पार्करचं लाल जॉटर पेन आणि बाळ्या!

पार्करचं लाल जॉटर पेन आणि बाळ्या!

तारीख
-
स्थळ
Pune

पार्करचं लाल जॉटर पेन आणि बाळ्या! मी नुकतीच विश्‍वस्त आणि लॉक ग्रिफीन या कादंबर्‍यांचे लेखक वसंत वसंत लिमये (बाळ्या) यांची मुलाखत घेतली. खरं तर त्या वेळी दोन मुलाखती रंगल्या. एक प्रत्यक्षातली, जिचं रेकॉर्डिंग झालं आणि दुसरी म्हणजे पडद्यामागची ! या वेळी अनेक विषयांवर आम्ही भरभरून बोललो. बाळ्या म्हणाला, 'दीपा जस्ट मी एक कथा लिहून पूर्ण केलीय. त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद आणि आता ते अपत्य कोणाला दाखवू असा झालेला चेहरा बघून मी म्हटलं, अरे मी वाचते ना.....' मी घरी पोहोचायच्या आतच मला जीमेलवर ‘पार्करचं लाल जॉटर पेन’ ही कथा आलेली दिसली.

गोष्ट वाचताना माझा औरंगाबाद, नगर, नाशिक, बारामती असा दौरा...व्याख्यानं .....अशा सगळ्या गडबडीत मी 'पार्करचं लाल जॉटर पेन' गोष्ट वाचली. मात्र बाळ्याला प्रतिक्रिया द्यायची राहिली. 'पार्करचं लाल जॉटर पेन' ही वसंत वसंत लिमये लिखित गोष्ट वाचताना मला या लेखकाचं वैशिष्ट्य ठळकपणे जाणवलं. ते म्हणजे हा आयआयटीचा इंजिनिअर असला, तरी याचं मराठी भाषेवरचं प्रभुत्व 'लै भारी' आहे. गोष्ट रंगत जाते, खुलत जाते. त्यात पुण्यातल्या टिळक रोडवरच्या 'शब्दांगण' पासून अप्पा बळवंत चौकातल्या 'रसिक साहित्य' पर्यंतची पुण्यातली पुस्तकांची दुकानं येतात. त्या त्या ठिकाणचं अतिशय सूक्ष्म निरीक्षण येतं. त्या त्या पात्राचं हुबेहूब व्यक्तिचित्र वाचकासमोर उभं राहतं. गोष्टीतली वर्णनं अजिबात बोजड आणि अलंकारिक असत नाहीत. तर आपण बोलू, त्याच पद्धतीनं सहजसोप्या पण रसाळ भाषेत ती वर्णनं येतात. एखाद्या टुमदार छोट्याशा बंगलीमध्ये गेल्यावर जो मूड तयार होतो तोच मूड वसंत वसंत लिमये यांची गोष्ट वाचताना मला आला.

गंमत म्हणजे यातली पात्रं आपल्याच आसपास असावीत इतकी खरीखुरी वाटली. 'गाडी हलकेच संथपणे गुरगुरत टपरीपाशी थांबली’ हे वाक्य वाचलं आणि मला ती गाडी देखील जिवंत होऊन कशी थांबली असेल हे डोळ्यासमोर उभं राहिलं. ‘रस्त्याच्या दोन्ही बाजूला धुक्याच्या तलम पडद्याआड काळोख दडून बसला होता’ वा, क्या बात है! वसंत वसंत लिमये यांच्या गोष्टीतला प्रवास करताना त्या प्रवासातले रस्ते, ती ठिकाणं, ती चहाची टपरी आणि ती माणसं हे सगळं त्यांच्या कादंबर्‍यांप्रमाणेच खरं आहे की कल्पना हे कळतच नाही. याचं कारण या आयआयटीतल्या बाळ्या नामक इंजिनिअरची स्मरणशक्ती अफाट आहे. सतत प्रवास करणारा हा भटक्या माणूस असल्यानं ते ते रस्ते, त्या त्या आवडलेल्या खुणा, ते घाट, ती वळणं, ती रस्त्यात लागणारी छोटी छोटी डौलदार गावं हा पठ्ठया लक्षात ठेवतो आणि मग असा बेमालूमपणे कथेत गुंफतो.

'पार्करचं लाल जॉटर पेन' या गोष्टीतही कळत नकळत जगताना धावण्याच्या स्पर्धेत जवळ असलेली माणसं आणि छोटी छोटी सुखं आपण गमावून बसतो. त्यामुळे त्या सुखाचे क्षण वेचावेत असं लेखक सांगतो. या गोष्टीचा शेवट एका धक्कातंत्रानं लेखकानं केला आहे. त्यामुळे त्या सगळ्या प्रसंगांमध्ये रमलेल्या आपल्याला काही क्षण स्तब्धता येते. छान गोष्ट! ताज्या आणि गरमागरम कथेची पहिली वाचक बनवण्याचा मान दिल्याबद्दल थँक्यू, बाळ्या ऊर्फ वसंत वसंत लिमये! तुम्हीही जरूर वाचा, 'पार्करचं लाल जॉटर पेन!'

दीपा देशमुख,

१० जानेवारी २०१८.

कार्यक्रमाचे फोटो