अनर्थ - विशेष चर्चासत्र - मनोविकास पुणे

अनर्थ - विशेष चर्चासत्र - मनोविकास पुणे

तारीख
-
स्थळ
Maratha Chember of commerance Pune

अनर्थ अच्युत गोडबोले लिखित ‘अनर्थ’ या नव्यानं आलेल्या पुस्तकावर एक चर्चासत्र मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, स्वारगेट इथं ठेवण्यात आलं होतं. या चर्चासत्रात कॉम्रेड अजित अभ्यंकर, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, लेखक अच्युत गोडबोले आणि संवादक म्हणून दीपा देशमुख यांनी सहभाग घेतला होता. अनर्थ कार्यक्रमाचं नेमकं आणि नेटकं निवेदन सुप्रिया चित्राव या माझ्या मैत्रिणीनं केलं. विठ्ठल रामजी शिंदे यांचा ग्रंथ आणि अनर्थचा कॉफी मग भेट देऊन रीना पाटकर यांनी सहभागींचं स्वागत केलं.

त्यानंतर मनोविकासचे संचालक अरविंद पाटकर यांनी अनर्थ या पुस्तकाच्या निर्मितीमागची भूमिका सांगितली. चंगळवादाचे थैमान या साधनेनं प्रकाशित केलेल्या पुस्तिकेनंतर ते सातत्यानं अच्युत गोडबोले यांना या विषयावर विस्तृतपणे लिहा असा आग्रह करत होते. खरं तर २०१३ सालापासूनच या पुस्तकाच्या लिखाणाला सुरुवात झाली होती. पण त्यानंतर मध्ये अनेक प्रकल्प येत गेले आणि हे काम जरा बाजूला पडत गेलं. 'अर्थात' हे अच्युत गोडबोलेंचं अर्थशास्त्रावरचं महत्वाचं पुस्तक! या पुस्तकाचा पुढला भाग म्हणून 'अनर्थ'कडे बघता येईल.

अनर्थची टॅगलाईन - विकासनीतीः सर्वनाशाच्या उंबरठ्यावर आहे का असा प्रश्न उपस्थित केला आहे. याविषयी बोलताना उल्का महाजन आणि अजित अभ्यंकर यांनी ठामपणे विकासनीती ही विनाशाकडे नेणारी असल्याचं सांगितलं. त्यासाठी त्यांनी अनेक क्षेत्रातले दाखले दिले. अच्युत गोडबोले आणि अजित अभ्यंकर यांनी जीडीपी आणि जीडीपीझम याविषयी श्रोत्यांना सजग केलं. बेरोजगारीच्या कारणांविषयी ते बोलले. अजित अभ्यंकरांनी तर टॅक्स हेवन या विषयाला वाचा फोडली. हे प्रकरण किती भयंकर आहे याबद्दल त्यांनी अतिशय सोप्या भाषेत उपस्थितांना समजावून सांगितलं.

अच्युत गोडबोले यांनी शिक्षण आणि आरोग्य याविषयीची परिस्थिती बद्दल आकडेवारीसह अनेक गोष्टी सांगितल्या. उल्का महाजन यांनी सरकारचं धोरण, विकासाच्या नावाखाली होत असलेलं कष्टकर्‍यांचं शोषण, पिकाऊ जमिनी ताब्यात घेऊन त्यावर मोठमोठे उद्योग सुरू करण्याचा घातलेला घाट, यातून होणारं नुकसान, प्रदूषण, वाढती विषमता, याविषयी पोटतिडकीनं सद्यःस्थिती काय आहे हे सांगितलं. जागतिकीकरणाच्या परिणामाविषयी सर्व मान्यवर बोलले. तसंच शिक्षण, आरोग्य, सार्वजनिक वाहतूकव्यवस्था, स्वस्त घरं, रोजगार यासाठी सरकारनं पैसा कुठून आणायचा या प्रश्नावरही चर्चा झाली. पर्यावरणाचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे याविषयी चर्चा झाली. कार्यक्रमासाठी पन्नालाल सुराणा, उल्हासदादा पवार, डॉ. अनंत फडके, मुक्ता मनोहर सह मोठ्या संख्येनं पावसाची पर्वा न करता पुणेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. सलग अडीच ते पावणेतीन तास हा कार्यक्रम चालला.

चर्चासत्रानंतर श्रोत्यांनी प्रश्न विचारले. 'अनर्थ' हे पुस्तक कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना वाचा फोडणारं असून, याच्या जागोजागी कार्यशाळा होणं गरजेचं असल्याचं अजित अभ्यंकर आणि उल्का महाजन यांनी आवर्जून सांगितलं.

दीपा देशमुख, पुणे 

कार्यक्रमाचे फोटो