सेमी प्रायव्हेट रूम - दिमाखदार प्रकाशन समारंभ

सेमी प्रायव्हेट रूम - दिमाखदार प्रकाशन समारंभ

तारीख
-

सेमी प्रायव्हेट रूम दिमाखदार प्रकाशन समारंभ आज डॉ. अमित बिडवे यांच्या 'सेमी प्रायव्हेट रूम' या कादंबरीचा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. नव्यानं सुरू झालेला सीटी इन हॉटेलचा भव्य हॉल आणि आकर्षक सजावट! कार्यक्रमाला अगत्यानं येणार्‍यांची गर्दी आणि बिडवे कुटुंबियांनी त्यांच्यासाठी खास केलेली नाश्त्याची व्यवस्था....यामुळे वातावरणात वेगळीच चहलपहल होती. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी डॉ. अनिल गांधी, मुक्ता पुणतांबेकर आणि दीपा देशमुख असे होते. डॉ. अनिल गांधी यांचा आणि माझा परिचय रुग्ण आणि डॉक्टर या नात्यानं आणि लेखक आणि वाचक या नात्यानंही आहे. त्यांचा मृदू, सौम्य स्वभाव त्यांच्या लिखाणातून आणि त्यांच्या रुग्णांशी असलेल्या नात्यातूनही जाणवतो. तसंच मुक्ताबद्दल! खरं तर मुक्ता, अमित आणि मी आम्ही भावंडंच म्हणायचं. कारण बाबानं आमचं पालकत्व घेतलंय. मुक्ताचा खंबीरपणा, कणखरपणा आणि बुद्धिमत्ता मला नेहमीच आकर्षित करते. या दोघांसोबत मला इथं यायला मिळणं याबद्दल मी अमितचे आभार. आम्ही तिन्हीही पाहुणे (खरं तर यातले आम्ही कोणीही पाहुणे नाही आहोत. डॉ. अनिल गांधी अमितला लहानपणापासून ओळखतात. मुक्ता आणि माझं अमितशी असलेलं नातंही तसंच अकृत्रिम स्नेहाचं आहे.) वेळेवर पोहोचलो होतो.

बघता बघता हॉल खच्चून भरला आणि कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमात अमितचा वाढदिवसाचा केकही कापण्यात आला. दौंडच्या काही मान्यवरांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला आशीर्वादपर शुभेच्छा दिल्या. मी अमितला कॅनव्हास हे आमचं चित्र-शिल्पकलेवरचं पुस्तक भेट दिलं. मॅजेस्टिकचे कोठावळे यांनी अमितच्या लिखाणाविषयी कौतुक केलंच, मात्र पुस्तकाची निर्मिती, दर्जा यात आपण कधीही तडजोड करत नसल्याचं सांगितलं. याप्रसंगी अमितचे वडील यांनीही आपल्या खुमासदार शैलीत अमितविषयी आणि कार्यक्रमाविषयी नेमकं मनोगत व्यक्त केलं. अमितला आम्ही आल्याचा आनंद होताच, पण दडपण नसल्यामुळे त्यानं त्याच्या भावना सहजपणे शेअर केल्या. त्याचा आदर्श असलेला अवचटबाबा त्याच्या मनोगतातून डोकावत होता. अमितचा सकारात्मक दृष्टिकोन आणि मनस्वीपण याची उत्तम सांगड त्यानं आपल्या जगण्यात घातली आहे. म्हणूनच आता आपण सर्जरीचं काम थांबवलं असून अर्धा वेळ डॉक्टरी आणि अर्धा वेळ लिहू शकतो आणि तोच आपल्या आनंदाचा भाग असल्याचा सांगितलं. आपला प्राधान्यक्रम निश्‍चित असला तर कुठलाच अडथळा किंवा ‘वेळ मिळत नाही’ ही सबब पुढे येत नाही असं तो म्हणाला. अमितचा चाहता वर्ग खूप मोठा असल्याचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं बघायला मिळाला. केवळ आभासी नातं निर्माण न करता वास्तव पातळीवरही ते नातं टिकवून ठेवण्यात, वृद्धिंगत करण्यात अमितचा नम्र मनमिळाऊ स्वभाव दिसून आला. त्याचे एक फेसबुक मित्र नीतीन राणे हे तर केवळ प्रकाशनासाठी मुंबईहून खास दौंडला आले होते. या दोन मित्रांमधलं निरपेक्ष प्रेम मला नीतीन राणे यांच्या कौतुकभरल्या चेहर्‍यावर दिसत होतं.

या कार्यक्रमात कादंबरीतल्या काही भागाचं थोडक्यात अभिवाचन झालं. यातल्या सादरकर्त्यांची सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळ्यांनीच खूप चांगलं वाचन केलं. विशेषतः अनुष्का बिडवे! अमितची मुलगी! अतिशय गोड असलेल्या या मुलीनं सगळ्यांना अक्षरशः खाऊन टाकलं. याच कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करणार्‍या इंगळे या वैद्यकीय क्षेत्रातल्या असून त्यांची वाचनाची आवड आणि सूत्रसंचलनाची शैली इतकी छान होती की मला त्या खूपच आवडल्या. कुठलाही मेकअप नाही, शब्दांचे अलंकार नाहीत की माईक हातात मिळालाय म्हणून इतर अवांतर गोष्टींचा फाफटपसारा नाही, खूप अगत्य आणि सहजता त्यांच्या निवेदनात होती. मला त्या खूप आवडल्या. डॉ. अनिल गांधी यांनी लिखाणासाठी ती व्यक्ती किती शिकलीये हे महत्वाचं नसून त्याचा अनुभव, त्याची निरीक्षणदृष्टी, त्यांची संवेदनशीलता किती महत्वाची आहे याबद्दल सांगितलं. आपण प्रशंसा करण्यात अतिशय कंजूष असून आज मात्र जाहिरपणे अमितची प्रशंसा करताना आपल्याला आनंद होतोय असंही ते म्हणाले.

मुक्ताचं बोलणं मी काल पहिल्यांदाच समोरासमोर ऐकलं. अतिशय संवादी, ठाम असं ती बोलली. केवळ सेमी-प्रायव्हेट रुमचं नव्हे तर मुक्तानं अमितच्या सगळ्या पुस्तकांचा आढावा घेत त्या त्या पुस्तकांची वैशिष्ट्यं नमूद केली. पुस्तकं आणि अमित अशा दोहोंवर ती मनमोकळं बोलली. व्यक्तिचित्रण करण्यातलं अमितच कसब याबद्दल तिने सांगितलं. मुक्तामधला कार्यकर्ताही तिच्या बोलण्यातून डोकावत होता आणि तिच्यातला साहित्यिकही! खूप प्रसन्न व्यक्तिमत्व असलेली मुक्ता मीच काय कोणालाही आवडावी अशी आहे. मुक्ताच्या आधीच माझं बोलून झालं होतं.

माझ्या बोलण्याचा साधारण सारांश असा होता ः अमित बिडवे यानं लिहिलेली आधीची पाचही पुस्तकं वाचली असल्यानं त्याचा संवेदनशील स्वभाव तर दिसतोच पण कुठलाही एखादा लेखक जेव्हा काही लिहितो तेव्हा त्याच्या लिखाणातून तो डोकावत असतोच. म्हणजे तो कोणते विषय लिखाणासाठी निवडतो, यातून त्याची विचारधारा कळते. त्याची मांडणी कशी आहे यावरून त्याचा स्वभाव कळतो. त्यामुळे एखादा माणूस ओळखण्यासाठी तो साहित्यिक असेल तर त्याचं सगळं लिखाण नक्कीच वाचावं. तो कळायला लागेल. अमितच्या बाबतीत नेमकं हेच सांगता येईल. सेमी प्रायव्हेट रूम ही कादंबरी एका हॉस्पिटलमधल्या एका खोलीत दोन रुग्ण असलेल्या गोष्टीविषयी बोलते. अमितचं वैशिष्ट्य असं की कादंबरी एकदा वाचायला सुरुवात केली की आज थांबू, नंतर वाचू असं होतं नाही. याचं कारण त्याची सोपी, साधी आणि संवादी भाषा! कादंबरीतल्या प्रत्येक पात्राच्या अंतःकरणातली घालमेल, अस्वस्थता, आनंद, धावपळ, जगण्यातली पळापळ आपल्याला कळत राहते. प्रत्येक पात्रातलं वेगळेपण अमितनं यात जपलं आहे. आपल्या मनाविरुद्ध अमेरिकेत स्थायिक झालेला मुलगा याच्याविषयी नाना या पात्राच्या मनात बसलेली अढी, हट्टी आणि चिडचिडा झालेला स्वभाव, तर त्याउलट सगळ्यांशी जुळवून घेण्याचा नानीचा स्वभाव......आज डॉक्टरकडे जायचं म्हटलं तरी मध्यमवर्गीय घरात कोसळणारं संकट, पैशांची जुळवाजुळव, मूल्यांची कसरत, नात्यांमधली गुंतागुंत असे अनेक कंगोरे अमितची ही कादंबरी वाचताना समोर येत होते. कथानक सांगत नाही कारण त्यातली उत्कंठा आणि उत्सुकता तशीच राहू दे. मात्र सहवासानं नात्यातले बंध कसे तयार होतात, कसे जपले जातात याचं अनोखं दर्शन अमितच्या या कादंबरीत होतं.

खरं तर कादंबरी हा प्रकार हळूहळू कमी होत चाललेला दिसतो. हरी नारायण आपटे, वि. स. खांडेकर, नाथ माधव, फडके, त्यानंतर रंगनाथ पाठारे, रणजीत देसाई, अण्णाभाऊ साठे, सदानंद देशमुख, विश्‍वास पाटील अशांनी ही धुरा समर्थपणे सांभाळली. आताशा वाचकांना फार दीर्घ काही नको असतं. सुटसुटीत, संक्षिप्त असलेल्या गोष्टी त्यांना आवडतात. त्यातच आजचे तरुण उपय्ाुक्त लिखाण जास्त वाचतात. म्हणजे परीक्षेला आहे का वगैरे. त्यामुळे त्या धर्तीवर अमितचं ललित शैलीत लिहिलेलं लिखाण आणि तेही कादंबरीस्वरूपात हे धाडस तो करतोय कारण त्याचा त्याच्या स्वतःच्या क्षमतेवर विश्‍वास दिसून येतो. ही कादंबरी असली तरी यात क्रमसुसंगत यातली पात्र स्वतःशी आणि आपल्याशी बोलत समोर येत राहतात. त्यामुळे वाचक म्हणून आपणही त्या जीवनप्रवाहात मिसळून जातो. त्यानं असं नको असं वागायला हवं होतं किंवा तिनं असं नको असं करायला हवं होतं अशी मनाची संभ्रमावस्था अमितमधला लेखक करत नाही. ती ती पात्रं समजून उमजून वागताहेत, आपलं जगणं जगताहेत. त्यांना त्यांच्या मर्यादा माहीत आहे आणि बलस्थानंही! वाचकाला ही कादंबरी वाचताना रमून जायला तर होतंच, पण त्याचबरोबर आता पुढे काय ही उत्कंठा त्याच्या मनाला राहते.

आज आरोग्याच्या क्षेत्रातली दुरावस्था आपण सगळेच बघत आहोत. आरोग्यावर आपण दरवर्षी ५ टक्वे खर्च करणं अपेक्षित असताना आपण केवळ १.३ टक्के खर्च करतो. तोही तळापर्यंत किती पोहोचतो ते सांगता येणं कठीण आहे. अशाच वेळी जागतिकीकरणामुळे, गतीमुळे फॅमिली डॉक्टर ही संकल्पना बाद होत चालली आहे. डॉक्टरकाका हे कोणाला संबोधायचं हा प्रश्‍न आज आहे. डॉक्टरांनाही समोर असणारी रांग संपवायची आहे आणि रुग्णालाही डॉक्टरांशी मनातलं सगळं सांगावं असं नातं तयार होण्याइतका वेळ मिळत नाही. ही दरी कशी सांधायची हा खूप मोठा प्रश्‍न आहे. पूर्वी फॅमिली डॉक्टरांच्या एका चकरेनं, दिलाशाच्या एका स्पर्शानं रुग्ण बरा व्हायचा. आज अमितकडे बघताना त्याच्यातला डॉक्टर आणि त्याच्यातला लेखक दोन्हीही एकमेकांना पूरक असल्याचे मला बघायला मिळतात. त्याचं रुग्ण असो वा वाचक दोघांशीही तितकंच घट्ट नातं निर्माण झालेलं दिसतं.

सेमी प्रायव्हेटच्या निमित्तानं अमितच्या संवेदनशीलतेचे अनेक कंगोरे तर कळलेच, पण त्याचबरोबर हॉस्पिटलमधल्या वातावरणात तितके दिवस जुळतं घेत नात्याचे बंध घेऊन चालणारे लोकही भेटले. आपण ही कादंबरी जरूर वाचा. आपलं मन शांगच्या क्रिशबरोबर मैत्री करेल, नानाचा विक्षिप्तपणा समजून घेईल तर रोहितची मानसिकताही आपल्याला कळू लागेल. या कादंबरीबरोबर हसता हसता आपल्या डोळ्यातून आसवंही बाहेर पडणार आहेत. आणि हे सगळं तुमच्या माणसातल्या माणूसपणाला बाहेर आणायचं काम अमितची सेमी-प्रायव्हेटरूम करणार आहे. त्यामुळे जरूर वाचा. मॅजेस्टिक प्रकाशनानं अतिशय सुरेख निर्मिती ‘सेमी प्रायव्हेट रूम’ची केली आहे. विशेषतः कथा-कादंबर्‍यांना फारसे चांगले दिवस नसताना त्याचं महत्व जाणून त्यांनी लेखक आणि हा साहित्यप्रकार दोन्हींसाठी ही निर्मिती केली त्याबद्दल त्यांचं अभिनंदन! दौंडवासियांशी संवाद साधताना खूप आनंद झाला. अमितच्या जडणघडणीत त्याच्या कुटुंबाचा असलेला मोलाचा वाटाही मला सांगावासा वाटला.

या प्रसंगी जगदीशचंद्र बोसचे आणि रिचर्ड फाईनमनचे वडील मला आठवत गेले. अमितच्या वडलांच्या जागी मला तेच दिसायला लागले. मुलगा घडण्यात एका बापाचं योगदान मला इथं बघायला मिळत होतं. कार्यक्रम संपल्यावर मिळून सार्‍याजणीच्या प्रतिनिधी अरूणा मोरे आणि इतर अनेक चाहते आवर्जून भेटले. सगळ्यांशी बोलून खूप खूप छान वाटलं. माझ्यासाठी खास वेळ काढून आलेल्या, सोबत करणार्‍या, माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणार्‍या अभिजीत, संजीव, कल्पना, वर्षा, दर्शना, श्रीनिवास, अश्विनी, कल्याण आणि मीनाक्षी यांचेही खास आभार! खास बात : कालच्या प्रकाशनात शाल श्रीफळ न देता अमित अंजली यांनी अतिशय सुरेख अशा चंदेरी साड्यांची भेट आम्हाला (मला आणि मुक्ताला) दिली. तसच डॉ. क्षितीजा आणि सिद्धार्थ कुलकर्णी यांनी इतकं रुचकर जेवण तयार केलं होतं की अत्रेंच्या भाषेत सांगायचं झाल्यास गेल्या दहा हजार वर्षात इतकं स्वादिष्ट जेवण मी जेवले नाही.

क्षितिजा एक डॉक्टर असून अप्रतिम सौंदर्यदृष्टी असलेली कुशल अन्नपूर्णा आहे. दोघांचे खूप खूप आभार. आदित्य बिडवे च्या अगत्यशील स्वभावाचं दर्शन तो आपल्या कृतीतून आम्हाला देत होता. सगळ्यांचे मनपूर्वक आभार !!!!!!!

दीपा देशमुख, पुणे

कार्यक्रमाचे फोटो