लेखक आपल्या भेटीला - रोटरी क्लब प्रिस्टीन पुणे

लेखक आपल्या भेटीला - रोटरी क्लब प्रिस्टीन पुणे

तारीख
-
स्थळ
रोटरी क्लब प्रिस्टीन पुणे

रोटरी क्लब प्रिस्टीन पुणे आयोजित लेखन प्रवास उलगडण्यासाठी मी सेवासदनमध्ये पोहोचले. माझ्या आधी स्वाती प्रभुणे, आसावरी माझी वाट बघत होत्या. काहीच वेळात शंकरही आला. रोटरीचे सदस्य हास्यविनोद करत अल्पोपहार करत होते. बहुतांशी सदस्य तरूण वयोगटातले आणि अत्यंत उत्साही असे दिसले. शुभांगी मुळे आणि नितीन मुळे या जोडीनं माझं स्वागत केलं आणि आम्ही हॉलमध्ये पोहोचलो. 
आसावरीला बघून माझ्या डोक्यात एकाएकी एक कल्पना आली. सकाळमध्ये काम करत असताना तिचं उत्कृष्ट सूत्रसंचालन, हजरजबाबीपणा मी बघितला होता. पण त्यानंतर सकाळमध्ये तिचं कामाचं बदलत गेलेलं स्वरूप, त्यानंतर सकाळ सोडून अ‍ॅमेनोरा प्रकल्पात तिचं जॉईन होणं आणि आता बुकगंगा पब्लिकेशनमधला जॉब! या सगळ्यांत तिच्या मुळातल्या गुणांना दडपून ठेवावं लागत होतं. तसा तिचा एस.पी. कॉलेजचा ग्रुप (ज्यात पोलिस अधिकारी महेश भागवतांचा पुढाकार असतो) बराच अ‍ॅक्टिव्ह असल्यामुळे थोडाफार वाव तिथे नक्कीच मिळतो. पण बाकी तेच साचलेलं, चाकोरीबद्ध रूटीन. त्यामुळे मी माझ्या व्याख्यानाऐवजी आसावरीला 'माझी मुलाखत घे' असं सांगितलं. तिला गेल्या १०-१२ वर्षांमधला प्रवास माहीत होताच. तसंच तिला मी काय बोलणार होते, ते मुद्दे क्रमानं सांगितले. विशेष म्हणजे ती कुठलेही आढेवेढे न घेता तयार झाली. थँक्स आसावरी. 

मी आयोजकांना हा बदल सांगितला, त्यांनी आनंदानं संमती दिली. रोटरीच्या सदस्यांबरोबर माझ्या आलेल्या पाहुण्यांचंही विशेष स्वागत करण्यात आलं आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. 
लिहायला का आणि कधीपासून लागले हे सांगत सांगत मी बोलत गेले, आसावरी मला विचारत गेली आणि कार्यक्रमात रंगत आली. प्रवास खूप सारांशरूपानं घेणं आवश्यकच होतं. वेळेची मर्यादा लक्षात घेऊन तो आम्ही त्या वेळेत बसवला आणि शेवटाकडे जाताना आसावरीने मला कविता किंवा गाणं गाण्याचा आग्रह केला. मी पेटंट घेतलेल्या आणि अलिखित माझ्याच असलेल्या वैभवच्या कविता अशा वेळी धावत येतात. मी वैभव देशमुखची 'गुणगुणावे मी तुला अन तू मला' ही कविता गाऊन सादर केली. या गीतामागे खूप आठवणी आहेत. वैभवच्या या गीतानं मला भरभरून बळ दिलं आहे. 

कार्यक्रम कधी संपला कळलंच नाही. श्रोत्यांमधून कार्यक्रम आवडल्याची पंसतीची पावती आली. प्रत्येकजण आवर्जून भेटून गेला. जाताना आता 'आम्ही कॅनव्हास वाचणार', 'सिंफनी वाचणार' असं सांगून गेला. त्यातही 'सिंफनीचा कार्यक्रम कधी आहे ते कळवा, आम्हाला ऐकायचाच आहे' असंही त्यांनी सांगितलं. सगळ्यांचा निरोप घेऊन मी निघाले. 
नितीन आणि शुभांगी यांनी मला घरी पोहोचवलं. कार्यक्रमाच्या छानशा आठवणी घेऊन मी घरात शिरले. 

दीपा देशमुख, पुणे. 

कार्यक्रमाचे फोटो