.. यांनी घडवला भारत - राजमोहन गांधी अनुवाद सतीश कामत

.. यांनी घडवला भारत - राजमोहन गांधी अनुवाद सतीश कामत

अनेक पुस्तकं विकत घेतली जातात, काही भेट मिळतात, पण कामाच्या व्यापात बरीचशी वाचायची राहून जातात. आता मात्र आठवड्यातून दोन-तीन पुस्तकं तरी वाचून संपवायची असं ठरवलंय. सुरुवात कालपासूनच केली. काल रात्री  ‘....यांनी घडवला ‘भारत’ हे पुस्तक वाचलं. मानवी हक्काविषयी आंतरराष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानित झालेले राजमोहन गांधी (प्राध्यापक, लेखक आणि महात्मा गांधींचे नातू अशी त्यांची ओळख) यांनी मूळ पुस्तक लिहिलं असून मराठी अनुवाद सतीश कामत यांनी केला आहे. मनोविकास प्रकाशनाची ही निर्मिती आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात अनेक नेते, स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वसामान्य जनता या सगळ्यांचाच सहभाग होता. गांधीजींचा अहिंसेचा मार्ग आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा लष्करी मार्ग या दोन्हींच्या एकत्रिकरणातून स्वातंत्र्याची वाट सुकर झाली. महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि सुभाषचंद्र बोस यांचं भारत घडण्याच्या प्रक्रियेतलं योगदान मोलाचं आहे. भारतीय प्रजासत्ताकाची पायाभरणी यांनी केली. हे सर्व नेते भारतीय प्रजासत्ताकचे संस्थापक जनक!
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताची स्थिती अतिशय नाजूक बनली होती. धार्मिक विद्वेष, जातीय हिंसा, प्रादेशिकवाद यांनी देश पोखरला जाण्याची भीती होती आणि अशा वेळी या सर्व नेत्यांनी देशावरचं अरिष्ट टाळण्यासाठी अतिशय खंबीर भूमिका घेतली. त्यामुळेच स्वातंत्र्य, समता, न्याय आणि परस्परांविषयीचा सद्भभाव या मूल्यांनी भारतीय राष्ट्रीयत्वाचं रूप धारण केलं. 
हिंदू उदारमतवादी स्वामी सच्चिदानंद आणि अमेरिकन प्राध्यापक पेरी अँडरसन यांनी आपल्या लिखाणातून या नेत्यांविषयी, त्यांच्या धोरणांविषयी आणि त्यांच्या अनेक निर्णयांविषयी टिका केली. गांधीजीवरचे काही आक्षेप आणि नेहरुंवरचे आरोप या सगळ्या टिकेवरच्या प्रत्येक मुद्दयाचा खोलवर अभ्यास करून राजमोहन गांधी यांनी आपले विचार या पुस्तकातून पुराव्यानिशी मांडले आहेत.
तरीही अनेक प्रश्‍नांना घेऊन वावरणारे लोक आजही अवतीभवती दिसतात. फाळणीला कोण जबाबदार होतं? गांधी आणि आंबेडकर यांच्यात बरोबर कोण होतं? काश्मीर प्रश्‍नाची हाताळणी वेगळ्या प्रकारे करता आली असती का? नेहरूंऐवजी सरदार पटेल किंवा सुभाषचंद्र बोस हे भारताचे पहिले पंतप्रधान झाले असते तर? अखंड भारत राहण्यासाठी जिना यांना पंतप्रधान दिलं असतं तर? भारतानं हिंदूराष्ट्र व्हायला हवं होतं का? देशाची फाळणी का झाली? अशा अनेक प्रश्‍नांची चर्चा आजही लोक आवडीने करतात. या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं या पुस्तकातून मिळतात.
आज आपल्या याच नेत्यांचं चारित्र्यहनन करण्याचं कामही जोरात चालू आहे. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. कारण जागतिक पातळीवर आपणच आपल्या नेत्यांची प्रतिमा मलिन करतो आहोत याचंही भान आपल्याला नाही.
राजमोहन गांधी यांनी ज्या तटस्थतेनं हे पुस्तक लिहिलंय, तितकाच सरस अनुवाद सतीश कामत यांनी केला आहे. अनुवाद वाचताना हा अनुवाद आहे हे पूर्ण पणे विसरून जायला होतं आणि पडलेला प्रत्येक प्रश्‍न आणि त्याचं निराकरण याच भावनांना घेऊन वाचक वाचत जातो. इतक्या चांगल्या विषयावर पुस्तक प्रसिद्ध केल्याबद्दल मनोविकास प्रकाशनाचे अभिनंदन. एकच खंत, आज ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना अवघा महाराष्ट्र ओळखत असला, तरी सर्वसामान्य वाचकांसाठी त्यांचा परिचय या पुस्तकातून करून द्यायला हवा होता. तसंच इलिनॉय विद्यापीठ कुठे आहे याचाही संदर्भ आवश्यक वाटला.
भारतीय प्रजासत्ताकाच्या आरंभकाळाचा शोध घेणारं हे पुस्तक इतिहास जाणून घेण्यासाठी, आपल्या नेत्यांच्या भूमिका समजून घेण्यासाठी प्रत्येकानं वाचायलाच हवं. जरूर वाचा.

दीपा देशमुख

२५ ऑगस्ट २०१७.

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.