लोणावळा, खंडाळा आणि कामतचा वडा!

लोणावळा, खंडाळा आणि कामतचा वडा!

तारीख
-
स्थळ
Lonavala Khandala

रात्री झोपताना अपूर्वनं म्हटलं, 'ममा, उद्या सकाळी सहा वाजता तयार हो. आपण लोणावळ्याला जाऊ.' मला खूपच आश्चर्य वाटलं. अचानक अपूर्वने इतकं मनावर कसं घेतलं. मी आनंदात झोपी गेले. पहाटे लवकर उठून तयार झाले. सख्ख्या मैत्रिणीनं - सुवर्णसंध्यानं- आणलेला ड्रेस घालून गाडीत बसले. अपूर्वनं छानशी गाणी लावली आणि आमची गाडी लोणावळ्याचा रस्ता कापू लागली. खंडाळ्याला उड्डाणपुलाच्या बाजूला असलेल्या कामतच्या रेस्टारंटमधला बटाटेवडा आणि पुदिन्याची चटणी मला जाम आवडते. अनेक वर्षं मुंबईहून येताना आणि पुण्याहून मुंबईला जाताना हा बटाटेवडा खाल्ल्याशिवाय प्रवासच केला नाही.

मध्यंतरी माझ्या नाजूक झालेल्या प्रकृतीमुळे कार्यक्रमाव्यतिरिक्त होत असलेला माझा मुंबईचा प्रवास थांबला आणि कामतचा वडा खाणंही! अपूर्वमुळे पुन्हा अनेक दिवसांनी हा योग जुळून आला. आम्ही बटाटेवडा आणि पुदिन्याची चटणी यावर मनसोक्त ताव मारला. मी कधीही लोणावळा आणि खंडाळा हायवेशिवाय बघितलं नव्हतं. खरं तर भोंडे हायस्कूलमध्ये दोन वेळा कार्यक्रमासाठी जाणं झालं होतं. भोंडे पती-पत्नी नेहमीच त्यांच्याकडे दोन दिवस राहायला येण्याचा आग्रह करत असतात, पण तेही जमलं नव्हतं.

आज घाटातून, हिरव्यागार झाडीतून अपूर्व गाडी काढत होता आणि मी आजूबाजूची हिरवाई बघून खूपच आनंदून गेले होते. लॉयन पॉइंटला आम्ही पोहोचलो. पांढर्‍याशुभ्र ढंगांचे कापसासारखे भासणारे असंख्य पुंजके इकडून तिकडे लगबगीनं चालले होते. स्वप्नवत वाटत होतं. त्या ढगांना पकडावं वाटत होतं. आमचा परमनंट फोटोग्राफर अपूर्व फोटो आणि व्हीडीयो काढण्यात मग्न झाला होता.

परत निघताना रस्त्याच्या कडेला क्रॉकरीची छोटीछोटी दुकानं लागली. तीन वर्षांपूर्वी एका छोट्याशा हॉटेलमध्ये अपूर्व आणि मी अनेकदा जेवायला जायचो. अपूर्वच्याच वयाच्या मुलानं ते हॉटेल चालवायला घेतलं होतं. तिथल्या प्लेट्स आणि काचेची भांडी मला खूपच आवडत. एकदा न राहवून मी त्याच्या प्लेट्स, बाऊल आणि भांड्यांची प्रशंसा केली आणि ती कुठून आणली विचारलं. तेव्हा तो म्हणाला होता, लोणावळ्याला गेलात की तुम्हाला तिथं मिळतील...ते सगळं मला आठवलं. त्यानं सांगितल्यावरही लोणावळ्यात मुद्दाम जाणं कधी जमलं नव्हतं.

अपूर्वनं गाडी थांबवली होती. मी गाडीतून उतरले. मनसोक्त खरेदी केली. सूपसाठी बाऊल पासून सगळं काही! परतीच्या प्रवासात, अपूर्व म्हणाला, 'ममा खुश ना?' मी फक्त त्याच्याकडे बघितलं, उत्तर दिलंच नाही...मला ‘येस बॉस’मधला शाहरूख खान आठवत होता. 'बस इतनासा ख्वाब है' म्हणणारा! माझ्याही अशाच छोट्या छोट्या इच्छा आहेत आणि त्या आपोआप, न मागता पूर्ण होतात, 'जिने को और क्या चाहिये?'

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

कार्यक्रमाचे फोटो