मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’

मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’

मनावर मोरपीस फिरवणारा ‘मुरांबा’
चार दिवसांपूर्वी आसावरीच्या आग्रहामुळे मी, अपूर्व आणि आसावरी मिळून चि. व चि. सौ. का. हा तद्दन भिक्कार चित्रपट बघितला. खरं तर संपूर्ण सिनेमागृहातले लोक खुदूखुदू हसून एन्जॉय करत होते. आसावरी देखील चांगलीच रमली होती. सिनेमा संपला आणि आसावरी म्हणाली, ‘मजा आ गया यार….’ मी तिच्याकडे हतबुद्ध होऊन बघतच राहिले…..अवास्तव चित्रण, अतिरंजित, अतिनाटकीपणा……त्यातल्या शिव्या काय…..घरीदारी चाललेली कचाकचा भांडणं काय …..त्याला अर्कचित्राची कशी ट्रिटमेंट दिलीये वगैरे खूप छान छान परीक्षणही वाचलं. पण मला काही तो भावला नाही. आसावरीच नाही तर चित्रा या माझ्या ठाण्याच्या मैत्रिणीनंही तो लाऊड असला तरी आपल्याला आवडल्याचं लिहिलं…..परेश मोकाशीचा चित्रपट आणि तो वाईट असूच शकत नाही असं वाटायचं काहीच कारण नाही. मी मात्र यापुढे मराठी सिनेमे बघायचे नाहीत असं मनाशी ठरवून टाकलं. पण मी ठरवलं तरी अपूर्वनं आज आपण ‘मुरांबा’ बघायला जाणार आहोत हे जाहीर केलं. आलिया भोगासी ….म्हणत मी त्याच्याबरोबर गेले…..
अमेय वाघ हा ‘दिल, दोस्ती….’ किंवा इतर मालिकांमध्ये मला सुमार अभिनयाचा मुलगा वाटायचा. मात्र या चित्रपटातला त्याचा अभिनय प्रशंसनीय! त्याची popcorn मधली मुलाखत बघितली तेव्हा अमेयला या चित्रपटापासून खूप अपेक्षा असल्याच तो सांगत होता. त्याच्या अपेक्षेप्रमाणेच हा चित्रपट खूप प्रशांसला जाईल. मिथिला पालकर ही मुलगी तर इतकी गोड आहे, नव्हे ती नुसतीच गोड नाही तर तिचा अभिनय देखील उत्तम आहे. तिला बघून मला सायलीची खूप आठवण आली. खरं तर हा चित्रपट बघताना त्यातली सगळीच पात्रं मला ओळखीची वाटली. काही वेळा मीच चिन्मयी सुर्वे होते आणि काही वेळा मीच सचिन खेडेकरही होते. अमेयच्या जागी मला माझा अपूर्व दिसत होता, तर कधी सजल……अमेयच्या मित्राच्या जागी मला आमचा शास्त्री दिसत होता….. माझ्या घरात ही गोष्ट घडली तर याचप्रमाणे घडेल हे मला चित्रपट बघताना सतत जाणवत होतं…..माझ्याशी मोकळेपणानं सगळं सांगणारी माझी मुलं आठवत राहिली. यतिनचे प्रत्येक वेळचे ब्रेकअप त्यानं मोकळेपणे मला सांगितले ते दिवस आठवले. शास्त्रीची प्रेमकहाणी आठवली आणि त्यात सामील असलेली मी आठवत राहिले…..मुलांचं आळसावलेपण आठवलं…..मुलाचं हक्कानं माझ्यावर दादागिरी करणं आठवलं……
अपूर्वचे मित्र घरी आले की त्यांच्यामाझ्यातलं मोकळेपण हे छान सुरू असतं….ते आठवत गेलं…..अपूर्वही त्यात सामील असतो…..पण ते मित्र गेले रे गेले की अपूर्व माझी चिन्मयी सुर्वे करून टाकतो आणि मी काय बोलायला नको होतं याचे धडे मला देतो……घरात जेवढं सहजतेनं सगळं घडतं, तितक्याच सहजतेनं या चित्रपटातले प्रसंग घडत राहतात. यात कुठेही आपल्या मनाला कायम धास्ती, भीती दिग्दर्शक देत नाही. शेवट गोड होणार हे ठाऊक असलं तरी आपली उत्कंठा आणि चव घेण्याची पद्धत दिग्दर्शक आपल्याला नकळत सांगून जातो.
माझी पिढी आताच्या पिढीशी कशी जोडून आहे हे तर या मुरांब्यात दिसतंच, पण आताच्या मुलांचे प्रश्‍न, त्यांची नाती, कामाच्या संधी आणि स्वतःला सिद्ध करण्याची धडपड, त्यात स्वतःचे अहंकार, बदलत्या काळानुसार लिंगभेद न करता, समानता मानत असतानाही स्त्रीचं आपल्यापेक्षा वरचढ असणं न रुचणं, आम्ही खूप बेफिकीर आहोत, आम्हाला कशाचंच काही वाटत नाही असा आव आणणारी पण मनातून हादरलेली तरुणाई, स्वतःलाच ‘स्व’ न सापडणं, गोंधळलेल्या मनाची चलबिचल हे सारं सारं वरूण नार्वेकर या दिग्दर्शकानं अचूक टिपलंय. कथा, पटकथा आणि संवाद हे सगळं त्याचंच! अप्रतिम! आणि त्याला सचिन खेडेकर, चिन्मयी सुर्वे, अमेय वाघ आणि मिथिला पालकर यांनी सुरेल साथ दिलीये.
आलोक देशमुख (अमेय वाघ) या तरूणाचा इंदूबरोबर झालेला ब्रेकअप पासून या चित्रपटाचं कथानक वेग घेऊ लागतं. खरं तर वेग हा शब्द योग्य नाहीच इथं. छानपैकी घोळवत घोळवत हे कथानक हळुवारपणे पुढे सरकतं. आपल्यालाही त्यात ओढून घेतं आणि चित्रपट संपणार हे माहीत असूनही ‘अजून थोडा हवा गडे’ असं वाटत राहतं. यातला मित्राचं नातं जोडणारा बाप सचिन खेडेकरनं खूप सहज साकारलाय. चिन्मयी सुर्वे ही धारवाडसारख्या लहानशा गावातून पुण्यात आलेली एक साधी गृहिणी ते पुण्यासारख्या शहरात येऊन सगळे बदल सहजगत्या स्वीकारणारी आई खूपच सुरेख साकारली आहे. तिच्या चेहर्‍यावरचे त्या त्या वेळचे एक्स्प्रेशन्स खूपच नैसर्गिकरीत्या येत राहतात. इंदू (मिथिला) ही शिकलेली आपलं करियर प्रामाणिकपणे घडवणारी कष्टाळू तरुणी…..येणारी आव्हानं पेलत पुढे जाणारी, तिचं राहणं, तिचं काम, तिचे मित्र, तिच्या पार्ट्या, तिचं व्यस्त असणं आणि तिचा भविष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन यामुळे आलोकमधला न्यूनगंड आणि अहंकार दोन्हीही वाढायला लागतो.
आपला ब्रेकअप झालाय हे अगदी सहजपणे आलोक आई-वडिलांना सांगतो, पण त्याच्या मनातलं काहूर त्याच्या चेहर्‍यावर उमटत राहतं, त्याच्या वागण्याबोलण्यातली चिडचिड त्याच्या आई-वडिलांना कळत राहते आणि मग त्याच्या ब्रेकअपचा पॅचअप कसा करावा यासाठी आई-वडील झटायला लागतात. त्यांचे हे प्रयत्न पाहून आलोकची जास्तच चिडचिड होते. मात्र हे सगळं सांगण्यापेक्षा प्रत्येकानं या चित्रपटातून ते अनुभवणं खूप सुरेख अनुभव आहे.
या चित्रपटाचं संगीत खूप सुरेख आहे. यातले संवाद असो की वेशभूषा तीही अगदी आसपासच्या आपल्याच घरातल्या व्यक्तींसारखीच आहे. नात्यातलं मुरलेपण तुम्हाला एकमेकांपासून दूर जाऊ देत नाही हेच खरं आणि हेच या चित्रपटात दाखवलं आहे. ताजे चेहरे, ताजा अभिनय, ताजं कथानक आणि दिग्दर्शकानं दिलेली ट्रिटमेंटही तितकीच ताजी!
चि. व चि. सौ. का. हा चित्रपट बघताना मला जे हळुवारपण हवं होतं, ते या मुरांब्यानं मला दिलं. हा चित्रपट माझ्या चेहर्‍यावर आणि मनावर हलकंसं मोरपीस फिरवून गेला. तुम्हीही या मुरलेल्या मुरांब्याचा आस्वाद जरूर जरूर घ्या.
दीपा देशमुख २ जून २०१७ रात्री ११ वाजून ४५ मिनिटं.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of