गरम हवा 

गरम हवा 

माझ्या मित्रानं अनेक दिवसांपासून ‘गरम हवा’ हा चित्रपट बघ असं आवर्जून सांगितलं होतं. आज यू ट्यूबवर वेळ काढून हा चित्रपट बघितला आणि सुन्न झाले. खूप ढसढसा रडले, आतून सगळं फुटतंय, जे मी थांबवू शकत नाही असं सगळं...चित्रपटातल्या त्या सगळ्या परिस्थितीचा मी एक भाग होऊन गेले. माझीही अनेक दुःख त्यात विरघळून गेली.

१९७३ मध्ये प्रदर्शित झालेला इस्मत चुगताईनं लिहिलेला आणि इप्टामध्ये सक्रिय असलेला एम. एस. सथ्यू यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा सर्वार्थानं अप्रतिम आहे. खरं तर याला चित्रपटच म्हणूच नये. ती एक भळभळणारी, न बरी झालेली, ठसठसत आपलं अस्तित्व दाखवणारी आजही ताजी असलेली एक जखम आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून ६० वर्षं झाली, पण फाळणीची खोलवर जखम आणि तिची ठसठस आजही जाणवते. ‘ते विरुद्ध आम्ही’ असा द्वेष पदरात या फाळणीनं टाकला. यानंतर गोविंद निहलानी यांनी तमस मालिकेद्वोर या प्रश्‍नाचं गांभीर्य मांडलं. फाळणीसारख्या संवेदनशील विषयावर चित्रपट काढणं हे खूपच धाडसाचं काम होतं.

‘गरम हवा’ हा चित्रपट तयार झाल्यावर सेन्सार बोर्डानं मंजुरीसाठी आक्षेप घेतला होता. अनेक वादविवाद, चर्चा होऊन अखेर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीं आणि सूचना आणि प्रसारण मंत्री इंद्रकुमार गुजराल यांनी तो बघून ग्रीन सिग्नल दिला आणि या चित्रपटाला प्रदर्शित करण्याची परवानगी मिळाली. काही नेत्यांच्या निर्णयानं भारत देशाच्या फाळणीवर शिक्कामोर्तब झालं, पण त्यामुळे लाखो/करोडो सर्वसामान्य लोकांचं दैनंदिन जगणं उदध्वस्त झालं. शाम बेनेगल आणि गुलजार यांच्यासारख्या लोकांनी फाळणीमुळे झालेली हानी किती भीषण होती, याबद्दल भाष्य केलंय. यावर आधारित निघालेल्या या ‘गरम हवा’ चित्रपटाची नोंद सत्यजित रे, मृणाल सेन यांनी घेतली. लालकृष्ण अडवानीसारख्या नेत्यानं तर हा चित्रपट न बघताच त्याच्यावर खूप टीका केली होती आणि या चित्रपटाला पाकिस्ताननं पैसा पुरवला असल्याची शंका व्यक्त केली होती. महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे यांनी देखील हा चित्रपट प्रदर्शित केला तर चित्रपटगृहांना जाळलं जाईल अशी भूमिका घेतली होती. पण प्रत्यक्ष चित्रपट बघितल्यावर त्यांना तो इतका आवडला की त्यांनी आपली भूमिका मागे घेतली होती.

हा चित्रपट अनेक देशांमध्ये झालेल्या चित्रपट महोत्सवात दाखवला गेला. पाकिस्तानात तर या चित्रपटाचं पायरेटेड व्हर्जन पोहोचून तो बहुतांशी लोकांनी बघितला. ‘गरम हवा’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे सथ्यूपासून ते या चित्रपटातले तंत्रज्ञ, कलाकार हे सगळे डाव्या विचारसरणीचा प्रभाव असलेले असे एकत्र आले होते. कथानक जरी इस्मत चुगताईचं असलं तरी कैफी आझमीनं पटकथेमध्ये रुपांतर केलं होतं. हा चित्रपट मसालेदार, लोकप्रिय कलाकार यांनी बनलेला नव्हता, तरीही त्याच्या कथानकात जबरदस्त दम होता.

हा चित्रपट बघितल्यावर, स्वातंत्र्य मिळालं, पण नंतरच्या वातावरणामुळे झालेली लोकांची सैरभैर झालेली मानसिकता, ज्या स्वातंत्र्यासाठी लोक सर्वस्व झोकून या रणसंग्रामात उतरले, त्यांचं जगणं किडामुंगीपेक्षाही वाईट व्हावं आणि ज्यांनी फारसं काही केलं नाही, ते देशभक्त म्हणून मिरवायला लागले. त्या स्वातंत्र्याचं मोल विसरले, संयमानं वागण्याऐवजी द्वेषभावनेनं पछाडलेला समाज दाखवत असतानाच काही प्रसंगात माणुसकीचं हृद्य दर्शनही घडवलं होतं. गरम हवा या चित्रपटात मिर्झा नावाच्या एका मुस्लीम कुटुंबाची झालेली फरफट तर बघायला मिळतेच, पण त्याचबरोबर त्या वेळच्या सामाजिक परिस्थितीचं चित्रण आपल्याला अतिशय लहान लहान प्रसंगांमधून बघायला मिळतं.

आग्य्रााचा ताजमहाल, फत्तेपूर सिक्री आणि त्यातला चिश्तींचा दर्गा या ऐतिहासिक वास्तूंचा खूप सुरेख उपयोग दिग्दर्शकानं करून घेतलाय. यातली जाळीदार नक्षी, दारामागचा पडदा, इतिहास जपणार्‍या वास्तू यातनं दिग्दर्शकानं मोठ्या खुबीनं पात्रांच्या मनातली खळबळ दाखवलीय. चित्रपटाच्या सुरुवातीलाच भारताला स्वातंत्र्य मिळाल्याची तारीख आणि संपूर्ण भारताचा नकाशा प्रेक्षकांच्या डोळ्यासमोर येतो. महात्मा गांधी, नेहरू, जिना असे अनेक मातब्बर नेतेही दिसायला लागतात. नंतर कानावर पडणारे बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आणि रेल्वेचा धडधडणारा आवाज ऐकवत नाहीत. बलराज सहानीचा धीरगंभीर आवाज कानावर पडतो...त्या स्वरातून फाळणीचं दुःख बोलतं....

तबसीम हुआ मुल्क तो दिल हो गये टुकडे,
हर सिनेमे तुफान वहॉं भी था यहॉं भी
हर घरमे चिता जलती थी लहराते थे शोले,
हर शहरमे शमथान वहॉं भी था, यहॉं भी
गीता की कोई सुनता,न कुरान की सुनता
हैरान था इमान वहॉं भी था, यहॉं भी

मिर्झा कुटुंबातले हलीम मिर्झा आणि सलीम मिर्झा (बलराज सहानी) हे दोन भाऊ आपापल्या कुटुंबासह पूर्वजांच्या एका हवेलीत आनंदात राहत असतात. स्वातंत्र्य मिळण्याचं स्वप्न मिर्झा कुटुंबानं पाहिलेलं असतं आणि आता ते खरं झाल्यावर खूप चांगल्या गोष्टी घडतील असा विश्‍वास त्यांना वाटत असतो. सलीम हा बूट बनवण्याचा कारखाना चालवत असतो, तर हलीम मुस्लीम लिगचा नेता तर असतोच, शिवाय राहत असलेल्या हवेलीवर त्याची मालकी असते. सलीम म्हणजे बलराज साहनीला दोन मुलं म्हणजे बाकर (अबू सिवानी), सिकंदर (फारूख शेख) आणि अमिना (गीता सिद्धार्थ) नावाची एक मुलगी असते. हलीमचा मुलगा कासिम (जमाल हाश्मी) आणि अमिना यांचं एकमेकांवर जिवापाड प्रेम असतं. दोन्ही कुटुंबातल्या सगळ्यांना हे लग्न मान्यही असतं. मात्र भारताची फाळणी होते आणि सगळंच चित्र बदलतं. प्रत्येक कुटुंबापासून ते समाजापर्यंत - प्रत्येकाचं जगणं तितरबितर होतं. छोट्या छोट्या क्षुल्लक गोष्टींवरून होणार्‍या दंगली, परस्परातला विश्‍वासाचा अभाव, धर्मामुळे आपसांत निर्माण झालेलं वितुष्ट, एकमेकांविषयी निर्माण झालेला संशय यामुळे भारतात राहणार्‍या अनेक मुस्लीम कुटुंबांना पाकिस्तानात जायची पाळी येते आणि भारतात राहणारे अनेक जण तर त्यांना ‘‘तुम्हाला हवा होता ना तुमचा देश, जा की मग तिकडे’’ असंही ऐकवतात. आपल्याच देशात, आपल्याच जमिनीवर, आपल्याच घरात आता आपल्याला कवडीइतकंही स्थान नाही याचा वारंवार प्रत्यय येत राहतो. या सगळ्यामुळे आपली राहती हवेली सोडून हलीम मिर्झाचं कुटुंब पाकिस्तानला स्थलांतर करतं. आपल्याला तिकडे चांगली नोकरी मिळताच येऊ आणि लग्न करून तिला घेऊन जाऊ असं वचन कासिम अमिनाला देतो आणि जातो.

काहीच दिवसांनी तो चोरून पोलिसांच्या पहार्‍याला चुकवून अमिनाला भेटायला पाकिस्तानातून भारतात येतो. अमिना आणि कासिम यांचं लग्न लगेचच लावून देण्याचा सलिम मिर्झा आणि कुटुंबाचा विचार असतो आणि ते झटपट तयारी देखील करतात. पण अशा घुसखोरांना (कारण आता तो भारतीय नसून पाकिस्तानी झाला असं मानण्यात येतं!) भारतात राहण्याचा हक्क डावलण्यात येतो. कासिम आल्याची कुणकुण लागताच पोलीस येऊन त्याला पकडून घेऊन जातात आणि कोर्टाच्या आदेशानुसार त्याच्याकडे आवश्यक कागदपत्रं नसल्यानं त्याला भारताच्या सिमेपलीकडे नेऊन सोडण्यात येतं. कासिम आता कधीच पुन्हा इथं येऊच शकणार नाही हे अमिनाला लक्षात येतं आणि ती मनानं कोसळते. तिला सावरताना घरातले सगळेच जण प्रयत्न करत असतात. दुसरीकडे आजूबाजूचं गढुळलेलं सामाजिक वातावरण....पूर्वजांची हवेली सलीमच्या कुटुंबाला सोडावी लागते. ज्या ठिकाणी सन्मानानं दिवस काढले, तिथेच किरायानं राहायला जागा मिळवण्याची पाळी सलीम मिर्झावर येते.

प्रत्येक ठिकाणी घर मिळताना धर्म आडवा येतो. पैशाला वारेमाप महत्त्व आल्यानं एके ठिकाणी धर्माचा अडसर न ठरता केवळ पैसा बघून सलीमला किरायानं छोटंसं घर मिळतं. घर मिळाल्यावर सलीमची वृद्ध आई हवेली सोडायला तयार होत नाही. तिचा सगळा जीव त्या हवेलीत अडकलेला असतो. तिच्या आठवणी तिथेच तिला जगण्याचं बळ देत असतात. त्याच हवेलीत तिला आपणं संपावं असं वाटत असतं. न कळत्या बालवयात लग्न झालेली ती एक अजाण मुलगी ते आज वृद्धावस्थेत पोहोचलेली सगळयांची आज्जी हा प्रवास तिला हवेलीनंच दाखवलेला असतो. तिला हवेलीतून बाहेर काढताना सलीमची जी कसरत होते, ती बघताना अस्वस्थ व्हायला होतं. सलीमचा बुटाचा कारखानाही एका दंगलीच्या वेळी आगीत जाळला जातो. तसेही त्याचे कारागीर एक एक करत पाकिस्तानला निघून जातात. कर्ज मिळवण्यासाठी सलीम सावकार आणि बँक यासारख्या अनेक ठिकाणी खेटे घालत असतो. पण सगळीकडेच आता माणसाचा माणसावरचा विश्‍वास उडाल्याची परिस्थिती असते. इतरांसारखाच सलीम कर्ज बुडवून पाकिस्तानात निघून गेला तर काय, ही कारणं दाखवत त्याला कोणीही कर्ज देत नाही. अखेर एक वेळ तर अशी येते की सलीम मिर्झा आपल्या सहकार्‍यासमवेत डोक्यावर टोपलीत बुट घेऊन विकायला निघतो. त्याच वेळी नजरचुकीनं पोलीस त्याला पाकिस्तानी हेर समजून तुरुंगातही डांबतात. नंतर लक्षात आल्यावर निर्दोष म्हणून त्याला सोडून देतात, पण त्याच्यावरचा संशयाचा डाग आणखीनच पक्का होतो.

याच काळात आता आयुष्यात काहीच शिल्लक नाही अशा उदध्वस्त झालेल्या अमिनाला अशा मनःस्थितीतून बाहेर काढण्यासाठी तिची आई आपल्या सुनेला अमिनाला मनवण्यासाठी, तिला सलीम चिश्तीच्या दर्ग्यावर घेऊन जायला सांगते आणि सुनेचाच भाऊ शमशाद (जलाल आगा), जो सुरुवातीपासून सलीम मिर्झा यांच्या घरी केवळ अमिनाला भेटण्यासाठी येत असतो. शेरोशायरीत रमणारा हा देखणा तरूण- त्याला अमिना आणि कासीम यांचं प्रेम ठाऊक असतानाही तो येतच राहतो. कासीमला पोलीस पकडून सीमेबाहेर केल्यानंतरही तो येतो. अमिना शमशादशी बोलायचं नाकारते, तरीही तो येत राहतो. मात्र एका क्षणी आपल्यासाठी इतकं झटणारा, जिवापाड प्रेम करणारा शमशाद हा तिला फत्तेपूर सिक्रीच्या परिसरात सलिमची गोष्ट सांगतो. ती आपल्याशी बोलत नाहीये, आपले सगळे प्रयत्न कमीच पडताहेत हे कळत असूनही तो अमिनाला सलीम आणि मेहरुन्निसा यांची गोष्ट सांगतो. त्या गोष्टीत एके दिवशी सलीम आणि मेहरून्निसा बोलत असतानाच बादशहा सलीमला बोलावतो. सलीमच्या हातात असलेली दोन कबुतरं तो मेहरुन्निसाच्या हातात देऊन जातो. परत येतो तर तिच्या हातात एकच कबुतर असतं. तो तिला विचारतो, ‘‘कबुतर कुठे आहे?’’ तर ती म्हणते, ‘‘ते उडालं.’’ तो विचारतो, ‘‘कसं?’’, ती म्हणते, ‘‘असं....’’ आणि शमशाद ते दुसरं कबुतर ती कसं उडवते हे अभिनयानं दाखवणार तेवढ्यात अमिना त्याचा वर गेलेला हात घट्ट पकडते आणि म्हणते, ‘दुसरेको नही उडने दुँगी’!

या चित्रपटातली चिश्ती दर्ग्यात गायली गेलेली ‘मौला सलीम चिश्ती’ ही कव्वाली अजीज वारसीनं गायली आणि ती ऐकताना काय वाटतं याचा केवळ अनुभवच घ्यायला पाहिजे. उस्ताद बहादूर खॉंचं संगीत निर्देशन केवळ अप्रतिम! अमिना हळूहळू कासीमला विसरते आणि शमशादमध्ये गुंतत जाते. त्याचा दिलखुलास स्वभाव, तिला घेऊन सायकलवरचं फिरणं, ताजमहालच्या बाजूनं वाहणार्‍या यमुनेच्या पात्रात नावेत होत गेलेली दोघांची जवळीक....या सगळ्यात त्यांच्या घरचेही या लग्नाच्या बाजूनंच असतात. ही हळुवार प्रेमकहाणी आता सगळं सुरळीत करेल असा विश्‍वास वाटायला लागतो. मात्र हे सगळं सुरु असतानाच सलीमच्या कारखान्याचं बंद होणं, आणि आपल्या वडिलांचं- सलीमचं काळानुसार स्वतःला न बदलणं यामुळे मोठा मुलगा बाकर (अबू सिवानी) आपल्या कुटुंबासह पाकिस्तानला निघून जाण्याचा निर्णय घेतो. या चित्रपटात अबू सिवानी हा अभिनेता सतत अन्नू कपूरची आठवण आपल्याला देत राहतो. बाकर आपल्या वडिलांना - सलीमलाही आपल्या बरोबर चलण्याचा आग्रह करतो. सलीमची बायकोही पदोपदी विनवत राहते की आपल्याला इथं जी उपर्‍यासारखी वागणूक मिळते, आपण जाऊ या. पण सलीम खूप आशावादी असतो. महात्मा गांधींच्या मूल्यांवर त्याचा विश्‍वास असतो. हे दिवस थोडेच आहेत, ते जातील असं त्याला वाटत असतं.

सलीम शांतपणे आपल्या मुलाला निरोप देतो. काहीच दिवसांत शमशादचं कुटुंबही इथल्या अस्थिर परिस्थितीला कंटाळून पाकिस्तानला जाण्याचा निर्णय घेतं. जलाल आगा हळुवारपणे अमिनाला भेटतो आणि तिला विश्‍वासात घेत, ‘नोकरी मिळताच आपण आपल्या आईला आपल्या लग्नाचा प्रस्ताव घेऊन भारतात पाठवू, काळजी करू नकोस’ असं सांगून तिचा निरोप घेतो. सलीमचा धाकटा मुलगा सिकंदर (फारूख शेख) उत्तम रीतीनं पदवी मिळवतो. पण कुठेच नोकरी मिळत नाही. सगळीकडे वशिला, भ्रष्टाचार, अन्याय, बेरोजगारी असं वातावरण वाढत चाललेलं असतं. तसंतसा तरुणांच्या मनातला असंतोषही वाढत असतो. एका चहाच्या टपरीवर सिकंदरसह ही सर्वधर्मीय समदुःखी तरूण मंडळी भेटत असतात. आजूबाजूच्या वातावरणाबद्दल चर्चा करत असतात. वाद घालत असतात. हळूहळू ते सगळे एकजूट होऊन अन्यायाचा विरोध करू लागतात. तिथल्या टपरीवरचा तो वृद्ध, गरीब चहावाला या तरुणांना मनापासून साथ देत असतो. त्या तरुणांकडे पैसे असोत, वा नसोत त्यांना खाऊपिऊ घालणं ही जणू काही त्याचीच जबाबदारी असावी असा! सलीमला सिकंदरचं नेहमी रात्री उशिरा घरी येणं, पत्रकं वाटणं आवडत नाही. तो सिकंदरला स्पष्ट शब्दात विरोध करतो.

यात सिकंदर आणि अमिना या दोघा बहीण-भावामधलं नातंही खूप हळुवारपणे टिपलंय. तिला चिडवणारा सिकंदर, त्याचं उशिरा येणं समजावून घेणारी अमिना, वैतागलेल्या प्रसंगातलं त्यांचा एकमेकांना आधार देणारा स्पर्श हा प्रवास खूप छान उलगडलाय. एके दिवशी पाकिस्तानमध्ये रुळलेली शमशादची आई भारतात येते आणि आपल्या मुलाच्या लग्नासाठी साड्या आणि इतर खरेदी करायला अमिनाला बरोबर घेऊन जाते. सगळेच जण तिच्या येण्यानं खुश होतात. घरी आल्यावर सगळे बोलत असताना अमिनाला समजतं की शमशादच्या आईनं पाकिस्तानात एका श्रीमंत घरातल्या मुलीशी शमशादचं लग्न ठरवूनही टाकलंय. अमिनाची आई चिडते आणि आपल्या मुलीच्या आयुष्याशी असं खेळल्याबद्दल ती शमशादच्या आईला खूप बोलते. सलीम तिला शांत करतो. पण आता अमिनाची आशा पूर्ण संपते. ती कशीबशी आपल्या खोलीत जाते. तिथल्या पलंगावर शमशादच्या होणार्‍या बायकोसाठी घेतलेल्या लग्नाच्या भरजरी साड्या पसरलेल्या असतात. पण त्या अमिनासाठी नसतात! ती त्या साड्यांमधून लग्नाची खास लाल रंगाची ओढणी डोक्यावरून घेते आणि आरशात स्वतःचं रूप न्याहाळते. तिला शमशादबरोबरचा एक एक प्रसंग आठवायला लागतो, त्याचे शब्द तिच्या कानात घुमायला लागतात. त्याच वेळी तिला आरशात नवरदेवाच्या वेषातला शमशाद दिसतो, पण क्षणात तो नाहिसा होतो. त्या स्वप्नातून अमिना बाहेर येते आणि आता बस्स झालं या विचारानं ती ब्लेडनं आपल्या मनगटावरची नस कापून स्वतःला संपवते. त्यानंतर सलीम अमिनलाला जेवायला बोलवायला तिच्या खोलीकडे वळतो. हलक्या आवाजात तिला हाक मारत असतानाच त्याचं मन अस्वस्थ झालेलं असतं. दार ढकलताच समोर आपल्या लाडक्या मुलीचं कलेवर बघताना बलराज सहानीला आपण बघूच शकत नाही. मोठ्या मुलाचं पाकिस्तानात निघून जाणं, नातवाच्या प्रेमाला दुरावणं, स्वतःच्या आईचा हवेली सोडावा लागल्यामुळे झालेला मृत्यू, कारखान्याचं नष्ट होणं, लोकांचे टोमणे आणि मानहानी हे सगळं कमी होतं की काय म्हणून अमिनाचं जाणं....ती वेदना बलराज सहानीनं आपल्या डोळ्यातून अशी काही व्यक्त केलीय, की तीच वेदना आपलंही काळीज चिरत जाते.

एका क्षणी मात्र सलीम आसपासच्या बदलत चाललेल्या परिस्थितीपुढे हतबल होतो आणि बायकोचं म्हणणं ऐकतो. आता तसंही त्या तिघांचंच कुटुंब उरलेलं असतं. तो पाकिस्तानात जायचा निर्णय घेतो. ‘आपण याच देशाचा हिस्सा आहोत, आपण इथंच राहिलं पाहिजे’ असं सलीमला समजून सांगण्याचा प्रयत्न सिकंदर करतो, पण सलीम आता आपल्या निर्णयावर ठाम असतो. खरं तर या चित्रपटातलं माझ्या अतिशय आवडत्या आणि अतिशय ताकदीचा कलावंत असलेल्या बलराज सहानीचं अतिशय मोलाचं योगदान आहे. या चित्रपटातलं बलराज सहानीचं आवाजाचं डबिंग ज्या दिवशी संपलं, त्याच्या दुसर्‍याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या चित्रपटातल्या बलराज सहानीच्या अभिनयाबद्दल त्यांना नॅशनल ऍवार्ड मिळायला हवं होता, पण ते कम्युनिस्ट विचारसरणीचे असल्यानं ते शक्य झालं नव्हतंच! दिग्दर्शक सथ्यु सांगतात, हा चित्रपट बनवताना त्यांनी बलराज सहानीला खूप क्रूरपणे वागवलं. बलराज सहानी निवडणुकीच्या काळात इंदोर शहरात प्रचारासाठी गेले असतानाच त्यांना पुन्हा अचानक मधूनच दौरा अर्धवट सोडून घरी परतावं लागलं. मध्यप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना खास विमानानं पाठवण्याची व्यवस्था तातडीनं केली होती. सथ्यु या प्रसंगाच्या वेळी बलराज सहानींच्या बरोबरच होते. ते दोघं घरी आले, घर लोकांनी भरलेलं होतं. काहीतरी वाईट घडलंय याची कल्पना बलराज सहानींना आली. ते आपली लाडकी मुलगी शबनम हिच्या खोलीत शिरले. तिनं आत्महत्या केली होती. ते दृश्य पाहून ते स्तब्ध झाले होते. त्या वेळची ती अवस्था सथ्युनं बघितली होती आणि नेमका हाच प्रसंग ‘गरम हवा’मध्येही होता. सथ्युनं बलराज सहानी यांना चित्रपटातला अमिनाच्या मृत्यूचा प्रसंग सांगितला आणि तो आपल्याला कसा हवाय हेही सांगितलं. बलराज सहानी काहीच बोलले नाहीत. त्यांनी तो प्रसंग आपल्या अभिनयानं उंचीवर नेऊन पोहोचवला. बलराज सहानीकडून तो प्रसंग करून घेताना बलराज सहानीची काय अवस्था झाली असेल याबद्दल सथ्युनं ‘बलराज सहानीसारखा कलावंत पुन्हा होणे नाही’ असे उद्गार काढले.

या चित्रपटात काम केल्याबद्दल बलराज सहानीला केवळ ५००० रूपये देण्यात आले होते, तर फारूख शेखला ७५० रुपये. आणि फारुख शेखला तर ते पैसे तब्बल १५ वर्षांनी देता आले. पण ही सगळी कलाकार मंडळी इतकी चांगली होती आणि सगळीच पुरोगामी विचारांची होती, की त्यांना पैसा हा महत्वाचा वाटलाच नव्हता. हा चित्रपट अतिशय कमी बजेटमध्ये बनवला गेला. ‘गरम हवा’ चित्रपटाच्या शेवटच्या प्रसंगात टांग्यातून स्टेशनकडे निघालेला सलीम, त्याची बायको आणि सिकंदर ....रस्त्यात त्यांना मोर्चा दिसतो. अनेक तरूण ‘इन्कलाब जिंदाबाद’च्या घोषणा देत अन्यायाची दाद मागत रस्त्यावर उतरलेले असतात. सिकंदरला एक जण बघतो आणि तुम्ही कुठे चाललात असा प्रश्‍न करतो. सिकंदरची अवस्था अतिशय दोलायमान होते. त्याच्या चेहर्‍यावर उमटलेली वेदना सलीम बघतो आणि आपल्या मुलाला ‘तू जा, आता मी तुला थांबवणार नाही. माणूस एकटा राहूच शकत नाही’ असं सांगतो. एकाच क्षणात सिकंदर टांग्यातून उतरतो आणि त्या तरुणांच्या गर्दीत घोषणा देत मिसळून जातो. तोही त्या चळवळीचा एक हिस्सा बनतो. ते दृश्य बघत असलेला सलीम मनाशी काहीतरी विचार करतो आणि बायकोच्या हातात घराची चावी ठेवत टांगेवाल्याला गाडी घराकडे परत घ्यायला सांगतो. बायकोला सांगतो, ‘मीही एकटेपणाच्या घुसमटीत आता राहू शकत नाही’ आणि तो टांग्यातून उतरत, त्या गर्दीचा एक भाग बनतो. चित्रपट संपतो मात्र फाळणीनंतर जे प्रश्‍न निर्माण झाले, सर्वसामान्यांचं आयुष्य दुःखानं होरपळून निघालं, हिंसेनं सर्वत्र थैमान घातलं, समस्यांनी जगणं नकोसं केलं त्या प्रश्‍नांचा आवाज बलराज सहानी होऊन आपल्या कानात घुमत राहतो....... 

जो दूरसे तुफान का करते है नजारा उनके लिये तुफान वहॉं भी है, यहा भी 
धारेमे जो मिल जाओगे बन जाओगे धारा ये वक्त का ऐलान वहॉं भी है, यहॉं भी 

आज प्रत्येक तरुण वर्गानंच नव्हे, तर ही ‘गरम हवा’ विसरलेल्या प्रत्येकानं हा चित्रपट आवर्जून बघितलाच पाहिजे. जरूर बघा. 
दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.