श्रीमंती सोलापूरची पुरस्कार

श्रीमंती सोलापूरची पुरस्कार

तारीख
-
स्थळ
पुणे

काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या पंडित फॉर्म्समध्ये 'सोलापूर सोशल फाउंडेशन'नं तीन दिवस सोलापूरचे स्टॉल्स, विविध स्पर्धा, विविध गुणदर्शन आणि 'श्रीमंती सोलापूरची पुरस्कारा'चं वितरण केलं. मूळ सोलापूरचे अनेक उद्योजक, व्यावसायिक आणि इतर अधिकारी पदावर असलेले  लोक एकत्र आले आणि त्यांनी सोलापूर सोशल फाउंडेशनची स्थापना केली. या फाऊंडेशननं सोलापूरमधल्या तरुणांना उद्योगशील होण्यासाठी, व्यवसायात मार्गदर्शन करण्यासाठी, त्यांच्यातल्या सुप्त गुणांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आपला हात पुढे करायचा असं ठरवलं. 

या कार्यक्रमात अच्युत गोडबोले यांना श्रीमंती सोलापूरची पुरस्कार प्रदान करण्यात आला. पण गेले काही दिवस त्यांच्या आवाजानं त्यांना बोलण्यास मनाई केल्यामुळे त्यांच्या वतीनं मलाच त्या पुरस्काराला उत्तर द्यायचं होतं. अच्युत गोडबोलेंबरोबरच अभिनेता राहुल सोलापूरकर, दिग्दर्शक, अभिनेता नागराज मंजुळे यांनाही पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांनी या प्रदर्शनाचं उदघाटन केलं. 

या प्रदर्शनात सोलापूरवासीयांचे इतके वैविध्यपूर्ण स्टॉल्स होते की जवळपास सगळ्या स्टॉल्सना भेटी द्यायचं ठरवलं तर अख्खा एक दिवस काढायला हवा. सोलापूरच्या चादरी, सोलापूरच्या साड्या, सोलापूरच्या गरम उबदार घोंगड्या, सोलापूरची प्रसिद्ध शेंगदाण्याची चटणी, सोलापूरचे इतर खाद्यपदार्थ, कलात्मक वस्तू, चित्रप्रदर्शन....जे डोळ्यांना बघायला हवं अशी इच्छा धरावी ते ते सगळं इथं दिसत होतं. अंजली स्वामी या चित्रकार तरुणीच्या प्रदर्शनीला आम्ही भेट दिली, तिची चित्रं अप्रतिम अशी!

या कार्यक्रमात सोलापूरमधली कौशल्यं, कलाकार आणि खर्‍या श्रीमंतीचं दर्शन घडलं. सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या पुढल्या वाटचालीसाठी शुभेच्छा!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो