जहाँ चार यार मिल जाये, ...कलाम, शमा, उत्पल और मै ..
केसीईएस मॅनेजमेंट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट विद्यापीठ आणि व वा वाचनालय जळगाव यांनी - नव्या पिढीची वाचन संस्कृती - या वेबिनारचं आयोजन - आज केलं होतं. खरं तर आज एकाच परिवारातले आम्ही तिघेजण एकत्र आलो होतो. मिळून साऱ्याजणी परिवारातली शमा, उत्पल आणि मी! आजच्या वेबिनारमध्ये मला आणि उत्पल दोघांनाही आनंद मिळाला. मुख्य म्हणजे आम्ही एकमेकांशी तू काय बोलणार, मी काय बोलणार याविषयी काहीही चर्चा केलेली नसतानाही कुठलेही मुद्दे एकमेकांना येऊन धडकले नाहीत.
सुरुवातीला आयोजकांचे आभार मानत, वाचन प्रेरणा दिनाचं औचित्य साधत एपीजे अब्दुल कलाम यांना विनम्र अभिवादन करत त्यांच्या काही स्मृती जागवल्या.
रामेश्वरमसारख्या धार्मिक ठिकाणी जन्मलेला एक मुलगा,
मंदिर आणि मशिद यांना एकाच नजरेतून बघणारा,
कष्टाची किंमत लहानपणीच समजलेला,
दिनमणीसारखं वर्तमानपत्रं घराघरात टाकणारा
विनम्र, विनयशील, जिज्ञासा आणि कुतूहल असलेला
आकाशात पक्ष्यासारखं उडायची स्वप्नं बघणारा
आई, वडील, शिक्षक, परिस्थिती,
अनुकूल-प्रतिकूल
सार्यांनाच गुरू मानणारा
सकारात्मक विचारांची ऊर्जा घेऊन चालणारा
अपमानातून घडणारा, शिकणारा
पुस्तकांच्या ओढीनं धाव घेणारा
खलिल जिब्रान, टॉलस्टॉय, एलियट यांच्या विचारांवर प्रेम करणारा
रामानुजन, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न,
असे अनेक पुरस्कार आणि मानसन्मान प्राप्त करणारा
अग्निपंखांनी भरारी घेत, मर्यादांच्या सीमा ओलांडून जाणारा
भारताचा सुपुत्र म्हणजेच एपीजे अब्दुल कलाम!
कलामांच्या आई-वडिलांनी त्यांच्यात केलेली चांगुलपणाची रुजवणूक, प्रार्थना म्हणजे विश्वशक्तीशी एकरूप होणं ही दिलेली शिकवण, संकटं आपल्याला आत्मपरीक्षण करण्याची संधी देतात हे सांगणं, आणि जन्मभरासाठी पुस्तकांची दिलेली सोबत. कलामांच्या आयुष्यातल्या काही आठवणी सांगत त्यांच्या मृत्यूनंतरही त्यांची मागे राहिलेली संपत्ती काय होती, तर चार-पाच पोशाख आणि मिळालेले पुरस्कार. ना त्यांच्याजवळ स्वत:चं घर होतं, ना गाडी, ना एसी , ना फ्रीज. स्वत:ची पेन्शन देखील त्यांनी आपल्या गावच्या विकासासाठी देऊन टाकली होती. आपले तत्कालीन पंतप्रधान लालबहादूर शास्त्री प्रमाणेच हा एक साधा माणूस, आपला माणूस!
जेव्हा सीएनएन आणि आयबीएन यांनी ग्रेटेस्ट इंडियनचं सर्व्हेक्षण केलं, तेव्हा पहिल्या क्रमांकावर डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर दुसऱ्या क्रमांकावर एपीजे अब्दुल कलाम होते.
अब्दुल कलामांच्या जडणघडणीत पुस्तकांचा किती मोलाचा वाटा होता, याविषयी बोलताना माझा लाडका शास्त्रज्ञ रिचर्ड फाईनमन न आठवला तर नवलच. त्याला त्याच्या वडिलांनी आणून दिलेला एन्सायक्लोपिडिया, त्याची जिज्ञासा, त्याचं कुतूहल, त्याचं कलासक्त अभ्यासू मन, त्याच्यातला मानवतावाद... त्याचं नुसतं नाव निघालं तरी भावनांनी ओथंबलेले शब्द धबधब्यासारखे कोसळू लागतात.
वाचनानं काय काय घडतं, याविषयी बोलताना मी माझे काही अनुभव शेअर केले. सगळ्या प्रकारचं वाचन केलं पाहिजे कारण त्या त्या प्रकारचं वाचन आपल्या जडणघडणीत खूप मोठी भूमिका बजावतं. परीकथा/काल्पनिक कथा/चमत्कारांनी भरलेल्या कथा आपल्याला कल्पनेचे पंख देऊन भरारी घ्यायला शिकवतात, तर गूढ अदभुतरम्य रहस्य कथा आपल्यातली उत्कंठा वाढवत आपल्याला तार्किक विचार करायला भाग पाडतात, सामाजिक, वैचारिक, ऐतिहासिक प्रकारातलं लिखाण चिंतन करायला लावतं, पुढे जाण्याची दिशा दाखवतं. खरं तर कोणती पुस्तकं वाचावीत हे कोणाला विचारूच नये, कारण पुस्तकं स्वत:च सांगतात कुठलं चांगलं आणि कुठलं नाही.
वाचताना भाषेचा अडथळा येत नाही, आपल्या मातृभाषेशिवाय इतरही भाषा आपल्या जिवलग बनतात. मात्र त्यासाठी थोडा संयम, परिश्रम आणि सातत्य यांची जोड हवी. पुस्तकंच वाचायची नसतात, तर चालती बोलती जिवंत माणसं ही देखील कधी कधी पुस्तकांचं रूप घेतात, मग तीही वाचावीत.
आजची पिढी, तरुणाई - वाचते की. मराठी वाचते, इंग्रजी वाचते, अनुवाद वाचते...फक्त त्यांची वाचणाची माध्यमं शहरांनुसार बदलली आहेत. तंत्रज्ञानाद्वारे इंटरनेट, स्मार्ट फोन्स, संगणक हे सारं निवडक
शहरांपुरतं आणि सुस्थितीतल्या लोकांजवळ असण्यापुरतं न राहता ते तळागाळापर्यंत पोहोचलं पाहिजे. मग गावातले लोकही किंडलवर पुस्तकं वाचू शकतील. आज मात्र त्यांच्याकडे छापील पुस्तकं वाचायला उपलब्ध होत नाहीत, तर हा मार्ग सध्या तरी त्यांच्यासाठी थोडा दूरचाच आहे.
आज तरुण साहित्यिकांमध्ये साहिल शेख, देवा झिंजाड, हनुमंत चांदगुडे, बालाजी सुतार, फारुक काझी, प्रणव सखदेव, हृषिकेश गुप्ते, वैभव देशमुख, चैतन्य सरदेशपांडे, विवेक राजापुरे, शिरीष देशमुख, नवनाथ गोरे, डी. के. शेख, सुशील धसकटे, दासू वैद्य, इंद्रजित भालेराव, उमेश घेवरीकर, उत्पल, आणि सानिया भालेराव ही तरुण मंडळी खूप चांगलं लिखाण करताहेत. त्यांची पुस्तकं तर प्रकाशित आहेतच, पण सोशल मीडियावर त्यांचं लिखाण विशेष करून लोकप्रिय आहे.
बालाजी सुतार याच्या दोन शतकांच्या सांध्यावरची गोष्ट, आजच्या प्रत्येक क्षेत्रातल्या वास्तवाचं भान करून देणारी, अस्वस्थ करणारी अशी, तर साहिल शेखचा सविनय अस्वस्थ यातल्या कथा वास्तव आणि माणुसकी यांचं दर्शन घडवणाऱ्या, ह्षिकेश गुप्तेची परफेक्टची बाई आणि फोल्डिंगचा पुरुष यातून ॲब्स्ट्रॅक्ट पद्घतीनं लैंगिकतेवर भाष्य करणारा कथासंग्रह, काळेकरडे स्ट्रोक्ससारखी कादंबरी लिहिणारा प्रणव सखदेव, वैभव देशमुखच्या ठसठसत्या सामाजिक वास्तवाची जाणीव करून देणाऱ्या कविता, त्याच वेळी प्रेमात आकंठ बुडायला लावणाऱ्या प्रेमकविता, हनुमंत चांदगुडेच्या शेतकऱ्याच्या व्यथा मांडणाऱ्या कविता, तर देवा झिंजाडसारखा तरुणाचं सारंच उलथवून दिलं पाहिजे हे पुस्तक. फारूक काझी आणि डी के शेख यांची पुस्तकं तर मुलांसाठी पर्वणीच असते. डी. के. शेख दखणी भाषेचा लहेजा सांभाळत कविता लिहितात. नवनाथ गोरेचं फेसाटी हे पुस्तक म्हणजे दारिद्र्य, कर्ज, फरफट, शेतीमधलं दाहक वास्तव यांचं दर्शन घडवणारं आहे. सानिया भालेराव, डावकिनाचा रिच्या, रुचिरा सावंत, प्री ही सोशल मिडियावर अत्यंत सकस आणि सशक्त लिहिणारी तरुण मंडळी आहेत. कला आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर लिहिताना हे लोक अतिशय सजगतेनं लिहितात.
या सगळ्यांबरोबरच एक महत्वाचं नाव म्हणजे उत्पल. इंजिनियर असलेला उत्पल हा फक्त एक कवी नसून तो एक संवेदनशील पत्रकार, गंभीरपणे लिखाण करणारा अभ्यासू साहित्यिक आणि संपादक आहे. अरे हो, शिवाय एक हाडाचा कार्यकर्ताही आहे.
उत्पलच्या कवितेतल्या काही ओळी:
मनाचेच सारे, मनाचेच सुख,
मनाचेच शोष, मुक्तीच्याही दारी.
मनाचे उधाण, मनाचा कैवार,
मनाचे बोलणे, आवडीचे.
मन आकाश झाकोळे, मनी पाऊस पाझरे,
मन धरित्रीचे वारे, सैरभैर.
मनाच्या या भिंती, अरण्याचे भास,
मनाच्या रेघोट्या, गगनांतरी.
जे होई मना जड, त्याला शब्द शब्द स्पर्श
मनाचे मौक्तिक, सापडते...
तरुणांशी मी जेव्हा बोलते, तेव्हा त्यांना व्यकंटेश माडगुळकर, आंबेडकर, गांधी आणि पुलंपासून नव्यानं लिहिणारे लेखक आवडतात. इंग्रजीमध्ये ही मुलं बिल ब्रायसन, युवाल हरारी, मुराकामी, रिचर्ड डॉकिन्स यांची पुस्तकं वाचणं पसंत करतात.
अनिल अवचट, अनंत भावे, आ. ह. साळुंखे, अच्युत गोडबोले, वीणा गवाणकर, रंगनाथ पठारे, लक्ष्मीकांत देशमुख, सदानंद देशमुख, राजन गवस, प्रज्ञा पवारसह अनेकांनी वाचनाची गोडी जनमानसांत रुजवली आहे. अनंत भावे यांनी मुलांसाठी लिहिलेलं लिखाण त्यांच्या शब्दांतून संगीत, नाद, ताल यांची ओळख करून देत जीवनमूल्यांची पेरणी करणारं आहे.
अनंत भावे म्हणतात,
हे नच पुस्तक, ही तर खिडकी
जग भवतीचे बघण्यासाठी
हे नच पुस्तक ही तर दुर्बिण
अदृष्टाला भिडण्यासाठी
हे नच पुस्तक हा परवाना
विश्वनागरिक होण्यासाठी
हे नच पुस्तक हा तर आरसा
स्वत:लाच ओळखण्यासाठी
वीणा गवाणकरांचा कार्व्हर्र तर घराघरात पोहोचला आहे, पण त्याचबरोबर त्यांची सालिम अली, रॉबी डिस्ल्वा, विलासराव साळुंखे, लीझ माईटनर, आयडा स्कडर, ही पुस्तकंही वाचायला हवीत. अच्युत गोडबोले यांना तर लिखाणात कुठलाच विषय वर्ज्य नाही, त्यामुळे त्यांची सगळीच पुस्तकं ज्ञानवर्धन करणारी असतात असं मी म्हणेन. आ. ह. साळुंखे यांनी तर विद्यार्थ्यांना उपयुक्त ठराव्यात आणि विकत घेताना परवडाव्यात अशा छोट्या छोट्या पुस्तिका काढल्या. स्वत:चा अभ्यास, संशोधन करून त्यांनी आपलं लिखाण -शिवराय :संस्कार आणि शिक्षण, एकलव्य, शंबूक आणि झलकारीबाई, बहुजनांसाठी जीवनवादी सुभाषिते, चिंतन -बळीराजा ते रवींद्रनाथ, - सर्वोतम भूमिपुत्र गोतम बुद्घ , विद्रोही तुकाराम ...
जगाचा, व्यापकतेचा अनुभव घेण्यासाठी, आपला दृष्टिकोन विशाल होण्यासाठी, समृद्ध होण्यासाठी - जगभरातलं साहित्य वाचायला हवं - अनुवादित साहित्य जास्त्तीत जास्त प्रकाशित व्हायला हवं. आज मोठ्या प्रमाणात हे काम मधुश्री प्रकाशनचा शरद अष्टेकर हा तरुण करतो आहे. सविता दामले, सुनिल तांबे, माधुरी शानबाग, नंदा खरे अशा अनेकांनी जगप्रसिद्घ पुस्तकांचा अनुवाद या प्रकाशनासाठी अतिशय उत्कृष्टरीत्या केला आहे.
आज आपण पाहतो, पुणे हे देशातंलं महत्वाचं शहर मानलं जातं आणि सांस्कृतिक, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात या शहरानं खूप भरीव योगदान दिलं आहे. इथे अनेक कलाकार, कार्यकर्ते आणि साहित्यिक घडले आणि त्यांनी समाजासाठी आपापल्या कलेची, साहित्याची रुजवणूकही केली. करत आहेत. कारण मुलं वाचत नाहीत असं म्हणून चालत नाही, तर वाचनसंस्कृतीची रुजवणूक करण्यासाठी, जोपासना करण्यासाठी जाणीवपूर्वक मशागत करावी लागते. आणि ती या शहरानं केली आहे.
आज कोरोनानं आपल्याला नवं तंत्रज्ञान आत्मसात करा, त्याचा वापर करा नाहीतर फेकले जाल याचा जणू इशाराच दिला आहे. त्यामुळे आधी साधनांची उपलब्धता करणं हे पायाभूत काम करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्याकडे असलेलं विपुल साहित्य, नव्या लेखक/कवी यांचं दमदार साहित्य या नव्या माध्यमाद्वारे पोहोचवणं कठीण नाही. वयोगट बघितला तर आज लहान मुलं आणि तरुण यांना तंत्रज्ञानाची ओळख पटकन होते. आज फेसबुक, व्हॉटसॲप, टेलिग्राम, इन्स्टाग्राम, यूटयूब, ब्लॉग, वेबसाईट या द्वारे आपल्या लिखाणाला एक व्यासपीठ मिळतं आहे आणि तेही विनाशुल्क. तंत्रज्ञानाचा वापर मानवाच्या समृद्घतीसाठी, अर्थपूर्ण जगण्यासाठी, उन्नतीसाठी करायला हवा - त्यासाठी जबाबदारी घेऊन गावागावात, शहराशहरात सजग, सुजाण नागरिकांनी एकत्रित येऊन प्रयत्न करायला हवेत.
उत्पल यानं बोलताना एक इंजिनियर कसा साहित्यक्षेत्राकडे वळला याची कहाणी थोडक्यात सांगितली. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळे लेखक/कवी भेटतात, ते वेगवेगळ्या विषयांवरची आपली गोडी वाढवतात, पण आपण तिथेच न थांबता पुढे पुढे जात राहिलं पाहिजे. सुरुवातीच्या गोष्टी ऐकण्याच्या काळापासून ललित, वैचारिक, अशा प्रकारे आपला प्रवास घडला पाहिजे. उत्पलनं काहीशी खंतही व्यक्त केली, ज्या प्रमाणे आगरकर, लोकहितवादी, फुले, य. दि. फडके, कुरूंदकर यांच्या लेखणीनं समाजाला वैचारिक दिशा देण्याचं काम केलं, तशी लेखणी आणि तसे लोक कमी प्रमाणात दिसतात.
विशेषत: त्यानं वाचनाबरोबरच दृकश्राव्य माध्यमांचा वापर किती समर्थपणे करता येतो हे उत्पलने सांगितलं. पुस्तकांबरोबरच चित्रपट माध्यम आपल्या मनावर कसा प्रभाव टाकणारं आहे हेही सांगितलं. मात्र या सगळ्यांत मूळ कंटेंट ताकदवान असेल तर सगळंच पुढलं चांगलं होतं. आज डिजिटल माध्यमानं वाचकांवर/प्रेक्षकांवर अक्षरश: आक्रमण केलंय. दृकश्राव्य माध्यम आपल्याला पॅसिव्ह बनवतं, तर प्रत्यक्ष वाचन आपल्याला ॲक्टिव्ह बनवतं. साधी जीएंची कथा वाचली, तर वाचणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा अनुभव वेगळा असू शकतो. पुस्तकात साठलेल्या ज्ञानाची बरोबरी करताच येत नाही. मुख्य म्हणजे लोक म्हणतात, म्हणून वाचायचं की आपली आतली उर्मी आवाज देतेय म्हणून वाचायचं हा प्रश्नही उत्पलने केला.
उत्पल असो की मी, आम्हाला दोघांनाही हेच वाटतं की पुस्तकं केवळ वाचण्यासाठी नसतात, तर ती आपल्यामध्ये काय बदल घडतोय याच्या प्रतीक्षेत असतात आणि तो बदल घडवून आपण या पुस्तकांचं ऋण फेडायला हवं.
आजच्या वेबिनारने खरोखरंच मजा आ गया.
जहाँ चार यार मिल जाये, वही रात हो गुलजार
प्रमाणे चार म्हणजेच कलाम, शमा, उत्पल आणि माझं झालं. जळगाववासियों आपका क्या कहना है?
दीपा देशमुख, पुणे.