झेन आणि बाबा

झेन आणि बाबा

तारीख

कधी कधी एखादं पुस्तक आवडतं, पण ते नीटसं कळलेलं नसतं. झेनच्या बाबतीत असंच काहीसं माझं झालं होतं. मला त्या धर्माविषयी आकर्षण तर वाटत होतं, पण त्याबद्दलच्या गोष्टी पुरत्या कळत नव्हत्या.
नेहमीप्रमाणे बाबाने झेनवर लिहिलेला लेख मला वाचायला पाठवला आणि तो मला मिळालाच नाही. मग त्यानं काल रात्री  तो पुन्हा पाठवला. वाचल्यावर मी ताबडतोब त्याला फोन केला...तो झोपेतून उठलाय का वगैरे कुठलाच विचार माझ्या मनात आला नाही. कारण खरोखरंच बाबा म्हणाला तस अचानक मला लख्ख दिसायला लागलं होतं. मला लगेचच त्याच्याशी बोलायचं होतं. पहाटे पाच वाजताच उठणार्‍या बाबानं लगेचच फोन उचलला. मग मी मला त्याचा झेनवरचा लेख कसा आवडला यावर भरभरून बोलत राहिले. तोही सगळं मनापासून ऐकत होता आणि त्यावर आणखीन माझ्या ज्ञानात भर टाकत होता.
हे त्याचं झेन प्रकरण म्हणजे त्यानं लिहिलेल्या लेखाबद्दल तुम्हालाही सांगायचा मोह खूप होतोय. पण त्याचा हा लेख प्रपंच या दिवाळी अंकात येणार असल्यानं मी मोह आवरते आणि दिवाळीत लेख प्रसिद्घ होताच, तुम्हाला तो देते.

बाबानं या झेनला तिरपागडा म्हटलं आहे आणि त्याचा प्रत्यय मला आलेला होताच. झेनच्या गोष्टी वरकरणी वाचताना खूप सहज वाटतात, पण त्यातली मेख कळत नाही. अशा वेळी बाबानं इतक्या सोप्या पद्घतीनं सगळं काही उलगडून दाखवलं आहे की झेनची गोष्ट आणि बाबाचं सांगणं एकमेकांत एकजीव होवून गेलेलं आहे. मी तर त्याला म्हटलं, आज दिवसभर मला तुझ्या लेखातच गुंतलेलं राहायचं आहे.
झेन वाचता वाचता मला बाबाही तसाच दिसायला लागला..त्यातल्या साधूची एक गोष्ट ... त्याची निंदा करा, स्तुती करा...तो मात्र तसाच स्थितप्रज्ञ... मात्र त्याच्या त्या वागण्यानं हिंसा टळते, दुष्परिणाम टळतात...त्या साधूप्रमाणेच बाबा - कधी कोणावर रागावत नाही, कधी कोणाबद्दल आकस ठेवत नाही, कधी तारसप्तकात त्याचं बोलणं आजवर ऐकलेलं नाही, कधी स्वतःची टिमकी वाजवत नाही, जो त्याला भेटतो, तो त्याचा होवून जातो आणि किती निर्मळ असावं माणसानं ते त्याच्याकडे बघून कळतं. एक स्वच्छ, पारदर्शी, निखळ नातं हा माणूस आपल्याला देतो. तो माझ्यासारखीचा बाप असतो, तर त्याच वेळी अनेकांचा मित्रही असतो. पण दोन्ही नात्यात तो नितळ असा असतो. तो नेहमी जे गाणं गातो, तसाच तो वागतोही :

पानी सा निर्मल हो, मेरा मन मेरा मन
धरती सा अविचल हो, मेरा मन मेरा मन

दीपा देशमुख, पुणे

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.