वाचन प्रेरणा दिन, साकेत, औरंगाबाद आणि मी!

वाचन प्रेरणा दिन, साकेत, औरंगाबाद आणि मी!

तारीख
-
स्थळ
औरंगाबाद

साकेत प्रकाशनानं आयोजित केलेल्या औरंगाबाद इथल्या कार्यक्रमाला नुकतीच जाऊन आले. वाचन प्रेरणा दिनानिमित्त माझं व्याख्यान आयोजित केलं होतं. या प्रसंगी औरंगाबादच्या उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर यांचं 'व्यक्तिमत्व विकासासाठी सॉफ्टस्किल्स' या पुस्तकाचं आणि त्यांच्याच आवाजातलं 'श्यामची आई' या ऑडिओ बुकचं प्रकाशन होतं. सकाळी आसावरीसोबत औरंगाबादला पोहोचताच प्रतिमा आणि साकेत भांड यांनी आमचं स्वागत केलं. साकेत प्रकाशनाचं अतिशय सुरेख असं कार्यालय आम्ही न्याहाळत होतो. काम करण्याचा हुरूप यावा असं तिथलं वातावरण होतं. प्रतिमानं तिथल्या उत्साही आणि हसतमुख स्टाफशी आमची ओळख करून दिली. तिथून आम्ही क्रांतिचौकातल्या ‘मनोर’ हॉटेलमध्ये लंचसाठी पोहोचलो. आमच्या स्वागताला प्रसन्न व्यक्तिमत्व असलेल्या लेखिका उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर फुलांचा भलामोठा सुरेखसा गुच्छ घेउन आल्या होत्या. त्या छान की फुलं जास्त छान असा प्रश्‍न मला पडला. त्यांच्याबरोबर त्यांच्या जाऊबाई आणि ज्योती नांदेडकर होत्या. सगळ्यांशी गप्पा मारत छान जेवण झालं. कार्यक्रमाला भेटूया असं म्हणून आम्ही त्यांचा निरोप घेत साकेत प्रकाशनाच्या बुक वर्ल्डला भेट दिली.

बळवंत वाचनालयाच्या शेजारी असलेल्या औरंगपुर्‍यातल्या साकेतच्या बुक वर्ल्डनं माझं लक्ष वेधून घेतलं. औरंगाबादमध्ये त्या वेळी असलेली औरंगाबाद बुक डेपो, विद्या बुक्स, आरती बुक्स अशी मोजकी पुस्तकांची दुकानं मला आठवत होती. पण इतकं देखणं दुकान त्या वेळी तिथे नव्हतं. पुण्यात जसं अक्षरधारा दालनाला भेट दिल्याशिवाय करमत नाही, तसंच औरंगाबादवासियांना आता बुक वर्ल्ड विषयी वाटत असणार. आसावरी आणि मी तिथून भरपूर पुस्तकं विकत घेतली. साकेतच्या बुक वर्ल्डच्या उत्साही स्टाफनं आमचं स्वागत गुलाबाचं फूल आणि पेढा देऊन केलं. 'जीनियस'विषयी ही मंडळी भरभरून माझ्याशी बोलली. मला एकदम छान वाटलं. घरी परतलो.

प्रतिमाची चिमुरडी चिमणी साची आमच्याबरोबर चिवचिवत होती. त्यानंतर बाबा भांड आणि आशा भांड यांच्यासोबत आमच्या गप्पा झाल्या. शांत, समाधानी आणि तृप्त जीवन जगत असलेलं जोडपं माझ्यासमोर होतं. मुलगा आणि सून यांच्यावर कामाची जबाबदारी निश्चिंत मनानं सोपवून दोघंही प्रसन्नपणे योगा, व्यायाम आणि इतर अनेक विषयांवर आमच्याशी बोलत होते. आशा भांड यांची दुर्मिळ वस्तूंचा संग्रह करण्याची आवड घरातल्या प्रत्येक ठिकाणी दिसत होती. समयांचे तर इतके विविध प्रकार बघायला मिळाले की अनेक वेळा आपण समयांचं प्रदर्शन भरवल्याचंही आशा भांड यांनी सांगितलं. मला एकाएकी मी एमकेसीएलमध्ये काम करत असलेले दिवस आठवले. सेनापती बापट रोडवरच्या आयसीसी टॉवर्समधल्या पाचव्या मजल्यावरचं एमकेसीएलचं कार्यालय....आत प्रवेश करताच स्वागताला उभी असलेली छतापासून साखळीनं लटकवलेली समयी....त्यात चोवीस तास जळणार्‍या तेलावातीच्या ज्योती....ते दृश्य बघून इतकं प्रसन्न वाटायचं....तसंच काहीसं आशा भांड यांच्या समयांकडे बघून मला वाटलं. देशातूनच नव्हे तर जगाच्या कानाकोपर्‍यातून आणलेल्या अप्रतिम वस्तू आमचं लक्ष खेचून घेत होत्या. आसावरी आणि मी कार्यक्रमाला जाण्यासाठी दहाच मिनिटांत तयार झालो.

कार्यक्रमस्थळी पोहोचताच तापडिया रंगमंदिर खच्चून भरलेलं दिसलं. साकेत आणि प्रतिमा यांच्यासह त्यांच्या आख्ख्या टीमनं घेतलेले परिश्रम दिसत होते. सारंग टाकळकर आणि ज्योती नांदेडकर यांनी छानसं सूत्रसंचलन केलं. प्रकाशक म्हणून बाबा भांड यांनी अतिशय नेमक्या शब्दांत साकेत आणि पुस्तकाविषयी भाष्य केलं. आशा भांड यांनी आमचं स्वागत केलं. पुस्तक प्रकाशन आणि श्यामच्या आईचं ऑडिओ बुक यांचं प्रकाशन झालं. माझ्या शेजारी असलेल्या पद्मश्री धनराज पिल्ले यांच्याकडे मी पाहत होते. अतिशय गरिबीतून वाट काढत, आंतरराष्ट्रीय स्तरावर हॉकीत यश मिळवून देशाचं नाव उज्ज्वल करणारा खेळाडू, मार्गदर्शक! स्वभावानं नम्र, साधा! त्यांच्या बोलण्यातून त्यांचा साधेपणा जाणवत होता. उद्योजक ऋषिकुमार बागला यांनी आपल्या व्याख्यानानं उपस्थितांचं मन जिंकून घेतलं. यशस्वी उद्योग करताना कौशल्यविकासाची किती आणि कशी आवश्यकता आहे याबद्दल ते बोलले. आपल्या मनोगतात लेखिका अंजली धानोरकर यांनी आपण हे पुस्तक का लिहिलं याविषयी सांगितलं. मी या देखण्या तरुणीकडे बघत होते. सगळेच सरकारी अधिकारी अंजलीइतके प्रसन्न, कार्यतत्पर आणि मनमिळाऊ असतील तर सरकारी कार्यालयांचं स्वरूपच पालटून जाईल असं वाटलं. गृहिणी म्हणून, अधिकारी म्हणून, प्रशिक्षक म्हणून आणि लेखक म्हणून आत्मविश्‍वासाने उभ्या असलेल्या अंजलीचं मला विशेष कौतुक वाटलं.

वाचनाची गोडी कधी आणि कशी लागली आणि त्या वाचनानंच लिखाणाकडे कशी वळले, तसंच परिस्थिती, भेटलेली माणसं आणि वाचलेली पुस्तकं आपल्याला रोज समृद्ध करताहेत याविषयी माझ्या व्याख्यानात मी बोलले. चांदोबापासून सुरू झालेला वाचनाचा प्रवास आज कुठपर्यंत पोहोचलाय आणि पुस्तकांनी आपल्याला काय दिलं हे सगळं श्रोत्यांशी संवाद साधताना जाणवत होतं. पुस्तकांचं आपल्या आयुष्यातलं स्थान किती मोलाचं आहे हे कळत होतं. पृथ्वीराज तौर यांनी अनुवादित केलेल्या पुस्तक या विषयांवरच्या काही कविता या वेळी आठवत राहिल्या. राष्ट्रपती अब्दुल कलाम यांचे अनेक हृद्य प्रसंग आठवत गेले. कार्यक्रम खूप छान झाला.

माझ्यात वाचनाची आवड निर्माण करणारे, माझ्यातल्या कवयित्रीला जागं करणारे फ. मू. शिंदे सर, माझी मैत्रीण बनलेल्या प्रा. लीला शिंदे, मला कॉलेजमध्ये अकांउटन्सी शिकवणारे धूत सर, माझी मैत्रीण अलका राजेभोसले, अनेक वर्षांनी भेटलेला शेजारी संजू अष्टेकर, जगताप, छानसं लिहिणारी ज्योती धर्माधिकारी असे अनेक जण खूप प्रेमानं भेटले. ही भेट साकेत आणि प्रतिमा यांच्यामुळेच घडून आली होती. त्यांच्या आग्रहाच्या निमंत्रणामुळे मी पुन्हा महाविद्यालयीन विश्‍वात पोहोचू शकले होते. (सख्खा भाऊ अभिजीत पंडित आणि सावत्र भाऊ विश्‍वास देशपांडे यांची भेट न झाल्यानं वाईट वाटलं!)

कार्यक्रम संपताच जेवणाचा आणि इतर गप्पांचा मोह टाळून मी आणि आसावरी सगळ्यांचा धावत धावत निरोप घेऊन अहमदनगर मार्गे पुण्याच्या रस्त्याला लागलो. नगरला किरण, स्नेहल आणि राजवर्धन आमची वाट बघत होते. त्यांच्याबरोबर चविष्ट जेवण जेऊन आम्ही पुण्याला मध्यरात्री पोहोचलो. थकव्यामुळे झोप लगेच लागली, पण झोपेतही 'बुक वर्ल्ड' मात्र सारखं खुणावत राहिलं! 

दीपा देशमुख 
२० ऑक्टोबर २०१७.
 

कार्यक्रमाचे फोटो