झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव!

झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव!

झिपर्‍या – सुन्न करणारा एक अनुभव!

‘झिपर्‍या’ चित्रपट सुरू झाला आणि आपण ‘दिवार’, ‘जंजिर’ वगैरेसारखा एखादा हिंदी चित्रपट तर बघत नाही ना असा मनात विचार चमकून गेला. समोरच्या पडद्यावर वेगात काहीतरी घडत होतं, संगीत आणि समोरची चित्रं काहीतरी सांगत होती…..त्या संगीतानंच मला अर्ध जिंकलं. मनाला हायसं वाटलं आणि मनातल्या शंकाकुशंका पार मिटल्या. मी निश्चिंत मनानं ‘झिपर्‍या’ च्या स्वाधीन झाले.

म्हटलं तर कथानक नवीन नाही. शेवटही वेगळा नाही तरीही हा ‘झिपर्‍या’ मनाला चटका लावून गेला. झिपर्‍या ही कादंबरी ज्येष्ठ पत्रकार, समीक्षक आणि विख्यात साहित्यिक अरूण साधू यांची! ती निवडणं यातच निर्मात्यांनी अर्धा गड जिंकला होता.

बूट पॉलिश करणार्‍या मुंबईतल्या अर्धवट वयातल्या मुलांची ही गोष्ट! मुलांची होणारी पिळवणूक, उस्तादाची दादागिरी, अपमान, समाजाकडून वाट्याला येणारी तुच्छता, उद्या काय होणार ठाऊक नाही, असं सगळं जगणं असतानाही ही मुलं रोज स्वप्नं बघतात, उद्या चांगला असेल ही आशा त्यांना वाटते. यातली झिपर्‍याची बहीण लीला ही एका पारशी कुटुंबात घरकाम करतेय. ते कुटुंब चांगलं सुसंस्कृत असतं. तिच्यातल्या चांगुलपणाबरोबरच तिच्यातलं उमलणारं तारुण्य तिला शरीरसुखाकडे खेचत असतं. म्हणूनच पिंगळूसारख्या गुंडावर ती प्रेम करताना दाखवली आहे. झिपर्‍याचे मित्र….प्रत्येकाची वेगळी कहाणी आणि वेगळी दुःख! मात्र या दुःखाची दिवाळी साजरी करायला त्यांना वेळ नाही आणि त्यांचा तो स्वभावही नाही. आला क्षण कसा घालवायचा यातच ते गुरफटलेले! त्यांच्या वाट्याला अनेक थरारक प्रसंग येऊनही त्यातून सहीसलामत बाहेर पडलेले! या चित्रपटात मैत्री, एकी, नात्यांमधलं प्रेम खूप तरलपणे दाखवलं आहे. यातला नार्‍या खूप भाबडा दाखवलाय. त्याची सावत्र आई त्याला कामाला जुंपून त्याच्याशी अतिशय वाईट वागत असते. असलमला चित्रपटात काम करण्याचं वेड असतं. मात्र बिडीचं व्यसन त्याचं शरीर पोखरत असतं. पोम्प्याला बासरी वाजवण्याचा नाद असतो. या मुलांचं जग त्यांना पुढली वाट गुन्हेगारीचीच दाखवणारी असतं. मात्र त्या सीमारेषेवर असतानाच जर चांगली मूल्यं, चांगल्या व्यक्ती, अनुकूल परिस्थिती तुमच्यासमोर आली तर जगणं कसं बदलू शकतं याची देखील गोष्ट यात सांगितली आहे.

हा चित्रपट अतिशय सकस बनला आहे. तो व्यावसायिकदृष्ट्या देखील खूप चालेल असं वाटतं. कारण या चित्रपटातल्या निर्मात्यापासून ते संगीतकार, दिग्दर्शक, अभिनेते आणि सगळी टीम यांच्यातला समन्वय खूपच चांगला होता हे लक्षात येतं. निर्माते रणजीत दरेकर आणि अश्‍विनी दरेकर यांनी केवळ पैसा ओतला नाही तर आपला जीव ओतल्याचं चित्रपट बघताना लक्षात येतं. चित्रपटाला साजेसं संगीत, गीतं….कुठेही वातावरणात भडकपणा दिसत नाही. मुंबईसारख्या गर्दीच्या ठिकाणी अत्यंत कठीण असतानाही या चित्रपटाचं शूटिंग कसं केलं असेल हा मोठा प्रश्‍नच आहे. खरं तर चित्रपटातल्या सगळ्यांचाच अभिनय अप्रतिम आहे. अमृता सुभाष, प्रथमेश परब, हसंराज जगताप, सक्षम कुलकर्णी, चिन्मय कांबळी, अमन अत्तर ही सगळी पात्रं आपापल्या भूमिका जगली आहेत इतकी त्या त्या भूमिकेशी ती एकरूप झालेली होती.
फक्त कथानक चांगलं असून उपयोग नसतो तर त्याला न्याय देणारा दिग्दर्शक तितकाच कुशल असावा लागतो. या चित्रपटाचा दिग्दर्शक केदार वैद्य याचं मनःपूर्वक अभिनंदन. या चित्रपटाचा ऍक्शन डायरेक्टर अब्बास अली मुगल आणि कोरियोग्राफर उमेश जाधव यांचा विशेष उल्लेख करावा लागेल.

आणि शेवटी अश्‍विनी, तू माझी मैत्रीण आहेस. इतक्या संवेदनशीलतेनं तू हा सामाजिक प्रश्नांना वाचा फोडणारा चित्रपट बनवलास, या सगळ्या काळात तुझ्यावरचे ताणाचे प्रसंग कितीतरी आले असतील. त्यातूनही तू पुढे जात राहिलीस त्याबद्दल तुझा खूप खूप अभिमान वाटतोय.

चित्रपट बघून झाल्यावर मन बधिर झालं होतं. भानावर येऊन समोरच्या जगासमोर हसणं, बोलणं काहीही नको वाटत होतं. एक स्तब्ध शांतता अनुभवावी वाटत होती. अश्‍विनी, आज अरूण साधूंच्या झिपर्‍याने त्यांना खरोखरची आदरांजली वाहिली आहे हे मात्र खरं!

उत्कृष्ट चित्रपट जरूर जरूर आणि जरूर बघा!

दीपा देशमुख १५ जानेवारी २०१८.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of