मि. अँड मिसेस अय्यर

मि. अँड मिसेस अय्यर

मी कोण, कोण तू आहे…… ‘मि. अँड मिसेस अय्यर’
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ४ वर्षं झाली, तरी अद्याप मारेकरी सापडले नाहीत. भर पावसांत या गोष्टींचा निषेध करण्यासाठी पुण्यातले अनेक नागरिक एकत्र आले….. पण त्याचवेळी दुसरीकडे तितक्याच जोरात अंधश्रद्धा आणि धार्मिकता या दोन्ही गोष्टी बरोबरीनं वाढवण्याचं कामही काही गट सक्रियतेनं करताहेत. धर्माच्या भिंती जास्त जास्त पक्कया होत चालल्या आहेत. माझा शिवाजी, तुझा आंबेडकर, माझा येशू, तुझा पैगंबर……..एक मराठा – एक लाख मराठा, एक ब्राह्मण – एक लाख ब्राह्मण, एक दलित – एक लाख दलित, एक मुस्लिम- एक लाख मुस्लिम…..आणि आणखी जेवढ्या काही जाती असतील त्याप्रमाणे….ही वाक्यं जातींची नावं बदलत कानावर आदळत राहताहेत. तू नमाज पढताना लाऊडस्पीकरचा आवाज करशील तर मी गणपतीत डीजेच्या संगतीने गोंधळ घालीन …..आज प्रत्येक धर्मातल्या माणसांना असुरक्षिततेनं ग्रासलं आहे.
धर्मानं माणसामाणसांतलं प्रेम वाढण्याऐवजी क्रौर्य वाढत असेल तर काय करायचा तो धर्म? कशाला हवा तो धर्माचा शिक्का? ज्या गोष्टी अस्तित्वातच नाहीत, आपणच निर्माण केल्या, त्याला प्रमाण मानून मग त्यालाच चिटकून जगत राहायचं? संतांची, तत्वज्ञांची, वैज्ञानिकांची त्यांच्या आयुष्यभर केलेल्या कार्याची एक प्रकारे क्रूर चेष्टाच तर आपण करत नाही ना असंही वाटत राहतं. मन अस्वस्थ होतं.
लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात सगळे धर्म आणि पंथ यांची माहिती होती. त्या त्या धर्मांची धार्मिक स्थळं, त्यांचे फोटोही पुस्तकात होते. तेव्हा वाटलं होतं, सगळ्याच धर्मांची तत्वं सारखी असतील तर धर्माचे इतके प्रकार हवेतच कशाला? अमक्याचं मंदिर, तमक्याची मज्जीद, फलाण्याचं चर्च हे सगळं तेढ निर्माण करणारं हवंच कशाला? त्या परमेश्‍वराला, त्या अदृश्य शक्तीला पुजायचं असेल, तिच्यासमोर नतमस्तक व्हायचं असेल तर निसर्गालाच देव मानून त्यालाच का नाही सगळ्यांनी मिळून पुजायचं? मानवता हा एकच धर्म मानून का नाही एकमेकांवर प्रेम करायचं? त्या त्या धर्मातल्या रुढी, परंपरा, शिष्टाचार….माणसाला एकमेकांपासून किती दूर नेताहेत? नाहीतर पुस्तकांवर मनापासून प्रेम करणार्‍या शेख आमीरमध्ये आणि माझ्यात माणूस म्हणून फरक तो काय आहे? पण तरीही आमचे धर्म वेगळे म्हणून मग आम्ही वेगळे ठरतो!
या प्रश्‍नाला उत्तर आपण आपलं जगणं आपलं वागणं कसं असावं हे ठरवायचं आपल्या हातात आहे. लिखाण असो, चित्रपट-नाटक माध्यम असो, संगीत असो, चित्र-शिल्पकला असो, या सगळ्या माध्यमांमधून माणसातल्या माणुसपणाचा संदेश सतत बिंबवला पाहिजे. या अस्वस्थतेतून काल रात्री ११.३० वाजता यू-ट्यूबवर ‘मि. अँड मिसेस अय्यर’ हा चित्रपट बघितला. एक उत्कृष्ट चित्रपट बघितल्यावर चित्रपटाचा गाभा, त्यातली व्यक्त-अव्यक्त भाषा, त्यातले कलाकार, त्यातलं संगीत, चित्रपटाचं दिग्दर्शन सगळं काही एकरूप, एकजीव झाल्याचं समाधान मिळालं.
ऑस्कर विजेते, भारतरत्न सन्मानित सत्यजीत रे या असामान्य दिग्दर्शकाच्या हाताखाली तयार झालेल्या अपर्णा सेन हिचा हा चित्रपट! अपर्णा सेन हिनं बंगाली, हिंदी चित्रपटसृष्टीत आपला ठसा उमटवलाच, पण तिचे चित्रपट आंतरराष्ट्रीय स्तरावरही गाजले. तिच्या प्रत्येक चित्रपटानं राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पारितोषिकं पटकावली.
‘मि. अँड मिसेस’ हा चित्रट कोकणा सेन (अपर्णा सेनची मुलगी) आणि राहूल बोस यांच्या प्रवासाची गोष्ट आहे. कट्टर कर्मठ तमीळ ब्राह्मण कुटुंबातली कोकणा सेन (मीनाक्षी अय्यर) ही तिच्या एक वर्षांच्या मुलाबरोबर आपल्या सासरी सासूची तब्येत बरी नाही म्हणून माहेरहून जायला निघते, तेव्हा लांबचा प्रवास असल्यानं तिचे आई-वडील राहुल बोस म्हणजेच चित्रपटातला राजा (जहॉंगिर चौधरी) चौधरी याच्यावर तिच्या सुरक्षित प्रवासाची जबाबदारी टाकतात.
या प्रवासात हिंदू-मुस्लिम यांच्यात काही अप्रिय घटना घडतात आणि हिंदू अतिरेकी सापडेल त्या मुस्लिमाला शोधून शोधून मारतात. सगळीकडे अराजकता माजते. जाळपोळ, दहशत यांनी सगळं वातावरण दूषित होतं आणि प्रवास करत असलेली ही बस या सगळ्या परिस्थितीत अडकून पडते. त्यातच संचारबंदीही लागू होते.
या प्रवासात माणसांतल्या स्वार्थाचं, कातडी बचाव मानसिकतेचं खूप चांगलं चित्रण केलंय. आपला जीव वाचावा म्हणून आणि आपण जातीभेद करत असल्यानं एका वृद्ध मुस्लिम जोडप्याची ओळख मुद्दाम सांगून त्यांचा बळी जाण्यास कारणीभूत असणारेही त्याच बसमध्ये असतात. ते भीषण क्रौर्य करणारी आपण माणसंच आहोत हे खरंच सहन होत नाही. यात तरूणतरुणींचा उत्साहानं भरलेला गटही असतो, त्यांच्यातलं निरागसपण आणि त्यानंतर त्यांच्यातले होत जाणारे बदल हेही आपल्याला या प्रवासादरम्यान जाणवतात.
तसंच कोकणा सेन ही शिक्षणानं भौतिकशास्त्रातली द्विपदवीधर असलेली सुशिक्षित तरुणीही आपल्या धार्मिक मतांवर ठाम असते. या सगळ्या प्रवासात राजा चौधरीचं मुस्लिम असणं तिला कळल्यावर आपण त्याचं पाणी प्यायलो इथंपासून तिच्या मनात त्याच्याविषयी चीड, आपण हे काय केलं याबद्दल अपराधी भाव आणि त्याच्यावरचा अविश्‍वास तयार होतो. मात्र संपूर्ण प्रवास ज्या रीतीनं, ज्या दहशतीच्या वातावरणातून होत राहतो, त्यात ती कशी बदलत जाते….या कृत्रिम भिंती कशा हळूहळू गळून पडतात आणि एका हळुवार, उत्कट नात्यांची वीण त्यांच्यात कशी गुंफली जाते हे या चित्रपटात अतिशय सुरेख रीतीनं दाखवलं आहे.
उत्कृष्ट अभिनय, उस्ताद झाकीर हुसेन यांच्या संगीताचा यथोचित वापर, परिणामकारी छायाचित्रण या सार्‍यांचा सुरेख मेळ या चित्रपटांत बघायला मिळतो. हा चित्रपट प्रत्येकानं पुन्हा पुन्हा बघायलाच हवा.
मी माझ्या मनात डोकावून बघू शकतो, अंतर्मूख होऊन माणूस म्हणून विचार करू शकतो आणि त्या वेळी कदाचित मन सांगेल,
पाडू चला रे भिंत ही मध्ये आड येणारी
या मनामनातून बांधू या एक वाट जाणारी
दीपा देशमुख २१ ऑगस्ट २०१७

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of