बारामतीत ‘अनर्थ’!

बारामतीत ‘अनर्थ’!

तारीख
-
स्थळ
Vidya Pratishthan Baramati

विद्या प्रतिष्ठान आणि एन्व्हॉयरमेंटल फोरम ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिबिंब तर्फे अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या पुस्तकावर मुलाखत संपन्न झाली. काल गुरूपोर्णिमा, सकाळीच आम्ही बारामतीच्या रस्त्याला लागलो. सोबत आमचा मित्र कल्याण तावरे होता. त्यामुळे सात मजली हास्य आणि गप्पा यांचा सिलसिला संपूर्ण प्रवासभर सुरू राहिला. निघाल्यापासून बारामतीकरांचे ‘वेलकम’चे मेसेजेस सुरू होते. आपली कोणीतरी वाट बघतंय ही भावना खूप सुखावणारी असते, त्यामुळे कधी एकदा बारामतीत पोहोचतो असं झालं होतं.

बारामतीशी माझा पहिला परिचय झाला तो यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईच्या वतीनं आयोजित केलेल्या युवती महोत्सवामुळे! त्यानंतर मी मुंबईहून पुण्यात आले, तेव्हा पहिल्यांदा कल्याण तावरेची ओळख अच्युत गोडबोलेंनी करून दिली. कधी कुठली अडचण आली, तर माझ्या या मित्राशी संपर्क साध असं सांगितलं. त्यानंतर बारामतीतलं आकर्षण स्थळ असलेली कल्याणची आर्याबाग इथं अनेकदा जाणं झालं. प्रत्येक वेळी तिथले कार्यक्रम आणि गेट-टूगेदर खूप काही देऊन गेले....बारामतीनं आणि कल्याण तावरेनं अनेक जिवाभावाचे मित्र-मैत्रिणी दिले. सुवर्णसंध्या, सुवर्णरेहा, दिनेश, ज्योती, डॉ. संजीव - साधना कोल्हटकर, डॉ. दर्शना-भास्कर जेधे, प्रतिभा, नीता, रुपाली, सीमा, सुचित्रा, सुनिताभाभी, मंगला शहा, दीपा, संगीता....आणि अनेक....सगळ्यांची नावं घेत नाही कारण पान पुरे पडणार नाही. दोन वर्षांपूर्वी बारामतीत महिला दिनानिमित्त मला बोलवण्यात आलं. तेव्हाही सुनेत्राताई, सुनंदाताई, पोर्णिमा तावरे. अश्विनी (माझी बहीण!) यांच्या भेटीनं आणि प्रत्यक्ष बारामतीच्या मैत्रिणींशी संवाद साधताना खूप आनंद मिळाला. हे सगळं आठवत असतानाच गदिमा सभागृह आलं!

आम्ही कार्यक्रम स्थळी प्रवेश केला. सभागृह भरलेलं....दीप प्रज्वलन, परिचय, स्वागत होताच संवादाची सूत्रं मी हाती घेतली. अनर्थ या विषयावर अच्युत गोडबोलेंना बोलतं केलं. मी या मुलाखतीविषयी जास्त सांगत नाही.

कारण फेसबुकमित्र उदय कुलकर्णी यांनी माझ्या आधीच त्यांची प्रतिक्रिया शेअर केलीय, तीच तुमच्यासाठी देते! "आज विद्या प्रतिष्ठान व Environmental forum of India यांच्या वतीने प्रतिबिंब व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.गदिमा सभागृहात श्री.अच्युत गोडबोले सर यांच्याशी प्रसिध्द लेखिका दीपाताई देशमुख यांनी संवाद साधला.विषयाचा आवाका फारच मोठा होता.विषय अतिशय गंभीर होता. परंतु दिपाताईंनी समर्पकपणे विचारलेले प्रश्न व अच्युतजींनी दिलेली मुद्देसुद सविस्तर उत्तरे यातुन हा अवघड विषय चांगलाच उलगडत गेला.

'अवघड सोपे झाले हो' याची अनुभूती श्रोत्यांना आली. दिपाताईंनी स्थानिक संदर्भ देत केलेल्या टिप्पण्यांमुळे परिस्थितीचे गांभीर्य नेमकेपणाने समोर आले.आपण स्वीकारलेल्या विकासनीती मुळे वाढती बेरोजगारी, विषमता आणि पर्यावरणाचा र्‍हास असे तीन मुख्य अनर्थ होत आहेत. तंत्रज्ञान माणसासाठी आहे याचा विसर पडल्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर चुकीच्या पध्दतीने होतो आहे.त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे.जागतिकीकरणा नंतर राबवलेल्या धोरणांमुळे देशातील वरच्या १५-२० % वर्गाचा प्रचंड फायदा होत आहे.ते आणि कनिष्ठवर्ग यांच्यातली दरी , विषमता प्रचंड प्रमाणावर वाढत आहे. पर्यावरणाच्या र्‍हासाचा वेग इतका प्रचंड आहे की ही विकासनीती देशाला व जगाला जणु सर्वनाशाच्या उंबरठ्यावर नेउन उभी करत आहे. हे विदारक वास्तव सरांंनी सोदाहण स्पष्ट केले.वरच्या वर्गाकडे येणारी संधींची उपलब्धता व सुबत्ता खालपर्यंत अजिबात झिरपत नाहीये.विकसित देशांनी आपला उत्पादन खर्च कमी व्हावा, नवनवीन बाजारपेठा व ग्राहकवर्ग उपलब्ध व्हावा यासाठी जागतिकीकरणाचा घाट घातला.चीन सर्वात मोठा उत्पादने पुरवठादार तर भारत सेवा पुरवठादार बनला.साफ्टवेअर क्षेत्रात मिळणार्‍या प्रचंड पगारामुळे तिकडे जाणारा लोंढा प्रचंड वाढला.त्यामुळे इतर क्षेत्रात तंत्रज्ञ -अभियंत्यांची कमतरता निर्माण झाली.त्याही क्षेत्रात प्रचंड पगारवाढ झाली.याचवेळी अकुशल मनुष्यबळाला मात्र तुटपुंज्या उत्पन्नात, हलाखीतच रहावं लागलं.परकीय भांडवल शेअर बाजारात आलं.कृत्रिम तेजी , प्रोपागंडा सुरु झाला.विकसित देशातल्या उत्पादनांसाठी नव श्रीमंत ग्राहक वर्ग तयार झाला.याच काळात शासन जीडीपी वाढावा व राजकोषीय तूट कमी व्हावी यासाठी कल्याणकारी खर्चातुन अंग काढुन घेउ लागलं.शिक्षण आरोग्य यासारख्या क्षेत्रातील खर्चात प्रचंड कपात करु लागलं. ह्याचा फटका कनिष्ठ वर्गाला बसला.आरोग्य सेवा अत्यवस्थ झाली.पोटाला चिमटा घेउन कनिष्ठ वर्ग मुलांना चकचकीत शिक्षण मिळावे याच्या मागे लागला.शासनाने खर्च कमी करण्या इतकेच उत्पन्न वाढवणेही गरजेचे होते.यासाठी संपत्तिचा प्रचंड हिस्सा बाळगणार्‍या श्रीमंतांवर, काॅर्पोरेटस् वर कर वाढवायला हवेत.ते वाढवण्यास सरकार राजी नाही.जीडीपी वाढला म्हणजे त्या प्रमाणात रोजगार निर्मिती होतेच असे नाही.

ग्रामीण भागात शेती परवडत नाही म्हणुन ते शेतीतुन बाहेर पडत शहरात येउ पहात आहेत.शिक्षणा अभावी व अकुशलतेमुळे ड्रायव्हर , वाचमन , फेरीवाले अशी तुटपुंज्या रोजगाराची कामे करीत आहेत.विकासनीती ही सर्वसमावेशक नाहीये तर एकांगी आहे.ही सर्वच राजकीय पक्षांची चुकीची धोरणे आहेत.स्वयंसेवी संस्था कामाचे माॅडेल उभं करु शकतात.परंतु शासनाची जागा घेउ शकत नाहीत.संपूर्ण परिवर्तन घडवु शकत नाहीत. त्यासाठी आपापले काम करीत धोरणे बदलण्यासाठी शासनावर दबाव आणायला हवा.चंगळवाद म्हणजे गरज नसताना सातत्याने वस्तु जमवीत राहणे.वस्तुंचा साठा करुन त्यातुन स्वतःःची ओळख निर्माण करणे.आपण कसे आहोत या पेक्षा लोक आपल्याकडे कसे पाहतात या वरुन आपण स्वतःःला जज करु पहातो.हे चुकीचे आहे.त्यामुळे हौस मौज अवश्य करा परंतु हव्यासापासुन दूर रहा.असे सरांनी तळमळीने सांगितले. व्यवस्थेचा फायदा स्वतःःला जास्तीत जास्त व्हावा याकडे लक्ष देउ नका तर व्यवस्था जास्तीत जास्त लोकांच्या फायद्याची व्हावी यासाठी धडपड करा.

एकुणच अंतर्मुख करणारा व ज्ञानात भर घालणारा असा हा सुरेख चर्चेचा कार्यक्रम होता.तरी वेळेअभावी पर्यावरणर्‍हासाचा मुद्दा विशेष चर्चेत आला नाही." - उदय कुलकर्णी कार्यक्रमानंतर बारामतीकरांची कडकडून भेट....संगीता काकडे अतिशय गोड असून ती पाककलेत निपूण आहे. प्रत्येक वेळी ती आवर्जून माझ्यासाठी लोणचं, साखरांबा, केक करून आणत असते. कालही कार्यक्रमाच्या ठिकाणी तिनं सगळं आठवणीनं आणलं होतं. खरं तर मला या प्रेमानं भरून आलं. या सगळ्याची उतराई कसं व्हायचं ठाऊक नाही, जमेल का नाही माहीत नाही....पण तिला जवळ घेतलं, स्पर्शाची भाषा तिला नक्कीच समजली असणार, कारण ती किती संवेदनशील आहे हे ठाऊक आहे.

सगळ्यांचा निरोप घेऊन डॉ. महेश गायकवाड यांना सोबत घेऊन सुप्याच्या दिशेनं कूच केलं. चिंकारा, मुंग्यांची वारूळ हे सगळं बघितलं, डॉक्टरांकडून या जंगलाची जैवविविधता समजावून घेतली. पुण्यात पोहोचलो.... बारामतीकरांनी केलेलं उत्कृष्ट नियोजन, त्यातही मिलिंद संगई, सचिन, श्रीराम गडकर, प्राचार्य शिंदे यांचं आतिथ्य आठवत होतं. खरं तर मनात कितिक वेळ बारामती घर करून होतं!

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो