जळगावचं कुमार साहित्य संमेलन!
विवेकानंद प्रतिष्ठान, जळगाव आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई आयोजित जळगावमध्ये ९, १०, ११ आणि १२ जानेवारी या कालावधीतलं चार दिवसांचं कुमार साहित्य संमेलन आयोजन केलं होतं. १० जानेवारीला माझी मुलाखत मुलंच घेणार होती. नेहमीपेक्षा हे हटके असल्यामुळे मलाही या मुलाखतीबद्दल अपार उत्सुकता होती. बोचर्या थंडीच्या वातावरणात मी १० तारखेला सकाळी रेल्वेनं जळगाव स्टेशनवर पोहोचले. एवढ्या थंडीत मला घ्यायला आलेल्या जयदीप या विज्ञानवेड्या तरुणाला बघून मला एकदम उबदार वाटायला लागलं.
आयोजक किरण सोहळे यांनी कोझी रिसोर्ट या सुरेखशा ठिकाणी निवासाची व्यवस्था केली होती. गावातल्या वातावरणाचा फील देणारं हे टुमदार रिसोर्ट खूपच छान होतं. किरण सोहळे एक अत्यंत उत्साही व्यक्तिमत्व! त्यांच्या भेटीनं संवादातली औपचारिकता दूर झाली. रिसोर्टच्या समोरचं संमेलनाचं मैदान असल्यानं तिथली लगबग दिसत होती. इंद्रधनुष्यी प्रवेशद्वार मनाला मोहवत होतं. खानदेशकन्या बहिणाबाई चौधरी, पद्मश्री ना. धो. महानोर आणि बालकवी त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांच्या कार्याची संकल्पना या कुमार साहित्य संमेलनात असणार होती. एखाद्या मोठ्या साहित्य संमेलनाप्रमाणेच संपूर्ण मैदान नटलेलं होतं. या संमेलनात संपूर्णपणे मुलांचा सहभाग होता. आठवी ते बारावी अशा वयोगटातली मुलं-मुली, तीही संपूर्ण जळगाव जिल्यातल्या विविध शाळांमधून आलेली होती.
या मुलामुलींनी त्यांना दिलेल्या वेळात चित्रं काढली होती, पन्हाळा, जंजिरा, सिंहगडपासून अनेक किल्ले तयार केले होते. हस्तकलेच्या अनेक वस्तू बनवल्या होत्या. वास्तुकलेचे अनेक मॉडेल्सही बनवले होते. प्रत्येक स्टॉलवर हे सगळं मी बघत होते. सूत्रसंचलनापासून संमेलनाचं अध्यक्षस्थान देखील मुलंच भूषवत होती. सगळं काही आलबेल चाललंय ना आणि वेळात घडतंय ना हे बघण्यासाठी केवळ विवेकानंद प्रतिष्ठानचे कार्यकर्ते लगबग करताना दिसत होते.
काव्यसंमेलन, कथाकथन, परिसंवाद असे कार्यक्रम मुलामुलींच्या सहभागाने वेळेत पार पडत होते. मुलं अतिशय धिटाईनं आपले विचार मांडत होती. या सगळ्यांच्या बोलण्यातून ज्ञानेश्वर, तुकाराम, गाडगेबाबा, यांची विचारमूल्यं आणि कुसुमाग्रजांपासून ते बहिणाबाई, बालकवी, महानोर, पुल देशपांडे यांच्या लिखाणातले विचार व्यक्त होत होते. बघता बघता ही सत्रं संपली आणि माझ्या मुलाखतीची वेळ जवळ आली. अभिजीत आणि अनुष्का ही दोन तरतरीत गोड मुलं माझी मुलाखत घेणार होती.
आम्ही व्यासपीठावर स्थानापन्न झालो आणि मी परीक्षेसाठी सज्ज झाले. कुठलाही औपचारिक, अलंकारिक, क्लिष्ट, बोजड शब्दांचा आधार न घेता या दोघांनी बोलायला सुरुवात केली. त्यांच्या मनातल्या उत्सुकतेला वाट करून देणारे प्रश्नच दोघांनी विचारायला सुरुवात केली. अगदी माझ्या लहान असण्यापासूनच्या वातावरणाचे ते प्रश्न होते. त्यांच्या प्रश्नामुळे मीही काही काळ भूतकाळाची सैर करून आले. मुलाखतीचे प्रश्न माझ्या लहानपणापासून लिखाणापर्यंतच्या प्रवासापर्यंत येऊन थांबले होते आणि मला त्या सगळ्या प्रवासातल्या गमतीजमती आठवत होत्या. माझ्या आयुष्यातले सुपरहिरो कोण, शास्त्रज्ञांनी किंवा जीनियस मालिकेने मला काय दिलं हे सगळं मलाही नव्याने उमगत होतं. अभिजीत, अनुष्का आणि मी या गप्पांमध्ये रंगून गेलोच, पण समोर असलेले विद्यार्थी, शिक्षक, कार्यकर्ते आणि पालक सगळेच रमलेले दिसले. मुलाखतीचा शेवट करताना मी सध्या माझ्या मनात रेंगाळत असलेलं ‘तू जिंदा है तू जिंदगीकी जीत मे यकीन कर, अगर कहीं है स्वर्ग तो उतार ला जमीनपर ’ हे शैलेंद्र कवीचं गीत सादर केलं. मुलाखत कधी संपली कळलंच नाही.
नंतर मात्र उपस्थित मुलामुलींपैकी कथाकथन, काव्यवाचन, चित्रकला, हस्तकला आणि परिसंवाद यात पारितोषिक प्राप्त केलेल्यांना पारितोषिक वितरण माझ्या हस्ते झालं. त्यानंतर मग मुलामुलींसोबत फोटोसेशन पार पडलं. सगळ्यांनी आम्हाला मुलाखत खूप आवडली असं आवर्जून सांगितलं आणि आपले विचार पोहोचले या जाणिवेनं मलाही खूप बरं वाटलं. जळगावला माझी मैत्रीण सुचेता, श्रेयस, संजय, शुभा जोशी यांच्या भेटीनं आनंद द्विगुणित झाला. कित्येक वर्षांनी विनय पाटील यांची भेट झाली. सकाळी मानसिक विकलांग असलेल्या मुलांच्या आश्रय या संस्थेला मी रेखा पाटील आणि अमित पाठक यांच्याबरोबर जाऊन भेट दिली.
वेळेअभावी यजुवेंद्र महाजन यांच्या मनोबल उपक्रमासाठी आणि मुलांना भेटण्यासाठी जाणं रहित करावं लागलं. मात्र त्यांच्यासाठी नेलेली पुस्तकं पाठवली. सायंकाळी लोकमतच्या सचिन या तरुण पत्रकाराला मुलाखत दिली आणि सुचेतानं केलेल्या अतिशय चविष्ट खिचडी-कढीवर ताव मारून जळगाव स्टेशन गाठलं. बोचर्या थंडीनं जळगावमध्ये कहरच केलाय. हाडांमध्ये घुसावी अशी थंडी आणि थंडगार वारे वाहत होते. ट्रेनमध्ये शिरताच उबदार वाटलं. दिवसभरातल्या आठवणी आणि नव्यानं ओळख झालेल्या सर्व मुलामुलींचे चेहरे आठवत मी झोपेच्या आधीन झाले.
मुलांसाठीची अशी संमेलनं त्या त्या भागात व्हायलाच हवीत. त्यातच जळगावच्या विवेकानंद प्रतिष्ठानचं काम आणि नेटकं आयोजन बघून मी थक्क झाले. त्यांच्या कार्याचा विस्तार बघूनही अचंबित व्हायला झालं. विशेष म्हणजे मुलांनी या वयात घडायला हवं, त्यांच्या विचारांना योग्य दिशा मिळायला हवी, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचा आत्मविश्वास आणि त्यांच्यातला माणूस तयार होण्यासाठीचं वातावरण विवेकानंद प्रतिष्ठान करत असल्याचं जाणवलं. हे कुमार साहित्य संमेलन पाचवं होतं. या आधी अनिल अवचट, वीणा गवाणकर मुलाखतीसाठी येऊन गेल्याचं आयोजकांनी सांगितलं. अशा दिग्गज लोकानंतर मला जाण्याची संधी मिळाल्यामुळे आनंद तर होताच, पण दडपणही होतं. मात्र मुलांच्या गोड वागण्यानं ते दडपण तर दूर झालंच, पण नवीन स्नेहाचं नातं अभिजीत, अनुष्का आणि गिरीश सह अनेक मुलांनी माझ्या मनात निर्माण केलं.
लवकरच पुन्हा भेटूया नववर्षातल्या नवमित्रांनो!
दीपा देशमुख, पुणे.