नांदेड दौरा! 17 March 2018
नांदेड इथल्या ग्रामीण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि सायन्स कॉलेज इथं १७ मार्च २०१८ या दिवशी सकाळी ११.३० वाजता व्याख्यान आणि पारितोषिक वितरण अशा कार्यक्रमासाठी मला जायचं होतं. जाताना पनवेल-नांदेड एक्स्प्रेसनं प्रवास झाला. या प्रवासात पुण्यात नोकरीसाठी स्थायिक झालेले आणि ज्यांचं मूळ गाव नांदेड आहे असे युवा मला भेटले. एकजण आयटीत इंजिनिअर, तर दुसरी जिममध्ये झुम्बा शिकवणारी, एकजण अमेरिकेत नोकरी करत असलेली, एकजण व्यवसायात रमलेला या सगळ्या तरुणांनी एकमेकांची ओळख करून देताना माझीही ओळख विचारली. मी ‘लिहिते’ असं सांगितल्यावर त्यांनी पुस्तकांची नावं विचारली. मी फक्त 'जीनियस' सांगताच - त्यांनी ती मालिका वाचलेली असल्यामुळे मग पुढले दोन-अडीच तास केवळ जीनियस, कॅनव्हास यावरच म्हणजे - थोडक्यात विज्ञान आणि कला या विषयांवर आमच्या भरपूर गप्पा झाल्या. त्यांना माझ्या लिखाणासंबंधी अनेक गोष्टींचं कुतूहल होतं. त्यांचे प्रश्न आणि शंकानिरसन करताना खूप मजा आली. आम्ही रोज एखादं तरी पुस्तक वाचल्याशिवाय झोपत नाही असं या युवांनी सांगितलं. माझ्या पुढल्या पुस्तकांबद्दल विचारणा केली. सिंफनीविषयी ऐकून आम्ही प्रतीक्षा करतो म्हणत पुण्यात प्रकाशनाच्या कार्यक्रमाला आम्ही नक्की येणार असं त्यांनी सांगितलं.
रात्री दहा वाजता सगळ्यांनी आपापले डबे उघडले. यातल्या एका तरुणीला स्वयंपाकाची खूपच आवड होती. तिने अनेक पदार्थ करून आणले होते. या नव्या मंडळींनी खूप आग्रहानं मला त्यांच्याबरोबर जेवायला लावलं. मिस्क डाळीची आमटी, भाजी, लसूणखेाबरं यांची चटणी, कोथिंबीर वडी असे भरपूर पदार्थ जेवणात होते. गप्पा मारत जेवणं झाली आणि छानशी झोपही! सकाळी मात्र नऊला पोहेाचणारी ट्रेन अकरा वाजले तरी धावतेय....मी काळजीत ....आता कार्यक्रमात वेळेवर कसं पोहोचणार? अर्थात सगळी उत्तम व्यवस्था आयोजकांनी केलेली असल्यामुळे गाडी नांदेड स्टेशनवर थांबताच माझ्या नव्या मित्र-मैत्रिणींना टाटा करत मी कार्यक्रमस्थळी निघाले.
ग्रामीण पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग आणि सायन्स कॉलेजचे संचालक संजय पवार एकदम खंबीर आणि धडाडीचे प्राचार्य वाटले. आलेले मान्यवर पाहुणेही दिग्गज होते. कोणी बीएआरसीमध्ये शास्त्रज्ञ, तर कोणी इन्कमटॅक्स ऑफिसर, कोणी केईएम हॉस्पिटल, मुंबईमधले प्रोफेसर तर कोणी हैंद्राबादलहून आलेले, तर विनोद तिवारी हे महाराष्ट्र शासनाच्या वॉटर रिर्सोस रेग्युलेशनची महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे....! मोकळ्या पटांगणावर टाकलेला मंडप आणि त्यात खच्चून गर्दीत बसलेले युवा - प्राध्यापक.....खूपच उत्साही वातावरणात कार्यक्रम सुरू झाला. आपल्या महाविद्यालयाबाबतची भूमिका मांडताना प्राचार्य संजय पवार हे स्वतः इंजिनिअर असूनही त्यांची साहित्यावरची पकड जबरदस्त असल्याचं त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. विनोद तिवारी यांनी शासनाच्या अनेक योजनांना कार्यान्वित करताना महाविद्यालयातल्या युवांना कसं जोडून काम करता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं. बीएआरसीमधून आलेले मेहेत्रे यांनी संशोधनातल्या अनेक संधी युवांना दाखवल्या. खरं तर प्रत्येक व्याख्यात्याचं व्याख्यान तास-दीड तास व्हायला हवं असं वाटलं. या वेळी गुणवंत विध्यार्थ्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं. प्राचार्य संजय पवार याचं पुनश्च कौतुक यासाठी की सात हजार ...पाच हजार अशी पारितोषिकांची रक्कम रोख स्वरुपात न देता तेवढ्या किमतीची पुस्तकं विद्यार्थ्यांना दिली होती!! मी या उद्घाटन सत्रात युवांना प्रेरित करण्याच्या हेतूनं सुरुवातीलाच स्टीफन हॉकिंगला आदरांजली व्यक्त करत...त्या वैज्ञानिकाची चिकाटी, संशोधन आणि मृत्यूला झुंज देणारी लढवैय्या वृत्ती याबद्दल बोलले. त्यानंतर नांदेडच्या कॉलेजमध्ये सी.व्ही. रामन सेंटर सुरू झाल्यामुळे सी.व्ही. रामन यांच्याविषयी बोलले. विश्वेश्वरैयांमधला अभियंता, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजक, लेखक हा प्रवास उलगडला. जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा यांच्यासारख्या वैज्ञानिकांनी आहे त्या परिस्थितीत भारतात राहून संशोधन आणि संशोधनासाठी लागणारी साधनं कशी निर्माण केली, मानवतेच्या कल्याणाचा ध्यास कसा घेतला याबद्दल बोलून व्याख्यानं संपवलं.
व्यासपीठावरचे उपस्थित आणि समोर बसलेले युवा यांना आवडल्याची पावती त्यांच्या हसर्या चेहर्यानं मला दिली. कार्यक्रमानंतर जेवण आणि त्यानंतर फक्त विज्ञानाच्या विद्यार्थ्यांसमोर पुन्हा एकदा मला बोलायची संधी मिळाली. तेवढ्याच प्रचंड गर्दीसमोर बोलताना खूप उत्साहित वाटलं. कारण कॉलेजच्या युवांचा प्रतिसाद खूप चांगला होता. विज्ञान आणि कला आयुष्यात किती महत्वाच्या आहेत....आपल्या अर्थपूर्ण जगण्यासाठी गणित आणि विज्ञान कसं आवश्यक आहे यावर बोलत आईन्स्टाईन, रामानुजन, लुई पाश्चर, रिचर्ड फाईनमन अशा अनेक वैज्ञानिकांवर मी बोलले. परत निघताना कहाळेकर यांनी कॉलेजच्या परिसरात उभारलेलं भास्कराचार्य गार्डन बघितलं. इथे अनेक वैज्ञानिक उपकरणं खेळातून उभी केलेली होती. सगळ्या वस्तू टाकाऊमधून बनवलेल्या होत्या. कहाळेकरांचे परिश्रम यातून जाणवत होते. विज्ञान आणि गणित समजण्याचा अतिशय सोपा उपाय इथं बघायला मिळाला.
नांदेडच्या प्रसिद्ध गुरूद्वार्याला सगळ्यांच्या आग्रहामुळे धावती भेट दिली. संपूर्ण परिसरातली स्वच्छता, बांधकामातली कलाकुसर आणि देखणेपण, कानावर पडणारं सुरेल संगीत, सात्विक स्वादिष्ट प्रसाद या सगळ्यांचा लाभ घेत तिथून बाहेर पडले.....गुरूद्वारा मनापासून आवडला! गाभार्यातली शांतता इथल्याही वातावरणात तशीच होती. मी थांबले त्या हॉटेलचं नावही मजेशीर होतं - ताज पाटील हॉटेल! मला सोबत करायला माधुरी आणि पठाण सर हे अतिशय मनमिळाऊ प्राध्यापक होते. रात्रीचं हलकं जेवण या ताज पाटीलमध्ये घेतलं. अतिशय छान समाधान देणारं आणि तृप्त करणारं जेवण होतं. आयेाजक मंडळींनी मला परतीच्या प्रवासात गाडीत बसवून टाटा केला आणि मी पुण्याच्या दिशेनं निघाले!
दीपा देशमुख