सुप्याजवळचा सय्यद तांडा

सुप्याजवळचा सय्यद तांडा

सुप्याजवळचा सय्यद तांडा
सकाळी साडेआठ वाजता औरंगाबादला जाण्यासाठी निघाले असता, नगरजवळच्या सुप्याच्या अलीकडे असलेल्या सय्यद तांड्यावर जाऊन पोहोचले. किरण काळे आणि त्याची टीम आधीच उपस्थित झालेली होती. माझं स्वागत झालं आणि मी तांड्यावर पोहोचले, तर त्या वैराण, ओसाड जागेवर फाटक्या कपड्यांनी शिवलेले तंबू (तंबू तरी कसं म्हणावं…) जवळ जवळ टाकलेले होते. एक-दोन मोठी माणसं सोडली तर तांड्यावर सगळी ६ ते १६ वयोगटातली मुलंमुलीच होती. सामाजिक कार्याचं शिक्षण घेतलेले रमेश, रत्ना आणि सोनल हे तीन युवा किरणच्या मार्गदर्शनाखाली गेले काही दिवस या मुलांसाठी झटत असलेले दिसले. या मुलांमध्ये या तीन युवांनी लक्षणीय बदल घडवून आणलेला मला बघायला मिळाला.
मुलींच्या गळ्यातले चांदीसारखे दागिने, कानातले झुमके, मुलांच्याही गळ्यातल्या रंगिबेरंगी मण्यांच्या माळा आकर्षित करून गेल्या. मला हवं मला हवं असं मन म्हणत राहिलं आणि माझा आवाज ओळखल्यासारखा त्यातल्या एका मुलानं पुढल्या वेळी आपण अशी माळ आणून देऊची खात्री मला दिली.
मुलांनी हात स्वच्छ केले नाही तर काय होतं हे सांगत, दोनच मिनिटांत हात धुण्याचं गाणं गाऊन दाखवलं. मी चकित झाले. कारण हे गाणं तर माझ्या पवननं तयार केलं होतं! तसंच हात धुण्यासाठी कमीत कमी पाण्याचं साधनही त्यानं बनवलं होतं. डॉ. पवनकुमार पाटील याचं गाणं आणि हात धुण्याची कृती सय्यद तांड्यापर्यंत पोहोचली होती. मात्र त्यातल्या कुणाला पवनचं नावही माहीत नव्हतं. मला पवनविषयीचा अभिमान दाटून आला.
मुलामुलींना मी आणि किरणच्या बायकोनं गाणं शिकवलं. त्यांचा आवाज, त्यांची आकलन शक्ती बघून मी थक्क झाले. ती सगळी मुलंमुली खूपच गोड होती. आईवडील नेतील तेव्हा कामासाठी स्थलांतर करणारी ही मुलं इतर मुलांसारखं एका ठिकाणी राहून का शिकू शकत नाहीत यांची टोचणी मनाला लागली. मात्र त्याच वेळी किरण, रमेश, रत्ना आणि सोनल यांच्यासारखे युवा त्यांच्यासाठी झटताना पाहून बरंही वाटलं. मी लिहिलेलं डॉ. प्रकाश आमटे यांचं पुस्तक मुलांना भेट देऊन आणि पुन्हा लवकर येण्याचं वचन देऊन मी तिथून ते दिसेनासे होईपर्यंत टाटा करत निघाले!
दीपा देशमुख

Leave a Reply

avatar
  Subscribe  
Notify of