किशोर मित्र आणि आदिती ट्रेनिंग सेंटर!

किशोर मित्र आणि आदिती ट्रेनिंग सेंटर!

तारीख
-
स्थळ
Lonavala

नयनला कबूल केल्यानुसार आज सकाळी नयन आणि नीलम ओसवाल यांच्यासोबत कामशेतकडे कूच केलं. किशोर मित्र आणि आदिती ट्रेनिंग सेंटरचा परिसर बघण्याची खूप उत्सुकता होतीच. प्रवासात भुरभुरणारा पाऊस आणि सगळा परिसर हिरवागार बघून डोळे सुखावलेले... टुमदार अशा छानशा वृक्षांनी वेढलेल्या वास्तूत गाडी शिरली. इथंच कायम वास्तव्य करावं अशी जागा... गाडीतून उतरायच्या आतच चार-पाच राजबिंड्या सोनेरी श्वानांनी स्वागत केलं. मला प्राणी आवडत असल्यामुळे प्राणी मला कधीच त्रास देत नाहीत. म्हणजे अंगावर भूंकणं वगैरे कुठलाही प्रकार त्यांनी केला नाही. स्वागतपर आनंदानं शेपटी हलवत त्यांनी रस्ता दाखवला.

तेवढ्यात सोनू नावाच्या गोड मांजरीबाईंनीही आपल्या अस्तित्वाची आम्ही दखल घ्यावी असे नखरे सुरू केले. नयननं मला आदिती ट्रेनिंग सेंटरची सर्वेसर्वा मेरी डिसुझा हिची ओळख करून दिली. मेरी अतिशय गोड बाई वाटली. हुशार, करारी, प्रेमळ असं सर्वकाही. तिच्यामुळे आज कामशेत परिसरातल्या तरूण मुलींमध्ये केवढा कायापालट झालाय. नयन आणि मेरी यांच्यामुळे या मुली आज आत्मविश्वासानं वाटचाल करताहेत. काहीतरी चांगलं करू पाहणार्‍या आणि आपल्या आयुष्याला अर्थपूर्ण बनवू पाहणार्‍या या मुली.... इथं कोणी चाळीस किमी अंतरावरून तर कोणी ३० किमी अंतरावरून मिळेल त्या वाहनानं पोहोचतात. काहीजणी तर चालत! त्यांची चिकाटी, जिद्द आणि कामाची तळमळ मला त्यांच्या सगळ्या हालचालींतून जाणवत होती. त्यांना घडवणार्‍या नयन आणि मेरीला मी मनातल्या मनात शंभरवेळा झुकून सलाम ठोकला. नयननं फिरून सगळा परिसर दाखवला.

पोटली प्रकल्पाची जागा, मुलींचं वाचनालय, आंगणवाडीसाठीची जागा, ग्रंथपालापासून सगळा कारभार सांभाळणार्‍या गोड गोड तरुणी.... अर्थात त्यांच्यात तीन शिक्षक होते, तेही तितकेच सामाजिक जाणीव असलेले, नाटकवेडे आणि पैशाच्या मागे न धावता काहीतरी चांगलं काम करू पाहणारे.. या तरूणाईलाही मी मनात एक नमस्कार केला. आज पोटली प्रकल्पाच्या मुलींशी संवाद साधताना त्यांनी मला मी माझ्या कामाविषयी बोलावं असा प्रस्ताव समोर ठेवला....मग आजवरच्या प्रवासातली कामं आणि त्यातून मी काय शिकत गेले याविषयी मी बोलत गेले...मुली रंगून गेल्या होत्या...त्यांच्या चेहर्‍यावरचं हास्य आणि फाईनमनच्या प्रेमकहाणीच्या वेळेसचे अश्रू दोन्हीही मी टिपत होते....आपलं बोलणं या मुलींपर्यंत आपण पोहोचवू शकलो याचा आनंद मलाही होत होता. या मुलींनी मला गाण्याचा आग्रह केला, मात्र त्या आधी त्यांनीही गावं असा मीही आग्रह धरला.

त्या वेळी अंगाईगीत, मोरावरचं सुरेखसं गाणं, रीमझिम सरी अशी गाणी या तरुणींनी सादर केली. गोड गळा, गाण्याची सहजसोपी चाल आणि त्यांचं त्यात रमून जाणं मला भावलं. मीही गायले. अर्थातच वैभवच्या आणि माझ्या कविता! वैभव देशमुख जिंदाबाद! यानंतर दहावी, बारावी आणि पदवीचं शिक्षण घेणार्‍या मुली आणि त्यांचा शिक्षकवर्ग यांच्याशी देखील गप्पा झाल्या. सुरुवातीला या मुली गंभीर होत्या, नंतर खुलल्या. मग जरा बरं वाटलं. या मुलींच्या आग्रहामुळे माझा आवडता गायक किशोरकुमार याचं गाणं मी गायले. तिकडे गेल्यापासून त्या सगळ्यांशी अखंड बोलत होते. आपण या मुलींशी पहिल्यांदा भेटतो आहोत असं वाटलंच नाही.

मला मासवणच्या सगळ्यांचीच खूप आठवण आली. विजया, रिया, करूणा, प्रतिभा, आशाताई, मंगला, विकास, संजू, प्रमोद सगळ्यांचीच! नयन, नीलम, मेरी यांनी आणलेल्या डब्यातलं जेवण झालं. नीलम ओसवाल ही मानसोपचारतज्ज्ञ असून अतिशय शांत स्वभावाची नीलम मनावर तिची छाप पाडून गेली. या सगळ्या वातावरणात आशाताईंची म्हणजे लेखिका आशा साठे यांचीही खूप आठवण आली. आशा साठे यांनी मला काही वर्षांपासून मी इकडे चलावं असा आग्रह धरला होता...पण इतर व्यस्ततेत कधी जमून आलं नव्हतं. परत निघताना सगळ्यांना डोळ्यात साठवून घेतलं. पुन्हा लवकरच परत यायचं कबूल केलं. मग मांजरीनबाई सोनू आणि राजपूत्र (चारपाच तगडे कुत्रे) यांनाही बाय केलं आणि पुण्याच्या दिशेनं गाडी धावू लागली!

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो