चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग

चिंतामणराव केळकर विद्यालय अलिबाग

तारीख
-
स्थळ
अलिबाग

परवा अलिबाग इथे चिंतामणराव केळकर विद्यालय आणि जवळच असलेल्या कुरळ या ठिकाणी विज्ञानविषयक कार्यक्रम होता. मी आणि मनोविकास प्रकाशनाचे अरविंद पाटकर पहाटेच अलिबागला जाण्यासाठी निघालो. मी पहिल्यांदाच अलिबाग बघणार होते, उत्सुकता होतीच. मला मी काम करत होते त्या आदिवासी गावांची आठवण रस्ता बघून होत होती, दोन्ही बाजूनी हिरवीगर्द झाडी, डोळे सुखावले. 
अलिबागला सर्वप्रथम डॉक्टर धामणकर यांच्याकडे गेलो. आजच्या काळात असा डॉक्टर शोधूनही सापडणार नाही. मुंबईसारख्या महानगराचा निरोप घेऊन डॉक्टर अलिबागला प्रॅक्टिस करताहेत, शाळेकडे बघताहेत. शाळेचे मुख्याध्यापक अमर वार्डे हा तर एकदम फणसासारखा असामी! बघाताक्षणी कठीण वाटणारा पण शाळेसाठी जीवतोड मेहनत घेणारा.... शाळा आणि मुले .... चित्रा्सारखी .... मुलांशी सव्वा तास गप्पा मारल्या, तरी मुले कंटाळली नाही. त्यानंतर कुरल मधल्या शाळेतही खूप मस्त अनुभव.... सुजाता पाटील सांगत होत्या, त्यांच्या शाळेत बिहार, उत्तर प्रदेश राजस्थान अशा अनेक राज्यातून कामाच्या शोधात आलेल्यांची मुले आहेत. या मुलांना सुरुवातीला मराठी नीट कळायची नाही, पण शिक्षकांनी अफाट परिश्रम घेऊन मुलांना शिकायची गोडी लावलीय. या चुणचुणीत मुलांशी संवाद साधताना खूप समाधान मिळालं. निरोप घेताना बुचाची दोन फुलं हातात देत ती पुन्हा येण्याचा आग्रह करत होती. 
तिथून पुन्हा केळकर विद्यालयात आलो येताना समुद्र दिसत होता. केळकर महाविद्यालयात मुलांनी जत्रा आयोजित केली होती. सगळं काही मुलांच्या हाती होतं.... अनेक स्टॊल्स मुलांनी उभारले होते, पालक खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते. मनोविकासचा स्टॉल तुडुंब गर्दीने फुलून गेला होता. अरविंद गुप्ता यांची, सुपर हिरो, जिनियस आणि कॅनव्हास पुस्तकांना मिळणारा प्रतिसाद बघून मस्त वाटत होतं. जत्रा संपताना पारंपरिक ढोल ताशा सारख्या वाद्यांच्या तालावर मुले आणि मुली मनसोक्त नृत्य करत होती. एकूणच अलिबागचा अनुभव खूप विलक्षण होता, कायम लक्षात राहील.

कार्यक्रमाचे फोटो