**करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस** '

**करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस** '

तारीख

 मनोविकास प्रकाशनाने डॉ. आनंद नाडकर्णी यांचे नवीन पुस्तक 'करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस ' प्रकाशित झाल्यानिमित्त त्यांची facebook live मुलाखत आयोजित केली  होती. 
ही मुलाखत माझी सख्खी मैत्रिण, प्रसिद्ध लेखिका व संवादक दीपा देशमुख हीने घेतली. खरं तर डॉ. आनंद नाडकर्णी हे नाव माहीत नाही असे लोक महाराष्ट्रात तरी सापडणार नाहीत. त्यांच्या या पुस्तकाची आवृत्ती प्रसिद्ध झाल्यानंतर 10 च दिवसांत संपली देखील.
डॉ. नाडकर्णी  मानसोपचार तज्ज्ञ म्हणून तर ते प्रसिद्ध आहेतच परंतु त्याशिवाय ते लेखक, कवी, भाषणकार , समाजहितासाठी कार्य करताना वेध सारखा सुंदर  कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांत सुरू करणारे हाडाचे कार्यकर्ते आणि उत्तम व्यवस्थापक, म्हणूनही ओळखले जातात. त्यांची अनेक पुस्तके, अनेक मुलाखती अनेक विषयावरचे भाषणे ,लेख आपण वाचलेली अन ऐकलेली आहेत़. 
 डॉ. नाडकर्णी यांचा व्यासंग, अभ्यास किती मोठा आहे हे  या आधी ज्यांनी  त्यांना  ऐकले आहे  वाचले आहे त्यांना माहीत आहेच परंतु ज्यांनी काल पहिल्यांदा ऐकले ते आणि ऐकणारे  सगळे  जणच  मुलाखती नंतर अतिशय भारावून गेले होते  एवढी ही मुलाखत सुंदर झाली. माझी स्वतःची विनंती आहे की प्रत्येकाने ही मुलाखत जरूर पहावी...ऐकावी.
'करण्याचे दिवस कळण्याचे दिवस ' यां पुस्तकाच्या शीर्षकामागचा आणि या पुस्तकाच्या निर्मिती मागचा विचार काय आहे या दीपाच्या पहिल्या प्रश्नाला उत्तर देताना डॉक्टरांनी सांगितले की, कोविड मुळे आलेल्या बदलांना अन 
lock down मधल्या काळात आलेल्या मानसिक तणावाला सामोरे जात असताना जी वैचारिक गुंतागुंत झाली, जे अनेक  प्रश्न अचानकपणे समोर उभा राहिले, त्या गुंतागुंतीला कसे सामोरे जायचे आणि प्रश्नांना कसे सोडवायचे अशी नकारात्मक भावना त्यांच्याही मनात होती. अपेक्षेप्रमाणे काही  होत नसल्यामुळे  पहिल्यांदा मनोभंग झाला पण  मग त्या परिस्थितीचा स्वीकार करत  त्यातून मार्ग काढणे  व वेगवेगळ्या पातळीवर स्वतः मधे बदल करत जाणे होवू लागले . 
कसोटीच्या काळात निराश न होता वेगवेगळ्या तर्हेने  कामं कशी पूर्ण  करता येतील  आणि  संवाद कसा साधता येईल यांसाठी त्यांनी प्रयत्न केले आणि मग हे करत असताना त्यातूनच  कळतही  गेलं 
हे त्यांनी फार छान सांगितले.
म्हणून मग हे समर्पक असे शीर्षक त्यांनी या  पुस्तकाला दिले आहे .
 डॉक्टर नाडकर्णी यांनी   फार छान शब्दांत सांगितले की, कुठल्याही क्रियेनंतर  आपल्या कडे  दोन पर्याय असतात एक प्रतिक्रिया म्हणजे reaction आणि दुसरा प्रतिसाद म्हणजे respond . आपण काय निवडायचे हे आपण ठरवावे.  Reaction _ म्हणजे प्रतिक्रिया या मोड मधे आपण काही  करतही नसतो  आणि आपल्याला काही कळतही नसते .
त्यामुळे अश्या प्रतिकूल काळात निरनिराळे मार्ग शोधणे कल्पकतेने काम करणे महत्वाचे ठरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविद काळात दिवे लावण्याचे आवाहन केले होते, त्यावेळी नाडकर्णी यांनी व्हिडिओ द्वारे याबाबतीत संवाद साधला होता. त्यावेळी उलटसुलट अनेक प्रतिक्रिया आल्या. डॉक्टरांनी प्रतिकांबद्दल अतिशय सुरेख भाष्य केलं. त्यांच्या मनात उमटलेली प्रतीकांची आवश्यकता त्यांनी सांगितली. तसेच याच काळात
 माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला या कोविड काळात आपल्या सर्वाना दिलासा देताना, आश्वस्त करतांना एक वाक्य म्हटले होते की 'तुम्ही खबरदारी घ्या मी जबाबदारी घेतो' आणि हे  शब्द सगळ्यांच्या मनाला भावले होते ,  डॉ नाडकर्णी यांनाही हे शब्द खूप भावले  आवडलें परंतु आवडले इथेच न थांबता त्यांनी  त्यावर एक मोठी कविताच लिहिली आणि तीं आशावादानें भरलेली होती  याबद्दल  दीपानें  विचारल्यावर  डॉक्टरांनी फार सुंदर शब्दांत ससांगितले, की  आशावादाला नेहमी वास्तवाचं भान असायला हवे नाहीतर ते स्वप्नरंजन ठरते . भाबडा आशावाद कामाचा नाही आणि त्याच बरोबर प्रश्नांना सोडून देऊन  आता काहीच होत नाही असं म्हणणे सुद्धा चूकच आहे .
करोना काळात मुन्नाभाई सारखे गांधीजी  डॉक्टरांना भेटत गेले  ते नेमके काय यांवर बोलतांना ते म्हणाले की  या काळात आपल्या सगळ्यांना  घरकाम करावे लागले  आणि आपल्या साऱ्यांच्या जीवनशैली मधे बदल झाले. गांधीजींनी नेहमीच श्रमप्रतिष्ठेला महत्व दिले आहे. गांधीजींनी जीवनशैली वर प्रयोग केले, त्याबद्दल लिहिले. घरातील कामं करतांना गांधीजीचे विचार कसे समजत गेले हे बोलतांना त्यांनी एक अत्यंत सुंदर विचार सांगितला की गांधीजींची सौंदर्याची व्याख्या  साधेपणात होती -
**इतरांकडे नाही ते सुंदर नाही ,तर सगळ्यांकडे आहे ते सुंदर!* अत्यंत सुंदर अशी ही सौंदर्याची व्याख्या गांधीजीनी केलेली आहे .
ही व्याख्या समजावून सांगताना डॉक्टर म्हटले की गांधीजींच्या  द्रुष्टीने सौदर्य हे inclusive असण्यात आहे exclusive असण्यात नाही. सगळ्यांपेक्षा वेगळे असण्यात सौदर्य पाहण्यापेक्षा सगळ्यांसारखे असण्यात सौदर्य पहायला आपण शिकायला हवे .
 हा विचार मला एवढा  भावला  की हा विचार सर्वांपर्यंत  पोहचायला हवा असे मला वाटले  आणि हे ऐकल्या नंतर मला माझ्या गांधीवादी वडिलांची तीव्रतेणे आठवण  झाली. सगळी मोठी लोकं साधी आणि खरी असतात हे तीव्रतेणें जाणवले म्हणूनच ते आपल्या मनात आपल्या ह्रुदयांत स्थान मिळवतात .
कोव्हिड काळात जी कामं करण्याची सवय आपल्याला नव्हती ती कामं आपण सारेच करू लागलो आणि घरातील कामं 
करतांना आधी जरी तक्रार असली तरी नंतर ते आपण साऱ्यांनी स्वीकारले आणि अरे आपण यांसाठी एवढा त्रागा का करत होतों असे वाटायला लागले,  हे सांगताना डॉक्टरांनी सांगितले, की त्यांनी zero sink ही कल्पना राबवली .
एकही भांड सिंक मधे साठू द्यायचे नाही उलट हाताला आले की भांड धुवूनच टाकायचे हा नियम त्यांनी  केला आणि त्याची सवय लावली  त्यामूळे भांडे धुणे हे मोठे त्रासाचे काम राहिले नाही आणि हा प्रयोग खूप छान प्रकारे यशस्वी झाला .
अश्या प्रकारचे बदल आपण केले तर कामांचे व्यवस्थित नियोजन होते, त्रास कमी होतों आणि ओढाताण न होता वेळेचे नियोजन होते .
    अँफ्लुयेन्झाची साथ म्हणजे काय
यावर  त्यांनी सांगितले, की अँफ्लुयेन्झा म्हणजे सुबत्ता आणि समरुद्धीतून येणारी सूज. हा आजार समाजशास्त्रज्ञानी मांडला  आहे . करोना जसे नियंत्रणात आणावे लागेल तसे आपल्याला या अँफ्लुयेन्झालाही आणावे लागेल.
 म्हणजेच आपण आपली जीवनशैली बदलवू शकतो हे आपण या काळात शिकलो आहोत . अभावाच्या परिस्थितीमधे, कसोटीच्या या काळात  आपण जर भोगवादी प्रवृत्ती सोडून देऊन अनावश्यक खर्च कमी केले तर चांगले  बदल होतील 
आणि व्यापक समाजहित साधले जाईल. 
आणखी एक महत्वाचा विचार डॉक्टरांनी यात व्यक्त केला तो म्हणजे सवय ही फार  महत्वाची गोष्ट आहे. सवय ही सवयीची होवून जाते असं सांगताना ते म्हटले की सवय हाच संस्कारांचा कणा असतो  आणि सवय हाच संस्कृतीचाही कणा असतो. नीट विचार केला तर आपल्या लक्षात येते की हा डॉक्टरांनी मांडलेला विचार किती महत्वाचा  आणि  खरा आहे.
डॉक्टरांनी सांगितलेल्या या वाक्यावरून मला आपल्या समाजातील एक उदाहरण ईथे मुद्दामहून लिहावे  वाटते. आपल्याकडे सार्वजनिक ठिकाणी थुंकन्याची चुकीची आणि आरोग्याला घातक अशी सवय आहे आणि अक्षरशः तीं भारतीय समाजाच्या अंगवळणी पडली आहे. माणूस म्हणून आपल्यामध्ये आपण
चांगल्या सवयी रुजवल्या तरच त्या समाजामध्ये रूजल्या जातील आणि आपल्या संस्कारांचा व संस्कृतीचाही भाग बनतील.
दीपा ने विचारलेल्या एका प्रश्न होता की  डॉक्टर नाडकर्णी यांनी लिहिलेल्या या पुस्तकांत तितिक्षा हा एक संस्कृत मधला शब्द आलेला आहे तो नेमका काय आहे त्याचा अर्थ काय आहे आणि त्यामागचा विचार काय आहे .डॉ. नाडकर्णी यांनी यांवर फार छान विश्लेषण दिले आहे ते जिज्ञासूंनी  मुळातून ऐकावे.
डॉक्टरांनी सांगितले की तितिक्षा यां शब्दांचा ज्ञानेश्वरांनी दिलेला अर्थ आहे सहनसिद्धी आणि इंग्रजी मधे त्याला resilient असे म्हटले जाते तर सामन्य मराठी मधे याला चिकाटी किंवा धीर म्हणतात .
सहनसिद्धी आणि रेसीलियंट हे दोन्हीही शब्द ( resilient ) मला फार भावले. तितिक्षा म्हणजे प्रतिकूल परिस्थिती मधे मनावर ताबा ठेवून विवेक बुद्धी हरवू न देणे आणि चिकाटीने मार्ग काढत राहणे .न खचता मोडून न पडता अत्यंत प्रतिकूल काळात सुद्धा मोठी माणसे कशी  मार्ग काढत असतात यात शिवाजी महाराजांपासून ,लोकमान्य टिळक, संत ज्ञानेश्वर, सुभाष बाबू या सगळ्यांबद्दल डॉक्टर बोलले.
राग, चिंता ,निराशा यांवर मात करतांना भावनिक नियोजन का महत्वाचे याबद्दल डॉक्टरांनी मुक्ताबाईच्या ताटीच्या अभंगाचे उदाहरण देऊन फार सुंदर रीतीने सांगितले आहे. ज्ञानेश्वरांच्या मनात आलेल्या निराशेला किती छान रीतीने मुक्ताबाईनी  दूर केले. त्या योग्य वेळी समुपदेशकाची भूमिका बजावतात तर योग्य वेळी छोटी बहीण होवून लडिवाळ आग्रह करतात. डॉक्टर म्हणाले की नकारात्मक भावनांना फक्तं ताब्यात ठेवायचे असे नाही तर त्या  भावनांना विधायकतेकडे कसे वळवता येईल हे पहायला हवे.
कुठलाही प्रश्न उभा राहिला तरी सोडवण्याचा कुठला मार्गच राहिला नाही असं कधीच होत नसतं , कांहींना काही पर्याय हा असतोच हे लक्षात ठेवले पाहिजे. परंतु यांसाठी शरीरा बरोबरच  मनानेसुद्धा आपण निरोगी ,स्वस्थ  असणे आवश्यक आहे.
शरीर आणि मनाचे नाते अत्यंत जवळचे आहे हे सांगताना त्यांनी प्रतिकार शक्ती ही  मनावर कशी अवलंबून असते हे ही सांगीतले.  आपल्या आरोग्यासाठी शरीर मन आणि समाज यांचा सर्वसमावेशक विचार आपण करायला हवा हा मुद्दा त्यांनी सांगितला. कुठल्याही शारीरिक आजारपणातून रिकव्हर होण्यासाठी मनाचा वापर महत्वाचा असतो. त्यामुळे शरीराबरोबरच मनाच्या आरोग्याची काळजी आपण घेतली पाहिजे त्याबद्दल सजग रहायला पाहिजे आणि यांसाठी आपण स्वतःला तपासत रहायला पाहिजे. मानसिक आरोग्य तपासण्यासाठी वाचकांना मदत व्हावी  म्हणून या पुस्तकांत त्यांनी सर्वात शेवटी एक सनद दिली आहे हे त्यांनी आवर्जून सांगीतले.
हे सगळे मुद्दे डॉक्टरांच्या तोंडून ऐकत असताना कसा वेळ गेला कळलेच नाही.
यां मुलाखती च्या अनुभवातून खूप काही शिकता आले. आपल्या स्वतःच्या विचारांना डॉक्टरांच्या मांडणी मुळे पुन्हा तपासून घेता आले आणि कितीतरी चांगल्या विचारांनी मन ताजे झाले बुद्धी सम्रूद्ध झाली . डॉक्टर  नाडकर्णी यांच्या  स्पष्ट, स्वच्छ, समर्पक, नेटक्या  आणि मुद्देसूद मांडणी मुळे ही मुलाखत अत्यंत सुंदर अनुभव देणारी ठरली .
निरनिराळ्या क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या अश्या व्यासंगी व्यक्तीची मुलाखत घेणे हे काही  सोपे काम नसते परंतु दीपा ने ही  मुलाखत उत्तम घेतली. तिने डॉक्टरांची ओळख देखील एकदम हटके करून दिली. तिने त्यांच्याशी संवाद साधताना त्यांच्या  पुस्तकातील प्रत्येक लेख  बारकाईने वाचला होता. दीपा लेखिका असली तरी अनेकदा मुलाखती घेत असते, पण आजची तिने घेतलेली मुलाखत खूप उंची गाठणारी होती. ही मुलाखत नसून दोन स्नेही आपसात गप्पा मारत आहेत असे वाटावे इतकी ती सहजसुंदर झाली. आपल्या मुलाखतकार होण्याचे सगळे श्रेय तिने डॉक्टरांचे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे बघत, त्यांना ऐकत आपण शिकत गेलो असे ती म्हणाली. डॉक्टरांच्या त्या त्या लेखनामागचा  विचार त्यांचा दृष्टिकोन  रसिक श्रोत्यांपर्यंत , वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी  सुयोग्य अश्या प्रश्नांची निवड तिने केली होती. त्यामुळे मुलाखत खूपच खुलत गेली.
एवढा सुंदर अनुभव आम्हांला आज मिळाला तो मनोविकास प्रकाशनामुळे आणि मनोविकास प्रकाशन नेहमीच दर्जेदार निर्मितीला प्राधान्य देते त्यामुळे त्यांची पुस्तके खरोखरच वाचनीय आणि संग्रहित असायलाच हवीत अशीच असतात. डॉ .नाडकर्णी यांचे  'करण्याचे दिवस आणि कळण्याचे दिवस ' हे पुस्तक सुद्धा मनोविकासनें फार सुंदर केले आहे. दीपा ने लेखक आणि प्रकाशक यांच्यामधल आपले नाते कसे एका विस्तारित कुटुंबामध्ये बदलून गेले हे सांगितले. त्यांची पुस्तक निर्मिती मागची तळमळ आमच्यापर्यंत पोहोचवली.
त्यांनी अशीच सुंदर आणि समाजाला दिशा देणारी पुस्तक निर्मिती करत रहावी यांसाठी मनःपूर्वक शुभेच्छा. डॉ नाडकर्णी यांनी स्वतःचा अमूल्य वेळ देऊन एवढे सुंदर विश्लेषण या काळाचे या पुस्तकांच्या  निमित्ताने केले आणि आम्हांला पुन्हा एकदा स्वच्छ  दिशा दाखवलीत त्यासाठी मनःपूर्वक धन्यवाद .
दीपा तू नेहमीच मुलाखत मस्त घेतेस तुझा तो हातखंडा आहे आणि झालेल्या  कार्यक्रमांवर अनुभवांवर  अप्रतिम लिहितेस. परंतु तरीही आजची मुलाखत एक अत्यंत अनोखा अनुभव होता, या मुलाखतीत कुठेही औपचारिकता, कोरडेपणा नव्हता. त्यासाठी तुझे अभिनंदन आणि एक प्यार की झप्पी !(मुन्नाभाई ईथे पण आला बघ)
डॉ. सुवर्णसंध्या धुमाळ 
6-12-20

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.