'स्नेहांकित' पुणे

'स्नेहांकित' पुणे

तारीख
-
स्थळ
पुणे

काल 'स्नेहांकित' या संस्थेत बोलावलं होतं.(खर तर अश्विनीमुळे जाण्याची संधी मिळाली.) संचालक राहुल देशमुख यांचं कार्यालय मोजता येणार नाही इतक्या पुरस्कारांनी भरून गेलंय.
राहुल देशमुख हा तरुण वयाच्या सातव्या आठव्या वर्षी आपली दृष्टी गमावून बसला. तिथून त्याच्या संघर्ष्मयी जगण्याला सुरुवात झाली. कुठेही आपला स्वाभिमान न गमावता या तरुणाने अथक प्रयत्नाने शिक्षण तर (मेरीटमध्ये) पूर्ण केलंच, पण आपल्यासारखा त्रास इतर दृष्टिहीन मुलामुलींना होऊ नये म्हणून त्याने पुण्यात अशा मुलांसाठी हॉस्टेल सुरु केलं. तेही मोफत !!!! त्यानंतर अंधत्व आलेल्या मुलामुलींसाठी कॉम्पुटर क्लास्सेस सुरु केले. यात वेगळ software वापरलं जातं जेणेकरून ही मुले इतर नॉर्मल मुलांप्रमाणे दिसत नसतानाही उत्तमरीत्या काम करू शकतात. 

राहुल देशमुख यांनी आर्थिक परिस्थिती अतिशय वाईट असलेल्या या मुलामुलींसाठी शिष्यवृत्तीची व्यवस्था सुरु केली. यामुळे या मुलांना जगणे सुसह्य होणार आहे. ही मुले अतिशय उत्साही आणि आनंदी दिसत होती ....आपण काही करू शकतो हा आत्मविश्वास राहुल देशमुख यांनी या मुलांमध्ये निर्माण केला होता.

मुलामुलींनी अतिशय सुरेल आवाजात कर्मा चित्रपटातलं 'दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिये' हे गाणं गायलं. स्वातंत्र्य दिन जवळ आल्याने हे गाणं ऐकताना डोळे भरून आले.
या मुलामुलींशी संवाद साधून खूप आनंद मिळाला.  शिष्यवृत्तीचे धनादेश मुलामुलींना देताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप काही सांगून जात होता. अश्विनी इथे नेहमीच येते कारण देवता आणि अश्विनी दोघी मैत्रिणी!!! अश्विनीला या मुलांमध्ये राहण्यात खूप समाधान मिळत. या मुलांनी आमची 'जीनियस' मालिका ब्रेल मध्ये वाचली होती आणि याची लेखिका अश्विनी ची मैत्रीण आहे कळताच त्यांनी अश्विनी जवळ 'आम्हाला लेखिकेला भेटायचं' असा आग्रह धरला होता. आणि मला हे तिने सांगताच 'माझी सगळी व्यस्तता सोडून मी येईन' असा शब्द मी अश्विनीला दिला होता. Thanks  अश्विनी !!!! 

याच वेळी मला खूप आवडली  राहुलची बायको देवता!!!! made for each other जोडी !!!! इतकी गोड आहे ही ! आणि राहुलबरोबर तिने या कामात स्वतःला वाहून घेतलंय.  राहुल आणि देवता यांची जोडी बघितल्यावर मला लुई पाश्चर आणि मेरी आठवले....याच वेळी मला माझा मित्र स्वागत याची देखील आठवण आली. स्वागतने तर कित्येक दिवस स्वतः डोळ्यांवर पट्टी बांधून अनुभव घेतला आणि अंध व्यक्तींसाठी काम सुरु केलं!!!!

पुन्हा पुन्हा इथे यायचं असं ठरवून मी सगळ्यांचा निरोप घेतला.

दीपा देशमुख.

कार्यक्रमाचे फोटो