मिले सूर मेरा तुम्हारा - पियूष पांडे आणि पांडेपुराण

मिले सूर मेरा तुम्हारा - पियूष पांडे आणि पांडेपुराण

‘तुम्ही आलंच पाहिजे’ असा मनोविकासच्या आशिशनं आग्रह सुरू केला. निमित्त होतं १० ऑगस्टला सायंकाळी टिळकरोडवरच्या ज्योत्स्ना भोळे सभागृहात संपन्न होणार्‍या ‘पांडेपुराण’ या पुस्तक प्रकाशनाचं! सतत सुरू असलेल्या कार्यक्रमांमुळे मी जाण्यासाठी कंटाळा करत होते, पण अखेर आशिशचं मन मोडावं वाटलं नाही आणि मी कार्यक्रमस्थळी पोहोचले.

‘पांडेपुराण’ हे पुस्तक जाहिरातगुरू म्हणून प्रसिद्ध असलेल्या पियूष पांडे लिखित ‘पांडेमोनिअम’ या पुस्तकाचा अनुवाद! हा अनुवाद प्रसाद नामजोशी (सध्या चर्चेत असलेल्या रंगा पतंगाचे दिग्दर्शक) यांनी केला आहे. आज या अनुवादित पुस्तकाचं प्रकाशन आणि त्यानंतर प्रसिद्ध मुलाखतकार सुधीर गाडगीळ हे पियूष पांडे यांची मुलाखत घेणार होते. सभागृह खच्चून भरलं होतं. इतकं की समोरच्या, मधल्या, बाजूच्या मोकळ्या जागेत लोकांनी मांडी घालून बसणं पसंत केलं होतं. जाहिरातक्षेत्रातली पियूष पांडे यांची चाहती मंडळी अतिशय उत्सुकतेनं पियूष पांडे यांची व्यासपीठावर येण्याची प्रतीक्षा करत होती. पियूष पांडे हे जाहिरातविश्‍वातले सगळ्यात प्रभावशाली व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात. इकॉनॉमिक्स टाईम्समध्ये गेली १० वर्षं त्यांचं नाव सलगपणे मानाने घेतलं जातं. ते ‘ऑगिल्वी अँड मेदर इंडिया अँड साऊथ एशिया’ (Ogilvy & Mather India and vice-chairman of O&M Asia-Pacific) चे अध्यक्ष आणि क्रिएटिव्ह डायरेक्टर आहेत. आजपर्यंत त्यांना ८०० पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. त्यांना २०१२ साली न्यूयॉर्कचा अतिशय प्रतिष्ठेचा समजला जाणारा क्लिओ ऍवार्ड्स हा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले भारतीय आहेत. २०१६ साली भारतसरकारनं त्यांना ‘पद्मश्री’ देऊन गौरवलं.

खरं तर त्यांची ओळख थोडक्या शब्दांत सांगण्यासारखी नाहीच. अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर आठवा ती भारतीय एकात्मतेचं दर्शन घडवणारी लोकसंचार परिषदेची देस रागातली जाहिरात....मिले सूर मेरा तुम्हारा......भीमसेन जोशींचा त्यातला अंतःकरणाला भिडणारा आवाज......आजही या जाहिरातीचं गारूड तसूभरही कमी झालेलं नाही. इतक्यावर थांबता येणार नाही....आठवा, कुछ खास है हम सभी मे......आठवली ना कॅडबरीची जाहिरात? ही कॅडबरी आधी केवळ लहान मुलांचा आवडीचा पदार्थ म्हणून बघितली जात होती. पण पियूष पांडे या माणसानं अशी काही जादू केली की हीच कॅडबरी आबालवृद्धांना कशी आवडते हे त्यानं आपल्या जाहिरातींमधून दाखवून दिलं....याच कॅडबरीला ‘कुछ मिठा हो जाये’ म्हणत प्रत्येकाच्या घरातल्या सण-समारंभात कॅडबरीला महत्वाचं स्थान मिळवून दिलं. कॅडबरीला शतकातली सर्वश्रेष्ठ जाहिरातमोहिम म्हणून मान प्राप्त झाला. तर फेविक्विकची जाहिरात इतकी गाजली की शतकातली सर्वश्रेष्ठ जाहिरात होण्याचा मान तिला मिळाला. तुम्हाला टायटनची जाहिरात आठवते? यू-टयूबवर जरूर बघा. गेली अनेक वर्षं ३० वर्षांपेक्षा जास्त काळ या जाहिरातली दृश्यं बदलत गेली, पण त्यातलं संगीत - ती धुन मात्र बदलली गेली नाही....ती धुन आहे जगप्रसिद्ध संगीतकार मोत्झार्ट याची! तिचा मोठ्या खुबीनं वापर पियूष पांडे या माणसानं टायटनच्या जाहिरातीत करून टायटन घड्याळांना एक वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. मनगटावर टायटनचं घड्याळ असणं म्हणजे प्रतिष्ठेचं लक्षण समजलं जायला लागलं आणि ही किमया घडली केवळ पियूष पांडेमुळे! एशियन पेंट्सची जाहिरात असो वा बजाजची जाहिरात असो, कायनेटिक लुनाची जाहिरात असो, वा व्होडाफोनची जाहिरात असो या जाहिराती लोकांनी विसरायचं ठरवलं तरी विसरता येण्यासारख्या नाहीत. खरं तर सगळ्यात मोठा धमाका हा ‘मेरा देश बदल रहा है, आगे बढ रहा है’ ही भारतीय जनता पक्षाच्या सरकारसाठी केलेली जाहिरात! या जाहिरातीनं सगळीकडे एकच धुमाकूळ घातला.

पियूष पांडेची भोपाळ गॅस दुर्घटनेवरची भोपाळ एक्स्प्रेस ही फिल्मही खूप चर्चिली गेली. तसंच जॉन अब्राहमच्या मद्रास कॅफे या चित्रपटात पियूष पांडेंनी कॅबिनेट सेके्रटरीची भूमिका निभावली होती. हा मनुष्य क्रिकेटमध्ये रणजी खेळलेला खेळाडू आहे.

या सगळ्या आठवांच्या गर्दीतून बाहेर आले आणि बघितलं तर, व्यासपीठावर पियूष पांडे, अनुवादकार प्रसाद नामजोशी, सुधीर गाडगीळ, मनोविकासचे अरविंद पाटकर स्थानापन्न झाले आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. 'पांडेपुराण' या पुस्तकाचं प्रकाशन झालं. आपल्या मनोगतात प्रसाद नामजोशींनी ‘पांडेमोनिअम’ वाचल्यावर हे पुस्तक मराठीत आलंच पाहिजे असं आपल्याला वाटलं, पण ते मराठीत आपल्यालाच करावं लागणार आहे याची पुसटशी कल्पनाही आपल्याला नव्हती. मनोविकासच्या आशिश पाटकरांनी या लिखाणाचा प्रस्ताव आपल्यासमोर ठेवला आणि हे तुम्हीच करायचं आहे असं सांगितलं. हे पुस्तक करताना खूपच आनंद मिळाला, मात्र त्यात काही चुका आढळल्या तर निःसंकोचपणे आपल्याला सांगाव्यात असं त्यांनी विनम्रपणे सांगितलं. पियूष पांडेसारख्या कल्पक आणि इतक्या व्यस्त असलेल्या माणसाला भेटायला मिळणं ही माझ्यासाठी खूप महत्वाची गोष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं. अनुवाद करणं म्हणजे एका संस्कृतीचं दुसर्‍या संस्कृतीत आलेलं संक्रमण आहे. तसंच अनुवाद करणं हा एकप्रकारे थँकलेस जॉब आहे. कोणी जेव्हा म्हणेल हे पुस्तक चांगलं आहे, तेव्हा त्या सगळ्या कॉम्प्लिमेंट्स पियूष पांडेना असतील. प्रसाद नामजोशी यांनी म्हटलं, ‘शरदचंद्र टोंगो यांनी म्हटलंय अनुवाद म्हणजे अत्तराच्या एका कुपीतून दुसर्‍या कुपीत ते अत्तर एकही थेंब न सांडता टाकायचं आहे. मी तो प्रयत्न केलाय. इंग्रजीच्या कुपीतून मराठीच्या कुपीत पियूष पांडेंनी निर्माण केलेलं अत्तर मी टाकलेलं आहे पण ते टाकताना त्या सर्जनाचा सुगंध माझ्या हाताला लागला आहे. हे पुस्तक वाचून तो सुगंध तुमच्याही हाताला लागावा आणि अशा हजारो सर्जनशील हातांनी सर्जनशील देशाकडे जावं असं मला वाटतं.’ प्रसाद नामजोशीला मी अनेक वर्षांपासून ओळखते. त्यांचं याआधीचं ‘शॉर्टकट’ हे पुस्तकही खूप गाजलं. ते माहितीपट तयार करतात. मी 'निर्माण' या डॉ. अभय बंग यांच्या पुढाकारानं सुरू झालेल्या उपक्रमात काम करत असताना सर्च, गडचिरोली इथे प्रसाद नामजोशींची एका शिबिरादरम्यान ओळख झाली होती. त्या वेळी युवांबरोबर रात्री जागवताना प्रसादची साहित्यावरची कमांड, नाटक-सिनेमावरची जबरदस्त पकड, स्वभावातला खेळकरपणा, कोणाशीही पटकन मैत्री करण्याचा स्वभाव लक्षात आला होता.

मुलाखतीला सुरुवात झाली. मी पियूष पांडे यांच्याकडे बघत होते. अतिशय साधे, चेहर्‍यावरच एक वेगळाच मीश्किलपणा, खट्याळपणा जाणवत होता. हे सगळं वाटणं उलगडत जाणार्‍या सुधीर गाडगीळ यांनी घेतलेल्या मुलाखतीतून पुढे प्रत्ययाला देखील आलंच. सुधीर गाडगीळ यांनी आजपर्यंत ३००० च्या वर एक से एक दिग्गज लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. सचिन तेंडुलकर असो, वा आशा भोसले...मुलाखत घ्यावी तर सुधीर गाडगीळ यांनीच असं लोकांच्या पसंतीचं एकमेव नाव! दोन प्रसन्न व्यक्तिमत्वाची माणसं समोर व्यासपीठावर होती. सुधीर गाडगीळ यांनी आपल्या खुमासदार शेलीत पियूष पांडेना बोलतं केलं. पियूष पांडे यांचं कुटुंब म्हणजे एक क्रिएटिव्ह फॅक्टरी आहे. त्यांना सात बहिणी (त्यात प्रसिद्ध गायिका इला अरुण) आणि एक भाऊ असून ते सगळेच नृत्य, गायन, अध्यापन अशा अनेक क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांच्या आई-वडलांना साहित्य आणि कविता यांच्यात रस होता. पियूष पांडेच्या आईनं हिंदी साहित्यातलं एकही चांगलं पुस्तक वाचायचं शिल्लक ठेवलं नव्हतं. आपल्या मुला-मुलींनी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे याकडे त्यांचा कटाक्ष होता. जाहिरातीच्या क्षेत्रात येण्याचा सुरुवातीच्या काळात पियूष पांडे यांनी विचारही केला नव्हता. ते एका चहा कंपनीत नोकरी करत होते. दोन अडीच वर्षं ती नोकरी केल्यावर त्यातल्या एकसूरीपणाचा त्यांना कंटाळा आला. एकदा त्यांना त्यांचे जाहिरातक्षेत्रात काम करणारे मित्र भेटले आणि त्यांनी तू या क्षेत्रात का येत नाहीस असा प्रश्‍न केला. गेली ३५ वर्षं पियूष पांडे हे जाहिरात क्षेत्रात काम करत असून त्यांना या क्षेत्राचा कंटाळा आला नाही. ज्या कामात मौज वाटते, आनंद मिळतो आपलं मन रमतं असंच काम करावं असं ते सांगतात. जाहिरात करणं म्हणजे एका क्रिकेट मॅचसारखं त्यांना वाटतं. क्रिकेटप्रमाणेच जाहिरात करणं हे कोणा एकट्याचं काम नाही तर ते एक चांगलं टीमवर्क आहे असं पियूष पांडे म्हणतात. एक जाहिरात बनवताना ती क्लाएंट, निर्माता, दिग्दर्शक, एडिटर अशा सगळ्या प्रक्रियांमधून महिना-दोन महिने जाते. अजूनही सोशल मीडियावर जाहिरात करण्याला मर्यादा आहेत. पेपर माध्यम हे जास्त प्रभावी आहे. कॅडबरीची जाहिरात करताना गेल्या आठ वर्षांत १२ वेळा ती नवीन फॉर्ममध्ये लोकांसमोर आली. प्रत्येक गोष्ट वेगळी होती. पण त्या गोष्टीतलं मूल मात्र एकच होतं. क्रिकेटची मॅच जिंकल्यावर आनंद झालेली तरूणी क्रिकेटच्या मैदानावर सगळं काही विसरून बेभानपणे नाचत सुटते. हे ती करत नसून तिच्यातलं मूल तो आनंद घेत असतं. त्या वेळी तिच्या हातात एक कॅडबरी दाखवली आहे. किंवा मैदानात फूटबॉल खेळणारे वृद्ध असोत, त्यांच्यातलं मूल अद्याप जागंच आहे. अशा जाहिराती करणं म्हणजे हिर्‍याला पैलू पाडून त्याचा निखार जास्त वाढवणं असा आहे. कुछ मिठा हो जायेसारखी जाहिरात आपल्या आठवणीत रमतो, आपल्या रोजच्या जगण्यातले अनेक छोटेमोठे आनंदाचे प्रसंग शोधतो. लहान मुलांना जाहिरातीत काम करायला घेताना आपल्या शूटिंगचा विचार करण्यापेक्षा त्या मुलाचं ते शूट आहे असा विचार ठेवावा लागतो. मुलाला झोप येत असेल, त्याचा मूड लागत नसेल तर हट्ट न धरता मुलाला महत्व देत काम काही वेळ बंद करावं.

आपण अमिताभ बच्चनबरोबर खूप अर्थपूर्ण काम केल्याचं पियूष पांडेंनी सांगितलं. ७५ वर्षांच्या अमिताभबद्दल त्यांना खूप आदर वाटतो. अमिताभनं जेवढं काम केलंय, तेवढं काम दुसरा कुठलाही माणूस १५० वर्षांत करू शकणार नाही असं पियूष पांडेना वाटतं. त्यांनी अमिताभबरोबर कमर्शिअल प्रॉडक्टपेक्षा सोशल प्रॉडक्टवर जास्त काम केलं. २००३मध्ये पोलिओची जाहिरात अमिताभबरोबर केली आणि २०१४ साली भारतानं पोलिओमुक्त झाल्याचं जाहीर केलं. युनिसेफची जाहिरात असो, वा स्वच्छ भारत अभियानाची, हिपेटायटिसची जाहिरात असो, अमिताभ जेव्हा ती जाहिरात करतो तेव्हा ते वेगळं असतं. तो प्रत्येक जाहिरातीपूर्र्वी स्वतः खूप तयारी करतो आणि पियूष पांडेंसाठी तर अमिताभ बच्चन फक्त मॉडेल नाही तर रोलमॉडेल आहे. पियूष पांडे कुठलीही जाहिरात करताना दैनंदिन जगण्यातले प्रसंग शोधतात. आपल्या आयुष्याला ज्या भावनांनी स्पर्श केलाय, ते ते जाहिरातीत टिपणं त्यांना महत्वाचं वाटतं. पियूष पांडेचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नेहमी सकारात्मक असतो. या पुस्तकात हा दृष्टिकोन दिसतो. ते म्हणतात, मला रडायला लाज वाटत नाही. आपण आनंद झाल्यावर जसं हसतो, तेव्हा लाजतो का? एखाद्या गोष्टीनं आपल्या मनाला स्पर्श केला आणि त्यामुळे आपल्याला रडायला येत असेल तर मी रडतो. जाहिरातीतच नव्हे तर, खर्‍या आयुष्यात भावनेला खूप महत्व आहे.

पियूष पांडे म्हणाले, काम करताना त्या कामाच्या मुळापर्यंत जाणं, जाहिरातींवरचा पाश्‍चिमात्य प्रभाव करून भारतीय संस्कृतीचा वापर करणं, समोरच्या व्यक्तीला ती जाहिरात अवास्तव वाटली न पाहिजे याची काळजी घेणं या गोष्टींकडे मी कटाक्षानं लक्ष देतो. मुलाखतीनंतर उपस्थित श्रोत्यांमधून अनेक प्रश्‍न पियूष पांडे यांना विचारले गेले. तेव्हा आपलं काम आपल्या क्लाएंटला आवडलं नाही तर निराश होऊ नका. उलट असा विचार करा की जर आपण एका माणसाला आपल्या कामानं समाधानी करू शकत नसू तर हजारो लाखो लोक कसे समाधानी होतील. आणि मग दुप्पट जोमानं अतिशय संयम बाळगून काम करा. पियूष पांडे यांनी आपल्या (मराठी) पत्नीबरोबर अनेक मराठी चित्रपट आणि नाटकं बघितली असून त्यांना ती आवडतात. तसंच आपल्या पगाराव्यतिरिक्त जे पैसे त्यांना मिळतात, ते कुठलाही गाजावाजा न करता ते चांगल्या कामासाठी देणगीदाखल देऊन टाकतात. कार्यक्रमाच्या वेळी वैभव देशमुख, चंद्रमोहन कुलकर्णी, प्रसाद नामजोशी, प्रसाद मणेरीकर, संज्योत देशपांडे, शुभदा बर्वे आणि कल्याण तावरे यांच्याशी भेट आणि गप्पा झाल्या. पियूष पांडे हा अतिशय व्यस्त माणूस असून त्याच्यापर्यंत पोहोचणं ही अत्यंत कठीण गोष्ट असताना मनोविकास प्रकाशनानं पुणेकरांना त्यांची भेट घडवली, त्यांच्याशी संवाद साधायची संधी दिली याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार! घरी परतताना पियूष पांडेचंच वाक्य मनात घोळत होतं: Tell me a truth and I will believe, tell me a story and I will remember.

दीपा देशमुख

११ ऑगस्ट २०१७

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.