‘अरायव्हल’
मानवी प्रगतीत विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचं मोलाचं योगदान आहे. जेव्हा कल्पनेच्या भरारीला विज्ञानाचे पंख आणि तंत्रज्ञानाची साथ लाभते, तेव्हा त्यातून ‘अरायव्हल’ सारख्या अप्रतिम अशा चित्रपटाची निर्मिती होते. २०१६ साली प्रदर्शित झालेला ‘अरायव्हल’ या अमेरिकन चित्रपटाने जगभरात २०३ दशलक्ष डॉलर्सची कमाई केली. ॲमी ॲडम्सची भूमिका, डेनिस व्हिलेन्यूवचं दिग्दर्शन, ब्रॅडफोर्ड यंगची सिनेमॅटोग्राफी याबद्दल सर्वच समीक्षकांनी ‘अरायव्हल’ चित्रपटाची भरभरून प्रशंसा केली. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट, दिग्दर्शन, सिनेमॅटोग्राफी, पटकथा यासह ८ नामांकन ऑस्कर पुरस्कारासाठी मिळाली आणि यातल्या कलाकारांना अनेक मानाचे पुरस्कारही मिळाले. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या सर्वोत्कृष्ट १० चित्रपटांमध्ये ‘अरायव्हल’ची गणना झाली.
टेड चिआंग या विज्ञान लेखकाच्या ‘स्टोरी ऑफ युवर लाईफ’ या कथेवर ‘अरायव्हल’ हा चित्रपट आधारित असून या चित्रपटात लुई बँक्सची भूमिका ॲमी ॲडम्स या अभिनेत्रीने, तर इयान डोनेलीची भूमिका जेरेमी रेन्नरने याने साकारली आहे. हा चित्रपट म्हणजे एक सायन्स फिक्शन आहे. पृथ्वीवर परग्रहवासीयांचं आगमन, हेतू, घडत असलेल्या अनेक घटनांचा विसंगत क्रम आणि संबंध, याबद्दल माणूस म्हणून आपण कसं बघतो आणि परग्रहवासी कसे बघतात, परग्रहवासी आणि मानव यांच्यातला संवाद अशा अनेक गोष्टीचा उहापोह या चित्रपटात केलाय. ‘अरायव्हल’ या चित्रपटाचं वैशिष्ट्य म्हणजे याचं चित्रीकरण मॉन्ट्रियल, क्युबेक आणि या ठिकाणांच्या आसपासच्या परिसरात ५६ दिवसांत झालं. परग्रहावरून पृथ्वीवर आलेल्या तबकड्या योग्य ठिकाणी दाखवण्यासाठी टीमला अथक परिश्रम करावे लागले. या चित्रपटासाठी मॅकगिल विद्यापीठातल्या तीन विख्यात भाषातज्ज्ञांशी सल्लामसलत करण्यात आली, तर एलियन्सच्या संवादासाठी मॉर्गन सोंडरेगर या ध्वनितज्ज्ञाचं मार्गदर्शन घेण्यात आलं.
‘अरायव्हल’ या चित्रपटात जगभरातल्या १२ ठिकाणी परग्रहांवरून १२ तबकड्या पृथ्वीवर येऊन धडकतात. परग्रहवासी पृथ्वीवर का आले असावेत, त्यांच्यापासून पृथ्वीला काही धोका असेल का, त्यांच्याशी सामना कसा करावा लागेल असे अनेक प्रश्न जगभरातल्या प्रमुख नेत्यांना सतवतात. सुरुवातीला प्रचंड खळबळ, एकत्रित चर्चा, तर काही वेळा प्रत्येक देशानं आपली चूल वेगळी मांडणं असं घडतं. मात्र त्यानंतर लष्कराच्या, तंत्रज्ञांच्या आणि वैज्ञानिकांच्या मदतीने सजगपणे या परग्रहवासीयांशी कशाप्रकारे संवाद साधला जातो आणि तोडगा काढला जातो, हे या चित्रपटात दाखवलं आहे.
चित्रपटात भाषातज्ज्ञ असलेली लुई बँक्स ही आंतरराष्ट्रीय विद्यापीठात शिकवत असते. त्याच वेळी अमेरिकेसह जगभरात वेगवेगळ्या १२ ठिकाणी परग्रहावरून तबकड्या आल्यानं सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड घबराहट पसरली असल्याची बातमी तिच्या कानावर पडते. बँक्सला आपलं व्याख्यान अर्धवट थांबवावं लागतं. सगळ्यांना सुट्टी दिली जाते. कर्नल जी. टी. वेबर नावाचा लष्कराचा अधिकारी परग्रहवासीयांशी संवाद साधण्याच्या मदतीसाठी लुई बँक्स हिला आणि एलियन्स पृथ्वीवर येण्याचं कारण शोधण्यात साहाय्य करण्यासाठी भौतिकशास्त्रज्ञ इयान डोनेली यांना बोलावतो आणि तबकडी अवतरलेल्या परिसरात घेऊन जातो.
पृथ्वीवर आलेल्या परग्रहवासियांच्या/एलियन्सच्या तबकडीचं दार ठरावीक वेळीच उघडत असतं. त्या नेमक्या वेळी लुई बँक्स आणि इयान डोनेली, तसंच कॅमेरामनसह एक टीम रेडिएशन्स प्रतिरोधक पोशाख घालून तबकडीमध्ये प्रवेश करतात. प्रवेश करताना तबकडीच्या खालच्या बाजूने असलेल्या दारातून ते वर जातात, तेव्हा पृथ्वीच्या गुरूत्वाकर्षणाच्या पर्पेंडिक्युलर असं तबकडीचं गुरुत्वाकर्षण असलेलं दाखवलं आहे आणि त्यामुळेच ते जमिनीकडून आकाशाकडे देखील सरळ चालू शकतात. तसंच या आणि अशा अनेक प्रसंगांमधून एलियन्स मानवापेक्षा जास्त प्रगत असल्याचंही सूचित केलं आहे.
एलियन्स माणसासारखे दिसतात का, त्यांची भाषा कशी असते, त्यांच्याशी संवाद कसा करायचा हे सगळं टीपताना एलियन्सला अमिबाप्रमाणेच वेगवेगळा आकार धारण करू शकणारे असे सात पाय असल्याचं लक्षात येताच सगळे चकित होऊन बघतच राहतात. त्यामुळेच त्यांचं नाव हेप्टापॉड्स असं ठेवलं जातं. लुई बँक्स इंग्रजीतून एलियन्सशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते आणि उत्तरादाखल ते त्यांच्या वर्तुळाकार चिन्हांच्या लिपीतून तिला उत्तर देण्याचा प्रयत्न करतात. एलियन्सच्या चिन्हलिपीला समजून घेण्यासाठी बँक्सप्रमाणेच जगभरातले तज्ज्ञ कामी लागतात.
‘अरायव्हल’ या चित्रपटाच्या सुरुवातीला लुई बँक्सच्या हॅना नावाच्या मुलीचा जन्म झाल्यापासून ती १२ वर्षांची असताना कॅन्सरनं झालेल्या मृत्यूपर्यंतचा प्रवास दाखवला आहे. खरं तर हा फ्लॅशबॅक नाही कारण वर्तमानात लुई बँक्स हिचं लग्न झालेलं नसून ती एकटी राहत असते. (भूत-वर्तमान-भविष्य यातली वेळ आणि काळ यांच्याबाबत माणूस आणि एलियन्स यांच्यातली तफावत इथे दाखवली आहे. )
परग्रहवासी/एलियन्स पृथ्वीवर का आलेत असं विचारण्यासाठी जेव्हा लुई बँक्स आणि इयान डोनेली प्रयत्न करतात, तेव्हा त्यांना ‘यूज वेपन’ हा शब्द मिळतो. एलियन्सनी सांगितलेल्या यूज वेपन या शब्दाचा अर्थ शस्त्राचा वापर करा किंवा युद्घ असा नसून कदाचित तो वेगळा असू शकतो असं बँक्सला वाटत असतं, पण तिचं म्हणणं कोणीही ऐकत नाही. त्यातच चीन त्याचा अर्थ ‘युद्घ’ असा लावतो आणि चीनच्या सुरात सूर मिसळून चीन आणि इतर काही देश तबकड्यांना नष्ट करण्याचं ठरवतात. एकूणच एलियन्सच्या संवादाचा आपल्या भाषेत योग्य अर्थ लावण्यासाठी होत असलेला विलंब यामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण होतं. प्रत्यक्षात सगळ्या देशांनी एकत्र येऊन सुसंवाद साधावा असं एलियन्सला म्हणायचं असतं. त्यांचं म्हणणं बँक्स आणि इतरांना कळतं का, भविष्यात लुई बँक्स आणि इयान डोनेली यांचं नातं काय असणार, सुसंवादाचं महत्व, संवादाची माध्यमं, ‘युद्धातून विजेते निर्माण होत नाहीत, तर विधवा’ हे वाक्य कोण म्हणतं आणि त्याचा परिणाम काय होतो, तबकड्यांना नष्ट करण्यापासून चीनला बँक्स परावृत्त करू शकते का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ‘अरायव्हल’ हा चित्रपट बघितल्यानंतर मिळतात.
एकाच वेळी भूत-वर्तमान-भविष्य उत्कंठेने जगण्यासाठी, एका उत्तम कलाकृतीचा आस्वाद घेण्यासाठी आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान यांचा रोमांचकारी थरार अनुभवण्यासाठी ‘अरायव्हल’ चित्रपट नक्कीच बघायलाच हवा!
दीपा देशमुख, पुणे
Add new comment