मिस्टर अँड मिसेस 55 

मिस्टर अँड मिसेस 55 

गुरुदत्त निर्मित आणि दिग्दर्शित ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची गाणी लहानपणी अनेकदा ऐकली होती. औरंगाबादला शहागंज या भागातल्या ‘नरिमन’ नावाच्या दुकानातून माझ्या भावानं या चित्रपटाची एलपी रेकॉर्ड विकत आणली होती. यातली सगळीच गाणी एकसेएक होती. त्यातही ‘उधर तुम हसीं हो, इधर दिल जवॉं है’ हे गाणं मला इतकं आवडलं होतं की गाणी सुरु असताना त्या रेकॉर्डची पिन उचलून तेच तेच गाणं मी 50 वेळा तरी ऐकत असे. नंतर पुढे केव्हातरी कॉलेजला असताना हा चित्रपट दूरदर्शनवर बघितला तेव्हा तो खूपच आवडला. गुरुदत्त आणि मधुबाला यांच्यावर चित्रित केलेलं हेच गाणं आठवणीत राहिलं.

आज हा चित्रपट पुन्हा बघितला आणि आजही तो आपल्याला तितकाच भावत असल्याचं जाणवलं. 1955 साली प्रदर्शित झालेल्या ‘मिस्टर अँड मिसेस 55’ या चित्रपटाची कथा खूपच हलकीफुलकी असून अब्रार अल्वी यांनी लिहिलेली होती. यात प्रितमकुमार (गुरुदत्त) नावाचा एक कार्टुनिस्ट बेरोजगार असतो आणि त्याला पदोपदी आपल्या जॉनी नावाच्या मित्राकडून (जॉनी वॉकर) पैसे उसने घ्यावे लागत असतात. एके दिवशी त्याची भेट एका श्रीमंत घरातल्या इंग्रजाळलेल्या वातावरणात राहत असलेल्या अनिता (मधुबाला) नावाच्या तरुणीशी होते. अनितावर तिची फेमिनिस्ट आत्या - सीतादेवी (ललिता पवार) हिचा खूपच प्रभाव असतो. सीतादेवी पुरुषद्वेष्टी असते. तिच्या भावाला आपल्या बहिणीचा हा स्वभाव ठाऊक असल्यानं आपल्या मृत्यूपत्रात त्याच्या मृत्यूनंतर आपल्या मुलीनं लग्न केलं तरच त्याची संपत्ती तिला मिळेल असं तो लिहून ठेवतो. सीतादेवी एका सुसंस्कृत, शिकलेला पण गरीब असा तरूण शोधायच्या कामी लागते आणि तिला नेमका प्रितमकुमार सापडतो. ती त्याच्याबरोबर अनिताशी लग्न करण्याचा एक करार करते आणि लग्न झाल्यावर जेव्हा वाटेल तेव्हा घटस्फोट घेण्याचा अधिकारही आमचा असेल असं सांगून त्याला महिना 250 रुपये देण्याचं मान्य करते. प्रितमकुमार आणि अनिता यांचं नोंदणी पद्धतीनं लग्न होतं, मात्र अटीप्रमाणे त्यांना एकत्र राहणं तर सोडाचं पण बोलायचंही नसतं. प्रत्येक महिन्याला प्रितमकुमारकडे ठरल्याप्रमाणे 250 रुपयांचे चेक्स पोहोचत राहतात. या विचित्र लग्नाचा शेवट कसा होतो आणि काय गमतीजमती घडतात याचा अंदाज आपल्याला असला, तरी पडद्यावर हा चित्रपट बघणं हा खूपच सुखद अनुभव आहे.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच पेपरवाला ओरडत असतो, लोकसभेमध्ये घटस्फोटाच्या बिलावर वाद-चर्चा.....त्याचं ओरडणं ऐकून कुतूहलापोटी अनेक जण वर्तमानपत्र विकत घेतात. एका बंगल्यातली एक तरुणी तो पेपर विकत घेऊन आत शिरते. तेव्हा आत महिलांची मिटिंग सुरु असते. स्लिव्हलेस ब्लाऊज आणि साडी या पेहरावातली मॉडर्न स्त्री सीतादेवी ही स्त्री मुक्ती संघटनेची नेता असते. तिच्या समोर सुखवस्तू घरातल्या अनेक स्त्रिया बसलेल्या असतात. सीतादेवी पोटतिडकीनं भाषण ठोकत असते, की पुरुषांनी आजपर्यंत स्त्रीला कशी दुय्यम वागणूक दिली आहे, तिच्यावर अन्याय कसा केला आहे आणि आपण याविरोधात संसदेत घटस्फोटाचं बिल मंजूर होण्यासाठी किती प्रयत्न करत आहोत....वगैरे वगैरे...त्याच वेळी समोर बसलेल्या महिला मात्र आपसांत भाषण ऐकायच्या ऐवजी हळू आवाजात चेहर्‍याला संत्र्याचं साल लावावं की दुधाची साय की चिकणमातीचा लेप, जेणेकरून चेहर्‍यावरची तकाकी निखार आणखीनच वाढेल अशी चर्चा करण्यात गर्क असतात.

सीतादेवीची भाची अनिता आपल्या आत्याची नजर चुकवून तिला आवडत असलेला भारताचा टेनिसचा नंबर एकचा खेळाडू रमेश याचा खेळ बघायला चोरून स्टेडियमवर पोहोचलेली असते. तिथे तिची भेट प्रितमकुमारशी पडते. पहिल्याच भेटीत प्रितमकुमार तिच्यावर लट्टू होतो. ती कोण आहे, काय आहे काहीही माहिती नसतानाही केवळ तिचा राहून गेलेला रुमाल पकडून तिच्या आठवणीत गर्क होतो. त्याचा मित्र जॉनी त्याची ही अवस्था पाहून कपाळावर हात मारून घेतो. या वेळचं ‘दिल पर हुआ ऐसा जादू तबियत मचल मचल गयी, नजरे मिली क्या किसीसे हालत बदल बदल गयी’ हे रफीच्या आवाजातलं गाणं खूपच छान आहे. प्रेमात पडल्यावर प्रत्येकाची जी अवस्था होते ती अवस्था या गाण्यातून या प्रेमविरानं हुबेहूब उभी केलीय. ती आणि ती प्रेमात पडल्यावर दुसरं काही जगच कसं शिल्लक राहत नाही हे प्रितमकुमारच्या नुसत्या डोळयांत बघून आपण जाणू शकतो. घरी परतलेल्या अनिताला आपण टेनिसची मॅच बघायला गेलो नव्हतो तर डॉक्टरकडे गेलो होते असं सीतादेवीशी खोटं बोलावं लागतं. पण सीतादेवीची सेके्रटरी खरं काय ते सांगते. तेव्हा आत्याबाई अनिताला जगातले सगळे पुरुष मतलबी असतात असं सांगून आपणही लग्न करून कसं फसलो हे सांगते.

दुसर्‍या दिवशी अनिता 20 वर्षांची होणार असते आणि तिच्या वडिलांच्या मृत्य्ाूपत्राप्रमाणे त्यांची सगळी संपत्ती तिच्या नावानं होणार असते. अशा वेळी तिच्या संपत्तीच्या मोहापायी अनेक तरूण तिला फसवून लग्न करतील अशी भीती सीतादेवीला वाटत असते. पण या सगळ्या गोष्टींचा परिणाम भोळ्या अनितावर यत्किचिंतही होत नाही. ती आपल्याच नादात असते. सीता देवी अशीतशी हार मानणारी नसते. ती एका सुसंस्कृत, शिकलेल्या पण गरीब अशा प्रामाणिक तरुणाच्या शोधाकार्यात लागते. नेमकं नोकरीसाठी वर्तमानपत्राच्या संपादकांना वेळोवेळी जाऊन भेटणार्‍या प्रितमकुमारला संपादकाकडून सीतादेवीचा पत्ता मिळतो. प्रितमकुमार सीतादेवीला भेटायला जातो, तेव्हा ती त्याच्याकडे बघून खुश होते. तिला हवा तसाच तो तरूण असतो. सुरुवातीला तिचा हा सौदा ऐकून तो नकार देतो, पण त्याच वेळी त्याचं लक्ष भिंतीवर असलेल्या अनिताच्या फोटोकडे जातं. ज्या मुलीनं आपल्या हृदयात स्थान पटकावलंय तीच फोटोतून समोर उभी बघून तो सगळ्या अटी मान्य करून सीतादेवीला आपला होकार कळवतो.

सीतादेवी त्यानंतर त्याच्या राहत्या खोलीत येऊन त्याची अवस्था बघून जाते. जाताना एक चेकही ती त्याला देऊन जाते. दुसरीकडे अनिताही खुश होते आणि ती आपल्या टेनिसस्टार रमेश या मित्राला भेटून आपण आता लग्न करूया सांगते. पण आपल्या खेळालाच सर्वस्व मानणार्‍या रमेशला अनितामध्ये काहीच रस नसतो. तो कायमच तिला लग्नासाठी नकार देत असतो. अखेर तो जॉनी या फोटोग्राफर मित्राजवळ (जॉनी वॉकर) एक चिठ्ठी लिहून स्पष्टपणे आपण लग्नाला तयार नसल्याचं आणि आपण अमेरिकेत जात असल्याचं लिहितो. जॉनीही नेमका एका मुलीच्या भेटीत अडकतो आणि तो प्रितमकुमारच्या हाती सिनेमाचं तिकीट ठेवून शेजारच्या खुर्चीवर बसलेल्या मुलीला रमेशची चिठ्ठी द्यायला सांगतो. बरेच गोंधळ उडतात, पण प्रितमकुमार अनिताच्या हातात ती चिठ्ठी ठेवतो. ती चिठ्ठी वाचून ती खूप दुखावली जाते आणि रडायला लागते. लोकांना मात्र प्रितमकुमारनंच काहीतरी गडबड केली असं वाटतं.

नंतरही एकदा त्या दोघांची भेट होते. प्रत्येक भेटीत प्रितमला ती जास्त जास्त आवडायला लागते. लग्नाच्या दिवशी रजिस्ट्रार ऑफीसमध्ये पुन्हा अनिता आणि प्रितमकुमारची गाठ पडते. ती त्याला आपल्या या सिव्रेट लग्नाविषयी सांगते, तेव्हा तो तिला नवरामुलगा कोण आहे हे तुला ठाऊक आहे का विचारतो. तेव्हा ती सांगते, तो तिच्या आत्यानं बघितला आहे. आत्यानं आपली संपत्ती वाचवण्यासाठी हा मार्ग काढलाय असंही सांगते. त्या वेळी ती आत्याच्या किती कह्यात आहे हे त्याला कळून चुकतं. ती त्याच्याशी बोलताना त्याला म्हणते, अरेच्च्या, मी तुझ्याशीच लग्न करायला हवं होतं. तो तिला म्हणतो, मी तुला आवडतो का?, त्यावर ती म्हणते, हो थोडा थोडा. प्रितम सुखावतो आणि तिला म्हणतो, ज्याच्याशी तुझं आज लग्न होणार आहे तोही माझ्यासारखाच असेल कदाचित. त्यावर ती म्हणते, नाही नाही तो मुलगा तर पक्का स्वार्थी आणि मतलबी मुलगा आहे. ज्यानं काही पैशांसाठी हा लग्नाचा सौदा केलाय. मात्र जेव्हा रजिस्ट्रार त्यांना आत बोलावतो, तेव्हा हाच तो मतलबी मुलगा असं वाटून अनिताचं मन पुन्हा तुटतं. ती त्याला ‘तूही इतर मुलांसारखाच निघालास’ असं म्हणत चिडून तिथून बाहेर पडते, तेव्हा सीतादेवी बाहेर येऊन तिला आपली सगळी संपत्ती आपल्याला गमवावी लागेल आणि आपण काल रात्रभर किती समजावून सांगितलंय याची आठवण करून देते. प्रितमकुमार कसा आहे याच्याशी आपल्याला काही घेणं नसून आपल्याला हवा तेव्हा घटस्फोट तो देईल असंही ती समजवून सांगते आणि अनिताला सही करण्यासाठी राजी करते.

लग्नानंतर दोघंही आपापल्या घरी जातात. एकदा जॉनी आणि त्याच्या मैत्रिणीबरोबर प्रितमकुमार क्लबमध्ये पार्टीसाठी जातो. अनिताच्या घरी तिची नोकराणी तिला लग्न करून तू हे आपल्या नवर्‍यापासून दूर राहून चांगलं केलं नाहीस वगैरे वगैरे ऐकवते. तेव्हा वैतागून अनिताही क्लबमध्ये पार्टीत आलेली असते. तिथे तिची आणि प्रितमकुमारची तू-तू मी-मी होते आणि जॉनी आणि त्याची मैत्रीण त्या दोघांचं लग्न झालंय हे ऐकतात. घरी आल्यावर जॉनी प्रितमकुमारला आपण सगळं ऐकलं असल्याचं सांगतो आणि तुझं तिच्यावर इतकं प्रेम आहे तर तिला बाहेर घेऊन जा असंही सांगतो. दोघंही लटपट करून अनिताला घराबाहेर काढतात आणि प्रितमकुमार तिला आपल्या गावाकडे भावाच्या घरी घेऊन जातो. सुरुवातीला नाराज असलेली अनिता त्या वातावरणात, प्रितमकुमारच्या प्रेमळ वहिनीच्या सहवासात रमते. प्रितमची वहिनी संसारासाठी करत असलेले कष्ट, तिची गोड मुलं आणि तिचं तिच्या नवर्‍याविषयीचं असलेलं प्रेम बघून अनिताच्या मनातला आत्यानं भरवलेला लग्नाविषयीचा आणि पुरुषांविषयीचा कडवटपणा कमी व्हायला लागतो आणि तिचंही मन प्रितमकुमारकडे ओढ घ्यायला लागतं. त्या वेळच्या भावना व्यक्त करणारं ‘उधर तुम हसींन हो, इधर दिल जवॉं है’ हे गाणं इतकं सुरेखरीत्या पिक्चराईज केलंय की ते संपूच नये असं वाटत राहतं.

प्रितम आणि अनिता यांच्यातली जवळीक जास्त मजबूत होणार तेवढ्यात सीतादेवी तिथं येऊन पोहोचते. याचं कारण ज्या वेळी प्रितमनं अनिताला जबरदस्ती गाडीत बसवून तिथे आणलेलं असतं, तेव्हा तिनं सीतादेवीला तार केलेली असते. पण नंतरच्या चार दिवसांत तिचं त्याच्याविषयीचं मत बदललेलं असतं. तिच्या या गोष्टीनं प्रितम दुखावला जातो आणि तिला तिच्या आत्याबरोबर जायला सांगतो. खरं तर अनिताला जायचं नसतं, पण आत्यापुढे ती ठामपणे कृती करू शकत नाही. सीतादेवी प्रितमच्या या कृत्यानं त्याला खूप काही ऐकवते आणि घटस्फोटाची मागणी करते. प्रितम तिचे आत्तापर्यंत बँकेत जमा न केलेले चेक्स तिला देऊन टाकतो आणि घटस्फोट मिळावा म्हणून दोन मुलींना आजूबाजूला घेऊन समोर दारूची एक रिकामी बाटली ठेवून जॉनीकडून एक फोटो काढून घेतो आणि पुराव्यासाठी तो फोटोही सीतादेवीला देऊन टाकतो. या सगळ्या गोष्टी सीतादेवी अनितासमोर ज्या तर्‍हेनं ठेवते, तेव्हा अनिता जास्त दुःखी होते.

वर्तमानपत्रातून या घटस्फोटाची चर्चा होते. कोर्टात केस सुरू होते. दुखावलेल्या प्रितमच्या मनातून मात्र अनिता जाता जात नाही. तो जेवढा तिला विसरायचा प्रयत्न करतो, तेवढी ती त्याला आठवत राहते. अखेर तो ते शहरच सोडून जायचा निर्णय घेतो. जॉनी त्याला अडवण्याचा प्रयत्न करतो, पण तो ऐकत नाही. दुसरीकडे अनिताही त्याला विसरू शकत नाही. ती सगळं विसरण्याच्या प्रयत्नात क्लबमध्ये जाते, तिथे तिला जॉनी भेटतो आणि जॉनी तिला प्रितमच्या प्रेमाविषयी, जमा न केलेल्या चेक्सविषयी आणि त्या खोट्या फोटोविषयी तिला सांगतो. इतकंच नाही तर प्रितम हे शहर सोडून जात असल्याचंही तिला सांगतो. अनिता घरी परतते. आपल्या आत्याचं खरं रूप तिच्यासमोर आलेलं असतं. ती आत्याला आजपर्यंत आपण तिच्याच म्हणण्यानुसार वागलो, पण आता मात्र आपण आपल्या आयुष्याचा निर्णय आपण घेणार असल्याचं संागते आणि प्रितमकुमारला थांबवण्यासाठी निघते. अर्थातच, शेवट गोड होते. प्रेक्षकही शेवट ठाऊक झाला असला तरी प्रत्यक्षात दोघांना एकत्र आलेलं पाहून मगच समाधानाचा निःश्‍वास सोडतात.

या चित्रपटातचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातला नायक कार्टुनिस्ट दाखवला असून यात आपल्या सासूवर वैतागलेला प्रितमकुमार यानेके गुरुदत्त वर्तमानपत्रात जे कार्टून छापतो ते खूपच बोलकं आहे. दावणीला बांधलेली त्याची आणि तिची जोडी आणि त्यांचा लगाम खेचणारी सीतादेवी (ललिता पवार) असं ते कार्टून इतकं बोलकं असतं की त्याची चांगलीच चर्चा होते आणि सीतादेवी आणखीनच भडकते. प्रितमकुमारनं काढलेली कार्टून्स जी दाखवली आहेत ती खुद्द आर. के. लक्ष्मण यांची आहेत. या चित्रपटातली गाणी महरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेली असून ओ. पी. नय्यर यांचं संगीत म्हणजे वा, क्या बात है असंच! यातली गाणी शमशाद बेगम, गीता दत्त, मोहम्मद रफी यांनी गायली आहेत. यातलं अब तो जी होने लगा किसीकी सुरतका सामना, बुझो तो ये नैया बाबू किसीके लिये, नीले अस्मानी, चल दिये बंदा नवाज, छेड कर मेरे दिल का साज, दिल पर हुआ ऐसा जादू, जाने कहॉं मेरा किधर गया जी, मेरी दुनिया लूट रही थी और मै खामोश था, प्रीतम आन मिलो, ठंडी हवा काली घटा आयी गयी झुमके, उधर तुम हसीन हो, इधर दिल जवॉं है ही गाणी पुन्हा पुन्हा ऐकतच राहावीत अशीच आहेत.

या चित्रपटासाठी मधुबालाच्या आधी वैजयंती माला हिलाही विचारण्यात आलं होतं. मात्र मधुबालाच्या हाती हा चित्रपट आला. या चित्रपटातलं तिचं काम तितकंच सहजसुंदर झालं आहे. या चित्रपटात गुरुदत्तचे आवडते सहकलाकार जॉनी वॉकर, टूणटूण आहेत आणि विशेष म्हणजे जॉनी वॉकरचं काम खरंच खूप चांगलं झालं आहे. जॉनी वॉकरबरोबर त्याची हिरॉईन यास्मिन ही खूपच सुंदर दिसते. तिचं आणि त्याचं ‘जाने कहॉं मेरा किधर गया जी’ हे गाणं खूपच चांगलं चित्रित झालं आहे. प्यासा, कागज के फूल असे गंभीर चित्रपट बनवणार्‍या गुरुदत्तचा हा हलकाफुलका नर्मविनोदी चित्रपट प्रत्येकानंच बघावा आणि अनुभवावा हे मात्र नक्की! 

दीपा देशमुख

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.