भावे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पुणे - विज्ञान दिन साजरा!
१५८ वर्षांची परंपरा चालवणारं भावे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, पुणे - बळवंत वासुदेव फडके यांच्या पुढाकाराने सुरू झालं. या शाळेतून अनेक दिग्गज शिकून गेले. विज्ञान दिनानिमित्त आज १ मार्च २०१८ या दिवशी भावे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय यातल्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान आणि वैज्ञानिक असा माझ्या व्याख्यानाचा कार्यक्रम ठरवण्यात आला होता. मी शाळेच्या आवारात सकाळी बरोबर आठ वाजता प्रवेश करताच, संपूर्ण शाळेचा परिसर इतिहासाची आठवण करून देत होता. सगळी मुलं शिस्तीत बसून प्रतीक्षा करत होती.
सुरुवातीला उपमुख्याध्यापिका, ग्रंथपाल, विज्ञान शिक्षिका यांनी माझं स्वागत केलं. त्यानंतर कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या कलेतली कौशल्यं आणि विज्ञानावरचा निबंध या स्पर्धांमध्ये नैपुण्य मिळवलं होतं, त्यांना पारितोषिक दिली. विज्ञान दिनानिमित्त वैज्ञानिकांचे शोध, त्यांचं आयुष्य, प्रतिकूल परिस्थितीशी त्यांचं झगडणं, त्यांचं झपाटलेपण, त्यांची चिकाटी, समस्त मानवजातीवर त्यांच्या शोधानं केलेले उपकार हे सगळं मुलांशी संवाद साधताना उलगडलं गेलं. हे सगळे शास्त्रज्ञ झापड लावलेले नव्हते तर त्यांच्यातल्या कलेनं त्यांना ऊर्जा दिली, त्यांच्यातल्या माणुसकीनं त्यांना विश्वाच्या कल्याणाची ओढ लावली, तर जगाला विज्ञानाशिवाय पर्याय नाही हेही त्यांनी आपल्या कार्यातून दाखवलं. आज आपलं जगणं सुसह्य बनलं आहे ते केवळ त्यांच्यामुळे! गणित आणि विज्ञान या दोहोंवर आपल्या आख्ख्या आयुष्याची इमारत उभी आहे. अशा अनेक मुद्दयांवर विद्यार्थ्यांशी केलेल्या संवादात मी तासभर बोलले.
मुलांनी भरभरून प्रतिसाद दिला. माझं म्हणणं त्यांच्यापर्यंत पोहोचलं, याचं समाधान मला मिळालं. कार्यक्रम संपल्यावर प्रोफेसर मंडळी, शिक्षक वर्ग या सगळ्यांनी आवर्जून भेट घेऊन त्यांना माझं बोलणं आवडल्याचं मनापासून सांगितलं. लगेचच पुनश्च लवकरच भावे हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयाचं निमंत्रणही मला मिळालं. वारंवार होणार्या भेटीनं भावे स्कूलबरोबरचं नातं आणखी दृढ होणार यात शंकाच नाही!
दीपा देशमुख
१ मार्च २०१८.