किशोरकुमार आणि लीना चंदावरकर

किशोरकुमार आणि लीना चंदावरकर

किशोरकुमार हा माझा लहानपणापासूनच अतिशय आवडता गायक! लता मंगेशकर किंवा आशा भोसले अशा गायकांची गाणी गुणगुणायच्या ऐवजी मी मेल सिंगरचीच त्यातही किशोरकुमारची गाणी गुणगुणायची. त्याचं ‘जीवनसे भरी तेरी आँखे’ असो, की ‘आ चल के तुझे मै लेके चलॅू’ किंवा ‘बेकरार दिल तू गाये जा’  वा ‘ओ मेरे दिल के चैन’, किंवा ‘कोई होता जिसको अपना’ हे गाणं असो किंवा ‘ये राते ये मोसम नदी का किनारा’ हे ड्युएट सॉंग असो अशी शेकडो गाणी मला पाठ असायची. त्यातली काही गाणी तर आजही तोंडपाठ आहेत. खूप आनंदाच्या क्षणी किंवा अस्वस्थ मनःस्थितीत किशोरकुमारची गाणी धावून येतात. ती ऐकताना मी त्यात बुडून जाते. 

आज सकाळी  नव्या पुस्तकावर काम करत असताना पहाटे पाचलाच जाग आली आणि कम्प्युटरवर कामाला सुरुवात करण्यापूर्वी सहज एखादं गाणं ऐकावं म्हणून किशोरकुमारचं ‘पंछी हू मै इस का पथ का, अंत नही जिसका’ हे गाणं ऐकत होते आणि ऐकत असतानाच माझ्या एका मित्राचा वैतागलेल्या मनःस्थितीत फोन आला. त्याचा मूड बदलावा, त्याला चांगलं वाटावं म्हणून मी किशोरकुमारचं गाणं ऐकत असल्यामुळे त्याच्याविषयीच बोलत बसले. किशोरकुमारविषयी बोलताना लीना चंदावरकर या गोड अभिनेत्रीचा चेहरा डोळ्यासमोर आला.

लीना चंदावरकरचा जन्म १९५० सालच्या ऑगस्ट महिन्यातला! तिचं लग्न गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांचे चिरंजीव सिद्धार्थ बांदोडकर याच्याशी झालं. लग्नानंतर ११ महिन्यांनीच त्याचा मृत्यू झाला. अकरा महिन्यांमधल्या सिद्धार्थबरोबरच्या लीनाच्या आठवणी खूप सुखद आहेत. नवरा-बायको या नात्यापेक्षा आम्ही खूप चांगले मित्र होतो असं ती म्हणते. एंगेजमेंटनंतर एकदा दोघं लोणावळ्याला गेले असताना तिथं किशोरकुमार आणि त्याची तिसरी बायको योगिता बाली आले होते. सिद्धार्थ हा किशोरकुमारचा जबरदस्त चाहता होता. त्या वेळी किशोरकुमारकडे पाहून सिद्धार्थनं लीनाला विचारलं, ‘‘जर त्यानं तुला लग्नाचा प्रस्ताव ठेवला तर तू त्याच्याशी लग्न करशील?’’ त्या वेळी लीना म्हणाली, ‘नेव्हर’ 
आपण ठामपणे एखाद्या गोष्टीबद्दल नाही म्हणण्याला पुढे चालून काहीच अर्थ नसतो. 
सिद्धार्थचा एकदा अपघात झाला, त्या वेळी तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असताना तिथला जीवन नावाचा वॉर्डबॉय किशोरची गाणी खूप चांगली गायचा. सिद्धार्थनं आग्रहानं जीवनला ‘ए जीवन है इस जीवन का यही है रंगरूप’ हे गाणं गायला लावलं होतं.

सिद्धार्थच्या अचानक झालेल्या मृत्यूनंतर लीना नैराश्याच्या गर्तेत गेली. लोक आत्महत्या का करत असावेत हे तिला पटायला लागलं होतं. लीनाचे आई-वडील तिला घेऊन त्यांच्या गावी धारवाडला परतले. तिला बरं वाटावं यासाठी ते अनेक प्रयत्न करत. पण लीनाला त्या दुःखातून बाहेर येणं तितकंस सोपं नव्हतं. तिला ते जमत नव्हतं. एकदा सकाळी ती आपल्या घराच्या अंगणात उभी असताना तिची शेजारीण तुळशीच्या रोपट्याला पाणी घालत असताना लीनाला दिसली. लीनानं तिच्याकडे बघून स्माईल केलं. पण शेजारणीनं स्माईल न करता ती उलट घराकडे धावत सुटली. आपलं काय चुकलं हे लीनाला कळलंच नाही. पण नंतर तिला समजलं की सकाळी सकाळी विधवेचं तोंड बघणं हे त्या शेजारणीला अशुभ वाटलं होतं. लीनाचे काही नातेवाईक तिला टोमणे मारत. तिला मंगळ असल्यामुळे तिचा नवरा गेला असही बोलत. या सगळ्यांमुळे एकदा तर लीनानं चिडून फराळाची  प्लेट असलेला ट्रेच त्या नातेवाईकाच्या अंगावर फेकला होता. त्या काळात आपल्या आसपास कोणीही नको, आपण एकटंच राहावं असं तिला वाटत असे आणि मग ती तासनतास झोपून वेळ काढत असे.

काही दिवसांनी आपल्या अर्धवट चित्रपटांचं काम पूर्ण करण्यासाठी लीना मुंबईला आली आणि तो निर्णय तिच्या जीवनाला वेगळं वळण देणारा ठरला. 
१९७९ साली लीनाची आणि किशोरकुमारची भेट झाली. एके दिवशी किशोर कुमारचा ड्रायव्हर अब्दुल लीनाकडे आला आणि त्यानं किशोरकुमारचा फोन नम्बर लीनाला देत तिनं त्याला फोन करावा असा निरोप दिला. लीनानं किशोरकुमारला फोन केला, तेव्हा त्यानं ‘प्यार अजनबी है’ या चित्रपटाची पटकथा ऐकवण्यासाठी तिच्याशी चर्चा केली. त्यानंतर रोजच किशोरकुमारचे फोनकॉल्स लीनाला येत. वेगवेगळ्या प्रकारे बोलून तो तिला हसवत असे. लीनाच्या वडिलांना देखील लीनामधला फरक जाणवायला लागला होता. आपली मुलगी दुःखातून बाहेर येते आहे, हसते आहे याचाच त्यांना आनंद होत होता. एकदा एका संध्याकाळी किशोरनं लीनाला फोन केला, तेव्हा त्याचा आवाज खूपच बारीक आणि खोल असा येत होता. तो म्हणाला, ‘‘लीना, माझी रास सिंह असून माझ्यावर सूर्याचं अधिपत्य आहे. पण जेव्हा सूर्यास्त होतो, तेव्हा मला खूप एकाकी वाटतं.’’ मग लीनानं काश्मिरी पुलाव बनवला होता, तो त्याच्याकडे पाठवून दिला, तेव्हा लगेच त्याचा फोन आला, ‘‘पुलाव खूपच छान होता आणि हो पुढच्या वेळी पाठवताना सुद्धा असाच बनव आणि मला पाठव बरं का!’’

एकदा किशोरकुमारनं लीनाला विचारलं, ’ माझ्याबद्दल तुझ्या कानावर काय काय आलंय?’
लीना म्हणाली, हेच की तू खूप बुद्धिमान आहेस, हुशार आहेस.
त्यावर तो वेडंवाकडं तोंड करत सोफ्यावरून कोलांटी उडी मारत तो म्हणाला, आणखी काय? इतकंच? तेव्हा वैतागून लीना म्हणाली, आणखी हेच की तू मॅड आहेस. त्यावर किशोरनं जोरजोरात हसायला सुरुवात केली. लीनाला चिडवण्यात त्याला खूप मजा वाटत असे. 

एकदा किशोरकुमारनं लीनाला दाग या चित्रपटातलं ‘मेरे दिलमे आज क्या है तू कहे तो मै बतादू’ हे गाणं गाऊन दाखवलं. त्या गाण्यामागचा अर्थ तेव्हा लीनाला उलगडला नाही, पण काही दिवसांनी तो लीनाला म्हणाला, आयुष्य पुन्हा नव्यानं सुरू करण्याचा तू विचार करणार असशील तर माझ्या प्रस्तावाचा विचार जरूर कर. त्याचं बोलणं ऐकून लीनाला धक्काच बसला. ती त्याला म्हणाली, लग्न ही तुझ्यासाठी खूप कॅज्युअल बाब असेल, पण माझ्यासाठी ती इतकी सहज नाही. सिद्धार्थला मी कधीही विसरू शकत नाही. त्यावर तो म्हणाला, बरं बरं, माझा प्रस्ताव कॅन्सल कर. त्यानंतर मात्र किशोरनं कधीही लीनाला लग्नाबद्दल पुन्हा पुन्हा विचारलं नाही. त्यांच्यात कामापुरतं बोलणं होई. पण या कामातून लीनाला किशोरकुमार कळत चालला होता. ती त्याच्या प्रेमात नसली तरी त्याचं त्याच्या स्टाफबरोबरचं प्रेमानं वागणं, लीनाची काळजी घेणं तिला भावत होतं. त्याच्याबरोबर तिला खूप सुरक्षित वाटत असे. लोक त्याला कंजूष का म्हणतात हेही लीनाला कळत नसे. तो अतिशय गमतीजमती करे, पण त्यात कुठेही वाह्यातपणा नसे. तो दारू पित नसे. एकच होतं, की त्याच्या बायकोनं काम करावं अशी त्याची इच्छा नसे. त्याला निसर्ग खूप आवडायचा. त्याचं स्वतःचं एक स्वप्नांचं जग होता आणि त्यात रमायला त्याला खूप आवडायचंही! 

एकदा किशोरकुमार दिल्लीला गेला आणि त्यानं तिथं ‘मसूर की दाल’ बघितली आणि लगेचंच तिथल्या तिथे मसुरीला जाण्याचा निर्णय घेतला. असं तो काहीही करत असे. त्याच्या मनात कधी काय येईल याचा अंदाज कोणालाच बांधता येत नसे. त्याला भटकं, कलंदरासारखं जगणं आणि वागणं खूप आवडत असे. 

एकदा किशोर आणि लीना एका हॉटेलमध्ये थांबले होते आणि तिथे हा पठ्ठ्या एखाद्या माळ्यासारखा हॉटेलच्या झाडांना पाणी घालत बसला होता. लीनानं ते दृश्य पाहिलं आणि ती त्याला म्हणाली, हे तू काय चालवलं आहेस? आपण काही इथे कायमचं राहणार नाही आहोत. आपण उद्या जाणार आहोत. हे काही आपलं घर नाही.’’ त्यावर तो म्हणाला, तसं पाहिलं तर आपलं असं मालकीचं काहीच नसतं. पण तसं समजून आहे तो क्षण का नाही जगायचा?’’ त्याच्या या फिलॉसॉफिकल उत्तरावर लीना गप्प झाली. पण किशोरशी लग्न करण्याचा तिचा निर्णय मात्र पक्का होत गेला. हा निर्णय जेव्हा तिनं आपल्या वडिलांना सांगितला, तेव्हा ते वैतागलेच. ते तिला म्हणाले, तुला माहिती आहे का, त्याची आधीच तीन लग्नं झालेली आहेत. तुला कळत कसं नाही, तुझ्या कमकुवत मनाचा तो फायदा घेतोय. तुला तो एखाद्या देवासारखा आज वाटतोय, पण तसं नसून तो एक जादूगार आहे आणि तू त्याच्या जादूला फसते आहेस. आयुष्याच्या संध्याकाळी तू एकटी पडशील.’’ तसंही किशोरकुमार आणि लीना यांच्या वयात २१ वर्षांचं अंतर होतं. चिडलेले लीनाचे आई-वडील धारवाडला निघून गेले.

मग किशोरकुमारनं लीनाला फोन करून म्हटलं, आपण आता चर्चमध्ये जाऊन मस्तपैकी ऑपेरा स्टाईलनं लग्न करू या.’’ त्याच्या या बोलण्यानं लीना चिडली, तेव्हा तो म्हणाला, ठीक आहे अशा पद्धतीनं लग्न करणं तुला पसंत नसेल तर आपण निकाह करू या. निकाहनंतर तू हवाबेगम असशील आणि मी मोहम्मद अली भाई.’’ आता मात्र संतापून लीनानं फोन चक्क आदळला आणि बंद केला. किशोरच्या स्वभावाकडे पाहता तो काहीही करू शकतो याची लीनाला खात्री होती. पण नंतर किशोरकुमारनं आपण तिची फिरकी घेतली असं सांगितलं. योगिता बालीबरोबर डिव्होर्सची प्रक्रिया चालू होती. ती संपताच लीनाच्या आई-वडिलांच्या आशीर्वादानंच त्याला लग्न करायचं होतं.

किशोरकुमार लीनाच्या आई-वडिलांचा विरोध दूर करण्यासाठी घरी आल्यावर लीनाच्या भावानं त्याचं स्वागत केलं, पण वडील मात्र बोलायलाही तयार नव्हते. मग काय किशोरकुमारनं चक्क चटईवर मांडी ठोकली. आपल्या हार्मोनियमवर सूर धरले आणि जिन्दगीमधलं सहगलचं ‘मै क्या जानू क्या जादू है’ हे गाणं सुरू केलं. नंतर स्वतःचंच फंटूशमधलं ‘दुखी मन मेरे, सून मेरा कहना’ हे गायला लागला. त्यानंतर सफरमधलं जिन्दगी का सफर है ये कैसा सफर आणि त्यानंतर शेवटी जॉनी मेरा नाममधलं नफरत करनेवालोंके सिनेमे प्यार भर दूँ....आत्तापर्यंत गंभीर चेहरा असलेल्या लीनाच्या वडिलांच्या चेहर्‍यावर स्मित झळकलं आणि ते किशोरकुमारला म्हणाले, माझी मुलगी बरोबर आहे. खरंच तू खूप ग्रेट आहेस. तुझ्यात चांगलाच संयम आहे.’’ त्या दोघांत चांगलीच मैत्री झाली आणि लगेचंच हॉलिवूडच्या चित्रपटांवर ते चर्चा करण्यात गुंग होऊन गेले.

किशोरकुमारनं लीनाला कधीच ‘आय लव्ह यू’ असं म्हटलं नाही. प्रेम ही सांगण्याची गोष्ट नाही, तर ती अनुभवायची गोष्ट आहे असं तो म्हणत असे. त्याच्या चित्रपटातही त्यानं प्रेमाचं अतिरंजित रूप कधीच दाखवलं नाही. त्याच्या चाहत्यांना आवरता आवरता लीनाला नाकीनऊ येत असत. किशोरकुमारच्या फॅन्स त्याच्या कपड्यांवर किसच्या खुणा ठेवत. त्या वेळी किशोरकुमार लीनाला ‘तू माझा लगाम आहेस’ असं म्हणे. 

जेव्हा सुमीतचा जन्म झाला आणि किशोर धावत हॉस्पिटलमध्ये आला, त्या वेळी लीना चटकन लिपस्टिक लावायला लागली. तेव्हा तिथली नर्स आश्‍चर्यानं लीनाला म्हणाली, तुम्ही प्रेमिक आहात की नवरा-बायको?

लीना आणि किशोर यांचा संसार साडेसात वर्षांचा झाला. १३ ऑक्टोबर १९८७ साली किशोरकुमार या जगातून निघून गेला. त्या दिवशी तो घरीच होता आणि आपल्याला अशक्तपणा वाटतोय असंही म्हणाला. लीनानं डॉक्टरांना फोन लावायला घेतला, त्या क्षणी तो रागावून म्हणाला, तू जर डॉक्टरांना कॉल केलास, तर मला हार्टऍटॅक येईल.’’ हे त्याचं शेवटचं वाक्य होतं. त्याचा श्‍वास थांबला होता आणि डोळे सताड उघडे होते. त्याच्या स्वभावानुसार तो आपली गंमत करतोय असंच लीनाला वाटलं. पण त्या वेळी मात्र सगळंच थांबलं होतं.

या गोष्टींना आज २५ वर्ष होतायेत. लीनानं पुन्हा लग्न केलं नाही. तिला सुमीत आणि अमित या दोन भावांच  नातं फुलू द्यायचं होतं. अमित आणि सुमीत यांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. त्या वेळी सुमीतला शिकवायला एक शिक्षिका घरी येत असे. ती शाळेत जाऊन किशोरकुमारच्या मृत्यूनंतर खूपच गॉसिप करत असे. तिनं लोकांना असंही सांगितलं, की त्या दिवशी किशोरकुमार घरी आला आणि त्यानं अमितकुमार आणि लीना यांना एकत्र पाहिलं आणि तो त्याच क्षणी जमिनीवर कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. अफवा पसरवणारी ती शिक्षिका एक महिन्यानंतर लीनाकडे आली आणि पश्‍चात्ताप व्यक्त करत म्हणाली, मी सगळीकडे अशा बातम्या रंगवून सांगत होते. माझ्या मुलानं आत्महत्या केलीय आणि या दुखान मी किती चुकले याची जाणीव दिली. मला तुमच्याजवळ हे कन्फेस करायचं होतं. प्लीज, मला माफ करा.

लीनानं मात्र लोक काय म्हणताहेत याकडे दुर्लक्ष करून अमितकुमारच्या कुटुंबाबरोबर एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि ती त्यांच्यातलीच एक झाली. लीनाला आठवत, किशोरकुमार तिला म्हणायचा, आपण एखाद्या टुरिस्टसारखे या जगात आलो आहोत, तेव्हा आयुष्याकडून कमीतकमी अपेक्षा ठेवायच्या. आज लीना म्हणते,

दिल का मेरे हाल तुम ना पुछो, 
धडकता है अबतक ये दिल
क्या ये कम है सोचो

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.