माकड

माकड

माकड
काल रात्री ‘माकड’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पुण्यातल्या बालगंधर्व नाट्यगृहात संपन्न झाला.
धनू (धनंजय सरदेशपांडे) माझा अकरावीत असल्यापासूनचा मित्र! आम्ही नाटकांत एकत्रित कामं केली, एकमेकांच्या सुखदुःखात बरोबर राहिलो आणि आपापल्या दिशेनं प्रवास करत राहिलो. धनूनं बालनाट्य चळवळीत मोठी भूमिका बजावली आणि त्याच्या स्नेहांकित नाट्यसंस्थेनं अनेक राज्यस्तरीय पारितोषिकं पटकावली. धनूनं ‘ओपन खड्डा रोपण’ या पर्यावरणाचं महत्व सांगणार्‍या एकांकिकेपासून लिखाणही करायला सुरुवात केली. एकांकिका, बालनाट्य, नभोनाट्य, तीन अंकी नाटक, चित्रपट, अभिवाचन, कार्यशाळा अशा अनेक माध्यमातून धनू नेहमीच सक्रिय राहिला. भूमिका लहान का मोठी यापेक्षाही या क्षेत्राशी जोडून राहणं त्याला आवडतं आणि आपल्या त्या त्या भूमिकेचं तो सोनं करतो.
खरं तर आजचा विषय धनू नाही. किंवा बापलेकाचं नातं सांगावं यासाठीही हे व्यक्त झालं नाही. मनात उमटलं ते इथे आलं इतकंच. धनूचा मुलगा चैतू! चैतन्य सरदेशपांडे! अपूर्वप्रमाणेच कम्प्युटरचं शिक्षण घेत असलेल्या चैतूचं मन मात्र कम्प्युटरमध्ये रमलं नाही. एके दिवशी त्यानं आपलं क्षेत्र नाटक हेच असल्याचं वडलांना सांगितलं आणि लहानपणापासून अभिनय करणार्‍या चैतूला धनूनं विरोध केला नाही. चैतू नाटकं लिहायला लागला. इतकंच नाही तर त्याच्या कथा ‘अंतर्नाद’ सारख्या दर्जेदार मासिकांमधून प्रसिद्ध व्हायला लागल्या. त्यानं कथास्पर्धेतली बक्षिसंही मिळवली. दिग्दर्शन आणि अभिनय यातही तो दिसायला लागला. त्याच्या शॉर्ट फिल्म्स, मालिकेसाठीचं लिखाण सगळं काही मी आवर्जून लक्ष ठेवून बघत असते. मला आणि अपूर्वला चैतूचा इतक्या कमी वेळातला हा धडपडीचा प्रवास बघणं आवडायला लागलं.
आता ‘माकड’ या नाटकाबद्दल! माकड या नावावरूनच नाटकाविषयीची उत्सुकता निर्माण झाली होती. आजच्या व्यवस्थेवर भाष्य करणारं हे नाटक असणार अशी मनाशी अटकळ बांधली होती. मुळातच हा विषय व्यावसायिक नाटक म्हणून निवडणं हे खरोखरंच धाडसाचं काम आहे. त्याबद्दल निर्माता आणि सगळ्या टीमचं अभिनंदन.
नाटक सुरू झालं तेच मुळी ‘दिल चाहता है’ मधल्या रोमँटिक गाण्यानं! मन एकदम सुखावलं. दोन धर्माची दोन माणसं एकत्र आलेली होती. त्यांचं रोजचं आयुष्य सुरु असताना अचानक त्यांच्या घरात राजकीय आक्रमण होतं आणि मग त्यांनी काय करावं काय करू नये याचा जणू काही फतवाच काढला जातो. सुरुवातीला चिडलेलं, भांबावलेलं आणि नंतर आगतिक झालेलं जोडपं यात दिसतं. यात स्त्री-पुरुष समानतेपासून अनेक विषयांना स्पर्श केला आहे. पहिला अंक कसा संपला कळलंच नाही. मन गंभीरपणे विचार करायला लागलं.
या नाटकाचं संपूर्ण कथानक सांगत नाही. पण या नाटकातल्या चारही पात्रांचा अभिनय अतिशय सहजसुंदर! सगळी टीम नवी असूनही कुठेही चाचपडताना दिसत नाहीत. अतिशय आत्मविश्‍वासपूर्वक त्यांचा रंगमंचावरचा वावर आहे. चैतन्य आणि यातला राजकीय नेता यांचे काही संवाद त्यांनी अतिशय ताकदीनं साकार केले आहेत. या नाटकाचं नेपथ्य सचिन गावकर आणि प्रकाश योजना शाम चव्हाण यांची असून ती उत्कृष्टच! संगीत, वेशभूषा आणि अभिजीत झुंजारराव याचं दिग्दर्शनही चांगलं! विषय गंभीर असल्यानं या नाटकाला पुन्हा बघायला येणारा प्रेक्षक किती मिळेल याचा अंदाज बांधणं कठीण आहे. एक लेखक म्हणून चैतन्यचा प्रवास आता सुरू झालाय, त्यामुळे त्याच्या लिखाणात यापुढे जास्त सकसपणा नक्कीच येईल याची खात्री आहे! ‘माकड’ जरूर बघा!
सर्व ‘माकड’ टीमचं अभिनंदन आणि शुभेच्छा!
दीपा देशमुख १० जानेवारी २०१८

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of