'कन्या' या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन

'कन्या' या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन

तारीख
-
स्थळ
Pune

'कन्या' या इंग्रजी पुस्तकाचं प्रकाशन काल पत्रकार भवन इथे दुपारी ३ ते ५ या वेळात आकाश धानोरकर आणि हिताक्षी कथुरिया लिखित 'कन्या' या सत्यघटनेवर आधारित पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. आकाश धानोरकर या तरुणाला घेऊन मंजुळ प्रकाशनाचा मुख्य संपादक चेतन कोळी माझ्याकडे आला, त्या वेळी मला आकाशच्या बहिणीची - वर्षाची गोष्ट समजली. मी पुस्तक प्रकाशनाला प्रमुख पाहुणी म्हणून येण्याचं कबूल केलं. पुण्यात सकाळपासूनच नव्हे तर आदल्या दिवशीपासूनच पावसाचा जोर होता. मात्र भर पावसांतही धानोरकर कुटुंबीयांचे स्नेही पत्रकार भवनमध्ये जमले होते. आकाश, आकाशचे काका, आई-वडील, आजी या सगळ्यांची लगबग सुरू होती. लवकरच कार्यक्रमाला सुरुवात झाली.

कार्यक्रमात पत्रकार/लेखक पराग पोतदार, चेतन कोळी यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं आणि आकाशला पुस्तकाबद्दल शुभेच्छा दिल्या. पराग पोतदार आणि चेतन कोळी - मी या दोघा तरुणांचं बोलणं ऐकत होते, तेव्हा मनात त्यांच्याविषयी कौतुक दाटून आलं. त्यांच्यातलं अंडरस्टँडिंग, बोलण्यातली सहजता आणि नेमकेपणा, विषयाच्या खोलवर जाण्यासाठी केलेला अभ्यास बघून मला खरोखरंच खूप खूप समाधान मिळालं. लेखक आकाश याच्या बहिणीची गोष्ट 'कन्या' या पुस्तकात आहे. वर्षा हिनं शिक्षण पूर्ण होताच नौकरी मिळवली आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावता येईल या विचारानं ती मनोमन खुश झाली. आकाश आणि वर्षा यांचे वडील ड्रायव्हरची नोकरी करत असल्यानं आर्थिक कुचंबणा कशी होते, ते वर्षाला ठाऊक होतं. मात्र थोडे दिवस जातात न जातात तोच तिची नोकरी गेली, नोकरी जाताच वर्षाला अतिशय वाईट वाटलं. आपण आपल्या कुटुंबासाठी काहीच करू शकत नाही या विचारानं ती खचली आणि नैराश्याच्या खाईत गेली. घरात कोणालाच नैराश्य (डिप्रेशन) म्हणजे काय ठाऊक नव्हतं, त्यामुळे उपचाराचा प्रश्नच नव्हता. पोर काहीतरी विचित्र वागतेय इतकंच त्यांच्या लक्षात आलं होतं. तासनतास एकटीच बसून असणारी वर्षा हळूहळू अंमली पदार्थांची शिकार झाली. त्या धुंदीत, त्या नशेत तिला आपलं दुःख क्षणभर का होईना विसरता येऊ लागलं. घरात साधं सुपारीचंही व्यसन नसणार्‍या आकाशच्या कुटुंबाला हा फार मोठा धक्का होता. त्यांनी पुण्यातल्या निर्माण व्यसनमुक्ती केंद्रात तिला दाखल केलं. या संस्थेनं वर्षांसाठी खूप परिश्रम घेतले आणि वर्षा पुन्हा पहिल्यासारखी होऊ लागली.

मात्र एके दिवशी आकाशला निर्माण संस्थेतून फोन आला, की ताबडतोब या, वर्षाला हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागेल. इथूनच आकाशच्या कुटुंबासाठी आणखीन एक मोठं संकट समोर उभं असलेलं दिसणार होतं. वर्षाची अवस्था अतिशय वाईट झालेली होती. तिचे ओठ फाटले होते, तिची त्वचा देखील हात लावला की फाटत चालली होती. तिला असह्य वेदना होत होत्या. सगळेच घाबरले, तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करताना अनेक अडचणी आल्या. खाजगी हॉस्पिटलमधली तुच्छतेची वागणूक, डॉक्टरांना निदान न होणं आणि या सगळ्यात तिचा त्रास वाढत जाणं.....अखेर वर्षाचं निदान झालं. वर्षाला स्टिवन्स जॉन्सन सिंड्रोम झाला होता. लाखातून एखाद्याला होणारा हा विकार! मात्र त्या लाखात आपलीच मुलगी असावी याला काय म्हणावं? कधीही न ऐकलेल्या विकाराचं नाव ऐकून कुटुंबीय गोंधळात पडलेले... स्टीवन्स जॉन्सन सिंड्रोम हा कुठल्याही गोष्टीची, औषधाची कशाचीही रिअ‍ॅक्शन किंवा अ‍ॅलर्जी निर्माण झाल्यानं होतो. तो मिनिटामिनिटाला वाढू लागतो. लवकर कळला तर बरा होऊ शकतो, अन्यथा त्वचेचा दाह होणं, त्वचा फाटणं, चट्टे पडणं, लालसर, जांभळे चट्टे, अंधत्व येणं, त्यातूनच कॅन्सर उदभवणं,....आणि शेवटी मृत्यू होणं! वर्षाच्या उपचारासाठी पैसे कुठून आणायचे हा मोठा प्रश्न ड्रायव्हर असलेल्या वडिलांना भेडसावत होता. सगळी दारं बंद असतात, तेव्हा कुठूनतरी प्रकाशाची एक तिरीप येत असते, तसं आकाशचे वडील जिथे नोकरी करत होते, ते डॉ. सुभाष सिपी यांना वर्षाबद्दल कळताच त्यांनी १५ लाख रुपये वर्षाच्या उपचारासाठी खर्च केले.

आकाशच्या कुटुंबासाठी सिपी हे देवासारखे धावून आले होते. कुठल्याही हेतूविना, अपेक्षेविना त्यांनी ही मदत केली होती. मात्र तरीही वर्षा वाचू शकली नाही. तिच्या जाण्यानं कुटुंब दुःखानं कोलमडून गेलं. हा सगळा प्रवास आकाशनं जवळून अनुभवला होता. त्या दुःखाला कवटाळण्यापेक्षा त्यानं आपल्या बहिणीचा प्रवास लिहून काढायचं ठरवलं. वर्षा जाऊन अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही, मात्र आकाशचं पुस्तक तयार झालं. या प्रवासात चेतन कोळीनं वेळोवेळी आकाशला मार्गदर्शनही केलं. नैराश्याच्या खाईत जाणार्‍या प्रत्येक वर्षासाठी किंवा कुठल्याही व्यक्तीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरावं, या विकारानं आक्रमण केलं तर काय काळजी घ्यावी, याबद्दल लोकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आकाशनं हे पुस्तक लिहिलं आहे. आकाशला या लिखाणात हिताक्षीनं साहाय्य केलं आहे.

या पुस्तकाचं प्रकाशन करताना नैराश्य का येतं इथपासून मी बोलले. शिक्षण आणि आरोग्य या दोन्ही बाबतीत समाजात असलेली विषमता एकीकडे, त्याचबरोबर पैसा असणार्‍यांना पंचतारांकित सुविधा, तर दुसरीकडे पैसा नसेल तर तुम्हाला जगायचा अधिकारच नाही अशी अवस्था, त्यातच काहीही करून, कर्ज काढून शिकावं तर नोकरी मिळेलच याची खात्री नाही. मिळालीच तर तिथे स्थैर्य लाभेल हेही ठाऊक नाही. २० ते २५ वयोगटात भारतातले ३५ टक्के लोक आज बेरोजगार आहेत. तसंच वाढत्या प्रदूषणानं होणारे हृदयाचे, फुप्फुसाचे, श्वसनाचे आणि डिप्रेशनचे गंभीर परिणाम.....मानसिक आजारावंर उपचार करायला जावं तर आज भारतात अगदीच नगण्य प्रमाणात असलेले मानसोपचारतज्ज्ञ, त्यातच समाजाचा मानसिक विकारांकडे बघण्याचा उदासीन दृष्टिकोन अशा अनेक मुद्दयांवर मी आकडेवारीसह बोलले. सलमान रश्दीच्या पत्नीला वयाच्या १४ व्या वर्षी स्टिवन्स जॉन्सर हा विकार झाला असतानाही योग्य वेळी योग्य निदान आणि उपचार केले गेल्यानं ती त्यातून बाहेर येऊ शकली.

कार्यक्रम शेवटाकडे जात असताना आकाशचे वडील आपल्या मुलीच्या आठवणीनं डोळ्यात अश्रूंचा पूर घेऊन उभे असलेले मला दिसले. त्यांचं सांत्वन करायला खरं तर शब्दच नव्हते. मात्र मी तुमच्या बरोबर कायम आहे इतकंच मला त्यांना सांगता आलं. मला स्टिवन्स जॉन्सन या विकाराबद्दल सविस्तर माहिती फेसबुक मित्र डॉ. प्रशांत पाटील यांनी दिली, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. प्रशांत पाटील हे असे मित्र आहेत की कुठल्याही विषयावर त्यांच्याशी बोला, वेळेचा पत्ताच लागत नाही. मला त्यांच्याविषयी खूप आदर वाटतो! आकाशला पुढल्या प्रवासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! या कार्यक्रमात काही अक्षम्य चुकाही झाल्या. ज्या व्हायला नको होत्या. म्हणूनच कुठल्याही कार्यक्रमाचं नियोजन करताना ते बारकाईनं व्हायला हवं आणि वेळेच्या आधी त्याची पूर्तता व्हायला हवी. टीमवर्क नीट नसेल, जबाबदारीची जाणीव नसेल, बेफिकिरी असेल तर काय घडू शकतं याचा प्रत्ययही कालच्या कार्यक्रमात आला. असं सगळं असलं तरी आकाशच्या प्रामाणिक हेतूसाठी, पराग-चेतन यांच्या साहाय्यासाठी आणि डॉ. सिपींच्या वतीनं आलेल्या त्यांच्या पत्नीसाठी दिलसे मानाचा मुजरा!

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो