शब्दांचे जादूगार गुलजार - शब्दसुमनांनी बहरलेली एक बाग

शब्दांचे जादूगार गुलजार - शब्दसुमनांनी बहरलेली एक बाग

लकडी की काठी, काठी पे घोडा
घोडे की दुम पे जो मारा हथोडा
दौडा दौडा दौडा घोडा दुम उठा के दौडा
घोडा पहुँचा बाग मे बाग मे था नाई
घोडेजीकी नाई ने हजामत जो बनाई
टगबग, टगबग,...
घोडा था घमंडी पहुँचा सब्जीमंडी
सब्जीमंडी बरफ पडी थी बरफ मे लग गयी ठंडी
टगबग, टगबग...
घोडा अपना तगडा है देखो कितनी चरबी है
चलता है महरोली मे पर घोडा अपना अरबी है
बाह छुडा के दौडा दौडा दुम उठा के दौडा...

शेखर कपूर यानं दिग्दर्शित केलेल्या ‘मासूम’ या हिंदी चित्रपटात तीन छोट्या मुलांवर हे गाणं चित्रीत करण्यात आलं होतं. या गाण्यानं चित्रपट प्रदर्शित होताच एकच धूम मचवली होती. या गाण्यातून मुलांचं भावविश्व, त्यात काय काय असतं अणि ते आपल्या या अरबी घोड्याकडे कसे बघतात, तो घोडा कसा आहे याविषयी हे गाणं बोलतं.

हे गाणं लिहिणारा कवी नेहमीच पांढर्‍याशुभ्र झब्बापायजमा या पोशाखात वावरत असतो. या पांढर्‍याशुभ्र पोशाखाबरोबरच त्यांच्या पांढर्‍याशुभ्र मिशा आणि डोक्यावरचे मउशार पांढरेशुभ्र केस वार्‍याबरोबर भुरभुरत असतात. या कवीचं खरं नाव आहे संपूर्ण सिंह कावरा. मात्र अख्खं जग या कवीला गुलजार या नावानं ओळखतं.

गुलजार यांना 2002 साली साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवलं गेलं. हिंदी, उर्दू, पंजाबी, ब्रज भाषा, खडी बोली, मारवाडी आणि हरियानवी या भाषांमध्येही त्यांनी लिखाण केलं. 2004 साली भारत सरकारनं त्यांना पद्मभूषण देऊन त्यांचा सन्मान केला. त्यांना दादासाहेब फाळके हा मानाचा पुरस्कारही प्राप्त झाला. 2009 साली डॅनी बॉयल या दिग्दर्शकाचा ‘स्लम डॉग मिलेनियर’ नावाचा एक चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्या चित्रपटानं आणि त्यातल्या ए. आर. रेहमान या संगीतकारानं संगीतबद्घ केलेल्या ‘जय हो’ या गाण्यानं जगभर धूम मचवली होती. या गाण्याला सर्वश्रेष्ठ गीताचा ऑस्कर पुरस्कार मिळाला होता आणि हे गाणं लिहिलं होतं गुलजार यांनी. याच गाण्याला ग्रॅमी पुरस्कारानंही सन्मानित केलं गेलं.

दूरदर्शनवरची मोगलीचं पात्र असलेली जंगलबुक मालिका खूप खूप गाजली होती. या जंगलबुकचं गुलजार यांनी लिहिलेलं शीर्षक गीतदेखील सगळ्यांच्या आवडीचं आहे. ते म्हणजे:

जंगल जंगल बात चली है पता चला है,
चड्डी पहनके फूल खिला है फूल खिला है.’

हिंदी चित्रपटांमधली अतिशय अर्थपूर्ण अणि अप्रतिम गाणी गुलजार यांनी लिहिलेली आहेत. आजकाल ज्या गाण्यावर लहानमोठे सगळेच थिरकतात, ते ‘कजरा रे कजरा रे मेरे काले काले नैना’ हे गाणं देखील गुलजार यांचचं.

संपूर्णसिंह कालरा म्हणजेच कवी, पटकथा लेखक, दिग्दर्शक, नाटकार आणि विख्यात शायर गुलजार यांचा जन्म 18 ऑगस्ट 1936 या दिवशी पंजाब राज्यातल्या झेलम जिल्ह्यातल्या दीना या छोट्याशा गावी झाला. आता हे ठिकाण पाकिस्तानचा भाग आहे. त्यांच्या वडिलांचं नाव माखन सिंह कालरा आणि आईचं नाव सुजान कौर असं होतं. लहान असतानाच त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईची माया आणि वडिलांचं प्रेम यांना ते पारखे झाले. जेव्हा भारत-पाकिस्तान फाळणी झाली तेव्हा गुलजारचं कुटुंब भारतातल्या अमृतसर या शहरात येऊन स्थायिक झालं.

लहानपणापासूनच गुलजार यांना पुस्तकं वाचायला खूप आवडायचं. मनस्वी वागणं, सतत पुस्तकात डोकं खुपसून बसणं आणि काही ना काही लिहीत राहणं या गोष्टी त्यांच्या वडिलांना आणि मोठ्या भावाला मुळीच आवडत नसत. चांगलं शिकून चार पैसे कमवावेत आणि घराला हातभार लावावा असं त्यांना वाटायचं. पण गुलजार यांना कविता करण्यापासून कोणीच रोखू शकलं नाही. अखेर त्यांचे आणि घरातल्यांचे वाद व्हायला लागले. मग एके दिवशी गुलजार सरळ मुंबईला पोहोचले आणि त्यांनी चक्क एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरायचं काम करायला सुरुवात केली. कोणाची साथ नव्हती, पण कवितेची साथ मात्र त्यांना याही परिस्थितीत होती. सुरुवातीला गुलजार आपलं लिखाण गुलजार दीनवी या नावाने संपादकाकडे पाठवत. हळूहळू त्यांचं गुलजार हेच नाव रुढ झालं.

काही दिवस पेट्रोपपंपावर काम केल्यानंतर गुलजार यांनी मुंबईतल्या एका गॅरेजमध्ये मोटारमेकॅनिक म्हणून काम करायला सुरुवात केली. त्या गॅरेजमध्ये येणार्‍या मोटारगाड्यांना स्प्रे पेटिंग करण्याचं काम ते करत. आपलं हे काम ते अतिशय कौशल्यानं आणि मन लावून ते करत असत. आपल्या कामात कधीही त्यांनी हलगर्जीपणा केला नाही. उलट या कामात रंगांची वेगवेगळी कॉम्बिनेशन्स बनवून ते वेगळा रंग तयार करून गाडीला चकचकीत करून नवरुपडं देत असत. गाडीचा मालक आपल्या गाडीचं हे नवं रूप बघून खुश होत असे. गुलजारच्या या कामाचा बोलबाला इतका झाला होता, की गाडीचा मालक गुलजारनंच आपली गाडी चमकवावी असा आग्रह धरत असे. त्यांच्यासारखं काम करणारा दुसरा कोणीही त्या परिसरात नव्हता हे विशेष.

गॅरेजमधली कामं आटोपल्यावर फावल्या वेळात गुलजार कविता लिहीत असत. गुलजारच्या लहानपणापासूनच दु:खानं त्यांचा पाठपुरावा केला होता. पण त्यांनी कधीही दु:खाला आपला मित्र बनवलं नाही, दु:खाला कधी कुरवाळलं नाही आणि त्याला डोक्यावर घेऊन ते कधी नाचलेही नाहीत. गुलजार यांनी कधी आपल्या लोकप्रियतेचा आणि प्रतिमेचा तोरा मिरवला नाही. ते कधी व्यसनांच्याही आहारी गेले नाहीत. गॅरेजमधल्या आपल्या इतर मित्रांबरोबर ते त्यांच्या सुखदु:खात सामील होत आणि त्यांच्याबरोबर पत्तेही खेळत असत. आपल्या या गॅरेजमधल्या मित्रांनाही ते आपुलकीनं आपल्या कविता ऐकवत असत आणि त्यांनाही गुलजारविषयी खूप प्रेम आणि अभिमान वाटायचा.

त्या वेळी ‘इप्टा‘  नावाची चळवळ उभी राहिली होती. त्यातही गुलजार नित्यनेमानं जात असत. इथे समविचारी अनेक नाट्यकलावंत, कवी, लेखक, नाटककार, साहित्यिक येत असत. ‘इप्टा’ म्हणजे इंडियन पिपल्स थिएटर असोसिएशन आणि इप्टा हे नाव विख्यात शास्त्रज्ञ होमी भाभा यांनी सुचवलं होतं. भारतातल्या कलाकार मंडळींनी संघटित होऊन 1942 साली इप्टाची स्थापना केली. 1943 च्या दरम्यान मुंबईमध्ये इप्टाचं कामकाज रीतसर सुरू झालं. इप्टामध्ये त्या वेळी गुलजार बरोबर पृथ्वीराज कपूर, कैफी आझमी, ऋत्विक घटक, उत्पल दत्त, ख्वाजा अहमद अब्बास, पं. रवी शंकर, साहिर लुधिनयानवी, शैलेंद्र, सचिन देव बर्मन, चेतन आनंद, दिना पाठक, सलिल चौधरी, ह्षिकेश मुखजी, मृणाल सेन, ए.के. हंगल, बलराज साहनी यासारखी दिग्गज मंडळी सामील झालेली होती.

इप्टामध्ये गुलजार यांची कवी शैलेंद्रबरोबर मैत्री झाली होती. शैलेंद्रचं लिखाण त्यांना मनापासून आवडायचं. एके दिवशी शैलेंद्रने गुलजार यांना बिमल रॉयकडे आग्रह करून पाठवलं. बिमल रॉय हे खूप मोठे चित्रपट दिग्दर्शक होते. त्यांनी गुलजारमधली कला ओळखून त्यांना आपल्या बन्दिनी या चित्रपटातलं हे एक गाणं लिहिण्यासाठी दिलं. ‘मोरा गोरा अंग लई ले, मोसे शाम रंग दैदे’ हे गाणं गुलजार यांनी लिहिलं आणि तिथून मग गुलजार यांनी मागे वळून बघितलंच नाही. त्यांनी 1971 साली दिग्दर्शित केलेला मेरे अपने या चित्रपटात विनोद खन्ना आणि मीनाकुमारी या अभिनेत्रीला त्यांनी प्रमुख भूमिका दिली होती. गुलजार आणि सिनेअभिनेत्री मीनाकुमारी यांच्यातला स्नेह शब्दातीत होता. आपल्या मृत्यूच्या आधी मीनाकुमारीने आपली सगळी शायरी लिहिलेल्या डायर्‍या गुलजार यांना दिल्या. मैत्रीचं मोल लक्षात ठेवून गुलजार यांनी त्या डायर्‍या मीनाकुमारीच्या मृत्यूनंतर प्रकाशित केल्या. आजही गुलजार यांच्या ऑफीसमध्ये भिंतीवर मीनाकुमारीचा फोटो बघायला मिळतो.

‘मेरे अपने’ या चित्रपटानंतर गुलजार यांनी ‘कोशिश’ हा चित्रपट संजीवकुमार अणि जया भादुरी-बच्चन यांना घेऊन केला. मुक-बधिर व्यक्तींचं जगणं, त्यांची धडपड या चित्रपटात दिसते. या अत्यंत उत्कृष्ट चित्रपटाबरोबरच त्यांनी आँधी, मौसम, किनारा, खुशबू, परिचय, कोशिश, किनारा, किताब, अंगूर, मीरा, हूतूतू, नमकीन, इजाजत, लेकिन, लिबास आणि माचिस या चित्रपटांतून जणू काही विविध प्रकारच्या भावनांचे रंग आपल्यावर उधळले आहेत असा भास होतो. चित्रपट दिग्दर्शन असो, वा गीत लेखन गुलजार यांना आपल्या कामात परिपूर्णता आवडते. त्यांच्या चित्रपटातली पात्रं ही संवेदनशील आणि हळवी असतात. मुलं आणि स्त्री-पुरुष संबंध या विषयांवर ते खूप हळुवारपणे लिखाण करतात. त्यांनी चित्रपटांसाठी लिहिलेली गाणी चित्रपटातल्या कथानकाला धरून लिहिलेली असतात. त्या चित्रपटाचा ती एक महत्वाचा हिस्सा असतात. लहान पडद्यावर गुलजार यांनी मिर्झा गालिब आणि किरदार या मालिका अत्यंत वाखाणण्याजोग्या आणि दर्जेदार केल्या. त्यांनी चौरस रात, जानम, एक बूँद चाँद, रावीपार, रात, चाँद और मै, रात पश्मिनेकी, खराशे नावाची पुस्तकं लिहिलेली आहेत.

गुलजार आजही भल्या पहाटे टेनिस खेळतात. अनेक वर्षांपासून त्यांचा हा दिनक्रम असून त्यात कधीही खंड पडलेला नाही. रोज 10 ते 4 या वेळात गुलजार आपल्या अभ्यासिकेत लिखाण करणं, वाचन करणं या कामात व्यस्त असतात. नव्या जगाबरोबर चालण्यासाठी ते स्वत:ही अपडेट राहण्याचा प्रयत्न करतात. म्हणूनच ते कम्प्युटर, इंटरनेट शिकले, इतकंच नाही तर इमेल्सनाही स्वत:च उत्तर देतात. या माणसाला पाककलेमध्ये सुद्घा तितकीच रुची आहे. चविष्ट पदार्थ खायला गुलजार यांना मनापासून आवडतं. टीव्हीवर क्रिकेट मॅच बघणं हाही त्यांचा आवडीचा कार्यक्रम असतो. क्रिकेटची मॅच असेल तर त्यादिवशी हे महाशय दुसरं कुठलंही काम करत नाहीत. इतर दिवशी मात्र अतिशय शिस्तीनं त्यांची कामं चाललेली असतात.

गुलजार यांच्या मनात भारत पाकिस्तानची फाळणी यांचा सल अनेकदा त्यांच्या गीतांमधून उमटत राहतो. त्यांना आपलं बालपण आणि आपलं गाव सतत आठवत राहतं. त्यांना समाजात विषमता, तेढ निर्माण करणारे विचार अस्वस्थ करतात. समाजात वाढत चाललेला उथळपणा, भ्रष्टाचार यांनी ते बेचैन होतात. त्यांची लेखणी बोलते :

आँखोको विजा नही लगता, सपनोंकी सरहद नही होती
बंद आँखो से रोज मै सरहद पार चला जाता हूँ
मिलने मेंहदी हसन से

गुलजार इतके संवेदनशील आहेत की ते पाकिस्तानकडे शत्रूराष्ट्र म्हणून बघूच शकत नाहीत. भारताचा शेजारी देश असं म्हणूनच ते बघतात आणि मग त्यांच्या लेखणीतून त्यांच्या भावना कागदावर उमटतात, ते म्हणतात,

ऐ वतन वतन मेरे आबाद रहे तू,
मै जहाँ रहूँ जहाँ मे याद रहे तू

ही देशप्रेमाची भावना, हे गाणं, जगातल्या कुठल्याही देशाला लागू होऊ शकतं. याचं कारण त्यांच्यावर रवींद्रनाथ टागोरांचा प्रभाव, टागोरांचे विश्वबंधुत्वाचे संस्कार असल्यामुळेच हे घडतं. गालीब, साहिर लुधियानवी, शैलेंद्र हे त्यांचे आवडते शायर आहेत. शरदचंद्र चट्टोपाध्याय हेही त्यांचे आवडते साहित्यिक असल्यामुळेच गुलजार यांनी टागोर आणि शरदचंद्र चट्टोपाध्याय यांच्या कवितांचा उर्दू भाषेत अनुवाद केला आणि तो वाचकांच्या पंसतीसही उतरला.

पुस्तकांचं आपल्या आयुष्यातलं स्थान खूप महत्वाचं आहे असं गुलजार म्हणतात. ते म्हणतात:

किताबे झाँकती है बंद अलमारी के शिशोंसे
बडी हसरत ते ताकती है महिनो अब मुलाकाते नही होती
जो शामें उनकी सोहबत मे कटा करती थी
अब अक्सर गुजर जाती है कम्प्युटर के परदोपर
बडी बेचैन रहती है किताबे.....

Add new comment

Restricted HTML

  • Allowed HTML tags: <a href hreflang> <em> <strong> <cite> <blockquote cite> <code> <ul type> <ol start type> <li> <dl> <dt> <dd> <h2 id> <h3 id> <h4 id> <h5 id> <h6 id>
  • Lines and paragraphs break automatically.
  • Web page addresses and email addresses turn into links automatically.
CAPTCHA
This question is for testing whether or not you are a human visitor and to prevent automated spam submissions.