पुणे वेध कट्टयावरचा ‘अनर्थ’

पुणे वेध कट्टयावरचा ‘अनर्थ’

तारीख
-
स्थळ
Vedh Katta Pune

१८ मे या दिवशी पुण्यातल्या वेध कट्टयावर अच्युत गोडबोले यांच्या 'अनर्थ' या नव्या पुस्तकाविषयीची मुलाखत आयोजित करण्यात आली होती. 'अनर्थ'च्या प्रकल्पात सुरुवातीपासून म्हणजे अगदी २०१३ पासून मी सहभागी आणि साक्षी असल्यानं ही मुलाखत मी घ्यावी असा वेधच्या आयोजकांचा प्रस्ताव होता. अर्थातच मी आनंदानं होकार दिला. १८ तारखेला सायंकाळी ६ वाजता सुरू होणार्‍या कार्यक्रमासाठी नियोजित स्थळी अच्युत गोडबोले, अपूर्व देशमुख, गीता भावसार आणि मी पोहोचलो. वेधचे संयोजक दीपक पळशीकर आणि मिसेस पळशीकर यांनी आमचं स्वागत केलं. कार्यक्रम टेरेस म्हणजेच गच्चीवर होणार होता. तीन भागांत, रांगांमध्ये खुर्च्या टाकलेल्या होत्या. आमच्या पुस्तकांचा सवलतीच्या दरातला रसिक साहित्यचा स्टॉल एकीकडे लागलेला होता.

बघता बघता काहीच मिनिटांत गर्दीनं टेरेस फुलून गेलं. यात शारदा बापट, हेरंब कुलकर्णी, मुक्ता मनोहर, डॉ. अनंत फडके, अजित अभ्यंकर, आनंद करंदीकर, सरिता आव्हाड, डॉ. सदानंद कुलकर्णी, डॉ. मानसी देशमुख, सारंग ओक, वैजयंती ठाकूर, रुपा ब्रह्मे, हृषिकेश, श्रद्धानंद यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. गेली १२-१३ वर्षं मी अच्युत गोडबोले यांना ओळखत असल्यामुळे आणि त्यांच्या एकूणच लिखाणामागचा उद्देश माहीत असल्यामुळे त्यांना प्रश्न विचारणं माझ्यासाठी फारसं कठीण नव्हतं. कठीण गोष्ट ही होती, की त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप मोठं भांडार असतं आणि माझ्याकडे असणार्‍या दीड तासाच्या तुटपुंज्या वेळात मला 'अनर्थ' पुस्तकाविषयी अनेक प्रश्न विचारून संवाद साधायचा होता. तसंच याच वेळात उपस्थितांना पडलेले प्रश्नही घ्यायचे होते. माझे निवडक, महत्त्वाचे प्रश्न आणि अच्युत गोडबोले यांची नेमकी उत्तरं याची एकत्रित गाठ बांधायची होती.

तसंच मुलाखत घेताना माझे आदर्श म्हणजे डॉ. आनंद नाडकर्णी असल्यानं त्याबाबतीतली भीती कमी होती. कारण मी ज्या ज्या वेळी डॉक्टरांना ऐकते, बघते तेव्हा मी अचंबित होते. डॉक्टरांनी कधीही समोरचा आपल्यापेक्षा किती मोठा आहे, किंवा लहान आहे हे बघितलेलं नाही. ते समोरच्याला ज्या पद्धतीनं बोलतं करतात, ते खरोखरंच बघण्यासारखं आणि ऐकण्यासारखं असतं. त्यांनी रंगवलेला तो संवाद एखाद्या मैफिलीसारखा रंगत रंगत एक विलक्षण उंची गाठतो. त्यात नाट्यमयता असते, उत्कंठा असते आणि समोरच्या श्रोत्याला खिळवून ठेवण्याचं अफलातून कसबही असतं. मी डॉक्टरांमधली ही सगळी कौशल्यं कधीच आत्मसात करू शकणार नसले, तरी त्यांना याबाबतीत गुरू मानून प्रयत्न नक्कीच करू शकते. त्यामुळे मुलाखतीचं हे आव्हान मी स्वीकारलं होतं.

'वेध कट्टा' सुरू करण्यामागचं प्रयोजन प्रदीप कुलकर्णी यांनी सांगितलं. कला, क्रीडा, साहित्य, विज्ञान, मानसिक आरोग्य अशा अनेक क्षेत्रातल्या दिग्गज व्यक्तींना बोलावून त्यांच्याशी संवाद साधत आपण समृद्ध व्हायचं या हेतूनं सुरू केलेला वेध कट्टा माणसामाणसांना जोडणारा एक दुवा ठरतो आहे. वेधकट्टयाचं हे तिसरं पुष्प अच्युत गोडबोले आणि मी - आम्ही गुंफणार होतो. पहिल्या वेध कट्टयात प्रतिभा रानडे यांनी फैज अहमद फैज यांच्याविषयी श्रोत्यांशी संवाद साधला. त्यानंतर दुसर्‍या पुष्पात कर्नल पाटणकर यांनी काश्मीर प्रश्नाबद्दल मांडणी केली होती. प्रदीप कुलकर्णी यांनी अच्युत गोडबोले आणि माझा परिचय करून दिला, त्याचबरोबर वेध कट्टयातर्फे एक सुरेखशी भेट आम्हाला दिली. लगेचच कार्यक्रम सुरू झाला.

विज्ञान, तंत्रज्ञान, गणित, चित्रकला, चित्रपट, संगीत, साहित्य, तत्वज्ञान, अर्थशास्त्र, मानसशास्त्र अशा सगळ्यांच क्षेत्रात लीलया मुसाफिरी करणार्‍या अच्युत गोडबोले यांची लिखाणामागची प्रेरणा काय असा प्रश्न विचारताच, त्यांनी 'लहानपणापासून आपल्या मनात उमटलेलं कुतूहल' असं उत्तर दिलं. तसंच जगभर घडणार्‍या घटनांकडे लक्ष असणार्‍या अच्युत गोडबोले यांना अनेक वर्षांपासून बीबीसी, सीएनएन, अलजझिरा, रशियन टीव्ही, एनडीटीव्ही, इंडिया टुडे, मिरर नाऊ असे अनेक चॅनेल्स बघण्याची/ऐकण्याची सवय आहे. तसंच हिंदू, इंडियन एक्स्प्रेस असे अनेक वर्तमानपत्रं वाचून जगभर काय चाललंय याबद्दल ते सतत जाणून घेत असतात. त्यावर चिंतन करत असतात.

'अनर्थ' लिहिण्यासाठी असीम श्रीवास्तव आणि आशिष कोठारी यांचं 'चर्निंग द अर्थ' हे पुस्तक कारणीभूत ठरलं. हे पुस्तक वाचल्यानंतर अच्युत गोडबोले भारावून गेले आणि 'अनर्थ' हे पुस्तक लिहायला सुरुवात झाली. हे पुस्तक भारतीय अर्थव्यवस्थेवर असून त्यांच्याच 'अर्थात' या पुस्तकाचा पुढला भाग आहे असं म्हटलं तरी चालेल. शिक्षण, आरोग्य, रोजगार, शेती, उद्योग, विषमता, गरिबीची कारणं, वाढता चंगळवाद, विकासनीती, पर्यावरण, जीवनशैली आणि बदलती मानसिकता, अशा अनेक विषयांवर हे पुस्तक भाष्य करतं. जीडीपी आणि जीडीपीइझम म्हणजे काय, करप्रणाली, जागतिकीकरण म्हणजे काय, त्याचा इतिहास, आजची शिक्षणव्यवस्था, आरोग्याच्या क्षेत्रातली उदासीनता, बेरोजगारीची कारणं आणि उपाय, स्वयंसेवी संस्थांची या क्षेत्रातली भूमिका आणि आवश्यकता, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात काय काय होण्याची गरज आहे आणि काय घडत नाहीये याची अधिकृत आकडेवारी, पर्यावरण आणि हवामानबदल, पर्यावरणाच्या अरिष्टाचा आणि विकासनीतीचा संबंध, चंगळवाद, आणि चंगळवादामुळे निर्माण होणारा ई-कचरा, मोटारगाड्या, सौंदर्यंप्रसाधनं, शीतपेयं, फास्ट फूड या सगळ्या वस्तूचं आपल्या आयुष्यावर होत असलेलं अतिक्रमण आणि त्याला पूरक असणारी जाहिरातबाजी! या सगळ्या विषयांवर अच्युत गोडबोले भरभरून पण अतिशय परखडपणे बोलले.

या विषयामुळे आपण अनेक वर्षांपासून अस्वस्थ आहोत आणि हीच अस्वस्थता आणि बैचेनी 'अनर्थ' वाचल्यानंतर वाचकांनाही येईल असं ते म्हणाले. स्वयंसेवी संस्था असोत, वा सर्वसामान्य माणूस प्रत्येकानं सरकारला जाब विचारला पाहिजे, दबावगट तयार केले पाहिजेत, एक चळवळ उभी केली पाहिजे आणि हा प्रश्न व्यवस्थेच्या पातळीवर सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहिलं पाहिजे असं ते म्हणाले. डॉ. सदानंद कुलकर्णी, सारंग ओक, हेमंत देवस्थळी यांनी या प्रसंगी काही प्रश्न अच्युत गोडबोले यांना विचारले आणि त्यांनी त्या प्रश्नांची यथोचित उत्तरं दिली. कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन डॉ. ज्योती शिरोडकर यांनी केलं. ज्योती ही खूप कमी वेळात माझी मैत्रीण बनली. डॉ. आनंद नाडकर्णींबरोबर 'वेध' मध्ये ती मुलाखत घेत असते. एक कुशल डॉक्टर बरोबरच कला आणि साहित्य, संवादक म्हणून तिचं जेवढं कौतुक करावं तेवढं थोडचं आहे. वेध कट्टा कार्यक्रम संपेपर्यंत एकही व्यक्ती जागची हलली नाही हे विशेष! अतिशय गांभीर्यानं या विषयावर विचार करणारा श्रोतुवर्ग वेधकट्टयावर उपस्थित होता. यात प्रौढांबरोबरच तरूणाईची देखील तितकीच गर्दी होती.

कार्यक्रम संपल्यावर सगळ्याच ओळखीच्या, अनोळखी व्यक्तींबरोबर संवाद आणखीच रंगला. असे कार्यक्रम खरोखरंच समाधान देऊन जातात. आपण जे लिहितोय तो विचार अनेकांपर्यंत पोहोचतो, त्याचबरोबर अनेक नव्या विचारांची माणसं या निमित्तानं भेटतात, त्यांच्याबरोबर संवाद घडतो आणि ते नातं अधिक दृढ होत जातं. आम्हाला वेध कटट्यात सहभागी होण्यासाठी बोलावलं त्याबद्दल पुणे वेध कट्टा टीमचे मनःपूर्वक खूप खूप आभार! जरूर वाचा "अनर्थ"!!!!

..... यानंतर मनोज आणि मंदार या जोडगोळीनं आम्हाला 'स्वरूप हॉटेल'मध्ये अतिशय अगत्यानं जेवायला नेलं. 'स्वरूप'मध्ये आमचं गरमागरम जेवण तयार होतंच. भरल्या वांग्याची भाजी, आमटी, पिठलं, घरगुती लोणचं, मिक्स भाजी आणि खास हापूसचा आमरस असं सुग्रास जेवण आम्ही केलं. मंदार कुलकर्णी यांनी पाचच मिनिटांत एक अनोखं प्रेझेंटेशन आम्हाला त्यांच्या लॅपटॉवर दाखवलं. त्याबद्दल पुन्हा सविस्तर लिहीनच. नेहमीच प्रसन्न असणार्‍या आणि साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई ढेरे यांची तिथंच धावती भेट झाली.

जेवण करून गेटबाहेर पडताच समोरून चंदू (दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी) आला. मग काही वेळ त्याच्याबरोबर गप्पा रंगल्या. अच्युत गोडबोले आणि चंदू यांनी दुसर्‍या कोणाला टारगेट न करता माझी फिरकी घ्यायला सुरुवात केली. एकूणच वेध कट्टा, नंतर 'स्वरूप'चं जेवण आणि त्यानंतर चंदूबरोबरच्या गप्पा - मजा आ गया!

दीपा देशमुख, पुणे.  १८ मे २०१९

कार्यक्रमाचे फोटो