सावित्रीबाई फुले जयंती आणि आधुनिक सावित्री पुरस्कार २०२१

सावित्रीबाई फुले जयंती आणि आधुनिक सावित्री पुरस्कार २०२१

तारीख
-
स्थळ
Pune

३ जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. कुठल्याही आनंदाच्या प्रसंगी ती होती म्हणून आपण आहोत ही भावना जास्त घट्ट होत राहते, तर दु:खाच्या, संकटाच्या वेळी तिनं आयुष्यात काय काय झेललं हे डोळ्यासमोर येऊन आपल्या समोर आलेल्या अडचणी, अडथळे क्षुल्लक वाटायला लागतात. सावित्रीबाईंचं ऋण कधीही न फेडता येण्याजोगं. तर आजच्या दिवशी महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान साहाय्यता केंद्र आणि अवेक फाऊंडेशन या दोन्ही संस्थांच्या वतीनं १०००महिला उद्योजक घडवण्याच्या प्रकल्पांतर्गत काही निवड स्त्रियांना ‘आधुनिक सावित्री पुरस्कार’ देऊन गौरवण्यात येणार होतं.

हे पुरस्कार देण्यासाठी भारती विद्यापीठाचे कुलगुरू माणिकराव साळुंखे, डीआरडीओच्या संशोधिका वृषाली खिरे आणि मी असणार होतो. कार्यक्रमात सगळ्या पुरस्कार मिळणाऱ्या उद्योजिका तरुण आणि उत्साही होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे कुटुंबीय देखील आले होते. कोरोनामुळे मर्यादित उपस्थितीत हा सोहोळा संपन्न होणार होता. आयोजकांची लगबग सुरू होती. प्रणोती, यशवंत शितोळे, प्राजक्ता जोशी, कैलास म्हैसेकर, मिताली मोरे, भूषण कोळेकर, सिरम इन्स्ट्यूटचे संशोधक डॉ. जाना, संकल्पचे डॉ. पीएन कदम या सगळ्यांची जास्त खोलवर ओळख झाली. त्यांचं काम कळलं.

त्यातही भूषण कोळेकर हा तर माझ्या अकरावीतल्या वर्गमैत्रिणीचा - भावनाचा भाऊच निघाला. इतक्या वर्षांनंतर त्याची झालेली भेट आनंददायी होती. काहीच वेळात कार्यक्रम सुरू झाला. वृषाली खिरे आणि मला सावित्रीबाईंसारखी कुंकवाची लाल चिरी कपाळावर लावण्यात आली. मग पुरस्कारार्थींचा परिचय, त्यांचं मनोगत, आम्हा पाहुण्यांचं व्‍याख्यान, दोन्ही संस्थांची ओळख आणि आभार असं करत कार्यक्रम पार पडला.

आपल्या दृष्टीच्या पलीकडलं विस्तारलेलं जग काल मी बघत होते. या तरुण मुली कोणी डॉक्टर, तर कोणी इंजिनिअर, कोणी सीए, तर कोणी शिक्षण क्षेत्रात काम करणारी, कोणी सामाजिक प्रश्नांवर माहितीपट करणारी, तर कोणी कचऱ्यावर काम करून स्वच्छ भारताचं स्वप्न रंगवणारी...सगळ्यांमध्ये पुरेपूर आत्मविश्वास भरलेला होता, त्यांच्या वाटेतल्या अनंत अडचणी, अडथळे, त्यांनी प्रयत्नपूर्वक दूर केले होते. कर्तृत्वाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर पसरलेलं होतं. त्यांचं समाजाच्या विकासामधलं योगदान आणि सामाजिक भान चकित करणारं होतं आणि तरीही अंगी विनम्रता होती. खरोखरंच मला त्या सगळ्या सावित्रीच्या आधुनिक लेकी भासत होत्या. सगळ्या या तरुण मैत्रिणींशी बोलताना वेळ काढून त्या सगळ्यांचं काम आणखी खोलवर जाणून घ्यायचं हेही मी ठरवलं. कार्यक्रम संपल्यानंतर आयोजकांनी अल्पोपहार म्हणत भरपेट खाण्याची व्‍यवस्था केली होती. पण कोरोनाकाळातलं वाढतं वजन लक्षात घेऊन मी मोह आवरला.

मला आयोजक संस्थांचंही कौतुक वाटलं. सावित्रीबाईंच्या जन्मदिनाचं औचित्य साधून त्यांनी सावित्रीबाईंचं काम जिथे उभं राहिलं, त्याच पुणे शहरात हा कार्यक्रम साजरा केला. या दोन्ही संस्था महिला सक्षमीकरणासाठी (कम्प्युअर कौशल्यं, फॅशन डिझायनिंग, ब्युटीकेअर, बँकिंग, अकाउंटिंग, मोटर ड्रायव्‍हिंग वगैरे.) काम करतात. उद्योग किंवा व्‍यवसाय सुरू करताना त्या स्त्रीला अनेकदा मार्गदर्शनाची गरज असते. कुठला उद्योग सुरू करायचा आहे, कर्ज मिळेल का, कुठून मिळेल, त्याचं वितरण कसं आणि कुठे करायचं, या उद्योगात किती अडचणी येऊ शकतात, त्या दूर करण्यासाठी काय करायला हवं यासाठी या दोन्ही संस्था कार्यरत असून अशा धडपडणाऱ्या, स्वत:च्या पायावर उभं राहू पाहणाऱ्या स्त्रियांना सक्षम करण्यासाठी या खंबीरपणे उभ्या आहेत. त्यांच्याशी संपर्क करायचा असल्यास : 1kwe2021@gmail.com मोबाईल: 9975098539

दीपा देशमुख, पुणे.

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो