मोफत पोलीस भरती मार्गदर्शन-सर्वज्ञ विकास प्रबोधिनी, मुळशी
पोलीस सब-इन्स्पेक्टर संतोष भूमकर यांना शब्द दिल्याप्रमाणे आज सकाळी मुळशी इथल्या सर्वज्ञ विकास प्रबोधिनीच्या मोफत पोलीस मार्गदर्शनच्या अभ्यासिकेचं उद्घाटन करण्यासाठी पोहोचले. आज सुट्टी असल्यामुळे अपूर्वही सोबत होता. सुसगावातून मुळशीकडे जाणारा रस्ता हिरवागार....सोबतीला भुरभुरणारा पाऊस, खळाळून वाहणारी नदी...निळसर, काळसर आभाळ, रस्त्याच्या कडेला फुललेली रंगिबेरंगी घाणेरीची आवडती फुलं....हा प्रवास संपूच नये असा....पण पटकन संपला.
रस्त्याच्या कडेला संतोष आमची वाट पाहत होता. (मी संतोष असं एकेरी म्हणतेय कारण तो माझ्यापेक्षा खूप लहान आहे आणि त्याला एकेरीच संबोधन आवडतं.) संतोषनं त्याच्यासारख्याच ध्येयवेड्या सहा मित्रांची ओळख करून दिली. हे सात मित्र म्हणजे, ‘वेडात निघाले वीर मराठे सात’ प्रमाणे वाटले. कोणी शिक्षक, कोणी व्यावसायिक तर कोणी सरकारी नोकरीत! आपापले नोकरीउद्योग सांभाळून सगळ्यांनी आपल्या मुळशी तालुक्यातल्या मुलांना पोलीस भरतीसाठी मोफत प्रशिक्षण द्यायचं असा निश्चय केला आणि पदरचे पैसे खर्च करून ते कामाला लागलेत.
पाच या संख्येपासून सुरू झालेली ही तरुणाई आता १५० वर पोहोचली आहे. यात जवळजवळ ३० ते ४० मुलीही आहेत. सगळ्यांची घरची आर्थिक परिस्थिती खूपच हलाखीची आहे, मात्र अंगी चिकाटी, जिद्द, कष्ट करण्याची तयारी आणि आयुष्यात चांगलं काहीतरी करून दाखवायचं हा निश्चय असलेली ही चुणचुणीत मुलं! आज अमोल या इंजिनिअर तरुणानं या सात तरुणांच्या कार्यानं प्रभावित होऊन त्यांना आवश्यक ती मदत करायचं ठरवलं. या सगळ्यांच्या संकल्पातून या मुलांसाठी आज अभ्यासिका मुळशी इथे उभी राहिलीये. मी अभ्यासिकेचं फीत कापून उदघाटन केलं. प्रत्येकजण काहीतरी सांगत होता आणि त्यातून मला या सगळ्या तरुणांची प्रामाणिक धडपड दिसत होती. पोलीसभरतीसाठी यशस्वी झालेली प्रियंका हिनं आपलं मनोगत मांडलं. तसंच पूर्वतयारी करणारी मोनिका आणि शुभांगी या दोघींनीही सर्वज्ञ विकास प्रबोधिनीमुळे आपल्याला आपला मार्ग किती सुलभ झालाय हे सांगितलं. या सगळ्याच मुलामुलींमध्ये मला प्रचंड आत्मविश्वास जाणवला.
मी उपस्थितांशी संवाद साधला. आयुष्यात विज्ञान आणि कला दोन्हीही कसं महत्त्वाचं आहे हे सांगत झापड लावल्यासारखं न जगता सगळीकडे बघूया आणि चांगलं ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करूया असं सांगितलं. मी कोण होणार, किती यशस्वी होणार यापेक्षाही चांगला माणूस बनण्यासाठी मी काय करणार हे जास्त महत्वाचं हेही त्यांना सांगितलं. त्यानंतर नेहमीप्रमाणेच अनेक किस्से, गोष्टी, आयुष्यातलं सौंदर्य.....खूप काही. मुलं-मुली खुलली आणि मीही आनंदले. लवकर परत या असं निघताना जेव्हा सगळ्यांनी सांगितलं, तेव्हा खूप छान वाटलं. परत तर नक्कीच जायचं आहे कारण जाईल तिथे नवं नातं निर्माण होतंय.....पुढल्या वेळी अभिजीतला घेऊन येईन असं मी सगळ्यांना कबूल केलं.
संतोषच्या वृद्ध वडिलांनी पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया - ज्ञानेश्वर मुळे हे मी लिहिलेलं सुपरहिरो मालिकेतलं पुस्तक वाचलं होतं. कोणी मेरी क्युरी तर कोणी रॉबर्ट ओपेनहायमर! कोणी स्लमडॉग सी.ए. एकूणच त्यांना पुस्तकातलं जे जे भावलं त्यावर त्यांनी आवर्जून येऊन सांगितलं. असे प्रसंग आले की लिखाण पोहोचत असल्याचं समाधान मिळतं. त्यातच आजच्या लोकसत्तेत आलेली सिंफनीची जाहिरात - अवघ्या दोन आठवड्यांत सिंफनीची दुसरी आवृत्ती! पहाटेच वर्तमानपत्र बघून खूप आनंद झाला हे सांगायला नकोच. एकूण आजचा दिवस हिरवागार, रसरशीत, तजेलदार आहे - मुळशीत भेटलेल्या तरुणाईसारखा!
दीपा देशमुख, पुणे.