गोष्टीमागची गोष्ट!

गोष्टीमागची गोष्ट!

तारीख

सोयीच्या गाडीचं बुकिंग न मिळाल्यामुळे ऐनवेळी कारने आंबाजोगाई सम्मेलनाला जायचं ठरलं. सम्मेलनाच्या आदल्या दिवशी सायंकाळी चंदू या आमच्या नेहमीच्या टॅक्सीचालकाला फोन केला, तर तो त्या वेळी शिर्डीला काही लोकांना घेऊन गेला होता. मात्र मी रात्री आठ पर्यंत पुण्यात पोहोचतो आणि आपण लगेच निघू असा शब्द त्यानं मला दिला. 
चंदू, मी आणि आसावरी नगरच्या दिशेनं रात्री दहा वाजता पुण्याहून निघालो. किरणकडे नगरला मुक्काम करून पहाटे चार वाजता आंबाजोगाईकडे निघायचं असं आम्ही ठरवलं. 

चंदू हा तरुण आमच्याबरोबर गेली अनेक वर्षं कार्यक्रमाच्या वेळी अर्ध्या रात्री बोलावलं तरी त्याची इटियॉस गाडी घेऊन येतो. त्याला आमच्याबरोबरचा प्रवास खूप आवडतो. त्याची वैयक्तिक सुखदुःख तो शेअर करत असतो. आपल्यामध्ये काय चांगले बदल या भेटीनं घडले याबद्दलही तो भरभरून बोलत असतो. कष्टाळू, प्रेमळ असा धडपड्या चंदू (चंद्रकांत तौर) आमच्या लेखनप्रवासाचा एक भाग झालेला आहे. 
पुण्याहून नगरकडे जाताना रस्त्यात भैरवनाथ मिसळच्या रेस्टारंटमध्ये आम्ही सुकी भेळ आणि मिसळ खाल्ली. या रेस्टारंटचे मालक दोघे भाऊ असून त्यांनी आमचं खूप प्रेमानं स्वागत केलं. पुन्हा या असा आग्रहही केला. परतीच्या प्रवासात नक्की येऊ असं त्यांना सांगून आम्ही निघालो. 

रात्री सव्वा वाजता नगरला किरण काळेकडे पोहोचलो. किरण आणि स्नेहल आमची झोपण्याची व्यवस्था करून वाटच बघत होते. भूक लागली तर खिचडीही करून ठेवली होती. सकाळी साडेतीनचा गजर लावून आम्ही ताबडतोब झोपेच्या स्वाधीन झालो. यशवंतराव चव्हाण, प्रतिष्ठान, मुंबई यांनी अनेक कार्यकर्त्यांशी मैत्रीचं नातं निर्माण केलं. तरीही विशेष उल्लेख करायचा झाल्यास किरण काळे आणि मयुर जगताप हे दोन तरूण माझ्या आयुष्यातला खूप महत्वाचा भाग आहेत. या दोघांच्या निरपेक्ष प्रेमाचा अनुभव मला वेळोवेळी येतो. आम्ही पहाटे नगरहून आंबाजोगाईकडे निघालो. रस्ता खूप खराब आहे असं किरणनं बजावून सांगितलं. 

अंधारलेल्या रस्त्यावरून चंदूनं रस्ता कापायला सुरुवात केली. आम्ही अश्मयुगात पोहोचलो आहोत की काय असा भास काहीच वेळात व्हायला सुरुवात झाली. संपूर्ण रस्ता उखडलेला.....रस्ता म्हणायचं कसं हाच खरा प्रश्‍न होता.....अंग खिळखिळं होत होतं. हादर्‍यांमधला प्रवास सुरू होता. गाडीचा वेग २० पेक्षाही कमी होता. आपण उदघाटनाच्या वेळेपर्यंत पोहोचू की नाही अशीही भीती मनाला वाटत होती. मात्र चंदूनं 'वेळेत पोहोचवेन, काळजी करू नका' असा शब्द दिला होता. 

बरोबर नऊ वाजता मानवलोकच्या विश्रामगृहात आम्ही पोहोचलो. अतिशय सुंदर परिसर....वसंतराव काळे पब्लिक स्कूलचे प्रसन्न व्यक्तिमत्वाचे प्राचार्य वाघमारे आमच्या स्वागताला आणि सोबतीला आले होते.  १५ मिनिटांत ताजंतवानं होऊन आम्ही त्या निसर्गरम्य परिसरातून बाहेर पडलो. मानवलोकचा मनस्विनी प्रकल्प समजून घेतला. त्यानंतर नाश्ता करून संम्मेलनस्थळी पोहोचताच डॉ. नरेंद्र काळे (यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई विभागीय केंद्र आंबाजोगाईचे प्रमुख) आणि अभिजीत जोंधळे यांनी स्वागत केलं. शाळेच्या मुख्याध्यापिका देशमुख मॅडम, उषा दराडे मॅडम यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या. आदर्श शिक्षक आणि इतर अनेक मानाचे पुरस्कार प्राप्त केलेल्या देशमुखमॅडमची सर्जनशीलता, उत्साह त्यांच्या कामाच्या प्रवासातून कळत गेला. 

आमच्या गप्पा सुरू असताना खास संम्मेलनासाठी बोलावलेले फेटे बांधणारे तज्ज्ञ आले आणि त्यांनी संम्मेलनाचे अंध्यक्ष बालाजी इंगळे आणि मी आम्हा दोघांनाही काही सेकंदात फेटे बांधले. मला नेहमीप्रमाणेच फेटा बांधताच झाशीची राणी झाल्याचा आनंद मिळाला. या भेटीत दीपा क्षीरसागर यांनी त्यांची पुस्तकं खूप प्रेमानं भेट दिली. 

वेळ कमी होता, मात्र मनस्विनीच्या वसतिगृहातलं चविष्ट जेवण करत आम्ही अभिजीत जोंधळेच्या अनुराग पुस्तकालयाला भेट दिली. अभिजीत आणि त्याची पत्नी अर्चना, मुलगा अनुराग आणि धनश्री यांची ओळख झाली. अरविंद पाटकर (मनोविकास प्रकाशन) यांनी अभिजीत जोंधळे या तरुणाविषयी माझ्याजवळ आधीच खूप कौतुक केलं होतं. हा तरुण पुस्तकवेडा असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. 
या कुटुंबाने घरातली एक खोली स्वतंत्रपणे पुस्तकाला दिली आहे. इतकी सुरेख रचना आणि पुस्तकांची मांडणी या खोलीत आहे की सगळं भान विसरून फक्त आणि फक्त या अभ्यासिकेत बसून राहण्याचा मोह कोणालाही होईल असं वातावरण अभिजीतनं तयार केलं आहे. जीनियस, कॅनव्हास ‘आम्ही इथं आहोत’ असं अभिमानानं मला सांगत होते. त्याच वेळी अभिजीत मला आम्ही गावागावातून जीनियसचे १०० च्या वर संच मुलांपर्यंत कसे पोहोचवले हे सांगत होता. जीनियसचं योगदान किती महत्वाचं आहे याची कळकळ त्याच्या बोलण्यातून माझ्यापर्यंत त्यानं पोहोचवली. मला खूप बरं वाटत होतं. आपण जे लिहितोय त्याचं समाधान वाटत होतं. इथे असलेलं इंद्रजित भालेरावचं समग्र असं कवितेचं पुस्तक ज्याचं अतिशय सुंदर असं मुखपृष्ठ रविमुकूलनं केलेलं आहे ते पुस्तक मला सारखं खुणावत होतं. पुण्यात आल्यावर खरेदी करायचं मी मनाशी पक्क ठरवलं. मात्र रोहन प्रकाशनाचं रामचंद्र गुहा यांचं 'आधुनिक भारताचे विचारवंत' हे पुस्तक मात्र घेण्याचा मोह मी आवरू शकले नाही. थँक्स अभिजीत!

माझा मित्र विनायक रानडे याच्या 'ग्रंथ तुमच्या दारी' उपक्रमातल्या पुस्तकपेट्यांप्रमाणेच अभिजीतनंही शालेय विद्यार्थ्यांसाठी खास पुस्तकपेट्या तयार करून ४५ ठिकाणी या पेट्या काम करताहेत. कल्पक आणि उत्साही शिक्षकांनी या पुस्तकपेटीची जबाबदारी घ्यायची. या पुस्तकांचं वाचन, त्यावरच्या प्रतिक्रिया, प्रकल्प असं बरंच काही मुलं करत असतात. कुठलं पुस्तक आवडलं यावर चर्चाही त्यांच्यात खास घडून येतात. याचा पाठपुरावा सातत्यानं केला जातो. मुलांच्या जडणघडणीसाठी अभिजीतनं हाती घेतलेला हा उपक्रम मला खूपच भावला. अभिजीतच्या बोलण्यातून एकदाही ‘मी’ हा शब्द आला नाही. तो सतत आम्ही या शब्दाचा उच्चार करत होता आणि संघटनाची ताकद माझ्यासमोर व्यक्त करत होता. 

अभिजीतनं समविचारी, धडपड्या लोकांनी एकत्र येऊन दर महिन्याला दोनशे रुपये कसे जमा करतो आणि गरीब होतकरू पण हुशार मुलांच्या शिक्षणाला मदत त्यातून कशी करता येते याबद्दल सांगितलं. मी लगेचच आपण दर महिन्याला २०० रुपये देत असल्याचं सांगितलं. आज मला तुम्हाला सगळ्यांनाच ही विनंती करायची आहे. आपण साधी ओला, ऊबेर रिक्षा केली तरी दोनशे रुपये कुठे गेले पत्ता लागत नाही. तरी आपण अशा मुलांना शिकवण्यासाठी हा खारीचा वाटा उचलू या. ज्यांना दोनशे किंवा जास्त रक्कम भरायची असेल त्यांनी मला मेसेज पाठवल्यास मी बँक डिटेल्स पाठवेन. अभिजीतनं तांड्यावरच्या होतकरू विद्यार्थ्यांचे आणि शिकण्यासाठी धडपडणार्‍या इतर मुलामुलींचे प्रसंग सांगितले तेव्हा आपल्याला या जगाशी संपर्क ठेवावा लागेल, जमेल ते करावं लागेल याची जाणीव झाली. 

मी नास्तिक असले तरी चंदू आणि आसावरीसाठी योगेश्‍वरीच्या मंदिरात त्यांना दर्शनासाठी सोडलं. तिथून लगेचच बीडमार्गे परतीच्या प्रवासाला लागलो. अभिजीतनं दिलेल्या सल्ल्यानुसार बीडमार्गै निघाल्यामुळे चांगल्या रस्त्याचा सुखद अनुभव घेत प्रवास सुरू झाला. या प्रवासात मोकळ्या शेतातून चंदूनं माझ्यासाठी हरभरा उपटून आणला. तो ताजा ताजता हरभरा मी काहीच मिनिटांत फस्त करून चंदूला आणखी हवा अशी मागणी केली. काही अंतरावर नंजर ठेवून चंदूनं पुन्हा खूप सारा हरभरा पुन्हा समोर आणून टाकला. इतका गोड, ताजा हरभरा खाऊन मन तृप्त झालं. 

बरोबरीला साथ द्यायला आसावरी होतीच. आसावरीची मैत्री होऊन आता दहा वर्षं उलटून गेली. रविवारची सुट्टी असल्यानं तिनं बरोबर येण्याची तयारी दाखवली होती. ती सोबत असली की प्रवास सुखाचा होतो. या प्रवासात आम्ही खूपच धमाल केली. हरभरा तर संपवलाच, पण एक एक शब्द घेऊन आम्ही शेकडो गाणी (किशोरकुमार, मुकेश, तलत, हेमंतकुमार, गीता दत्त, अशा भोसले....) मिळून गायलो. या प्रवासात रामरक्षा, गणपती स्तोत्र, देवी स्तवन (लक्ष कोटी चंड किरण) अतिशय सुरेख चालीतल्या आरत्या, जोगवा, विडा, शेजारती मी आसावरीला म्हणून म्हणजे गाऊन दाखवल्या. तीच नाही तर मीही थक्क झाले. कारण इतक्या वर्षांनी देखील सगळं सगळं मला जसच्या तसं पाठ होतं. आठवत होतं.

आसावरी बरोबर असली की आयुष्यात कुठल्या अडचणी, समस्या आहेत असं वाटतच नाही. गुणी मैत्रीण आहे. कधीही कोणाविषयी गॉसिप नाही, की कोणाशी स्पर्धा नाही. सतत दुसर्‍याच्या अडीअडचणीत धावून जाणारी आसावरी सोबत असल्यानं प्रवास खूप मस्त झाला. मीनाक्षीची वारंवार आठवण होत राहिली. 

नगर ओलांडताच पुन्हा भैरवनाथमध्ये मिसळ आणि भेळ खाण्यासाठी आम्ही थांबलो. आम्हाला बघताच त्या मालकानं आम्हाला ओळखलं आणि त्याला इतका आनंद झाला की जणू काही आम्ही त्याच्या घरी जेवणासाठी गेलो आहोत असं आग्रहानं त्यानं आम्हाला खाऊ घातलं. गरमागरम जिलेबीचा आस्वादही इथं घेता आला. 

रात्री उशिरा घरी पोहोचले, तेव्हा अपूर्व वाट बघत होता. आंबाजोगाई संम्मेलनातल्या उत्साही, प्रसन्न, मुलामुलींचे, तरुण शिक्षकवर्गाचे चेहरे डोळ्यासमोरून जात नव्हते. त्या विचारांतच प्रवासातला सूर्योदर्य आणि सूर्यास्त आठवत कधी झोप लागली कळलंच नाही. 

दीपा देशमुख

१२ फेब्रुवारी २०१८.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.