माणसं जोडण्याची उत्तम कला अवगत आहे. चांगलं ते दुसर्‍यापर्यंत पोहोचवण्याची असोशी आहे. प्रशांत यांच्याशी बोलून खूप बरं वाटलं आणि नीतिन रानडे यांचा फोन आला. हे देखील  माझ्या लिखाणाचे चाहते आणि फेसबुक मित्र! नोव्हेंबरमध्ये भेटायचंच असा आम्ही निश्चय देखील केला. जळगावहून जयदीप पाटील या धडपड्या तरुणाचाही तितक्याच आत्मीयतेनं शुभेच्छा देणारा फोन आला. नागपूरहून अभिजीत राऊतने सुरेख भेटकार्ड करून शुभेच्छा पाठवल्या. अभिजीत थोरात याचाही लवकर भेटू म्हणत शुभेच्छा देणारा कॉल झाला. सातारच्या सुचित्राने तर शस्त्रक्रिया झालेली असताना हॉस्पिटलमधून शुभेच्छा देणारा फोन केला. 
संध्याकाळी संगीता काकडे या सुंदर आणि गुणी मैत्रिणीचा फोन आला. ही मैत्रीण कल्याणमुळेच लाभली. इतका लाघवी स्वभाव की बोलतच राहावं असं वाटतं. तिच्याशी बोलून जास्तच ताजीतवानी झाले आणि अश्विनी दरेकर हिचा फोन आला. ओळख झाल्यापासून न विसरता ती वाढदिवसाला फोन करते. आताही तब्येत बरी नसतानाही तिनं आवर्जून फोन केला. एक चित्रपट निर्माती असूनही कुठलाही गर्व तिच्याजवळ औषधालाही नाही. प्रत्येक गोष्टीत रस घेणारी, बागकाम करणारी, फळभाज्या पिकवणारी ही पोर मला नेहमीच भावते. अशीच एक गुणी लेखिका आणि अभिनेत्री म्हणजे रमा नाडगौडा! रमाचा फोन आला आणि तिच्याशी बोलताना दुसरं मन स्वतःशीच बोलायला लागलं. आमची फारशी भेट होत नाही. पण तरीही खूप कमी वेळात एकमेकींविषयी आत्मीयता वाटायला लागली. खरं तर याचं श्रेय तिलाच. पाककला, अभिनय, लेखन, अनुवाद प्रत्येक गोष्टीत ही अग्रेसर आणि माणसं जोडण्यातही! तिच्याशीही बोलून झालं आणि तिच्या हातचं चिकन आणि गप्पा असा कार्यक्रमही आम्ही ठरवून टाकला. सुवर्णरेहा ही मैत्रीण तर मैत्रीण कमी आणि जुळी बहीणच जास्त वाटते. आणि लोक तसं म्हणतातही. अर्थात ती खूप सुंदर आहे, गुणी आहे, बुद्धिमान आहे. माझ्याजवळ तिच्यातला एकही गुण नाही. पण तरीही लोकांना आम्ही बहिणी वाटतो याचा मला खूपच आनंद होतो. तिची माझी कपड्यांची आवड मात्र सारखी आहे आणि एकसारख्याच बँडवाल्यांसारखे कपडे नकळत आमच्या दोघींजवळही सारखे आहेत. आम्ही जिला ड्रीमगर्ल म्हणून संबोधतो, त्या प्रतिभा दाते या मैत्रिणीचाही फोन आला. चांगलं लिहिणारी, अतिशय उत्तम कविता करणारी, नाटकं लिहून दिग्दर्शित करणारी ही एक गुणी मैत्रीण! तिच्याशी बोलताना तर वेळ कुठे निघून गेला कळलंच नाही. 

या वर्षभरात मीनाक्षी वळसे, निर्मला जोशी, मीलन कणेकर या मैत्रिणींमुळेही जगण्यात बहार आली. त्यांच्याशी संवाद साधून मन प्रफुल्लित होतं. त्यांच्या सुरेखशा शुभेच्छांनी 'दिल गार्डन गार्डन हो गया'चं फिलिंग आलं. दिनेश-ज्योती तर घरातलेच. ज्योतीशी बोलून दिनेश-ज्योती आणि ओनीची खूप आठवण आली. पुढल्या महिन्यात बारामतीला जाऊन त्यांना भेटायचंच असं ठरवून टाकलं. प्रभाकर भोसले या मित्राने प्रत्यक्ष भेटून थिंक Positive चा दिवाळी अंक आणि जम्बो size चॉकलेट भेट दिलं. सीमा ढेरंगे ही देखील फेसबुकीय मैत्रीण आणि पुस्तकांची चाहती! तिच्या फोनच्या शुभेच्छाही आनंदात भर टाकून गेल्या. सीमा चव्हाण आणि प्रतिमा भांड यांचाही शुभेच्छा देणारा फोन येऊन गेला. मनोविकासचे आशिश पाटकर आणि रीना पाटकर यांनीही लक्षात ठेवून फोन केला आणि मुंबईहून परत पुण्यात येताच पार्टीसाठी कधी भेटायचं हे देखील ठरवून टाकलं. 

धनूनं माझ्याबद्दलच्या भावना पुन्हा रिपोस्ट केल्या, पण त्याहीपेक्षा त्याच्या फोननं जास्त बरं वाटलं. चैतूनं तर ऑडिओ क्लिप पाठवून शुभेच्छा दिल्या. त्या शुभेच्छांच्या बदल्यात मी त्याला गधड्या हे संबोधन बहाल केलं. डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनीही फोन करून शुभेच्छा दिल्या, तर शोभना गोडबोले यांनी आदल्या दिवशी मेसेज केलेला असतानाही पुन्हा आपुलकीनं फोन करून शुभेच्छा दिल्या. आम्ही ज्या किशोरवयात भेटलो, त्या दिवसांची, त्या क्षणांची आठवण देणारा मेसेज पाठवून पुन्हा शेगावच्या भेटीचे दिवस अतुल या माझ्या बालमित्राने माझ्यासमोर उभे केले. 

जनार्दन हा गजलवेडा मुलगा त्यानं आज पोस्ट टाकली आणि आमच्या दोघांच्या नात्याबद्दल. मी खूप काही विसरले होते. त्याच्या पोस्टनं सगळा भूतकाळ जागा झाला. आमच्या भेटीतल्या खूप सुरेख आठवणींचे क्षण एकामागून एक डोळ्यासमोर येत राहिले. मुसळधार पाऊस, त्या पावसात एखाद्या बोटीसारखी वाहत जाणारी आमची गाडी, आणि गाडीत आमच्या कथा,कविता, किस्से यांच्यावरच्या गप्पा! तो प्रवास खरंच अविस्मरणीय होता!

अपूर्वला बरं नसतानाही तो नेहमीप्रमाणे पालकाच्या भूमिकेत शिरला आणि माझं बी ट्वेल्व्ह वगैरे वाढावं म्हणून मला मस्त मासे, चिकन मन्च्युरियन वगेरे खाऊ घातलं. आयुष्यात कधी नॉनव्हेज खाईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. पण आता आनंदानं खाते. त्यामुळे मला हे आवडत नाही, मी हे करणार नाही, मला हे चालत नाही अशा वल्गना कधीही करू नयेत हे कळलं. मी ड्रेस घ्यावा किंवा साडी घ्यावी असा प्रस्तावही अपूर्वनं समोर ठेवला आणि मग त्याच्याच आवडीच्या एक सोडून दोन साड्या आम्ही घेतल्या. खरं तर पुस्तकं आणि साड्या यांनी घर भरलंय. म्हणजे खजिनाच असल्यासारखा! पण तरीही त्यात सतत भर पडत राहते आणि अपूर्व या दोन गोष्टींसाठी कधीच नाराजी दाखवत नाही. तसंच माझे पाय चालायला लागलं की खूप दुखतात, मग मी चालणं टाळते म्हणून त्यानं छानसे रिबॉकचे बूटही घ्यायला लावले आणि जादू व्हावी असं मी टकटक करत चालायला लागले. वाढदिवसाच्या निमित्तानं आणि बुटांच्या निमित्तानं माझा सकाळचा मॉर्निंग वॉक अशा रीतीनं सुरू झाला. 

वाढदिवस एक निमित्त! (मेसेजेस पाठवणाऱ्या सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही, त्याबद्दल दिलगीर आहे!!!) पण आवर्जून संपर्क, संवाद साधल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आणि खूप आभार! 

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.