नाशकात रंगलेली सिंफनी.....15 June 2019

नाशकात रंगलेली सिंफनी.....15 June 2019

तारीख
-
स्थळ
Kusumagraj Pratishthan Nashik

नाशकात रंगलेली सिंफनी..... १५ जून २०१९, शनिवार या दिवशी नाशिकच्या विशाखा हॉल, कुसुमाग्रज स्मारक इथं सिंफनीचा कार्यक्रम दोन महिन्यांपासून ठरला होता. अखेर काल हा कार्यक्रम संपन्न झाला. नाशिकमध्ये काल १५ ते १८ लग्न-समारंभ होते शिवाय इतर सांस्कृतिक कार्यक्रम वेगळेच, तसंच पावसानं आभाळ भरून आलेलं, नाशिकला पावसाळ्यात काढलेलं रस्त्याचं खोदकाम आणि त्यामुळे आपोआप झालेला एकेरी मार्ग या सगळ्यांमुळे सिंफनीच्या कार्यक्रमाला पुरेसे रसिक येतील की नाही अशी शंका अच्युत गोडबोले यांनी मला बोलून दाखवली. पाच लोक असो की पाच हजार, मी स्वतः शांत असते. त्यामुळे मी त्यांना आश्वस्त केलं आणि सहाचा कार्यक्रम साडेसहा वाजता सुरू झाला.

आम्ही हॉलमध्ये प्रवेश केला, तेव्हा संपूर्ण हॉल लोकांनी भरलेला होता. (नंतर उशिरा आलेल्या लोकांना मागे उभं राहूनच कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा लागला!) लोकांनी टाळ्यांच्या कडकडाटात आमचं स्वागत केलं. वैशाली (माझी मैत्रीण) हिनं अतिशय सुटसुटीत आणि नेटकं असं निवेदन केलं. पुस्तक पेठ, नाशिकचा निखील दाते यानं आमचं पुस्तक भेट देऊन स्वागत केलं. कार्यक्रमाला लगेचच सुरुवात झाली.

मी समोर बघत होते, नाशिकमधले रसिक दिग्गज श्रोते सभागृहात दिसत होते. लोकेश शेवडे, किशोर पाठक, विद्या फडके, श्रीकांत गायकवाड, मिलिंद मुरूगकर, आश्विनी कुलकर्णी, जिल्हाधिकारी संगीता धायगुडे, विनायक रानडे, स्वाती मानके आणि असे अनेकजण....अनेकजण अनोळखी होते, पण त्यांच्या चेहर्‍यावर ओळखीचं हासू होतं. ....फिनलँडवरून भारतात आलेले माझे मित्र हेरंब आणि शिरीन कुलकर्णी यांना बघून तर मी आणखीनच सुखावले. शुभम आणि ऋषिकेष हे युवामित्र तर खूप लवकर आले होते. कार्यक्रमाला सुरुवात झाली. पुण्यात आशय फिल्म्सतर्फे फिल्म अर्काइव्ह, पुणे कामगार युनियन तर्फे गणेश कला क्रीडा, थिंक ग्लोबल फाऊंडेशनतर्फे नगर मध्ये असे सिंफनीचे कार्यक्रम खूप छान झाले होते.

मात्र नाशिकचा कार्यक्रम काही औरच रंगला. श्रोत्यांची दाद इतकी सुरेख होती की आमचाही उत्साह वाढत गेला, ठरवलेल्या मुद्दयांपेक्षा आणखी नवं नवं आठवत होतं, ते उपस्थितांबरोबर शेअर करायला आणखीनच मजा येत होती. जसजसे किस्से पुढे सरकत होते, पाश्चात्य धुन वाजत होती, हिंदी चित्रपट संगीत पडद्यावर दिसत होतं आणि प्रेक्षक/श्रोते यांच्या चेहर्‍यावर आश्चर्य, आनंद आणि ओठांतून बाहेर पडलेली उत्स्फूर्त दाद हे दृश्य बघून मी सुखावून गेले. गेली तीन वर्षं सिंफनीचं चाललेलं काम सार्थकी लागतंय याचा आनंद एकीकडे होत होता. पाश्चिमात्य संगीत आणि संगीतकार लोकांपर्यंत पोहोचावेत याच उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन होतं.

नाशिकच्या पुस्तक पेठेच्या निखील दाते या तरुण मित्रानं खूप धडपड करत कार्यक्रमाची जय्यत तयारी केली होती. अपूर्व तर घरातलाच, पण त्याच्या तांत्रिक साहाय्यामुळे आम्ही कार्यक्रमाच्या वेळी अगदी निर्धास्त असतो. याही वेळी त्यानं सिंफनीमधले क्यूआरकोड कसे उपयोगात आणायचे याचं प्रात्यक्षिकही दिलं.

सिंफनीची निर्मिती, आम्ही एकत्रित सिंफनी का लिहिलं, सिंफनी लिहिताना पाश्चात्त्य संगीताच्या इतिहासाचा झालेला अभ्यास, संगीतातले कालखंड, बदलत गेलेलं संगीत आणि संगीतकार याबद्दल आम्ही बोललो. मोत्झार्ट, एल्व्हिस प्रिस्ले, बीटल्स, मरियम मकेबा, विवाल्डी, बाख यांच्यासह शंकर जयकिशन, ओ. पी. नैय्यर, सी. रामचंद्र, लक्ष्मीकांत प्यारेलाल, सलिल चौधरी यासह नामवंत संगीतकारांची गाजलेली गाणी दृकश्राव्य माघ्यमातून लोकांसमोर सादर केली. कार्यक्रम भराभर पुढे सरकत होता. निरोपाचं 'सायोनारा' गाणं कधी येऊन पडद्यावर झळकलं आमचं आम्हालाही कळलं नाही. टाळ्यांचा कडकडाट झाला, तेव्हा आम्ही भानावर आलो.

पुस्तक पेठेनं स्टॉलवर सवलतीच्या दरात उपलब्ध करून ठेवलेल्या 'सिंफनी'च्या सगळ्या प्रती संपल्या आणि निखीलनं तत्परतेनं उपस्थितांचे संपर्क क्रमांक घेत त्यांना घरपोच पुस्तक पाठवण्याचं कबूल केलं. सिंफनीवर स्वाक्षर्‍या करताना अनेक नवीन चेहर्‍यांची ओळख झाली. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमाला श्रद्धा नावाची कला शाखेच्या दुसर्‍या वर्गात शिकत असलेली एक हसरी तरुणी व्हील चेयर मध्ये बसून आली होती. तिला आमच्याबरोबर फोटो काढायचा होता. तिचे आई-वडील आणि भाऊ सोबत होते. तिला सिंफनी कार्यक्रम खूप आवडल्याचं ती सांगत होती.

आमच्या सगळ्या कार्यक्रमातला श्रद्धाचा जो प्रतिसाद होता, प्रतिक्रिया होती ती मला लाखमोलाची होती आणि आहे. काही क्षण श्रद्धाच्या आयुष्यात आपण आनंद पेरू शकलो याचा आनंद खूप वेगळा होता. सगळ्यांकडून कौतुकाची थाप घेऊन तृप्त मनानं परतले, परतताना नव्या प्रकल्पाचे वेध मनाला लागले हे वेगळं सांगायलाच नको! थँक्स नाशिककर, आपल्या अप्रतिम अशा प्रतिसादासाठी!

दीपा देशमुख, पुणे

कार्यक्रमाचे फोटो