हरित द्वीपाचा राजा - सुनील गंगोपाध्याय

हरित द्वीपाचा राजा - सुनील गंगोपाध्याय

हरित द्वीपाचा राजा आजचा बालदिन साजरा करण्यासाठी सकाळी सकाळी पं. नेहरूंची अनेक भाषणं वाचली. लिखाणाची महत्त्वाची कामं आटोपली आणि मग मनोविकास निर्मित ‘हरित द्वीपाचा राजा’ हे सुनील गंगोपाध्याय या प्रख्यात बंगाली लेखकाचं पुस्तक वाचायला घेतलं. सुनील गंगोपाध्याय हे नाव कुणाला माहीत नाही असा वाचक सापडणं विरळाच. साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त अशा या लेखकाच्या ११ साहित्यकृतींवर चित्रपट निघालेत. सत्यजीत रे यांच्यासारख्या दिग्दर्शकालाही त्यांच्या दोन कादंबर्‍यांवर चित्रपट काढण्याचा मोह आवरला नाही. २०० हून अधिक पुस्तकं लिहिणारा हा लेखक मला अतिशय आवडतो. याचं कारण त्या त्या वयात जाऊन पोहोचण्याची त्यांची हातोटी, भाषेतला सोपेपणा आणि रंजकता, वाचकाची उत्कंठा वाढवणारी शैली आणि वाचकाला गुंतवून ठेवण्याचं कसब सुनील गंगोपाध्याय यांच्याकडे आहे.

‘हरित द्वीपाचा राजा’ हे साहसकथेचं पुस्तक म्हणजे किशोरवयीन मुलांसाठी मेजवानीच आहे. काकाबाबू आणि संतू ही दोन पात्रं बंगाली साहित्यात सुनील गंगोपाध्याय यांनी अजरामर केली आहेत. एका सफरीवर असताना एक पाय गमावलेले काकाबाबू आणि त्यांचा पुतण्या संतू म्हणजेच सुनंद! दोघंही पोर्ट ब्लेअरला जातात. तिथे असलेली अनेक बेटं त्यांना आकर्षित करतात. तिथल्या बेटांचं वैशिष्ट्यं, त्या बेटांचं सौंदर्य, तिथल्या मगरी, खेकडे, मासे, बेडकं आणि पाली.....तिथली जंगलं, तिथले आदिवासी जारोवा...तिथं तस्करीसाठी येणारे परदेशी पर्यटक आणि रहस्यांचा शोध घेण्याच्या ध्येयानं झपाटलेले काकाबाबू, त्यांच्याच तालमीत तयार होत असलेला संतू हे सगळं या पुस्तकात आहे. हा सगळा प्रवास इतका सुरेख आहे की कुठल्याही वयोगटाच्या माणसानं हे पुस्तक वाचावं.

५३-५४ वर्षं वय असलेल्या काकाबाबूमधली तीव्र इच्छाशक्ती, प्रचंड निग्रह, साहसी स्वभाव, अलौकिक धैर्य, पराकोटीची निर्भयता आणि अभ्यासूवृत्ती आपल्याला प्रेरित करतात. त्यांचं आणि संतूंचं नातं देखील इतकं छान रंगवलंय की कुठल्याही पालकानं आपल्या मुलाशी काकाबाबूप्रमाणेच वागायला हवं हे जाणवत राहतं. संतूमधली वाढत्या वयाबरोबर वाढणारी उत्कंठा आणि कुतूहल...ते शमवण्याची ताकद असलेले काकाबाबू, यांचा प्रवास आपल्यालाही खूप काही शिकवून जातो.

खरं तर 'हरित द्वीपाचा राजा' या पुस्तकातलं कथानक हे काल्पनिक नसून खरंच असावं इतका जिवंतपणा लेखकानं त्यात आणला आहे. या पुस्तकात जारोवा या आदिवासींबद्दलचे गैरसमज, प्रत्यक्षात पर्यावरणाचा समतोल राखणारे, पर्यावरणाला अनुकूल असं जगणारे जारोवा भेटल्यावर त्यांच्याशीही वाचकाचं नातं जुळतं. त्यांचा नेता आणि त्याचं रहस्य जेव्हा उलगडतं तेव्हा आपणही चकित होतो. पर्यावरणाविषयी सजगता निर्माण करण्याचा प्रयत्न नकळतपणे लेखकानं केला आहे. जंगलातलं स्वच्छ, नैसर्गिकता जपणारं वातावरण आणि आज प्रगती म्हणून प्रदूषणयुक्त शहरांची दुर्दशा यांची टोचणी मनाला लागते.

घडत्या वयात अशा प्रकारची पुस्तकं वाचली तर किशोरवयीन मुलं जास्त सजग, सुजाण बनतील यात शंकाच नाही. या पुस्तकाचा तितकाच सकस अनुवाद रंजना पाठक यांनी केला आहे. ‘हरित द्वीपाचा राजा’ या पुस्तकावर आधारित तपन सिन्हा या दिग्दर्शकानं बंगालीतून सिनेमा काढला आहे. दृश्य स्वरूपात या पुस्तकाचा अनुभव घेणं ही रोमांचकारी गोष्ट आहे. मनोविकासनं किशोरांसाठी अशीच उतमोत्तम पुस्तकं काढावीत ही अपेक्षा. यातली गिरीश सहस्त्रबुद्धेची रेखाटनं खूपच सुरेख आहेत. आजचा बालदिन अतिशय सुरेख साजरा केल्याबद्दल मनोविकासचे खूप खूप आभार! जरूर वाचा.

दीपा देशमुख

१४ नोव्हेंबर २०१७.

हरित द्वीपाचा राजा लेखक - सुनील गंगोपाध्याय, अनुवादक - रंजना पाठक,

मनोविकास प्रकाशन, पृष्ठ १२० मूल्य १४०/-

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.