दापोलीतली विज्ञानजत्रा आणि मी!

दापोलीतली विज्ञानजत्रा आणि मी!

दापोलीतली विज्ञानजत्रा आणि मी!
२८ फेब्रुवारी २०१८ या दिवशी दापोलीमध्ये डॉ. सारंग ओक यांच्या पुढाकारानं विज्ञान जत्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. जवळजवळ वर्षंभरापासून त्यांनी मला निमंत्रण दिलं होतं, पण काही ना काही कारणांनी मला त्यांच्या कार्यक्रमात सामील होता आलं नव्हतं. या वेळी त्यांनी संपर्क साधल्याबरोबर मी २८ च्या कार्यक्रमाला नक्की येत असल्याचं कळवलं.
डॉ. सारंग ओक हा खगोलशास्त्रानं झपाटलेला एक तरुण असून पुण्यामुंबईपेक्षाही अगदी तळातल्या गावांपर्यंत पोहेाचून तिथल्या मुलांमध्ये आणि युवांमध्ये विज्ञान, गणित, पर्यावरण यासारख्या अनेक विषयांची गोडी निर्माण व्हावी यासाठी झटत असतो. मी वाईट्ट रस्त्यांचा सहा-साडेसहा तासांचा प्रवास करून दापोलीत पोहोचले, तेव्हा मात्र तिथल्या निसर्गानं मला ‘इथेच राहा कायमची’ असा आग्रह करायला सुरुवात केली. डॉ. सांरग ओक, दापोली शिक्षण संस्थेचे मुख्याध्यापक, प्राचार्य, इतर मान्यवर, वैजयंती ठकार, डॉ. माधुरी शेवाळे, सचिन जोशी, वीणा यांनी स्वागत केलं.
फारशा औपचारिकता न होता, लगेचच मी व्याख्यानाला सुरुवात केली. विज्ञान दिनानिमित्त अर्थातच बोलताना सी.व्ही. रामन यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला आणि त्यांचं विज्ञानावरचं प्रेम, त्यांचा रामन इफेक्ट, त्यांचं संगीतावरचं/वाद्यांमधलं संशोधन, नोबेल पारितोषिकाची खात्री असणारा आईन्स्टाईननंतरचा रामन हा संशोधक, याविषयी मुलांशी संवाद साधला. त्यानंतर कलेचं आणि विज्ञानाचं आपल्या आयुष्यातलं स्थान यावर मुलांशी गप्पा मारल्या. कला माणसाचं जगणं सुंदर करते, तर विज्ञान माणसाला डोळस बनवत आयुष्याला दिशा देतं या मुद्दयावर जास्त भर दिला. मुलं आणि मुली वैज्ञानिकांचं आयुष्य उलगडत असताना खूपच रमून गेली. तासाभराचा वेळ कसा भुर्रकन उडाला कोणालाच कळलं नाही.
कार्यक्रम संपल्यानंतर मुलामुलींनी माझ्याभोवती गर्दी केली. यातली बहुतांशी मुलंमुली उर्दू शाळेतली होती, मात्र त्यांचं मराठीवरच प्रभुत्व अफलातून होतं. त्यांच्यात कुतूहल होतं, ऐकण्यासाठीचे कान तयार झालेले दिसले. यातल्या अनेक मुलामुलींनी माझ्या बोलण्याच्या चक्क नोट्स काढल्या होत्या. ही मुलं जेव्हा त्या नोट्स दाखवायला माझ्याजवळ आली, तेव्हा त्यांच्या सुवाच्या अक्षरातली ती टिपणं बघताना मला त्या मुलांमुलींविषयी खूपच कौतुक वाटलं. त्यातलाच अर्थव नावाचा एक मुलगा रामानुजनच्या चित्रपटाविषयी, फाईनमनविषयी त्याला आवडलेल्या गोष्टींविषयी माझ्याजवळ भरभरून बोलला. त्यानं काढलेल्या नोट्स अतिशय मुद्देसूद, नीटनेटक्या कव्हर लावलेल्या वहीत त्यानं लिहिल्या होत्या. उपस्थित सगळ्यांनीच जवळ येऊन त्यांना माझं बोलणं खूप आवडल्याचं सांगितलं. मी पुन्हा त्यांच्याशा बोलायला यावं असा आग्रह त्यांनी केला. शहरी वातावरणापेक्षाही छोट्याशा गावातल्या मुलांचं कुतूहल, जाणून घेण्याची इच्छा मला जास्त जाणवली.
दापोलीत मी येणार असं दोन दिवसांपूर्वीच कळवल्यामुळे मला भेटायला आमचं लिखाण वाचणारी, माझी चाहती छोटी मैत्रीण नीता बोरिवली, मुंबईवरून आली होती. तिची भेट होताच, लहान बहिणींनं खूप दिवसांनी भेटल्यावर गळ्यात पडावं तशी ती मला बिलगली. तिला भेटून मला खूप आनंद झाला. जेव्हा ती माझ्या लिखाणाबद्दल भरभरून बोलायला लागली, तेव्हा खूप छान वाटलं. याच वेळी स्वागत या माझ्या मित्रानं मला दापोलीत सरकारी अधिकारी असलेल्या सुवर्णा बागल या गोड तरुणीला नक्की भेट असं सांगितलं होतं. तीही माझी प्रतीक्षा व्याख्यानाच्या आधीपासून करत होती. सामाजिक कार्याशी जोडून असलेलली, अनेक संस्थांबरोबर काम करणारी आणि त्याचबरोबर आपली सरकारी नोकरीतली आपली कामं जबाबदारीनं करणारी सुवर्णा मला खूप आवडली. तिनं मला अनेक प्रश्‍न विचारले. तिचा जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तिची सामाजिक काम करण्याची तळमळ मला जाणवली. स्वागतनं सांगितल्याप्रमाणे सुवर्णा ही कायमस्वरूपी माझी झाली.
दापोलीहून परतताना अनिल हुलावळे या तरुणाबरोबर ज्या गप्पा झाल्या, ती सोबत त्यानं केली ती मी आयुष्यात विसरणार नाही. या तरुणाविषयी मी लवकरच लिहीन. वाटेतल्या गप्पा, अनिलमधलं माणूसपण, रस्त्यावर लागणार्‍या डोंगरांवर पेटलेला, पसरत चाललेला वणवा हे सगळं खूप स्वप्नवत होतं. प्रवासात रस्ता खराब असूनही प्रवास कसा संपला कळलंच नाही.
डॉ. सारंग ओक, दापोलीत येण्याचं निमंत्रण दिल्याबद्दल, इतक्या अगत्यानं आतिथ्य केल्याबद्दल खूप खूप आभार! दापोलीतलं तुमच्या मित्राचं सुरेखसं रिसोर्ट, नारळाची झाडं, शाळा-कॉलेजचा परिसर, बाजूचं एकाकी उभं असलेलं चर्च, दापोलीतलं साध पण रुचकर जेवण, उर्दू शाळेतल्या मुलामुलींच्या चेहर्‍यावरचं सफरचंदी तेज हे सगळं सगळं विसरता न येण्यासारखं. तुम्ही तिथे उभारलेलं विज्ञान प्रदर्शन, त्यात अवकाशदर्शनापासून जीवसृष्टीचा प्रवास, पर्यावरण काय सांगतंय, प्राणिजीवन आणि त्यांचं अस्तित्व अशा अनेक बाबतीत त्यांनी प्रदर्शन दाखवताना माहिती दिली. या प्रदर्शनात स्वयंसेवक म्हणून महाविद्यालयातले युवा उत्साहाने सहभागी झाले होते.
दापोलीहून पुण्यात परण्यासाठी मन तयार होत नव्हतं. पण सकाळी आठ वाजता भावे स्कूलमध्ये असलेला कार्यक्रम सारखा दिसत होता. त्यामुळे इच्छा असूनही थांबता आलं नाही. पण पुढल्या वेळी दोन दिवस देणार असं मी सारंगला कबूल केलं आहे. डॉ. सारंग ओक यांच्याबरोबर विज्ञानाच्या कामासाठी जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेन असं मी त्यांना कबूल केलं सारंगच्या कामाविषयी मी लवकरच लिहिणार आहे.
वैजयंती ठाकर आणि डॉ. माधुरी शेवाळे या दोन छानशा हुश्शार मैत्रिणी मिळवून दिल्याबद्दल सारंग तुमचे पुन्हा एकदा आभार आणि पुढल्या कामाबद्दल खूप खूप शुभेच्छा!
दीपा देशमुख १ मार्च २०१८.

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of