वसंत व्याख्यानमाला लोणावळा

वसंत व्याख्यानमाला लोणावळा

तारीख
-
स्थळ
Maval Lonavala

काल सायंकाळी लोणावळा इथं लेखनप्रवासावर व्याख्यान झालं. पुण्याहून लोणावळयापर्यंत प्रवास करताना दीपक त्याच्या उत्तर प्रदेशातल्या गावावरून दीड महिन्यांच्या सुट्टीनंतर पुण्यात परतला होता. त्याला मी ड्राईव्ह करण्यासाठी बोलावलं तेव्हा तो आनंदानं 'येतो' म्हणाला. दीपक हा खूप मेहनती तरूण असून हॉटेलमध्ये व्हॅले पार्किंगचं काम करतो. अधूनमधून मी मदतीला बोलावलं की येतो. आम्ही लोणावळ्याला निघालो तेव्हा मी दीपककडे बघत होते, वीस तासांचा प्रवास करून हा मुलगा माझ्याबरोबर पुन्हा प्रवास करत होता. त्याचं राज्य कुठलं, जात कुठली, भाषा कुठली........काही फरक पडत नाही.......दोन माणसांमधलं माणुसकीचं नातं महत्वाचं! आणि युपी-बिहार असं म्हणून जी भीती आपल्या मनात बसलीये ती तर एकदमच निरर्थक, असंही जाणवलं. जाताना रस्ता चुकलो, म्हणजे नव्या एक्स्प्रेस हायवेनं जाण्याऐवजी जुन्या मार्गानं लोणावळ्यात पोहोचलो.

भोंडे व्याख्यानमालेच्या आयोजकांपैकी प्रगती स्वागतासाठी प्रवेशद्वाराजवळ आली. गुलाबी साडीतली प्रगती गुलाबाच्या फुलासारखीच टवटवीत भासली. खाली कार्यक्रमाची तयारी सुरू होती. पंधरा-वीसजण बसलेले होते. संगीत सुरू होतं. आम्ही वरती ऑफीसमध्ये पोहोचलो. हसतमुखानं भोंडे हायस्कूलच्या संस्थापक, विश्‍वस्त राधिका भोंडे यांनी स्वागत केलं. त्यांच्या चेहर्‍यावर आनंद दिसला. त्याचबरोबर त्यांच्याही गुलाबी साडीकडे लक्ष गेलं. आत आलेल्या सगळ्याच आयोजक सुंदर्‍या गुलाबी साडीत बघून चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह उमटलं. तेव्हा कळालं, की या व्याख्यानमालेचे पाचही दिवस या उत्साही स्त्रियांनी रंग ठरवले होते आणि आजचा रंग गुलाबी होता. गंमत म्हणजे आसावरीनं मीही गुलाबी साडी नेसावी असा सल्ला योगायोगानं दिला होता आणि मीही त्यांच्यासारखी गुलाबी झाल्यामुळे त्या सगळ्यांना आणखीनच आनंद झाला होता. अतिशय चविष्ट असा बेसनाचा लाडू खाऊन आणि सरबत पिऊन, सगळ्यांच्या ओळखी करत, गप्पा मारत त्यानंतर व्यासपीठाकडे निघालो.

मघाचं वातावरण बदललं होतं. स्त्री-पुरुषांनी खुर्च्या भरलेल्या होत्या. ईशस्तवन करणार्‍या मुलींनी खूप छान नृत्य केलं. सगळे वयोगट सामील असल्यानं मस्त वाटत होतं. लोणावळ्यातली वसंत व्याख्यानमाला सुरू होऊन सोळा वर्षं झालीत. लोणावळ्यात साहित्यिक, सांस्कृतिक वातावरण निर्माण करण्यात या व्याख्यानमालेचं फार मोठं योगदान आहे. सुरुवातीचं दीपप्रज्वलन, परिचय, स्वागत, प्रास्ताविक झाल्यानंतर माझा लेखनप्रवास सुरू झाला. मला माझी मैत्रीण आशा साठे यांनी सांगितलेली स्त्री संबंधीची एक लोककथा खूपच आवडली असल्यानं तिच्यापासूनच मी सुरूवात केली ....याचं कारण त्या लोककथेप्रमाणेच माझं आणि इतर अनेकजणींचा प्रवास असतो असं मला नेहमीच जाणवतं. प्रवासानं वेग घेतला....चित्रपटाप्रमाणे सगळा भूतकाळ डोळ्यांसमोरून सरकत होता.....त्यातले महत्वाचे टप्पे समोर तरळत होते.....मासवणच्या आदिवासी भागातल्या जगण्यानं काय काय दिलं ते आठवत होतं...त्याच वेळी अच्युत गोडबोले यांची ओळख आणि त्यांनी मागितलेला लिखाणासाठीचा मदतीचा हात आठवत होता......प्रवासात भेटलेली माणसं, टिपलेले क्षण, ती परिस्थिती यांनी आयुष्य किती किती अनुभव देऊन जातं हे समोर येत होतं...... खूप खूप बोलायचं असतं, प्रत्येक वेळी....समोरच्या श्रोतृवर्गालाही आणखी ऐकायचं असतं हेही त्यांचे चेहरे सांगत असतात, पण आपणच आपल्याला कुठेतरी थांबायची सूचना द्यावी लागते. त्यामुळे शेवटाकडे जाताना मी मला आवडणार्‍या या गीताच्या ओळीं गात शेवट केला....

इसलिए राह संघर्ष की हम चुने जिंदगी आसूमे नहाई न हो
शाम सहमी न हो, रात हो ना डरी भोर की आख फिर डबडबाई न हो
सूर्यपर बादलोंका न पहरा रहे, रोशनी रोशनाईमे डुबी न हो
यू ना इमान फूटपाथपर हो खडा हर समय आत्मा सबकी उबी न हो
हो किसी के लिए मखमली बिस्तरा और किसीके लिए इक चटाई न हो

आभारप्रदर्शन करण्यासाठी राधिका भोंडे माईकसमोर आल्या आणि त्यांनी आभार मानताना माझ्याविषयी आणखी काही सांगितलं. माझ्या फेसबुकच्या पोस्ट वाचून त्यावरच्या काही भावना त्या व्यक्त करत होत्या. माझ्या फेसबुकच्या पोस्ट इतरांच्या जगण्यात इतका आनंद भरताहेत हे कळल्यानं मी सुखावले आणि खूप भरूनही आलं. त्यांच्या प्रेमापुढे मन हळवं झालं. त्या सांगत होत्या, मी चित्रपटांविषयी लिहिलं की तो चित्रपट बघितला असला, तरी ते पती-पत्नी तोच पुन्हा बघतात कारण माझ्या लिखाणातून त्यांना काही वेगळे अँगल कळालेले असतात. मी पदार्थांच्या रेसिपीज टाकल्या की त्या करून बघतात आणि आनंद घेतात, मी कोणाचं कौतुक केलेलं असलं की ती व्यक्ती त्यांनाही जवळची वाटायला लागते....मी केलेल्या प्रवासानं त्यांनाही तो प्रवास घडतो...मी लिहिलेल्या कार्यक्रमाबद्दल वाचून त्यांनाही आपण तिथेच होतो हे अनुभवता येतं.....माझ्या मनात त्यांच्याविषयीची कृतज्ञता दाटून आली.

या आभारात त्यानंतर सगळ्या टीमचे, पत्रकारांचे, लोणावळा सुंदर करणार्‍या चित्रकारांचे, सफाई कर्मचार्‍यांचे, उपस्थितांचे आभार मानण्यात आले. त्यांच्याविषयीच्या भावना राधिका भोंडे यांनी काव्यात गुंफल्या होत्या. त्यानंतर अतिशय सुरेल आवाजात एका सुंदरीनं पसायदान सादर केलं. कार्यक्रम संपला. फोटोसाठी एकच गर्दी उसळली आणि कार्यक्रम आवडला सांगणार्‍यांनीही गर्दी केली. फोटो काढायला मलाच आवडत असल्यानं मी कधीही नकार देत नाही. तसा आताही दिला नाहीच. त्याच वेळी माझ्या नगरच्या कार्यक्रमाला आलेला रुद्र नावाचा युवक मला श्रोत्यांमध्ये दिसला. रुद्र नगरहून माझं व्याख्यान ऐकायला लोणावळयाला आला होता. त्याला मग बरोबरच राहायला सांगितलं आणि पुण्यात त्याच्या मित्रांकडे सोडलं. वाचनाची आवड आणि आवडत्या माणसाला बघण्यासाठी-ऐकण्यासाठी त्याची धडपड बघून मन मायेनं भरून आलं.

त्यानंतर आयोजकांच्या वतीनं गोविंदा हॉटेलमध्ये चविष्ट रुचकर जेवण, गप्पा झाल्या. लोणावळ्यात चित्रकार, आर्किटेक्ट, पत्रकार मोठ्या संख्येनं भेटले आणि सगळेच उत्साही, हसतमुख, प्रामाणिक, असे! गोविंदाच्या यजमानांचा प्रवासही जेवताना त्यांनी अगदी थोडक्यात उलगडला. दहावी पास मुलगा आपल्या परिश्रमानं कुठपर्यंत पोहोचला याचं ते उत्तम आदर्श उदाहरण होतं. त्यांचं आतिथ्य आणि अगत्य मी विसरू शकणार नाही. गाडीत बसताना राधिका भोंडे यांनी हळूच हातात एक बॅग सरकवली आणि पसंत नसेल तर बदलून घेऊ असं सांगितलं. मी बॅग उघडून बघितली नाही. पण तळेगावला प्रशांत पुराणिक या सामाजिक भान असलेल्या पत्रकार मित्राला सोडून पुण्यात रुद्रला शिवाजीनगरला सोडून घरी पोहोचलो तेव्हा बॅग उघडली - आतली राधिका भोंडेनं प्रेमानं भेट दिेलेली साडी बघून डोळे भरून आले. प्रवासात मला प्रशांत पुराणिक यांनी मानधनाविषयी प्रश्‍न केला होता, त्या वेळी ‘मी त्यात काटेकोर नाही’ असं सांगितलं होतं. कारण 'मी हे सगळं माझ्या आनंदासाठी करते, व्यवसाय म्हणून नाही' असं उत्तर मी दिलं होतं. ही साडी बघून मला त्या मानधनाच्या रकमेपेक्षाही हे प्रेम, हा स्नेह, हे कायमस्वरूपी निर्माण झालेलं मैत्र खूप मोलाचं आहे हे पुन्हा प्रशांत पुराणिकला सांगावंसं वाटलं.

राधिका भोंडेंसारखी मैत्रीण कर्‍हाडच्या विज्ञानवेड्या संजय पुजारींमुळे मिळाली. असे अनेक मित्र-मैत्रिणी संपूर्ण महाराष्ट्रात मिळाले आहेत. रुद्रसारखी किती मुलं प्रेम करणारी आहेत. ही साखळी वाढतेच आहे.... बस्स, यापेक्षा मला काहीही नकोच आहे. आणि या सगळ्यात माझं श्रेय इतकंच की मला आलेले अनुभव, मला भेटलेले कलाकार, मला भावलेले शास्त्रज्ञ यातून समता, मानवता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन लोकांपर्यंत पोहोचवण्याचं मी काम करतेय, यापलीकडे काहीच नाही! शेवटी, विशाल यांनी फोटो पाठवल्याबद्दल त्यांचे आणि समस्त लोणावळकरांचे खूप खूप आभार! लवकरच पुन्हा भेटणार आहोतच हे माझ्या लक्षात आहेच.

दीपा देशमुख

कार्यक्रमाचे फोटो