शब्दांगण-महाराष्ट्र साहित्य परिषद

शब्दांगण-महाराष्ट्र साहित्य परिषद

तारीख
-
स्थळ
शब्दांगण-महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे

शब्दांगण-महाराष्ट्र साहित्य परिषद सायंकाळी साडेसहा वाजता कार्यक्रम सुरू होणार म्हणून आम्ही वेळेत टिळक रोडला पोहोचलो. मात्र पावसाची एक मोठी सर फजिती करण्याच्या हेतूनं आली, पण तिच्याकडे लक्ष न देता आम्ही सभागृहात पोहोचलो. आदल्या दिवशी पुस्तक पेठेत वाचकांच्या मोठ्या उपस्थितीत झालेला कार्यक्रम लक्षात घेता, लगेचच दुसर्‍या दिवशी त्याच प्रकारच्या कार्यक्रमाला किती प्रतिसाद मिळेल याबद्दल मनात साशंकता होती. मात्र सभागृहात पाऊल टाकताच आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला. पावसाची पर्वा न करता सर्वच वयोगटातल्या वाचक मंडळींनी सभागृह भरलं होतं. वाचक जागर महोत्सवानिमित्त सुरू असलेल्या कार्यक्रमाचं आयोजन शब्दांगणचे लक्ष्मण राठिवडेकर यांनी केलं होतं. त्यांनी थोडक्यात प्रास्ताविक करून सूत्रं मुलाखतकर्ता कल्याण टांकसाळे यांच्याकडे सुपूर्त केली. कल्याण हा आयआयटीतून बाहेर पडलेला एक इंजिनियर असला तरी सामाजिक कार्य हाच त्यानं आपल्या आयुष्याचा मार्ग निवडलाय. प्रसन्न व्यक्तिमत्वाच्या कल्याणच्या तोंडून आमचा तोच परिचय ऐकताना आम्ही नवे झाल्यासारखं वाटलं. याचं कारण कल्याणची स्वतःची सादर करण्याची वेगळी शैली! मुलाखतीला सुरूवात झाली आणि साडेसहाला सुरू झालेला कार्यक्रम पावणेनऊ वाजता संपला. सव्वा दोन तास सुरू असलेला कार्यक्रम खूपच रंगला. कल्याणशिवाय उपस्थित वाचकांनी अनेकविध प्रश्‍न विचारले. तरुणाईची मोठ्या संख्येनं उपस्थिती असल्यानं त्यांचे प्रश्‍न खूपच अस्वस्थ करणारे होते. मात्र या कार्यक्रमाच्या निमित्तानं ही तरुणाई नेहमीसाठी आमच्याशी जोडली गेली. लिखाणामागची प्रेरणा, लिखाणाची प्रक्रिया, सहलेखन कसं घडतं, स्वतंत्र प्रकल्प आणि एकत्रित आताचे आणि भविष्यातले प्रकल्प, सद्यस्थिती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, बेरोजगारी, शेती, स्त्री-प्रश्‍न अशा अनेक विषयांवर आम्ही संवाद साधला. त्यात प्रकाशक आणि लेखक यांच्यातल्या नात्याविषयी वाचकांमधून एक मीश्किल प्रश्‍न विचारला गेला. खरं तर माझे 'तुमचे आमचे सुपरहिरो' ((अरविंद गुप्ता, डॉ प्रकाश आमटे, डॉ अनिल अवचट, डॉ आनंद नाडकर्णी, अच्युत गोडबोले. डॉ ज्ञानेश्वर मुळे आणि येऊ घातलेलं डॉ रवी बापट)) असोत, वा 'इत्यादि' दिवाळी अंकातले लेख असोत किंवा अच्युत गोडबोलेंबरोबरची माझी अनेक पुस्तकं (जगप्रसिद्ध जीनियस-१२ पुस्तिकांचे ३ संच (गलिलिओ, न्यूटन, आईनस्टाईन, हॉकिंग, कॉख, पाश्चर, जेन्नर, फ्लेमिंग, क्युरी, माईटनर, ओपेनहायमर आणि फाईनमन), भारतीय जीनियस - १२ वैज्ञानिक, तंत्रज्ञ, गणितद्न्य (आर्यभट्ट आणि इतर, जगदीशचंद्र बोस, मेघनाद साहा, रामन, रामानुजन, विश्वेश्वरैय्या, चंद्रशेखर, होमी भाभा, कोसंबी, स्वामिनाथन, लॉरी बेकर आणि नारळीकर), कॅनव्हास (चित्र-शिल्प कला)) असोत या सगळ्या लिखाणाला मनोविकासनं प्रकाशित केलंय. मनोविकासच्या आशिश पाटकरचं सहकार्य, त्यांच्या तांत्रिक कामातली माझी लुडबूड, त्यामुळे आपसांत होणारा थोडा रुसवा-फुगवा आणि हट्टीपणा आणि अखेर त्यातून निर्माण झालेल्या दर्जेदार पुस्तकाची पहिली प्रत, पुस्तकांची जाणीवपूर्वक कमी ठेवलेली किंमत, मनोविकासची सर्वदूरच्या वाचकांपर्यंत पुस्तकं पोहोचवण्याची धडपड आणि उत्कृष्ट वितरण आणि त्यानंतर आम्हा सगळ्यांच्या चेहर्‍यावर झळकणारा आनंद हा प्रवासही आम्ही वाचकांबरोबर शेअर केला. कार्यक्रम संपल्यानंतर वाचकांनी खरेदी केलेल्या पुस्तकांवर आमच्या स्वाक्षऱ्या झाल्या. प्राची आणि लक्ष्मण राठिवडेकर यांच्या परिश्रमामुळे पावसांतही असलेली लोकांची लक्षणीय उपस्थिती, (अप्पा, अभिजीत, प्राजंल, प्रज्ञा, विनू, मंदार आणि आसावरी यांची खास उपस्थिती) कल्याणचे ओघवते प्रश्‍न आणि वाचकांचा मनमुराद प्रतिसाद यामुळे कालचा कार्यक्रम संस्मरणीय झाला! 
दीपा देशमुख 
९ ऑगस्ट २०१७

कार्यक्रमाचे फोटो