तळ्यात....मळ्यात...!

तळ्यात....मळ्यात...!

फुलाला जाग आली आणि आपण कुठे आहोत हेच तिला कळेना...आजूबाजूला नजर टाकली तेव्हा ती दहा बाय दहाच्या भिंतीवरचे पोपडे उडालेल्या एका खोलीतल्या कॉटवर झोपलेली होती, बाहेरच्या बाजूनं तेवढीच खोली असावी. तिथे काही घरगुती कार्यक्रम असावा अशी चहलपहल चालू होती, मध्येच लहान मुलांचाही हसण्याचा आवाज कानावर पडत होता. फुला कॉटवर उठून बसली. अंगावर लाल पिवळी सिन्थेटिक साडी...हे काय, आपण अशा प्रकारची साडी कधी घालतो? आणि साडी घालून झोप लागणं कसं शक्य आहे? हे काय गौडबंगाल आहे तिला कळेनासं झालं? का आपण स्वप्नात आहोत? आणि स्वतःला फुला काय म्हणतो आहोत? आपलंच नाव आहे का हे?

ती हळूच कॉटवरून उतरली आणि बाहेरच्या खोलीत आली. सगळाच अनोळखी मामला होता. दोघी-तिघी स्त्रिया तिथे एकमेकींशी बोलत निवडणं-टिपणं अशी कामं करत बसल्या होत्या. एक वृद्ध माणूसही तिथेच आरामखुर्चीत पेपर वाचत बसलेला! एक ८-९ वर्षांची मुलगी आणि एक ४-५ वर्षांचा मुलगा दोघंही त्या वृद्धाच्या खुर्चीभोती पळापळी करत खेळत होते.

ती मुख्य दाराजवळ आली. बाहेरचं दृश्य, चित्रपटात दाखवतात तसं कनिष्ठ मध्यमवर्गाच्या चाळीसारखंच दिसत होतं. मध्ये थोडी मोकळी जागा आणि आजूबाजूला बैठी बसकट रांगेतली कबुतराच्या घरट्यासारखी घरं! घरांच्या खिडकीतून तुळशीचं रोप लावलेली कुंडी, एखादी गुलाबाची कळी आलेली कुंडी तर एखादी वाळत गेलेलं रोपटं असलेलीही कुंडी आणि त्यातून ओघळणारं पाणी...ती मागे वळाली आणि त्यातल्या एका जरा आपल्याशा वाटणार्‍या स्त्रीकडे तिनं बघितलं. तिनं तिला बसायची खूण केल्यावर ती तिच्या शेजारीच जाऊन बसली. पण बाकी तिच्या अस्तित्वाचीही त्या वातावरणात कोणाला दखल घ्यावी असं चित्र तिला दिसेना. काय बोलायचं या सगळ्यांशी? हे सगळे कोणाचे कोण? माझं यांच्याशी नातं काय? छे! मी यांची कोणीच नाहीये.

तिला फ्रेश होण्यासाठी बाथरुमला जायचं होतं. या घरातलं बाथरुम कुठे असेल? कोणाला विचारावं? आणि विचारलं तर चमत्कारिकपणे आपल्याकडे बघणार तर नाहीत ना? ती तटकन् जागेवरून उठली आणि घराच्या आतल्या भागाकडे वळाली. मधली खोली, जिथे ती झोपली होती, त्यानंतर तसंच इवलंस जुनाट स्वयंपाकघर, त्यात दाटीवाटीनं कोंबून बसवलेलं सामान, त्या पलीकडे मागच्या बाजूनं उघडणारा दरवाजा आणि त्याच्या बाहेर छोटे छोटे दोन टॉयलेट्स! ती आत शिरली.

अंगावरची ही साडी काढून टाकायला हवी, पण घालायचं काय, इथे जे काय दिसतं आहे, त्यात आपलं असं काहीच नाही. मग? काय करावं? तिचं डोकं सुन्न झालं. फ्रेश होऊन ती बाहेर आली. बाहेरच्या बाजूला एक भलंमोठं लाकडी कपाट होतं, तिनं ते उघडताच कर्रकर्र असा आवाज आला. त्यातल्या कप्प्यांमध्ये व्यवस्थित घड्या करून ठेवलेले कपडे होते. सगळ्याच घराचे असावेत. फुलाला आपले ओळखीचे कपडे त्यात कुठे दिसेनात. कसे असतील? हे घरच जर आपलं नाही, तर आपल्या वस्तू इथे कशा असतील? पण मग आपलं घर, आपल्या वस्तू आणि आपली माणसं ती कोण, ती कुठे आहेत? इथे

तरी मी का आहे?

काहीतरी करायलाच हवंय. फुला पुनश्च बाहेरच्या खोलीत आली. ज्या स्त्रीनं तिला तिच्या शेजारी बसायची खूण केली होती, तिला तिनं खुणावून आतमध्ये बोलावलं. ती आत येताच फुला म्हणाली, 'मला कपडे बदलायचे आहेत. हे कपडे मला नकोसे झालेत. प्लीज मला मदत करणार?' ती स्त्री समजंस असावी. तिने कुठलेही प्रश्न फुलाला न करता म्हटलं, 'आपण माझ्या घरी जाऊया. त्यातल्या नव्या कपड्यांमधले काही आवडले तर बघ नाहीतर विकत घ्यायला मार्केट जवळच आहे. मी तुला पुन्हा आणून सोडेन'.  फुलाने मान डोलावली आणि तिच्या पाठोपाठ मागच्या दारानं घराबाहेर पडली. त्याच वेळी तो छोटा मुलगा आणि मुलगी धावतच तिच्याजवळ आले. तिला मिठी मारून तो म्हणाला, 'तू कुठे चाललीस?' तिच्या बरोबरची स्त्री त्यांना म्हणाली, 'आम्ही लगेच परत येऊ. तोपर्यंत तू ताईसोबत खेळ हं' त्यानंही मग जास्त खळखळ केली नाही. लगेचंच तो आपल्या ताईचा हात पकडून घरात दिसेनासा झाला. फुलाला गंमत वाटू लागली. घरातल्या कोणाचंच आपल्याकडे लक्ष नाहीये. पण विचार करून वेळ दवडण्यात तिला काही अर्थ वाटेना. एका नागमोडी वाटेनं दोघीही निःशब्द चालत राहिल्या.

फुला तिच्या मागनं कितीतरी वेळ आपल्याच विचारात चालत राहिली. एका गेटमधून आत शिरताच, एक जरा सुस्थितीतल्या बैठ्या घरानं त्याचं स्वागत केलं. दोघी आत शिरल्या. आत जाताच कपाट उघडून त्या स्त्रीनं फुलाला एका कप्प्यातल्या साड्यांमधून तिच्यासाठी हवी ती साडी निवडायला सांगितलं. त्या सगळ्याच सिन्थेटिक होत्या. तिच्या अंगावर होती तशाच. त्यातली एक साडी हातात घेऊन फुला पाहू लागली, लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाची ती साडी, त्यावर असंख्य टिकल्या...टिकल्यांवरून तिला आठवलं, मुंबईतल्या धारावीत लहान मुलांकडून जबरदस्तीनं मेनबत्तीच्या प्रकाशात हे टिकली काम करवून घेतलं जात असे. एका स्वयंसेवी संस्थेनं आवाज उठवला आणि ते काम बंद पाडण्यात आलं. पण अजूनही तिथे कुठेतरी ते काम चालूच असणार. काश्मीरमध्ये देखील काश्मिरी कशिदा काढणारी मुलगी ही अल्पवयीन कुमारी असावी लागते, कारण काय तर त्या वयातली ती बोटंच तो कशिदा उत्तम बनवू शकतात असा त्यांचा दृढ समज आहे. मनातल्या विचारांना फुलाने हुसकावलं. आपण असा विचार करतोय म्हणजे असे सामाजिक विचार आपल्या मनात का येतायेत? कदाचित कार्यकर्ता वगैरे असू.....या विचारानं तिच्या चेहर्‍यावर एक हलकी मंद स्मितरेषा उमटली, मात्र फ्रेश झाल्यामुळे ही प्रसन्नता तिच्या चेहर्‍यावर आली असावी असं वाटून ती स्त्री फुलाला म्हणाली, 'छान, आवडली ना साडी? नेस तू' कपडे बदलणं तर आवश्यकच होतं. फुलाने होकारार्थी मान हलवत अंगावरची साडी सोडली आणि दुसरी साडी निमूटपणे नेसली. त्या स्त्रीनं परत फुलाला सोबत करत तिच्या घरापर्यंत (?) पोचवण्याबद्दल विषय काढताच फुला हसून म्हणाली, 'मला आता रस्ता माहीत झालाय. मी जाईन एकटी!'

फुला निघाली, पूर्वीची बघितलेली वळणं शोधत...त्या रस्त्यावरून ..फूटपाथवरून चालताना बाजूनं भरधाव जाणारी वाहनं तिच्या समोरून जात होती. ट्रक, चारचाकी मोटारगाड्या, रिक्षा, टेम्पो आणि टू व्हिलर...........सगळ्यांचीच एकमेकांशी चाललेली स्पर्धा...वेगाची आणि पुढे जाण्याची! मग कोणी कट मारून अमानुष अविर्भावात फूटपाथलाही काबीज करून पुढे जात होता, तर कोणी रस्ता माझ्या बापाचाच म्हणत! का धावताहेत सगळी? एकमेकांना चिरडून, वेळप्रसंगी एकमेकांचे गळे पकडून? या सगळ्या चित्रात आपण कुठे आहोत? का आपल्याला असं आक्रमक होणं जमत नाही? दुबळ्या, आगतिक आहोत का आपण? ज्या फूटपाथवरून चालतो आहोत तो तरी कुठे आपला किंवा आपल्यासाठी आहे? आणि स्पर्धा तरी निकोप कुठे आहे? आणि कशासाठी करायची आहे? कुठला उन्माद मिळतो त्यातून? त्याची चव आपल्याला चाखायची आहे का? मुळातच हा ‘कोहम्’ चा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत या गर्दीतल्या पळापळीला काही अर्थच नाही असं स्वतःशी पुटपुटत ती चालू लागली.

ते थोडसं ओळखीचं झालेलं घर एकदाचं दिसलं आणि फुला आत शिरली. अजूनही तिची कोणी तशी दखल घेतली नव्हती. ती बाहेर गेली होती, हे घरातल्या स्त्रियांच्या ध्यानातही आलं नसावं. तो छोटासा मुलगा मात्र अत्यानंदाने धावत येऊन तिला बिलगला, तिच्या साडीकडे बघून त्यानं फरकही ओळखला. त्यानं साडीला स्पर्श करून हसून मान डोलावली आणि पुनश्च तो खेळायला बाहेर गेला.

आता बाहेरच्या खोलीत आणखी कोणीतरी आलं असावं. त्या कौटुंबिक गर्दीत एका पुरुषाचा आवाज तिच्या कानावर पडला. तिनं हळूच पडदा सारून बाहेर डोकावून बघितलं. त्याच्या येण्यानं त्या वृद्धाच्या आणि इतर स्त्रियांच्या चेहर्‍यावर आश्वस्त झाल्याचे भाव उमटलेले तिनं टिपले. तो तिच्यापेक्षा ४-५ वर्षांनी मोठा असा मध्यमवयीन तरूण होता. काळ्या कुळकुळीत भरघोस शिस्तीत कापलेल्या मिशा, रंग गोरापान, अंगात पांढरा शुभ्र शर्ट आणि निळी जिन्सची पँन्ट, हसरा, आनंदी! कोण आहे हा? हा तर अगदी डॉ. बापटांसारखा दिसतोय. फुला गांगरली. आता हे बापट कोण? आपण ओळखतो का त्यांना? तिच्या मेंदूला झिणझिण्या आल्या.

ती आत फिरली आणि तिला त्याच खोलीला एल शेपमध्ये असलेली आणखी एक खोली दिसली. ती तशीच आत शिरली. तिथेही एक कॉट आणि भिंतीला भला मोठा आरसा टांगलेला होता. बाजूला एक रायटिंग टेबलही होतं. काचेच्या कपाटात रांगेत मांडून ठेवलेली पुस्तकं होती. बराच काळ कोणी त्यांना हाताळलं नसावं अशी! ही खोली जरा नीटनेटकी आवरलेली दिसत होती. बांबूचं फर्निचर...कलात्मक दृष्टिकोन...भिंतीवर लावलेलं व्हॅनगॉघचं सारीनाईटचं पेटिंग...ही खोली कोणाची असावी? इथे बाहेरचा कणभरही आवाज कानावर पडत नव्हता. एकदम शांतता! हीच तर हवी आहे आपल्याला. ती त्या कॉटवर रेलून बसली. डोळे मिटून घेतले, किती वेळ गेला कुणास ठाऊक! कोणाची तरी चाहूल लागली आणि तिने हळूच डोळे उघडले. तो - डॉ. बापट (नव्हे डॉ. बापटांसारखा दिसणारा कुणी!) आत आला होता. अरे बापरे! ही त्याची तर खोली नाही ना? ती घाबरली. तो जाईल का लगेच, का थांबेल? पण जाण्याचा त्याचा अंदाज दिसेना. त्यानं आपला मोबाईल, घड्याळ, खिशातला पेन या वस्तू काढून त्याच्या नेहमीच्या जागेवर गुणगुणत ठेवल्या. तिचं असणं हे त्याला कदाचित गृहीतच असावं. पण आपण त्याच्या प्रायव्हसीत अडथळा आणता कामा नये. इथून जायला हवं. ती कॉटवरून उतरण्यासाठी धडपडली आणि तेवढ्यात त्याने तिला हसून मिठीत पकडली. हे काय, परक्या पुरुषाचा स्पर्श? परका स्पर्श?

तसं तर तिला काही वाटेना. हा स्पर्श ओळखीचा होता- कुठली तरी भाषा बोलतोय - या स्पर्शाची किती रुपं...किती भावना व्यक्त करतो हा स्पर्श...पण म्हणून काय झालं? मी याला ओळखत नाही. अगं पण या स्पर्शाला तर ओळखतेस ना? 'नाही, नाही’ तिनं जोरात मान हलवली. तशी त्यानं आणखीनच आपली मिठी घट्ट केली. ती काकुळतीनं म्हणाली, 'मी कोण? मी इथे कशी? मला काहीच कसं आठवत नाही?' तो हळुवारपणे म्हणाला, 'काय घाई आहे? आठवेल हळूहळू. आता मात्र शांत रहा बघू.' ती म्हणाली, 'तू कोण? सॉरी तुम्ही कोण?' तो हसून म्हणाला, 'इतक्या हक्कानं, अधिकारवाणीनं जवळ घेतोय, म्हणजे कोण हे कळतंय ना तुला?'

हा आपला नवरा असावा का? पण कसं शक्य आहे? याला तर यापूर्वी आपण कधीच बघितलं नाही. याचं साधं नावही आपल्याला माहीत नाही. तोपयंत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले होते. तो तिला किस करू पाहत होता. तिला एकदम हसू फुटलं. याला किस येत नसावा बहुदा. फक्त ओठांवर ओठ टेकवतोय. किस कुठे असा करतात का? शिकवावा का याला? तिने नकळत त्याचा एक दीर्घ किस घेण्यात पुढाकार घेऊन सुरुवात केली. तिच्या आणि त्याच्या सर्वांगावर रोमांच उठले. त्याला आश्चर्य वाटलं असावं पण तरीही तिच्या आकस्मिक पुढाकारानं तो सुखावला. तिच्या पाठीवरून त्याचा हात हळुवारपणे फिरू लागला. त्या बोटांची वळणं तिला ठाऊक होती. तो जवळ जवळ येतोय, खूप जवळ येतोय आणि अचानक तिनं त्याच्याकडे बघितलं. त्यानं त्याचे डोळे सुखावून मिटले होते. छान, देखणा दिसत होता. काय नाव असावं याचं? हा आपला नवरा, तर मग ती बाहेर खेळणारी मघाची आपल्याला बिलगणारी दोन मुलं - तीही आपलीच का? त्या क्षणी अस्वस्थ होऊन ती त्याच्या कानात पुटपुटली, 'तुमचं नाव काय?'

तो म्हणाला, 'डॅनियल!' बापरे! डॅनियल! या नावाशी, त्या नावाच्या संस्कृतीशी आपला दुरान्वयानंही कधी संबंध आला नाही. आता काय करायचं? तो खूप जवळ आलेला होता. कोणत्याही क्षणी एकदम आत....एका अनोळखी माणसासोबतचा संग..........तिनं निकरानं त्याला ढकलत म्हटलं, 'मी तुम्हाला ओळखत नाही, प्लीज मला सांगाल, हे सगळं काय चाललंय?'

त्याची तिच्यावरची पकड सैलावली. तो त्या उत्कट क्षणीही तिच्यापासून दूर झाला. तिचा आदर राखला होता की अजून काही? तिला कळेचना. तिच्या डोळ्यातून असहायतेनं पाणी आलं. मात्र शरीरात आता प्रतिकाराचं त्राणही शिल्लक नव्हतं. तो हलके हलके तिच्या कपाळावर थोपटू लागला..त्याचं थोपटणं आणि त्या मघाशी खेळणार्‍या मुलाचा बिलगलेला स्पर्श एकमेकांत मिसळू लागले आणि तिचं विचारचक्र मंदावत पुन्हा झोपेचा अंमल तिच्यावर चढला.

त्या झोपेत स्वप्नांनी तिला अलगद पुन्हा आपल्याकडे ओढून घेतलं. आपल्याला स्वप्न पडतंय हे तिला जाणवत होतं. त्या अर्धवट ग्लानीतही तिला आठवलं, आपल्याला स्वप्नं पडतात तेव्हा आपला आत्मा आपलं शरीर सोडून बाहेर भ्रमण करत असतो आणि त्यानंतर तो पुन्हा शरीरात परत येतेा. चीनमधल्या लोकांचा तर म्हणे त्यावर ठाम विश्वासही होता. फुलाला मात्र नेहमीच स्वप्नांची धडकी भरे. समजा, स्वप्नातून अचानक जागे झालो आणि तोपर्यंत आत्मा जर शरीरात परतू शकला नाही तर मग काय करायचं? त्या भीतीनं ती घड्याळाला लवकर उठण्यासाठी गजरही लावत नसे.

आता मात्र हवं असो वा नको, हे स्वप्नं तिला दूरवर, दाट झाडीतून एका दुमजली कौलारू बंगलीत घेऊन गेलं. तिथे एक फ्रेंचकट पांढरीशुभ्र दाढी असलेला सडपातळ मनुष्य कसल्यातरी प्रयोगात गढलेला तिला दिसून आला. तिला पाहताच त्यानं समोरच्या खुर्चीत बसण्याची खूण केली. तो तिच्याशी बोलू लागला, 'आपल्या आयुष्यात अनेक कटु, दुःखद किंवा भीतिदायक असे प्रसंग किंवा भावना येतात आणि त्या आपण विसरण्याचा प्रयत्न करतो; दडपून टाकतो आणि त्यांना आपण स्मृतीच्या किंवा जाणिवेच्या पातळीवर येऊ देत नाही. मग त्या अनकॉन्शसमध्ये जाऊन बसतात आणि स्वप्नातून त्या आपल्या जाणिवेचं संरक्षणकवच मोडून बाहेर येतात. तसंच आपण जागेपणीच्या ज्या इच्छा करतो पण ज्यांची पूर्ती होत नाही अशा अपूर्ण, अपुर्‍या गोष्टी आपल्याला आपल्या स्वप्नात दिसायला लागतात आणि मग आपल्याला त्या इच्छांची पूर्ती झाल्यासारखं वाटतं...’’

हा काय बडबडतो आहे? माझ्या कुठल्या इच्छा, कुठली स्वप्नं अधुरी आहेत? जे मी अनुभवतेय ते खरं की मला जे वाटतंय ते खरं? मी जे वाचलं, माझ्या ज्या कल्पना होत्या त्याच तर मला सत्याचा आभास करून देत नाहीत ना? मग मग हे खुराड्यासारखं घर, हा मध्यमवर्गीय जगणारा वेगळ्याच संस्कृतीतला नवरा म्हणवणारा पुरूष, ती मला परकी वाटणारी पण माझी म्हणवणारी मुलं हे काय आहे? सत्य? सत्याचा आभास? की नको असलेलं स्वप्न? आणि मग स्वप्नच जर असेल तर खरं काय? का मला आठवत नाहीये काहीच! मला अ‍ॅम्नेशिया झालाय का? असे कोणते ताणतणाव होते म्हणून मला हा विकार झाला असावा? का माझ्या मेंदूला एखाद्या अपघातात दुखापत झाली असावी आणि रेट्रोग्रेड अ‍ॅम्नेशियाच झाला असावा? का आपल्या मेंदूतल्या टेम्पोरेल लोब, फ्राँटल लोब आणि हिप्पोकँपस यांना दुखापत झाली असावी? का आपण खूप काळ दारू पित असूत? म्हणूनच तर कदाचित आपल्याला कोर्सकोफ सिंड्रोम झाला असावा? किंवा आपल्या मेंदूतला अ‍ॅमिग्डाला आपल्याला फितूर झाला असावा. कारण आपली स्मृती शाबूत ठेवण्याचं काम तोच तर करतो. पण......पण हे सगळं सायन्समधलं आपल्याला कसं माहीत? आपण डॉक्टर तर नाही?

अचानक उठलेल्या वावटळीनं तिचा ताबा घेतला. त्या धुळीत कितिक वस्तू, कितिक आठवणी.....ती हलकी हलकी होत गरगरत वर वर जाऊ लागले.....थांबवायला हवं. नकोच विचार करायला. इथून मात्र जरा दूर जायला हवं. कॉन्शस, अनकॉन्शस............जाणिवेच्या पातळीला ओलांडून दूर.............त्या त्या एका उंच पर्वतावर! कलकत्ता कॉटनची कडक स्टार्च केलेली, मोकळ्या भुरभुरत्या केसातली फुला तिला तिथे दिसली. हातात जाडजूड पुस्तकं घेऊन, डोळ्यावर चष्मा...आजूबाजूला तिचं काही ऐकण्यासाठीची गर्दी! त्या गर्दीतून वाट काढत ती निघालीय. कुठे कुणास ठाऊक! पण असं जर असेल ही तिथे, तर मग या खोलीत झोपलेलं कोण?

त्या गर्दीतून वाट काढत ती फुला चालू लागली, तिनं डोळ्यावरचा चष्मा काढून हातात घेतला. डोळे उघडून बघितलं. तर डॉ. बापट तिची उठण्याची आतुरतेनं वाट पाहत होता. डॉ. बापट? नव्हे, डॅनियल! काय करायला हवंय? प्रवास खूप झालाय....वावटळीनं स्थिरावायला हवंय. तळ्यात की मळ्यात, मळ्यात की तळ्यात... ती पुटपुटली आणि डॅनियलच्या मिठीत शिरली. आता स्वप्न की सत्य हा वाद तिनं तिच्यापुरता तरी मिटवला होता!

 

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.