बुकगंगा इंटरनॅशनल - वाचक जागर महोत्सव 

बुकगंगा इंटरनॅशनल - वाचक जागर महोत्सव 

तारीख
-
स्थळ
Pune

'वाचक जागर महोत्सवात' पुस्तक पेठेतला पहिला, शब्दांगण,साहित्य परिषदेतला दुसरा आणि आजचा बुकगंगा इंटरनॅशनलमधला तिसरा कार्यक्रम होता. इजा, बिजा, तिजा......पण या इजा, बिजा चांगल्याच प्रतिसाद देऊन गेल्या होत्या. त्यामुळे तिजा कार्यक्रम देखील चांगलाच होणार ही खात्री होती.

सव्वासहा वाजता बुकगंगामध्ये सुहास्यवदना सुप्रिया लिमये-जोगळेकरनं बाबाचं आणि माझं स्वागत केलं. खरं तर दीक्षितसह सगळ्याच स्टाफनं आमचं हसून स्वागत केलं. बुकगंगाचा स्टाफ हा उत्साही तरूणांचा असून ते नेहमीच प्रसन्नपणे वावरत असतात. 'बाईट्स ऑफ इंडिया'चा संपादक अनिकेत कोनकर हाही तरूण स्वागताला होता. आम्ही स्थानापन्न झालो आणि कार्यक्रम पाचएक मिनिटांनी सुरू करू असं ठरल्यामुळे तोपर्यंत बाबामधला जादुगार जागा झाला.

समोर शालेय वयोगटातली मुलं-मुली देखील उपस्थित होती. त्यांच्यासाठी बाबाची जादू म्हणजे पर्वणीच होती. मग बाबानं दोर्‍याची बाज, नारळाचं झाड, घर असं काय काय करून दाखवलं. एक रुपयाचं नाणं घेऊन त्यानं ते हातात घेऊन क्षणार्धात गायब करून दाखवलं. मग रुमालाचा उंदीर करून माझ्या अंगावर फेकून मला घाबरवलं. बाबाच्या या जादूगिरीनं सगळं वातावरणच बदलून गेलं. सगळीकडे एक चैतन्य पसरलं. बुकगंगाची सगळी मोकळी जागा ‘रिकाम्या जागा भरा’ प्रमाणे गच्च भरून गेली. त्यात ज्येष्ठ नागरिक, तरूण-तरुणी, गृहिणी आणि विद्यार्थी असे सगळेच आपापल्या जागा पकडून दाटीवाटीनं बसले. गर्दीमुळे अखेर आमच्या अगदी जवळ अनेकांना मांडी ठेाकून आसनस्थ व्हावं लागलं.

हे दृश्य खरंच खूप छान होतं. सगळे इतके जवळ होते की दाटीवाटीनं गर्दीनं खच्चून भरलेल्या रेल्वेच्या बोगीतून प्रवास करताना जसं वाटेल तसं वाटायला लागलं. एकप्रकारची जवळीकही प्रत्येकाशी तयार झाली. मुलाखतकर्ती गोड तरूणी ही बुकगंगा परिवारातलीच एक होती. औपचारिकतेला जराही स्पर्श न करता कार्यक्रम सुरू झाला. मला आणि बाबाला अनेक प्रश्‍न विचारले गेले. लिखाणाचा आाणि सामाजिक कार्याचा प्रवास, आवडते लेखक, इंग्रजी चित्रपट आणि भारतीय चित्रपट, सोशल मीडिया, तरूणाईशी होणारा संवाद, अशा अनेक विषयांवर संवाद साधला गेला. बाबामधली (अनिल अवचट) प्रत्येक गोष्टीतली कल्पकता, सर्जनशीलता आणि कुतूहल यावर बाबा बोलला. आईनं दारासमोर काढलेल्या रांगोळीपासून ते सुनंदानं दिलेली साथ इथपर्यंत अनेक आठवणी त्यात होत्या. कोणासाठी, दाखवण्यासाठी, पैशासाठी आपण काही केलं नसून आपल्याला मिळणार्‍या आनंदासाठी, आपलं मन सांगतंय म्हणून आपण आजवर सगळं काही करत आल्याचं बाबानं सांगितलं. आपल्याला आजवर हवं ते करता आलं आणि आपण ते केलं, त्यामुळे हे राहिलं, ते करायचं होतं अशी कुठलीही खंत आपल्या मनात नाही असंही त्यानं सांगितलं. आपल्या पुस्तकात सजीव असो वा निर्जिव दोन्हीही वस्तू आणि माणसं आपल्याशी संवाद साधतात आणि तेच आपण कागदावर उतरवतो असं बाबा म्हणाला. बाबानं नुकताच लिहिलेला ‘डास’ या विषयावरच्या लेखामधली उद्बबोधक माहिती सांगितली. तसंच सामाजिक काम हे वेगळं असं काही नसतं, तर आपल्याचसारख्या काही माणसांचं जगणं किती दुःसह्य असतं, त्यांची परिस्थिती, त्यांच्या वेदना, त्याचं काम आपण जवळून बघितलं आणि नुसतंच बघितलं नाही तर त्यांच्याबरोबर मैला काढण्यापासून ते काम जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे श्रीमंतांपेक्षा गरीब माणसं नेहमीच जवळची वाटली. त्यांचं दुःख आपलं दुःख झालं आणि तेच लिखाणातून मांडलं.

अस्मादिक म्हणजेच मी लहानपणापासून ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्याविरुद्ध बंड केलं, जे जे मिळेल ते ते वाचलं, मनातल्या डाचणार्‍या आनंद देणार्‍या गोष्टी नेहमी डायरीत व्यक्त केल्या आणि यातूनच लिखाण सुरू झालं. जात-धर्म कधीच पटली नाही, मानली नाही. कर्मकांड कधीच आवडलं नाही. त्यामुळे जे जे पटेल तेच करत आले. आदिवासी भागातलं काम असो, वा निर्माण उपक्रमामुळे जोडली गेलेली तरूणाई असो या सगळ्यांमुळे सामाजिक भान जास्त तीव्र झालं. भेटत गेलेल्या व्यक्तींचा प्रभाव आयुष्यावर पडत गेला. त्या त्या टप्प्यावर भेटलेल्या लोकांमुळे ते झपाटलेपण, ती चिकाटी, ते साधेपण, ते परिश्रम अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा वाटत गेला. सोशल मीडिया असो की इतर माध्यमं त्यांचा वापर चांगलाही करता येतो आणि वाईटही. आपण तो चांगला करावा. चांगल्या गोष्टी शेअर कराव्यात, नेहमी सकारात्मक गोष्टी घेऊन पुढे जायला आवडत असल्यानं प्रेरणा देणारं जे काही दैनंदिन जगण्यात घडतं ते ते फेसबुक असो वा व्हॉट्सअप ते जवळच्यांना शेअर करावं वाटतं. यामुळे अनेक अनोळखी माणसं जोडली गेली. आनंद नाडकर्णीसारख्या खळाळत्या उत्साहानं ओतप्रोत भरलेल्या माणसांकडे आरईबीटीचा कोर्स केल्यानं तरुणाईशी वागताना, त्यांचे प्रश्‍न सोडवताना आणखी वेगळी दृष्टी मिळाली. १२ वर्षांपासून अच्युत गोडबोलेंसारख्या व्यासंगी, चतुरस्त्र व्यक्तीबरोबर काम केल्यानं त्यांच्याबरोबर केलेल्या लिखाणातून खूप शिकायला मिळालं. त्यांच्यामुळेच इंग्रजीचं वाचन वाढलं.

'वाचक जागर महोत्सव' या उपक्रमामुळे लेखक-वाचक संवाद वाढला. असा महोत्सव प्रत्येक वर्षी करावा अशी इच्छा व्यक्त करत मी त्यांना आमच्या दोघांच्या वतीनं शुभेच्छा देत थांबले. आज विशेष म्हणजे कार्यक्रमात एका गोड मुलाने त्याने स्वतः तयार केलेल्या ओरिगामीच्या वस्तू मला आणि बाबाला भेट दिल्या. खरं तर आजच्या कार्यक्रमातही साडेआठ वाजत आले तरी लोक उठायचं नाव घेत नव्हते. पण वेळेचं भान ठेवून बाबानं ‘आता बस्स’ म्हणत कार्यक्रम आटोपता घेतला. सुप्रियाच्या आग्रहामुळे बाबानं दोहे म्हटले आणि नंतर स्वतःची एक कविताही गाऊन दाखवली. मीही माझ्या आवडत्या वैभवची कविता गायले.

अखेर लोकांना ‘उठा कार्यक्रम संपला’ असं म्हटल्यावर लोक नाईलाजानं उठले. नंतरही अर्धा तास प्रत्येकाशी बोलण्यात वेळ गेला. बाबाची आपलेसे, कुतुहलापोटी, वनातजनात, सरलतरल अशी अनेक पुस्तकं विकली गेली. आमच्या जीनियस, भारतीय जीनियस आणि कॅनव्हास या विक्री झालेल्या पुस्तकांवर मी अतिशय आनंदात स्वाक्षरी केली. कार्यक्रमाला दीक्षित, पुस्तकवेडे अप्पा, फेसबुक फ्रेंड डॉ. रेखा पटवर्धन-देशमुख, आसावरी, मीनाक्षी, गायत्री, शुभांगी बर्वे, सुप्रिया, मंदार, अपूर्व, अभिजीत, प्रांजल, देवेंद्र, देवेंद्रचे आई-बाबा अगत्यानं उपस्थित राहिले होते. त्यांचे, कार्यक्रमाला आलेल्या सर्वांचे आणि बुकगंगा टीमचे खूप खूप आभार. 

दीपा देशमुख 
१२ ऑगस्ट २०१७

कार्यक्रमाचे फोटो