मुक्ताशी मुक्त संवाद

मुक्ताशी मुक्त संवाद

तारीख
-

महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्थेतर्फे श्रीगोंदे इथे प्रबोधन व्याख्यानमालेचं आयोजन गेली १० वर्ष केलं जातं. या वर्षी २४, २५ आणि २६ डिसेंबर असे तीन दिवस ही व्याख्यानमाला आयोजित केली होती. या वर्षी मुक्ता मनोहर, विनोद शिरसाट आणि अ‍ॅड असीम सरोदे श्रोत्यांशी संवाद साधणार होते. व्याख्यानाच्या पहिल्या दिवशी मुक्ता मनोहर यांची मुलाखत मला घ्यायची होती. मुक्ताची आणि माझी ओळख १०-११ वर्षांपूर्वी झाली आणि पहिल्याच भेटीत तिच्याशी मैत्र जुळलं. या मैत्रीमध्ये तिचं मोठेपण कधीही आडवं आलं नाही.

पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनची जनरल सेक्रेटरी असलेली मुक्ता एक प्रसिद्ध लेखिकाही आहे. तिला मिळालेल्या पुरस्कारांची यादी वाचली तर वेळ पुरणार नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, सुनिल दत्त पुरस्कार, कॉ गोविंद पानसरे प्रबोधन पुरस्कार, लोकमत जीवनगौरव पुरस्कार, लोकमत जीवन गौरव पुरस्कार, एसएम जोशी कार्यकर्ता पुरस्कार, आदिशक्ती पुरस्कार, उंच माझा झोका पुरस्कार. रमाबाई रानडे पुरस्कार आणि असे अनेक पुरस्कार! खरं तर काम करता करता मुक्ताचं जगणं स्वतःपुरतं राहिलंच नाही, ते सामाजिक जीवनात कधीच विरघळून गेलं आहे.

तिचा प्रवास या मुलाखतीच्या निमित्तानं उलगडला गेला. कॉ. अशोक मनोहरचा आयुष्यातला प्रवेश आणि त्याचा प्रभाव, तिची बंडखोरी, स्त्री मुक्ती चळवळ, कामगार चळवळ, कष्टकर्‍यांसाठीची चळवळ अशा अनेक चळवळींचा वेध आणि तिचं काम या प्रसंगी श्रोत्यांसमोर मांडता आलं. कामगारांसाठी काम करत असतानाच 'जगणं वेचताना' हे कष्टकरी स्त्रियांच्या आयुष्यातल्या समस्यांचा वेध घेणारं पुस्तक मुक्तानं लिहिलं. तसंच बलात्काराच्या घटना कानावर पडताच अस्वस्थ होऊन या प्रश्नाच्या मुळाशी जात 'नग्नसत्य'सारख्या पुस्तकाचं लेखन तिनं केलं, कामगारांसाठी सांस्कृतिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक उपक्रमांचं आयोजन ती सातत्यानं करते. आणि विशेष म्हणजे कॅन्सरसारख्या व्याधीनं आक्रमण केल्यावर, 'मला अजून बरंच काम करायचंय' असं म्हणत त्या व्याधीला पिटाळून लावते. अशा धाडसी, लढाऊ मुक्ताचा प्रवास उलगडणं हा माझ्यासाठी देखील एक खूप सुरेख अनुभव होता.

पुणे ते श्रीगोंदे हा प्रवास गप्पाटप्पा करत मुक्ता, मी आणि आमचा लाडका ल्योक शास्त्री (सिद्धार्थ प्रभुणे) असा मिळून केला. श्रीगोंदेला पोहोचताच अनंता आणि विकास वाट बघत होते. श्रीगोंदे इथे अनंतानं महामानव बाबा आमटे बहुद्देशीय सामाजिक विकास सेवा संस्था उभारून फासेपारथी मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपलं आयुष्य झोकून दिलं आहे. दोन मुलांपासून सुरू केलेलं त्याचं काम आज १०० मुलांचा पालक होण्यापर्यंत वाढलं आहे. त्याला विकास पाटील हा हरहुन्नरी तरूण साथ देतोय. या कार्यक्रमाचं आयोजन अतिशय सुरेख केलं होतं. मुलाखतीसाठी इतक्या लहान गावात संपूर्ण हॉल खच्चून भरेल इतके स्त्री-पुरुष उपस्थित होते.

वस्तिगृहातला शुभम पाटील हा अतिशय गोड आणि चुणचुणीत छोटासा मुलगा आमच्याबरोबर गप्पा मारायला होता. त्यानं आम्हाला तेवढ्या कमी वेळात गावाकडल्या भुताखेताच्या गोष्टी रंगवून सांगितल्या. सूत्रसंचालन करणारा अक्षय जहागीरदार या तरुणाची थोडाच वेळ भेट झाली. पण त्याचा प्रवासही उत्कंठावर्धक असल्याची जाणीव झाली. मराठी भाषेवर त्याचं असलेलं प्रभुत्व लक्षात आलं. माझ्या यादीत अनंता, विकास बरोबरच अक्षयचीही नोंद झाली.

कार्यक्रम संपल्यानंतर डॉ. रोडे यांच्या तिरंगा या हॉटेलमध्ये शुद्ध शाकाहारी अतिशय स्वादिष्ट जेवण झालं. जगात जेवढ्या भाज्या असतील तेवढ्या वाढायचा चंगच बहुतेक त्यांच्या कूकने बांधला असावा. तिथेही अनेक विद्यार्थी भेटले. तृप्त मनानं ‘लवकरच भेटू’ म्हणत अनंतासह सगळ्यांचा आम्ही निरोप घेत दौंड मार्गे पुणे गाठलं. (आणि हो, अनंतानं अगदी आठवणीनं निघताना पोतंभर हरभरा शेतातून काढून मला बरोबर दिला! त्यामुळे मोगॅम्बो एकदम खुश हुआ!)

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो