टिळक हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, कर्‍हाड

टिळक हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, कर्‍हाड

तारीख
-
स्थळ
Karhad

टिळक हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज, कर्‍हाड यशवंतराव चव्हाण भारताचे गृहमंत्री, सरंक्षणमंत्री, उपपंतप्रधान म्हणून आपल्या कार्यकर्तृत्वानं परिचित असलेलं नाव! कर्‍हाडचा परिसर यशवंतराव चव्हाण या नावानं व्यापलेला बघायला मिळतो. शैक्षणिक संस्था असो वा इतर कुठलाही व्यवसाय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने त्या यशस्वी होणार असा कर्‍हाडकरांचा ठाम विश्‍वास असावा. अशा कर्‍हाड इथल्या १०० वर्षांची परंपरा असलेल्या टिळक हायस्कूल आणि ज्यूनियर कॉलेज या ठिकाणी विज्ञानविषयक कार्यक्रमात मला सहभागी होता आलं.

या शाळेत यशवंतराव चव्हाण शिकले होते. या शाळेच्या आवारात ते फिरले असणार, यापैकीच कुठल्याशा वर्गातल्या बाकावर त्यांची जागा असणार. अभ्यास करताना, नोट्स काढताना, शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्‍नांची उत्तरं देताना यशवंतरावांना या परिसरानं बघितलं असणार. माझं मन भूतकाळात डोकावून आलं. त्या काळाला साक्षी मीही असावी इतकी मी भारावून गेले. या व्याख्यानानिमित्त विद्यार्थ्यांशी 'विज्ञान आणि वैज्ञानिक' या विषयावर संवाद साधता आला. खरं तर एका एका वैज्ञानिकावर बोलायला वेगळं सत्र पाहिजे......मनाला आवरून मी काही निवडक जीनियस वैज्ञानिकांवर तासभर बोलले. मुलांनी खूपच छान प्रतिसाद दिला. शिक्षकवर्ग खुश झाला. माणूस कळाला, तो जवळचा झाला की त्याचं कार्य आपोआपच कळतं. त्यामुळे आता आम्हाला विज्ञान कठीण वाटणार नाही अशी ग्वाही विद्यार्थ्यांनी दिली. पुन्हा भेटू म्हणत मी शिक्षकवर्गाचा आणि मुलांचा निरोप घेतला.

दीपा देशमुख, पुणे.

कार्यक्रमाचे फोटो