देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद  गणित दिन - गुरुवार, २२ डिसेंबर २०१६

देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद  गणित दिन - गुरुवार, २२ डिसेंबर २०१६

तारीख
-
स्थळ
देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद 

२२ डिसेंबर हा गणितज्ञ रामानुजन यांचा जन्मदिवस! या दिवसाचं औचित्य साधून देवगिरी महाविद्यालय, औरंगाबाद इथं अच्युत गोडबोले आणि मी - आम्हाला गणित दिन साजरा करण्यासाठी व्याख्याते म्हणून बोलावलं होतं. देवगिरी महाविद्यालय हे माझं कॉलेज! जिथं मी शिकले, त्यामुळे तिथे जाताना मला विशेष आनंद होत होता. ज्या वेळी कार्यक्रम ठरला, त्या वेळी मी आयोजकांना मी कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे याविषयी काहीच बोलले नव्हते.

आम्ही सभागृहात पोहोचलो, तेव्हा विद्यार्थी, विद्यार्थिनी, प्राध्यापक यांनी सभागृह तुडुंब भरलं होतं. फक्त गणित विभागाचेच नाही, तर इतरही विभागाचे (विज्ञान, संगणक, कला, वाणिज्य वगैरे) सर्वच जमले होते. ज्यांना जागा मिळाली नाही, ते समोर येऊन चक्क मांडी ठोकून बसले, काही तर व्यासपीठावर येऊन बसले आणि काहींनी दाराशी गर्दी केली. आम्ही दोघांनीही गणित याच विषयावर बोलायचं ठरवलं होतं, पण आता सर्वच शाखेचे विद्यार्थी असल्यानं वेळेवर अनेक गोष्टी बदलाव्या लागणार होत्या. दोनच मिनिटांत आम्ही मनाशी काय वेगळं बोलायचं हे ठरवलं. मुलं-मुली इतकी उत्साहात होती की ती जणू काही स्नेहसंमेलनाच्या मूडमध्ये शिरली होती. मुलांनी आरडाओरडा केला, गांभीर्यानं घेतलं नाही तर मी कदाचित डगमगून जाईल अशी अच्युत गोडबोलेंना माझी काळजी वाटत होती. कारण पहिलं व्याख्यान माझंच होतं आणि माझ्यानंतर ते बोलणार होते. 

मी शांत होते, कारण आता इतकी सवय झालीय आणि दुसरं म्हणजे आपल्यातला आत्मविश्‍वास आपल्याला काय घडणार याची ग्वाही देत असतो. मी त्यांना सगळं व्यवस्थित होईल या अर्थाचं स्मित दिलं. सुरुवातीची स्वागत, रामानुजनच्या प्रतिमेला पुष्प वगैरे औपचारिकता आटोपली आणि मी बोलायला सुरुवात केली. मी याच कॉलेजची माजी विद्यार्थिनी आहे हे सुरुवातीलाच सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. मी त्यांच्यातलीच एक आहे असा विश्‍वास देऊन मी बोलायला सुरुवात केली. हव्या तिथे टाळ्या, हवा तिथे हशा आणि हवा तिथे गंभीरपणा वातावरणात निर्माण होत गेला आणि माझं व्याख्यान आटोपलं. त्यानंतर अच्युत गोडबोले यांचं व्याख्यान झालं. त्यांनीही माझ्याप्रमाणेच गणिताबरोबरच अनेक विषयांना स्पर्श करत नंतर पूर्णपणे गणितावर बोलायला सुरुवात केली. मला वाटतं, मी आजपर्यंत त्यांच्या ऐकलेल्या व्याख्यानातलं हे सगळ्यात अप्रतिम व्याख्यान असावं. दोन तास बोलूनही विद्यार्थी -‘सर अजून बोला, अजून बोला’ असा आग्रह करत होते. ते उठायलाच तयार नव्हते. पण अखेर थांबणं भाग होतं. 

कार्यक्रम दोन तास उशिरा संपला. सगळेच तृप्त झाले होते. आम्ही प्राचार्यांच्या कार्यालयात पोहोचलो. याच कॉलेजमध्ये काही वर्षांपूर्वी मी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीनं युवती मेळावा आयोजित केला होता. त्या वेळी सी.एस. पाटील मॅडम यांनी खूप सहकार्य केलं होतं. हा कार्यक्रम खूपच यशस्वी झाला होता. ललित हा चित्रकार मित्र आज या जगात नाही पण त्यावेळी तो माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला होता.

आता मात्र कॉलेजमधल्या अनेक प्राध्यापकांनी मला ओळखलं. पांचाळ सर आणि इतर अनेक. त्यांच्या चेहर्‍यावर ओळखीचा आनंद दिसत होता. मी वाणिज्य शाखेची विद्यार्थिनी असून मी कला शाखेचे मराठीचे सगळे तास आवर्जून करत असे. त्या वेळी प्राध्यापक फ. मु. शिंदे मराठी  शिकवत असत. अप्रतिम ....ऐकत राहावं असं!!!! त्यांनीही 'आठवण केली' असा निरोप पाठवला. खूप छान वाटत होतं. ज्या महाविद्यालयात आपण शिकलो, अर्थात शिकत असताना नाटक, एकांकिकेतली अभिनयाची अनेक राज्यस्तरीय बक्षिसंही त्या वेळी महाविद्यालयाला मिळवून दिली होती. त्या वेळचं स्नेहसंमेलन, सुरेंद्र देशमुख बरोबर गायलेलं 'रमैया वस्तावैया, मैने दिल तुझको दिया' आणि सुषमा पेठेबरोबर गायलेलं 'हसता हुआ नुरानी चेहरा' गाणी आठवली, बिरोबाची वाडी आणि लक्षीची फिर्याद नाटकातली धनू आणि ज्योती यांची अविस्मरणीय भूमिका, आलेले फिशपॉंन्ड, 'आशय' नावाचं  आम्ही काढत असलेलं कॉलेजचं मॅगेझिन सगळं सगळं आठवलं. खरं तर मध्ये किती वर्षं गेली, पण आज मात्र काळाचं अंतर मिटलं होतं. मला मी त्याच वेळची आणि आसपासची सगळी मुलं-मुलीही जणू काही तीच आहेत असं वाटत राहिलं. 

आभार देवगिरी कॉलेज! आभार गणितज्ञ रामानुजन आणि आभार रघू! ललितची उणीव भरून काढल्याबद्दल!!!

दीपा देशमुख

२२ डिसेंबर २०१६
 

कार्यक्रमाचे फोटो