सेंट क्रिस्पिन्स होम आणि गुरुपोर्णिमा
सेंट क्रिस्पिन्स होम...... गुरुपोर्णिमेला ‘लेखक आपल्या भेटीला’ या कार्यक्रमासाठी ‘आपण आमच्या संस्थेत याल का’ अशी विचारणा मला संस्थेकडून झाली आणि आपण त्या दिवशी बारामतीत असणार हे माझ्या लक्षात आलं. मी त्यांना १७ तारीख चालेल का असं विचारल्यावर त्यांनी लगेचच ‘हो आपण १७ तारखेला गुरूपोर्णिमा साजरी करू या’ असं सांगितलं. आमचा धडा आठवीच्या पाठ्यपुस्तकात असल्यानं संस्थेतल्या मुलींना मला भेटायचं होतं.
मी आज सव्वा दहा वाजता घरातून निघून साडे अकरा वाजता सेंट क्रिस्पिन्स होम संस्थेत पोहोचले. मधली पंधरा-वीस मिनिटं मला पत्ता नीट सापडत नसल्यानं वाया गेली. सेंट क्रिस्पिन्सच्या आवारातच असलेलं १२० वर्षांपेक्षाही जुनं चर्च लक्ष वेधून घेत होतं. अतिशय टुमदार आणि आटोपशीर इमारत बघून एखाद्या रविवारी नक्कीच या चर्चला भेट द्यायची असं ठरवलं. संस्थेच्या पदाधिकारी, संगीता कदम या सगळ्यांनी स्वागत केलं. हॉलमध्ये आठवी, नववी आणि दहावी अशा वर्गांच्या मुली माझी वाट बघत होत्या. अतिशय गोड, हसर्या आणि चुणचुणीत मुली.........! मी मुलींशी कलेबद्दल, विज्ञानाबद्दल, मैत्रीबद्दल, जगण्याबद्दल, माणुसकीबद्दल संवाद साधला.
मुली आणि शिक्षक सगळेच रमून गेले. त्यांचा प्रतिसाद खूप सुखावून गेला. त्यानंतर गुणवंत विद्यार्थिनींना प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. मुलींनी गुरूपोर्णिमेनिमित्त कविता केल्या होत्या. त्या त्यांनी सादर केल्या. माझ्या भाषणातलं काय काय आवडलं तेही सांगितलं. वेळ अगदी भुर्रकन उडून गेला. सेंट क्रिस्पिन्स होम ही संस्थाही १२० वर्षं जुनी! या संस्थेत अनाथ (आणि सिंगल पेरेंट्सच्या मुली) मुलींना प्रवेश दिला जातो. अनाथ मुलींच्या राहण्याची व्यवस्था संस्थेतच असून सिंगल पेरेंट्स म्हणजे विधवा, परित्यक्ता स्त्रियांच्या मुली त्यांच्या आईबरोबर घरी राहतात. मला संस्थेच्या कार्याबद्दल जाणून घेतल्यावर संस्थेत काम करणार्यांविषयी खूप आदर दाटून आला. या मुलींना प्रेम देणं, वळणं लावणं, त्यांच्या समस्या समजून घेणं हे खूप आव्हानात्मक काम आहे, पण त्या आपल्याच मुली असाव्यात इतक्या आत्मीयतेनं इथला शिक्षक वर्ग हे सगळं करताना दिसला.
मुलींना ‘मी पुन्हा येईन’ असं आश्वासन दिलं आणि सगळ्यांचा निरोप घेतला!
दीपा देशमुख, पुणे